भाग पहिला https://www.maayboli.com/node/68516
भाग तिसरा ( अंतिम) https://www.maayboli.com/node/68557
सकाळी नऊ-सव्वानऊला आमची ओटीडीसीची टूर सुरू झाली. कोणार्कच्या दिशेने जाताना वाटेत पिपिली नावाचं गाव आहे. तिथे हस्तकलेच्या विविध प्रकारच्या वस्तू बनवतात. नारळाच्या काथ्यापासून, करवंटीपासून सुंदर सुंदर वस्तू केलेल्या होत्या. पामच्या पानावर केलेली चित्रकला ही ओडिशाची खासियत आहे. रघुराजपूर नावाचं दुसरं एक गाव त्यासाठी सुप्रसिद्ध आहे. आम्ही मात्र पिपिलीवरच समाधान मानलं. थोडीफार खरेदी झाली आणि आमची टेंपो ट्रॅव्हलर कोणार्कच्या दिशेने निघाली. रस्ता छान होता. साधारणपणे अकरा-साडेअकरा वाजता कोणार्कला पोचलो. एक गाईड घेतला. कारण त्याशिवाय सूर्यमंदिराबद्दलचे बारकावे कळले नसते.
सूर्यमंदिर पाहून आपण अवाक होतो. त्याची भव्यता चकित करून टाकते. मुख्य मंदिर जरी कोसळलेलं असलं तरी ’ ढासळलेले बुरुज सांगतात, मूळचा गड किती बुलंद होता ते’ ! मंदिरासमोर दोन्ही बाजूला सिंह, त्याखाली हत्ती आणि त्याहीखाली माणूस, अशी शिल्पं आहेत. सिंह हे संपत्तीचं आणि हत्ती हे सत्तेचं प्रतीक आहे. सत्ता आणि संपत्ती माणसाला चिरडते असं दाखवणारी ही शिल्पं आहेत.
सूर्यमंदिराची रचना रथाच्या आकारात केलेली आहे. दोन्ही बाजूंना बारा-बारा चाकं आणि पुढे रथ ओढणारे ७ घोडे. कोणार्कच्या सूर्यमंदिराची ’ ओळख’ म्हणता येईल असं शिल्प म्हणजे हीच सुप्रसिद्ध चाकं. जुन्या वीसच्या नोटेवर आणि नवीन दहाच्या नोटेवर याच चाकाचं चित्र आहे.
रथाचे घोडे मात्र आता भंगून गेलेले आहेत. चाकंही काही सगळी सुस्थितीत नाहीतच. ही चाकं पूर्वपश्चिम दिशेने आहेत आणि रोचक बाब म्हणजे ही चाकं वापरून आपल्याला दिवसाची वेळ सांगता येते. एखादी सरळ काठी चाकाच्या मध्यबिंदूकडे रोखून धरली, की तिची सावली कुठे पडते यावरून अचूकपणे वेळ कळते. उत्तरायणात उत्तर बाजूच्या चाकांवर सूर्यप्रकाश पडतो, दक्षिणायनात दक्षिण बाजूच्या चाकांवर. प्रत्येक चाकावर सुरेख नक्षीकाम आहे. मंदिराला पूर्वेच्या बाजूला तीन दरवाजे आहेत. सूर्य जेव्हा मकरवृत्तावर जातो (उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस), तेव्हा सकाळी सूर्य उगवल्यावर त्याचे किरण मुख्य दरवाज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या दरवाजातून आत शिरतात. याउलट जेव्हा सूर्य कर्कवृत्तापर्यंत जातो, (उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस) तेव्हा मुख्य दरवाज्याच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजातून सूर्यकिरण आत शिरतात. जेव्हा दिवस-रात्र समसमान असते, म्हणजेच ज्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तेव्हा सकाळी पहिले सूर्यकिरण मधल्या मुख्य दरवाजातून आत शिरतात. इ. स. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे. पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिरही याच सुमारास बांधलं गेलेलं आहे.
सूर्यमंदिरावरची शिल्पकला अतिशय सुंदर आहे. अनेक कथा, प्रसंग त्या दगडी शिल्पांमधून जिवंत केलेले आहेत.
