केशव शिंदे हा एक लहानपणापासूनचा माझा एक मित्र.माझा मित्र म्हणण्याऐवजी मी त्याचा मित्र असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.कारण त्याच्या दारापुढे त्यानेच लावलेले अशोकाचे झाड हे आमच्या दृढ मैत्रीचे खास द्योतक. श्रीकापरेश्वर निस्सीम भक्त असलेल्या भागोजी शिंदे यांचा द्वितीय सुपुत्र. एड्गाव, जुन्नरचे मूळ रहिवासी असलेले भागोजीबाबा निर्वतल्यावर त्यांची गादी खुल्या मनाने स्वीकारीत सांजसकाळ कापरीबाबाच्या चरणीलीन होत नामस्मरणाचा रोग जडलेले आगळे वेगळे दिलखुलास व्यक्तिमत्व. चांगल्या विचाराची उंची असलेला सहा फुटी मध्यम बांध्याचा एखाद्या स्वच्छ सुंदर निर्झरा सारखा खळाळून हसणारा. हसताना कंजुषी नाही पण खर्च करताना विचारू नका. मोकळा ढाकळा एखाद्या रानवाऱ्याप्रमाणे गेली तपभर कराड पासून चालत चालत पंढरपुरी विठ्ठलाच्या दर्शनाचा उत्साही भक्त. हळवा गडी शेजारी राहायचा. निर्मळ मनाचा आरसा. कधीही पोटात एक आणि ओठात एक अशी एक गोष्ट नसायची. येत्या ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहे. खरं तर आम्ही दोघांनी या पदासाठी अर्ज केला होता. दोघांचे अर्ज मीच लिहिले. पण बाबा त्याच्यावर प्रसन्न झाले. बृहन्मुंबई महानगर पालिकेत गेली ३५ वर्षे सुरक्षारक्षक म्हणून काम केले. अगदी काही वर्षे बाकी असताना देवाची लीलया म्हणावी त्याने या भोळ्या भक्ताला के ई एम रुग्णालयात सेवेला पदोन्नती देऊन सेवेला धाडले. अपघाती, तर खाजगी रुग्णालय न परवडणारे रुग्ण, नातेवाईक यांच्या चेहऱ्याकडे पाहत त्याला वेदना होऊ लागल्या. नाकावर आलेला चष्मा वर घेण्याचे निमित्त करीत हळूच डोळ्यांच्या किनारी पुसून मनाला उभारी देत मुखातून हळव्या मनानं मारुती स्तोत्र उच्चारत... लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना,पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका... या गरीब बापुड्यासाठी साद घालणारा. आपल्यासाठी परदु:ख शितल असते पण दुसऱ्यासाठी दिवस रात्र तळमळताना पहिले आहे. आई वडिलांनी नावं ठेवताना त्या भगवंताचे ठेवले. त्या नामात गोडवा आहे. पण एक पाहिले कुणाचं नांव धैर्यंधर असले तरी त्याने झुरळाला घाबरावे....! नावाप्रमाणे वागणे हे फार कमी लोकांना जमते. हुज्जत घालणं त्याला माहितीच नाही.पण फक्त हुज्जत घालतो तो माझ्याशी. विषय कोणताही असो... त्याचा विषय फक्त धार्मिक. या जगात देव आहे...! असं म्हटल्यावर आपणच हळूच कुणी पाहिला रे, असं म्हटले तर महाशय सुरु झाले. लग्नानंतर प्रथम सहचारिणी विठानानी माहेरी गेल्यावर तिने लिहिलेले इंग्रजी पत्र. त्यावर नाऊमेद न होता काय लिहावे म्हणून माझ्याशी केलेली सल्लामसलत. मला त्याने एखादे गुपित रहस्य सांगावे आणि पोटात ठेव म्हणून सांगू नको कुणाला,म्हणजे बर्फाने वितळू नये हा माझ्याकडून आग्रह धरताना माझे मलाच हसू फुटायचे. आता त्या बर्फाने तरी मुंबईच्या दमट हवामानात किती दिवस घुसमटत राहायचे. विठानानी निष्णात स्वयंपाकी. गोडधोड खावे यांच्याच घरचे. तिच्या हातचे अन्नपदार्थ केशवामुळे घरगुती मित्रांपासून कार्यालयीन सहकाऱ्यांनी सर्वांनी चाखले आहेत. इतरांच्या दु:खात समरस होत केशवसारखे आंनदाच्या वाटेवरचा पथिक क्वचित पाहायला मिळतील.कुणावर उपकार केल्याचे भाव न दिसू देता सतत हसत राहणारा...! या वरून आठवलं एकदा देव्हाऱ्यात थैमान घातलेल्या उंदरामुळे मेटाकुटीस आलेल्या केशवाने काठी काढून मारण्याऐवजी,रूप तुझे देखणे,सर्वांगाने लोभसवाणे, तयांत पूर्ण भक्तिचे लेणे, शोभे तुजला….... असे मंत्रोच्चार म्हणत त्यालाच हसत हसत नमस्कार करावा उलट उंदराने देखील पुढचे दोन्ही पाय जुळवीत प्रतीनमस्कार करताना मी पाहिले आहे. त्याच्यासारखा तोच देवा...सूर्यास्ताच्या वेळी सुरक्षित ठिकाणी परतणारे प्राणी पक्षी,पिल्लाच्या ओढीने हंबरणारी गाय या प्रमाणे संध्याकाळी ७.३० च्या कापरेश्वराच्या आरतीची घंटा केशवाला ‘ये रे बा विठ्ठला’ म्हणून साद घालीत असते. धावतपळत हजर होणाऱ्या केशवामुळे गाभाऱ्यात आरतीचा रव वरच्या ढंगी पोहचत असे.
