असा निवडुंग झालो मी

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 27 December, 2018 - 05:58

असा निवडुंग झालो मी मला तू त्यागल्यानंतर
फुले होतील काट्यांची पुन्हा तू भेटल्यानंतर

जसे होते तसे आहे गुलाबी पान पत्राचे
फुटे प्रौढत्व शाईला वयाने वाढल्यानंतर

अता ती टाळते आहे जरी माझ्या फुलोऱ्यांना
चटक लागेल श्वासाला स्वतः गंधाळल्यानंतर

तुला नाही म्हणायाला सबळ कारण जरी होते
जिवावर सोडले पाणी तुला होकारल्यानंतर

नको बांधूस इमले तू हवेच्या चौथऱ्यावरती
सुखाने उंबरा माझा पुन्हा ओलांडल्यानंतर

खरी सुरवात झाली का पुन्हा त्याच्या कमाईला
खिसा त्याच्याच शर्टाचा कुणीतर कापल्यानंतर

मला नाही जरासाही जरी अधिकार काडीचा
सिकंदर होत जातो मी जराशी घेतल्यानंतर

© रुपेंद्र कदम 'रूपक'
✍ पुणे 16 ऑक्टोबर 2018

Group content visibility: 
Use group defaults