यात समुद्रमंथनाचा देखावा आहे.
यात श्रावणबाळाची कथा आहे.
हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. यात कलिंगाचा राजा हत्तीवर बसलेला दाखवला आहे आणि त्याला भेट म्हणून एक जिराफ नजर केलेला दाखवला आहे. जिराफ या आफ्रिकन प्राण्याचा जुन्या भारतीय शिल्पकलेतला हा एकमेव उल्लेख आहे. अरबी व्यापार्यांनी आफ्रिकेतून हा जिराफ आणून कलिंगाच्या राजाला नजर केला असावा.
हे मंदिर दगडी असलं तरी दगड एकत्र ठेवण्यासाठी आत लोखंडी कांबींचा वापर केलेला आहे.
असं म्हणतात की मुख्य देवळाच्या कळसात एक मोठा चुंबक होता. पोर्तुगिजांनी काही कारणाने तो काढला आणि त्यामुळे मंदिर कोसळलं. खरंखोटं माहिती नाही. मंदिराचं अजून काही नुकसान होऊ नये यासाठी १९०३ मध्ये आतला भाग चिणून बंद केला गेला. तिथे जायला मनाई आहे, पण तरीही नियम हे मोडण्यासाठीच असतात असा ठाम विश्वास असणारे काही महाभाग असतातच.
कोसळलेल्या मंदिरातली काही शिल्पं कोणार्कमधल्याच संग्रहालयात ठेवलेली आहेत. पण टूरच्या कार्यक्रमात त्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे ती पाहता आली नाहीत याची रुखरुख लागली. काही मोठे दगडी भाग मंदिराच्या आवारात ठेवलेले आहेत. प्रचंड अवजड अशा लोखंडी कांबीही आहेत.
सूर्यमंदिर पाहून आम्ही भारावून बाहेर पडलो. उन्हात फिरून मुलंही दमली होती. बाहेरच असलेल्या शहाळीवाल्याकडून शहाळी घेतली. ते मधुर पाणी पिऊन खूप छान वाटलं. ओटीडीसीच्या ठरलेल्या हॉटेलमधे जाऊन जेवलो आणि परत गाडीत बसून पुरीच्या दिशेने निघालो.
जगन्नाथपुरीला एक अस्पष्ट गूढतेचं वलय आहे. मंदिरात जगन्नाथ ( श्रीकृष्ण), बलभद्र ( बलराम) आणि सुभद्रा या तीन देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती दगडी किंवा धातूच्या नसून लाकडी असतात. दरवर्षी आषाढात प्रचंड मोठ्या लाकडी रथांतून त्यांची यात्रा निघते. (जगन्नाथाच्या रथावरून इंग्लिशमधे जगरनॉट हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ अवजड, प्रचंड असा आहे.) मंदिरात बनवला जाणारा प्रसाद, म्हणजेच ’ भोग’ हा एक स्वतंत्रच विषय आहे. मातीच्या भांड्यांमधून भात आणि कडधान्याचा हा प्रसाद प्रचंड प्रमाणात रोज शिजवला जातो. पुरीला रोज सरासरी चार हजार भाविक भेट देतात. एकंदरीत जगन्नाथपुरी हे भव्य, प्रचंड असं प्रकरण आहे. मंदिर संपूर्ण दगडी आहे. मंदिरावरचा कापडी ध्वज रोज संध्याकाळी बदलतात. एका विशिष्ट कुटुंबातील माणसेच पिढ्यानपिढ्या हे काम करत आलेली आहेत. आम्ही गेलो तेव्हा नेमका हा ध्वज बदलण्याचा कार्यक्रम चालू असल्यामुळे आम्हाला पहायला मिळाला. इतक्या उंचावर त्या माणसाला चढून जाताना आणि ध्वज बदलताना बघून जरा भीतीच