सुंदर...एक सुंदर सहृदयी
त्याचे नाव सुंदर हरिहरन पण आमच्यासाठी तो फक्त सुंदर. नावातच त्याच्या स्वभावाचं सौंदर्य ठळकपणे व्यक्त व्हायचं. एखाद्या स्वच्छ सुंदर निर्झरा सारखं खळाळून हसायचा तो. माझ्या बाजूच्या केबिनमध्येच तो बसायचा. तो ऑफिसमध्ये आला आहे याची खबर मला त्याचे खळाळते सातमजली हास्य द्यायचे. कोणी काही विनोद केला तर ही मनमुराद दाद मिळायची. त्याचे खळाळते हास्य त्याच्या निर्मळ मनाचा आरसा होते. कधीही ओठात एक आणि पोटात एक अशी गोष्ट नसायची.
त्याला कधी काही पोटात ठेव सांगायचं म्हणजे बर्फाने वितळू नये अशी अपेक्षा ठेवणं.
त्यांचं कुजबुजण आमच्या आख्या मजल्यावर सहज ऐकायला यायचं. फोनवरून बोलताना रिसिवर अंम्मळ लांब नाही धरला तर तुमच्या कानाचे हमखास दडे बसणार. कधीकधी मी माझ्या केबिन मधून सुंदरशी काहीतरी अर्जंट इंटरकॉमवरून बोलायचो पण त्याचा डायरेक्ट आवाजच रिसिवरच्या आवाजा आधी कानावर आदळायचा .
त्याच्या या सवयी प्रथमदर्शनी खटकायच्या. वाटायचं एवढे कसे मॅनर्स नाहीयेत या माणसाला . पण नंतर पटलं फुलाचं उमलनं जेवढं प्रामाणिक तेवढंच सुंदरचं हास्य आणि मोठ्याने बोलण. त्यात कुठलीही काटछाट नव्हती. असा सुंदर अगदी मोकळा ढाकळा एखाद्या रानवा-या सारखा सर्वव्यापी . आत्ता पहिल्या माळ्यावर तर क्षणात बिल्डिंगच्या शेवटच्या माळ्यावर.
नावाप्रमाणे वागण्याची लय खूप थोड्या माणसात जुळते. बऱ्याचदा नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा अशीच परिस्थिती असते. आई-वडिलांनी आवडीने एखाद्याचा नाव धैर्यधर ठेवावं आणि त्याने झुरळालाही घाबरावं असाच प्रकार असतो ब-याचदा. सुंदर मात्र याला अपवाद होता.
विचाराच्या उंचीला साजेसा उंचापुरा सहा फूट तीन इंच सुदृढ देह. त्यात तेवढेच सुदृढ पण हळवं मन. काळ्याकुट्ट कपाळावर दाक्षिणात्य ब्राह्मण लावतात तो नाम लावला की सुंदर विठ्ठला सारखा सुंदर दिसायचा. बसमध्ये त्याला उभे राहणे कठीण जायचं. मान मुडपून उभं राहचा अंगाची घडी घालावी तसा. कुठल्याही परिस्थितीशी कसं जुळवून घ्यावं यांचं उत्तम शिक्षण मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देते आणि सुंदर ने त्याचा पुरेपूर फायदा उठवला होता.
सुंदरला बसायच्या जागेवरून हुज्जत घालणं माहित नव्हतं. उलटपक्षी एखादी जागा मिळाली तरी तो त्याच्या बाजूला असलेल्या वृद्धाला किंवा महिलेला, लहानग्यानां द्यायचा. हे करतानाही चेहऱ्यावर उपकार केल्याचा भाव मुळीच नाही. उलट चेहरा सतत हसतमुख असायचा.