आम्ही तरुणपणी अनेक ठिकाणी एकत्र काम केले. एका ठिकाणी १२ तासाला रु.४.१५ पैसे सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना तिथल्या ठेकेदाराने पगार देताना त्यामध्ये देखील गाळा मारला असताना केशवाच्या अंगी अकल्पित बळ कुठून आले हे त्या ईश्वराला ठाऊक. मेणासारखा मऊ माणूस वज्रासारखा कठीण झालेला पाहिला. हेच धैर्य दुचाकी वाहन, सायकल शिकतानाकोठे गेले ठाऊक नाही. पण मी पाहिले ही धार्मिक माणसामध्ये एक अदुष्य शक्ती असते.एक आंधळा माणूस एका धार्मिक ब्रम्हचारी माणसाला भेटायला आला होता. बाबा तुमच्याविषयी खूप ऐकले आहे. ‘मला दृष्टी तुम्हीच देऊ शकता...!’ त्या बाबांनी हे थोतांड असल्याचे सांगितले. “मी काय तुला दृष्टी देणार....!, मी ईश्वराची पूजा फक्त माझ्या आत्मिक समाधानासाठी करतो.मी माझ्यासाठी कधी देवाकडे मागितले नाही. मग मी तुला कसे देणार...!” तरीही ती आंधळी व्यक्ती म्हणाली, बाबा... “तुमचा परमात्म्याशी थेट सबंध असल्याचे माझे मन सांगत आहे. फक्त एकदा त्या ईश्वराला माझ्यासाठी विनंती करा.” आंधळा आपल्या आग्रहावर हटून बसला.बाबा म्हटले असे घडले असते तर जगात कोणी आंधळा जन्माला आलाच नसता. पण तो ऐकत नाही. म्हटल्यावर बाबांनी त्याच्यासाठी त्या नारायणाला, केशवाला गाऱ्हाणे घातले. आंधळ्याने त्यांच्या पायावर डोके ठेऊन आशिर्वाद घेतले तेव्हा त्या बाबांचा स्पर्श त्याला बरेच काही सांगून गेला. आंधळा आनंदाने घरी परतला. एक महिन्यांनी त्याला अंधुकसे दिसू लागले. हळूहळू त्याला दृष्टी आली.केशव नामाचा गोडवा असाच आहे. जो निस्वार्थ भावनेने धार्मिकता जोपासतो. परमेश्वरापुढे तल्लीन होतो. त्यानी इतरांसाठी जर काही मागितले तर देव उशिरा का होईना त्यांच्या पदरात सुख घालतो. मित्र या नात्याने आम्हांसाठी केशवाने ईश्वराकडे मागितले पण स्वत:साठी नाही. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. त्यांचा स्वभाव साधा, सरळ हे त्यांच्या मनावर रुजलेल्या धार्मिकतेचे प्रतिक असते.घरच्यांचे, गुरुजणांचे संस्कार असतात. स्वार्थाची, अहंकाराची कवचकुंडले फेकून ममत्वाच्या वाटेवर चालणाऱ्या *केशवाचे वाढदिवस अभिष्टचिंतन* करताना त्यांना दीर्घायुष्य लाभो, म्हणून देवाकडे नक्कीच हे मागणे मागण्याचा मला तरी हक्क आहे. आम्ही एकमेकांशी मनाने जोडलेलो आहोत. ममत्वाचा लवलेश नसलेला हा सह्रदय माणूस मला मित्र म्हणून दिल्याबद्दल मला त्या ईश्वराचे आभार प्रकट करायला आवडेल.
*अशोक भेके*
अशोकजी क्षणभर मी माझाच लेख
अशोकजी क्षणभर मी माझाच लेख वाचतोय असे वाटले. काही उपमा अगदी जश्याच्या तशा. उदाहरणार्थ
"कुणाचं नांव धैर्यंधर असले तरी त्याने झुरळाला घाबरावे....! नावाप्रमाणे वागणे हे फार कमी लोकांना जमते. "
वापरायला हरकत नाही पण माझ्या त्या लेखाला आपण प्रतिसाद देण्याचेही कष्ट घेतले नाहीत. तरीही धन्यवाद. कारण अप्रत्यक्षपणे माझा लेख आवडल्याची पोचपावतीच ती.
https://www.maayboli.com/node/68337
हो तेच ना, दत्तात्रय यांच्या
हो तेच ना, दत्तात्रय यांच्या मूळ लेखात थोडीफार फेरबदल करून इकडचे तिकडचे चार शब्द जोडून कॉपी पेस्ट केलेला लेख वाटतोय.