वाटली, पण त्यांच्यासाठी तो सवयीचा भाग असणार. मंदिरात खूप गर्दी होती. फोन, कॅमेरा, चप्पल, कुठलीही चामडी वस्तू (पाकीट, पट्टा वगैरे) देवळात नेऊ देत नाहीत. बाहेर पैसे घेऊन या वस्तू सांभाळणारे दुकानदार अर्थातच आहेत, पण आम्ही हे सगळं गाडीतच ठेवून अनवाणीच गेलो. गाड्याही मंदिरापासून लांब पार्क कराव्या लागतात. चालत जाता येतं, किंवा सायकलरिक्षाही असतात. वस्तू गाडीत ठेवण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरला, कारण त्या वस्तू ठेवायला आणि परत घ्यायलाही प्रचंड गर्दी होती आणि नेमकी जागा सापडणेही कठीण होते. बर्याच जणांनी आम्हाला तिथल्या पंड्यांबद्दल भरपूर सूचना दिल्या होत्या. पंड्ये त्रास देतात, पाठीशी लागतात, पैसे उकळतात वगैरे. पण आम्हाला तरी असा काही अनुभव आला नाही. गर्दी मात्र प्रचंड होती. जेमतेम दर्शन झालं. लांबूनच. बाहेर आल्यावर ध्वज बदलताना पाहिलं, प्रसाद जिथे विकत मिळतो तो आनंद बझार पाहिला. पण का कुणास ठाउक, प्रसाद विकत घ्यावासा मात्र आम्हाला वाटलं नाही. अगदी आईबाबांनाही नाही. कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्न पाहून ते खावंसं वाटलं नाही. बाहेर पडण्याच्या रस्त्यावर गर्दीत चक्क तीन-चार मोकाट बैल सैरावैरा पळत सुटले होते. कसेबसे चालत तिथून मुख्य रस्त्यावर आलो. जवळजवळ एक किलोमीटर चालत गाडीपर्यंत गेलो. ज्या प्रमाणात गर्दी तिथे रोजच्या रोज असते, त्या मानाने स्वच्छता मात्र खरंच चांगली होती.
ज्यावर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्यावर्षी जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती घडवल्या जातात. मूर्तींना ’ कलेवर’ असा शब्द वापरतात. नवीन मूर्ती म्हणजे नवकलेवर ( नबकलेबर). अधिक आषाढ दर आठ, बारा किंवा अठरा वर्षांनी येतो. नवीन मूर्ती बनवण्याचाही एक ठरलेला विधी आहे. विशिष्ट लक्षणं असलेलं ( रंग, फांद्यांची संख्या, खोडावरची चिन्हं इत्यादी) कडुनिंबाचं झाड त्या त्या मूर्तीसाठी निवडलं जातं. त्या लाकडाला ’ दारु ब्रह्म’ म्हणतात. दारु म्हणजे लाकूड. ते झाड प्रथम सोन्याच्या, नंतर चांदीच्या आणि शेवटी लोखंडी कुर्हाडीने तोडतात. वाजतगाजत ही लाकडं मंदिराच्या परिसरात आणतात. त्यांच्या मूर्ती घडवतात. जुन्या मूर्तींसमोर या नव्या मूर्ती ठेवतात आणि त्यांना रंगरंगोटी केली जाते. हा विधी ’ अनवसर’ म्हणून ओळखला जातो. नवीन मूर्तींमधे जुन्या मूर्तींमधला प्राण काढून घालण्याचा विधी डोळे बांधून केला जातो असं म्हणतात. जुन्या मूर्तींना ’ कैवल्य वैकुंठात' नेतात, म्हणजेच स्मशानात. तिथे त्यांना एका कूपात ठेवून वरून माती घातली जाते. ’ वासांसि जीर्णानि यथा विहाय...’
इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधल्या ’ नवकलेवर’ या कथेत/ लेखात हा सगळा विधी वर्णन केला आहे. कलेवर हा शब्द, प्राण काढून नवीन कलेवरात घालण्याची पद्धत, जुन्या मूर्तींना पाण्यात विसर्जित न करता मातीखाली पाठवणं हे सगळं गूढ वाटतं. शिवाय काही अंधश्रद्धाही या सर्वाशी निगडित आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांनी जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे होणार्या हस्तांतरणाशी याचा संबंध जोडला आहे. जगात रोज हा नवकलेवराचा उत्सव चालू असतो. कीटकांमधे जुन्या आणि नव्या कलेवरांची भेटच होत नाही. अंडी घालून पतंगाची मादी मरून जाते. उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांवरच्या प्राण्यांमध्ये मात्र हा ’ अनवसर’ काळ बराच मोठा असतो. कारण आचार-विचारांचा, संस्कृतीचा आत्मा नवीन कलेवरांमध्ये ओतायचा असतो. हे काम झालं की मात्र सन्मानाने निवृत्त होणंच श्रेयस्कर असतं. तसे जे निवृत्त होत नाहीत, घरात काय, बाहेर काय, सत्तेला चिकटून राहतात, त्यांना शेवटी अपमान, अवहेलना सहन करावी लागते. असा हा एवढा व्यापक विचार सांगणारी ही कथा कॊलेजच्या दिवसांत मनावर वेगळाच परिणाम करून गेली होती. तेव्हापासून मनात असलेली पुरीला जाण्याची इच्छा आज पूर्ण झाली.
कोणार्कजवळच्या चंद्रभागा बीच आणि भुवनेश्वरच्या मंदिरांबद्द्ल आणि लेण्यांबद्दल पुढच्या भागात.
भाग पहिला https://www.maayboli.com/node/68516
भाग तिसरा ( अंतिम) https://www.maayboli.com/node/68557
मस्तच वावे...सुरेख वर्णन
मस्तच वावे...सुरेख वर्णन केलयंस...
सुन्दर !
सुन्दर !
वाले, छान सूर्यमंदीराविषयी
वावे, छान सूर्यमंदीराविषयी वाचून छान वाटलं. प्रकाशचित्र पण छान आहेत. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत
ती छोटी छोटी शिल्पं पाहायची
ती छोटी छोटी शिल्पं पाहायची म्हणजे दोन दिवस हवेत. श्रावणाचं शिल्प फारच कमी आढळतं.
@ वावे,
@ वावे,
कलिंग देशाची सहल आस्ते कदम छान चालली आहे, आज दोन्ही भाग वाचले. जगन्नाथ पुरीचे वैशिट्य म्हणजे अन्यत्र फारसे न दिसणारे siblings / भावंडांचे मंदिर. बहुतेक ठिकाणी देवमूर्ती एकल किंवा युगल रूपात असतात.
इरावती कर्व्यांच्या परिपूर्तीचा उल्लेख विशेष आवडला.
पु भा प्र
अनिंद्य
हाही भाग छान. आय लव्ह ओरिसा.
हाही भाग छान. आय लव्ह ओरिसा. मी १२ वर्शे तिथे बिझनेस निमित्ता ने फिरले आहे. बेहराम पूर कटक भुवनेश्वर. पुरी ला फार जाणे झाले नाही.
भुवनेश्वर मध्ये उदबत्ती व टॉबॅको प्रॉडक्ट्स स्वस्त साबण ह्यांचा बिझनेस आहे. इथे दर वर्शी ओडिसी नाचाचा पण एक उत्सव असतो डिसेंबर फर्स्ट वी क.
खूप छान लिहिलंय! कथेबद्दल तर
खूप छान लिहिलंय! कथेबद्दल तर खास धन्यवाद!!!!
हे सगळं ऐकून कोकोची आठवण झाली!!!
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
छोटी छोटी शिल्पं पाहायची म्हणजे दोन दिवस हवेत. >> अगदी बरोबर! हंपीला गेल्यावरही असंच वाटतं. अशा ठिकाणी परत काही वर्षांनी जायला हवं.
अमा, कोणार्क फेस्टिवल का?
छान लेखमाला...
छान लेखमाला...
जगन्नाथ पुरी च्या खाद्यसंस्कृती वर एपिक वर एक छान कार्यक्रम दाखवलेला.
पुरीला सकाळी आणि कोणारकला
पुरीला सकाळी आणि कोणारकला चार वाजता गेल्याने फरक पडतो. सूर्य माथ्यावर नसल्याने सूर्यमंदिराचे फोटो छान मिळतात.