सुंदर नेहमी फुल बाह्यांचा शर्ट घालायचा. तो कधीच इन करत नसे. मग कुठल्या कॉन्फरन्समध्ये त्याचे भाषण असो किंवा महत्त्वाची मीटिंग असो. पायात चप्पलच. कार्यालयात बऱ्याच वेळा पायातली चप्पल काढून ठेवलेली असायची आणि तो इकडे तिकडे अनवाणी पळत असायचा. नंतर ती चप्पल कुठे ठेवली हे त्याला महत्प्रयासाने आठवायचे. बुटांचे आणि त्याचे काय वाकडे होते मला कधीच समजले नाही. जी गोष्ट चपलेची तीच हातातल्या पेनाची. कुठेही पेन सोडून चालायला लागायचा. बऱ्याचदा माझ्या केबिनमध्ये आल्यावर एखाद्या पेपरवर त्याची सही लागायची मग तो माझा पेन घ्यायचा पण मला आठवणीने तो परत घ्यावा लागायचा. नाहीतर पुढच्या पंधरा-वीस मिनिटात तो पेन कुठेतरी ऑफिस मध्ये इतरत्र पडलेला असायचा आणि ते त्याला आठवायचे नाही . हा विसरभोळेपणा ऑफिसच्या कामाच्या बाबतीत अथवा मित्रांना मदत करण्याचा सवयीच्या कधी आड आला नाही. सुंदरला एखाद्या आजारी माणसाला मदत करायची असेल तर तो त्या माणसाच्या आधीच दवाखान्यात दाखल व्हायचा.
तो आत बाहेर सुंदरच . मी नेहमी म्हणायचो
" तुझ्या आई वडिलांनी खूप विचार करून तुझे नाव ठेवले असावे . त्यांना मुलाचे पाय पाळण्यात दिसले असावे."
जेवढं प्रामाणिक हास्य आणि बोलणं तेवढेचं प्रामाणिक काम.
ऑफिसला यायची वेळ माहीत असायची पण जायची ठरलेली नसायची.
मी मजेने त्याला म्हणायचो
" लेट काम करता याचा अर्थ तुम्ही कार्यक्षम नाहीये."
यावर तो हसून म्हणायचा
"सर काय करू माझा दिवसभराचा वेळ कॉर्डीनेट करण्यात जातो. लोक घरी निघाल्यावर मला निवांत वेळ मिळतो. "
कधी कधी लवकर काम आटोपले तर सुंदर पेक्षा मी खुश व्हायचो. सुंदरला माझ्याबरोबर निघण्याचा आग्रह करायचो. मी त्याला म्हणायचो
" सुंदर ! बघ बाबा लवकर घरी जातोय , घरात घेतील ना . नाहीतर दार बंद व्हायचे ओळखत नाही म्हणून ."
आम्ही तेव्हा लोकलने प्रवास करायचो . फलाटावर आल्यावर सुंदरला आठवायचं माटूंग्यावरुन वाणसामान आणायचय . सुंदर मग रात्रीचे आठ वाजले तरी जायचा. घरी पोहोचेपर्यंत त्याला ११ वाजायचे . जेऊन झोपे पर्यंत १२ वाजले तरी काहीतरी वाचल्याशिवाय त्याला झोप यायची नाही. दुस-या दिवशी तो ९ वाजता कार्यालयात हजर असायचा.
कार्यालय सुरू व्हायच्या आधी एक तास सुंदर कार्यालयात हजर असायचा .
कधी मी त्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटांत कारने किंवा रिक्षाने निघायचो पण तोवर सुंदर निघून जायचा . कधी कधी आम्ही दोघे एकाच वेळी पोहचायचो . कधीही हिशेबी स्वभाव नव्हता की याच्या बरोबर गेलो तर आपला प्रवासखर्च वाचेल. त्याच्या अगदी उलट दिवस सरताना. म्हणायचा घरी जाऊन कुठं हजेरीपट सही करायचाय. सुंदर म्हणजे सर्वस्व कार्यालयाला वाहिलेला माणूस . एवढी कार्यनिष्ठा सरकारी कार्यालयात अपवादात्मकच.
