अल्पायुष्यी चमचमणार्या दवबिंदूंवर भाळलीस का?
अँबीव्हॅली, कधी लव्हासा भ्रामक स्वप्नी रंगलीस का?
तुझ्या महाली झगमगाट पण मनात का अंधार असा हा?
आठवणींना कुरवाळत तू अनेक रात्री तेवलीस का?
नांगरून तू दु:ख आपुले आनंदाचे बीज पेरले
पीक उगवले, पण काटेरी! तुझी तुला तू टोचलीस का?
मोह पडावा तुला असा का? जरी हुबेहुब फुले कागदी
भ्रमर जाणते दूर राहिले, तीच फुले तू माळलीस का?
तिन्हीत्रिकाळी मिष्टान्नाचे ताट असूनी उपासमारी
नजर चुकवुनी धाब्यावरती झुनका भाकर जेवलीस का?
आनंदाचा लेप लावुनी दु:ख कधी का हलके होते?
वर्ख काढुनी आरशात तू उदासवाणे हासलीस का?
बाजी हरता, हार लपवण्या, खोटेनाटे व्यर्थ खुलासे !
एक झाकण्या दुसरे खोटे, हाच मार्ग तू चाललीस का?
काळजातले दु:ख सांगण्या कुणीच नाही तुला आपुले
संग असूनी, मनी एकटी, पोकळीत तू हरवलीस का?
गरीब "निशिकांता"ला सोडुन मार्ग पकडला श्रीमंतीचा
जीवन सारे गुदमर झाले गमावले तू सावलीस का?
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३