खूप ओघवती वर्णन शैली.
खूप ओघवती वर्णन शैली.
शेवट तर खरंच कळस चढवतो लेखावर.
प्र. चि. देखील सुंदर.
हाही भाग आवडला
हाही भाग आवडला
वावे, छान लिहिताय.
वावे, छान लिहिताय.
आम्ही दिवाळीच्या सुट्टीत पुरी आणि भुवनेश्वर ला गेलो होतो. आम्ही इथून विमानाने, बाकीचे महाराष्ट्रातून-सिकंदराबाद-खोरदा रोड असा प्रवास करुन. Travel agent कडून हॉटेल, वाहन बुकिंग आणि टूर planning करून घेतले होते. पुरीला राहून सगळीकडे फिरलो. East coast रोडवर hotel होतं, sea facing. परंतु, बेसिन आणि गीझरच्या पाण्याची चव अगदीच वाईट होती
घामासारखी पण त्याहून वाईट. बाकी जेवणाखाण्याचा अजिबात त्रास झाला नाही. ब्रेकफास्ट आणि dinner राहत्या होटेल मध्ये आणि फिरताना भूक लागली तर शहाळी, काकडी, बरोबरचा फराळ असं जमलं.मला परत एकदा फक्त खाण्यासाठी जायला आवडेल.
पुरीच्या देवळाबाहेरचे वातावरण पाहून मला जरा विषणण वाटतं होतं पण मग देवाकडे कोणीच कमी-जास्त नाही, जसे आहात तसे या अशी जाणीव झाल्यावर दृष्टीकोन बदलला.
नंदनकानन चे वाघ बघायला खूपच मजा आली. पाय तुटायची वेळ आली पण वाघ बघून मन भरलं नाही.
पोर्तुगीजांना त्या चुंबकामुळे किनाऱ्यावर येता येत नव्हते म्हणून तो कळस त्यांनी तोफेनी उध्वस्त केला म्हणे.
गुंडेचा मंदिरात आम्हाला पुजाऱ्यांचा त्रास झाला. जबरदस्ती हात हातात घेऊन श्लोक म्हणणे आणि पैसे मागणे, पूजा नको सांगितले तर पुढे जा म्हणणे मग एकदोन ठिकाणी आवाज चढवावा लागला आणि समज द्यावी लागली.
सुरेख वर्णन केलय. फोटो अगदी
सुरेख वर्णन केलय. फोटो अगदी अप्रतिम आहेत. मस्तच!
DShraddha, srd, साळुंकेजी,
DShraddha, srd, साळुंकेजी, शालीदा, राजसी, हर्पेन, मनापासून धन्यवाद!
राजसी, नंदन काननला नाही गेलो आम्ही. पुरीला देवळाबाहेर रस्त्यावर लोक जेवायला बसलेले असतात त्याबद्दल म्हणताय ना? हो ते पाहून खिन्न वाटलं खरं.
वावे, हा ही भाग छान झालाय.
वावे, हा ही भाग छान झालाय. मागच्या अधिक महिन्यात 'कलेवर' लोकसत्तात विस्तृत लेख आला होता त्याची आठवण झाली. त्या मुर्त्या ज्या झाडाच्या करतात ते झाड ४०० वर्षे जुनं हवे त्याचा डायामीटर वै. तपशील होते. जे मुर्ती घडवतात त्यांना स्वप्नात ते झाड कुठे आहे ते दिसतं.........वै. ह्या अश्या काही प्रथांमधून जुनी खोडं टिकून आहेत ही जमेची बाजू.
पुरीचा बीच फार सुंदर आणि निवांत आहे.
सहा वर्षांपूर्वी एका लग्नाला गेलो होतो . कोणार्क पुरी बघितले होते. फक्त पंधरा रुपयात एक गोऽऽऽड शहाळं ! मनसोक्त आनंद घेतला.
हा ही भाग छानच झालाय.
हा ही भाग छानच झालाय.
मंजूताई आणि शशांकजी धन्यवाद!
मंजूताई आणि शशांकजी धन्यवाद!
मंजूताई, हो बरेच निकष असतात झाड निवडताना.