सुंदर आमच्या संस्थेत एक फॅकल्टी मेंबर होता. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी सुंदर एक तास आधीच कार्यालयात पोहोचायचा. प्रशिक्षण वेळेवर चालू करायचा . प्रशिक्षणार्थी उशिरा आल्यावर सुंदरची प्रशिक्षणातली एकाग्रता भंग पावली तरी त्याची काणउघाडणी खूप मृदू शब्दात व्हायची.
" तुमचे रोजचे कार्यालयीन काम वेगळे आणि प्रशिक्षण वेगळे. काम उरले तर उद्या होवू शकते पण प्रशिक्षण नाही . आम्हाला दिलेल्या मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. तेव्हा कृपया सहकार्य करा ."
" ही संस्था म्हंजे आपलं घर. मग आपल्या वागण्यात ती आत्मियता का नाही ? "
सुंदर म्हणायचा संस्थेचं अस्तित्व प्रशिक्षणार्थींमुळं. प्रशिक्षणार्थीचे स्थान त्यामुळे सर्वोच्च. त्याला प्रौढ प्रशिक्षण (Androgogy) आणि बाल प्रशिक्षण ( Pedagogy ) यातला फरक निट कळायचा. त्यामुळे सुंदरचा प्रशिक्षणार्थींशी कधीही संघर्ष होत नसे.
आमच्या संस्थेशी संलग्न कार्यालयात बढतीसाठी परिक्षा होत. त्या परिक्षेची तयारी करणाऱ्या स्टाफ मेंबर्सना तो अध्ययन सामग्री पुरवण्यापासून कोचिंग पर्यंत सारी मदत निःशुल्क करायचा. गरज भासल्यास सुटीची आहुती देऊन हा ज्ञान यज्ञ पार पाडायचा. परीक्षेत पास उमेदवार सुंदर साठी पेढ्यांचा बॉक्स घेऊन यायचे . सुंदर ते पेढे अॉफिसभर वाटायचा. हा वाटून खाण्याचा गुण बहुदा त्याला त्याच्या नावातील हरिने दिला असावा.
कुठलेही काम आजच करुया हाच वकुब असायचा त्याचा न जाणो आजची परिस्थिती उद्या बदलली तर.
कार्यालयात खर्च झालेल्या वेळा व्यतिरिक्त उरलेल्या वेळात घर, मित्र, नातेवाईक . एकंदरीत सगळ्या आघाड्यांवर सुंदर मुंडकं तुटलेल्या मुरारबाजीच्या निष्ठेने लढत असायचा .
सुंदर आमच्या संस्थेत संगणकाचे प्रशिक्षण द्यायचा त्यामुळे तंत्रज्ञानाशी त्याची सुंदर मैत्री होती. नवनवीन संगणक प्रणाली हाताळण्यात त्याचा हातखंडा होता. डेटा रिट्रीवल, डेटा अनालिसिस, डेटा स्टोरेज, आय एस सिक्युरिटी वगैरेची त्याला इतंभूत माहिती होती. काही प्रणाली तर त्याने स्वप्रयत्नाने शिकल्या होत्या. त्याला नेटवर्किंगचे देखील सखोल ज्ञान होते. आमच्या प्रशिक्षण संस्थेतला तो प्रशिक्षणार्थींचा आवडता प्रशिक्षक होता. प्रशिक्षणाव्यतिरिक्त तो संगणक
देखभालही करायचा.
संगणकाची मुलभूत माहिती नसलेले प्रशिक्षणार्थी पूर्वी परिचयात्मक प्रशिक्षणासाठी यायचे ते एकाच प्रणालीच्या एकाधिक विंडोज उघडायचे. परिणामी संगणक हॅंग होणे , कुठे काय केले याचा ठावठिकाणा न लागणे. सुंदर म्हणायचा
" जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही तेव्हा बाजूच्या मॉनिटरवर काय आहे ते पहा किंवा शेजाऱ्याला काय चुकले ते विचारा. त्याला ते पटकन कळते. "
संगणक प्रणाली लिहिताना तर हे तत्त्व खूप वेळा अनुभवास येते. आपले चुकलेले कोड आपला शेजारी पटकन दुरुस्त करतो. कारण आपल्या कोड कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ठरलेला असतो पण तेच कोड त्रयस्थाच्या नजरेने वेगळे दिसते. खऱ्या आयुष्यातही असचं होतं आपल्या चुका आपल्याला कळण्याआधी आपल्या जवळच्यांना कळलेल्या असतात.
संगणक हॅंग होणे किंवा मल्टिपल विंडोज ओपनिंग प्रॉब्लेम यावर सुंदर एक भन्नाट जोक सांगायचा .
" एकदा एका जीपमधून काही लोक जात होते. जीप अचानक बंद पडली. ड्रायव्हरने बेसिक चेक अप्लाय केले पण समस्या काय हे कळले नाही. मग ड्रायव्हरने सर्वांना खाली उतरायला सांगितले. थोडावेळ खाली उतरले सगळे. थोड्यावेळाने सगळे जीप मध्ये बसले आणि जीप स्टार्ट झाली. थोडक्यात सगळ्या विंडोज बंद करा प्रोग्राम मधून बाहेर या आणि कम्प्युटर रिस्टार्ट करा."
मुंबईसारख्या ठिकाणी कधी ट्राफिक मुळे एखाद्या फॅकल्टीला यायला उशीर झाला तर सुंदर त्यांचे व्याख्यान चालू करायचा. यात प्रशिक्षणार्थींचे नुकसान होऊ नये हा उदात्त हेतू असायचा . काम वेळेत होण्याशी मतलब. ते कोण करतं हे गौण. सुंदर नेहमी संस्थेचं व्हिजन, मिशन स्वत:चं मानायचा . अशी एकरूपता म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची त्या संस्थेशी, तिथल्या कामाशी नाळ जुळलेली असणं.
अनेकदा नवीन ट्रेनिंग चालू होणार असेल तर आधी लॅब तयार करावी लागायची. त्यासाठी सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन असायचे . बऱ्याचदा या कामासाठी सुंदर ला दिवसा वेळ मिळायचा नाही. मग तो ते काम कार्यालयीन वेळेनंतर करायचा किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर सुटीच्या दिवशी करायचा. ताप येण्यासारख्या किरकोळ तक्रारी तो कार्यालयीन कामासाठी सहज दुर्लक्षित करायचा.
वसतिगृहात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल तरी सुंदर सगळे इंटरनेट पॉइंट चेक करायचा. त्यासाठी इंजिनिअरची वाट पाहयचा नाही. लॅब तयार करताना कम्प्युटर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणे वगैरे कामासाठी देखील तो अटेंडंट ची वाट पाहायचा नाही तो स्वतः हमाली करायचा.
ऑफिस कामात हे त्याचे , हे माझे असा पंक्तिप्रपंच त्याला कधीच मान्य नसायचा . Division of labour अथवा Right Person, Right Job या आणि अशा संकल्पना त्याला गौण वाटायच्या. या दृष्टिकोनामुळे त्याच्यावर कामाचा जादा लोड असायचा आणि त्याला त्रास व्हायचा. त्याला सांगायला लागायचे ऑफिसचा एक खांबी तंबू करू नकोस.
कधी कधी आमची इतर कार्यालये त्यांची इन हाउस ट्रेनिंग आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कंडक्ट करायची. त्यावेळी आमचा रोल मंडप कॉन्ट्रॅक्टरचा असायचा. पण सुंदरच्या सहभागा मध्ये फरक पडलेला नसायचा. त्याचा उत्साह अगदी लग्न घरा सारखा असायचा.
जगात रुढअर्थी व्यवहारकुशल माणसांची बजबजपुरी असताना व्यवहारावर तुळशीपत्र ठेवणारा मला भेटलेला एक सच्चा माणूस. संपत्ती साठी भावाभावातही बेबनाव असतो. पण सुंदरने त्याला मिळालेले वडिलोपार्जित घर आपल्या अविवाहित मोठ्या भावाच्या नावावर केले होते. त्याचा भाऊ देखील त्याच्याबरोबरच राहायचा त्याचा सगळा खर्च हाच करायचा. असं करताना त्याला कधीच वाटलं नाही की हा अविवाहित आहे त्याला काय करायचय घर. नाहीतरी माझ्या सोबतच तो राहतो. मला एक लहान मुलगा आहे त्याचे शिक्षण आहे. मी स्वतः सरकारी घरात राहतो. तो ते घर विकून आलेले पैसे स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करेल असे देखील त्याला कधी वाटले नाही. त्याला भेट म्हणून मिळणाऱ्या वस्तूदेखील तो कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना देऊन टाकायचा.
आपल्या साठी परदु:ख शितल असते पण हा माणूस इतरांसाठी सुद्धा दिवस-रात्र तळमळताना पाहिलाय.
आमच्या कार्यालयात एक रोजंदारीवर ड्रायव्हर होता. तो संचालक ची गाडी चालवायचा. थोडा उर्मट स्वभाव . तसं पाहिल तर हा घरचा अत्यंत गरीब मुलगा. जेमतेम दहावी पास. आई आजारी असायची. त्याला ड्रायव्हिंग चांगले येत होते पण खाजगी कंपनीत भरपूर पिळवणूक आणि पगार अत्यंत कमी मिळत होता म्हणून त्याला काही दिवसासाठी आमच्या ऑफिसमधे रोजंदारीवर ड्रायव्हर म्हणून ठेवले.
आमची प्रशिक्षण संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी साठी वसतिगृह आहे. तेथे बाहेरून आलेले प्रशिक्षणार्थी राहतात. एक दिवस ड्रायव्हर भरपूर दारू पिऊन रात्री रिसेप्शन काउंटरवर आला. तेथील लोकांना म्हणू लागला
तुम्हाला धड काम करता येत नाही. कुठल्या गाढवानं ठेवलं तुम्हाला कामावर. तुमची लायकी नाही. नशेत त्यांना कुठलाही लॉजिक नसलेले प्रश्न विचारू लागला.
" मुंबई महाराष्ट्रात आहे तसं बिहार कुठल्या राज्यात आहे सांग नाहीतर राजीनामा दे "
वॉचमनकडून वसतीगृहाच्या एका खोलीची चावी घेतली आणि रात्री उशिरा खोलीत जाऊन झोपला. हा प्रकार सगळ्यांनाच खूप त्रासदायक होता . नियमाप्रमाणे फक्त अपवादात्मक परिस्थितीत ऑफिसचे काम असेल तर वसतीगृहात स्टाफ झोपू शकत होता, तेही संचालकांच्या पूर्वपरवानगीने .
दुसऱ्या दिवशी ही बातमी कार्यालयात पसरली . सुंदरकडं प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार होता. मनावर दगड ठेवून सुंदरने हे सारे संचालकांना रिपोर्ट करायचे ठरवले. सुरुवातीला त्याचे मन तयार होत नव्हते कारण त्या ड्रायव्हरच्या घरची परिस्थिती. पण नंतर वाटले आपण जर ते संचालकांना सांगितले नाही तर दुसरीकडून कुठून तरी त्यांना ते कळेल आणि आपल्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. दुसरे म्हणजे तसे नाही केले आणि संचालकांना जरी नाही कळाले तरी ऑफिसची शिस्त बिघडेल.
टू बी ऑर नॉट टू बी अशा विचित्र कोंडीत तो सापडला.
पण शेवटी त्याच्यातला सत्यनिष्ठ माणूस जागा झाला. त्याने भावनांवर विजय मिळवला आणि एक सविस्तर नोट संचालकांकडे गेली. त्या नोटेचा शेवट असा होता.
" सदर ड्रायव्हर कामात निष्णात आहे. तो वक्तशीर देखील आहे आणि गेली दोन वर्ष तो त्याचे काम उत्तम रीतीने करत आहे .सबब त्याचा हा पहिला गुन्हा माफ करावा."
पण या नोंदीचा संचालकांवर काही परिणाम झाला नाही. त्यांच्या मते अशी बेशिस्त सरकारी ऑफिसात चालणार नाही त्याने ऑफिसचे नाव खराब होईल. फक्त त्यांनी एक केले ड्रायव्हर वयाने लहान असल्याने आणि त्याला इतरत्र नोकरी करता यावी म्हणून पोलिसात तक्रार केली नाही. त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. ड्रायव्हरनेही रदबदलीसाठी खूप प्रयत्न केले . पण काही उपयोग झाला नाही.
या प्रसंगानंतर सुंदर खूप निराश झाला. मला वाटले कदाचित त्याला डिप्रेशन येईल . कारण तो सात-आठ दिवस नीट झोपू शकला नाही. त्याला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्या ड्रायव्हरची रोजीरोटी माझ्यामुळे गेली असेच त्याला वाटत राहिले. मी त्याला सांगितले तो जर नीट वागला असता तर असे झाले नसते. त्याचीच चूक आहे मग त्याचा पश्चाताप तुला का होतोय ? अजूनही ही आठवण आली की सुंदर स्वतःला दोषी मानतो. आपल्या सहका-या विषयची एवढी काळजी, आपुलकी आणि त्याने केलेल्या चुकीची त्याला खूप मोठी सजा होऊ नये ही तळमळ क्वचित दिसते .
असा हा मेणासारखा मऊ माणूस प्रसंगी वज्रा सारखा कठोर होतानाही मी पाहिला आहे. आपल्या समोरची व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी तिला सत्य सुनवायला सुंदरने मागेपुढे पाहिले नाही. व्यवस्थेतल्या भ्रष्टाचारापासून सुंदरने स्वतःला कमळासारखे दूर ठेवले आहे. चिखलात असूनही चिखल अंगाला लागू दिला नाही. माझ्या सेवानिवृत्ति आधी सुंदरने स्वतःची बदली करून घेतली. त्याला विचारले तू असे का केले तर तो म्हणाला माहित नाही तुमच्या जागेवर नंतर येणारी व्यक्ती तुमच्यासारखे मला समजून घेईल की नाही .
सुंदर स्पष्टोक्ता देखील आहे. एकदा आमच्या विभागाच्या एका उच्चपदस्थांने स्वतःचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. तो सुंदरला वाचायला दिला. सुंदरने तो वाचला पण त्याला काहीच कळले नाही. त्याने त्या उच्चपदस्थाला स्पष्ट सांगितले मी वाचला पण मला काहीच कळले नाही.
दुसरा एका प्रसंगात त्याने उच्चपदस्थांने चुकीच्या माणसाची बाजू घेतली म्हणून त्याच्या हाताखाली काम करणे नाकारले आणि स्वतःची बदली करून घेतली. त्या उच्चपदस्थांने त्याला बदली रद्द करण्याची गळ घातली तरी सुंदर आपल्या मतावर ठाम होता.
सुंदर आणि त्याचे काही मित्र सुटीच्या दिवशी माटुंग्याला जायचे आणि भिकाऱ्यांना अन्नदान करायचे. खरतर सुंदरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही आणि फार वाईट नाही. तरीदेखील जेवढे जमेल तेवढे लोकांसाठी करण्याची वृत्ती त्याला कुठे दुःख पाहिल्यावर शांत बसू देत नसे. त्याच्यावर नेहमी सहकारी बँकेचे कर्ज किंवा पीएफ मधून पैसे काढण्याची वेळ यायची. मदत मग ती आर्थिक असो किंवा शरीरश्रम असोत सुंदर यासाठी कधीही तयार असायचा. सुंदर म्हणजे Joy of giving च.
बऱ्याचदा त्याला परगावी प्रशिक्षण देण्यासाठी जावे लागायचे तेथून परतताना त्याठिकाणची मिठाई किंवा इतर खाद्यपदार्थ जो प्रसिद्ध आहे तो घरच्यांसाठी आणि स्टाफ साठी न विसरता घेऊन यायचा .
असाच एकदा मी घरात पाय घसरून पडलो तळपायाचे हाड मोडले मला उभे राहणे कठीण झाले. सुंदर रात्री बारा वाजता डॉक्टर कडे घेऊन गेला. एक्स-रे काढला. प्लास्टर झाले घरी येईपर्यंत तीन वाजले त्यानंतरही सुंदर मला फॉलोअपसाठी घेऊन गेला होता.
एकदा कोणाला मदत करायची ठरवले की जेवणाची वेळ चुकेल किंवा घरचे जेवणासाठी थांबतील या गोष्टींचा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नसावा. बऱ्याचदा त्याला घरून फोन यायचा जेवणाची वेळ झाली म्हणून. घरातल्यांना माहीतच नसायचे की हा कोणाच्यातरी हॉस्पिटल ड्युटीवर आहे. सुंदर म्हणजे " अहर्निशं सेवामहे" हे व्रत धारण केलेला सेवेकरी. त्यात उन, वारा, पाउस, रात्र, दिवस, भूक असल्या फुटकळ सबबींना स्थान नव्हते.
सुंदर एम कॉम इंटर सीए आहे. त्यामुळे त्याला टॅक्सेशनचे चांगले नॉलेज आहे. बरेच लोक त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न सुंदर कडून फाईल करतात. या कामासाठी सुंदर कुठलीही फी घेत नाही.
मुंबईस्थित सात-आठ कार्यालयातील प्रशिक्षणार्थी सुंदरला ओळखतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचे वैयक्तिक काम ते मार्गदर्शनासाठी सुंदर कडे घेऊन येतात आणि सुंदरही त्या कामाला पूर्णपणें न्याय देतो. आमच्या संस्थेशी संलग्न कार्यालयात पायथाॅन प्रणालीत एक इनहाऊस डेव्हलप केलेले सॉफ्टवेअर आहे. त्याचे कधी काही प्रॉब्लेम असले तर ते लोक सुंदरला मदतीसाठी बोलवतात. सुंदर संध्याकाळी प्रशिक्षण संपल्यानंतर त्या कार्यालयात जाऊन रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काम करत असतो.
सुंदर म्हणजे कर्मवीरच . कामाला वाहून घेणं म्हणजे काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण. सुंदर म्हणजे कामाचं अहर्निश धगधगतं यज्ञकुंडच.
त्याला पाहिल्यावर मनोमन खात्री पटते की पुलंचा नारायण जगद्व्यापी आहे . तो सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी आहे. अशा माणसांना स्थल काल मर्यादा घालता येत नाहीत. ती छोटी दिसतात पण आभाळा एवढी मोठी असतात. तद्दन मोठी माणंसं आपल्या बरोबर असताना जे मनावर दडपण असतं त्याच्या अगदी उलट या माणसांमुळं आपल्याला हायसं वाटतं. माणूस जेवढा उंच तेवढं पायाखालचं कमी दिसतं. पण अशा छोट्या माणसाच्या नजरेतून सहचराच्या डोळ्यातला धूलिकण बरोबर हेरला जातो. अशी माणसं मानवी जीवनात असलेल्या सुखाची खुमारी द्विगुणित करतात तर दु:खाचा उद्रेक सौम्य करतात. अशा लोकांचं आजूबाजूला असणं म्हणजे आपलं जगणं आश्वस्त होणं . घाबरु नकोस मी आहे तुझ्यासोबत. अशी माणसं जरी विरळ असली तरी आपल्या नकळत ती आपल्याला कुठेही भेटतात कुठल्याही रुपाने. त्यांना बोलवावं लागत नाही किंवा मानपानही लागत नाही. फक्त कोणाला तरी मदतीची गरज आहे एवढी खबर त्यांच्या पर्यंत पोहचावी लागते. सुंदरला लौकिकार्थाने कुठलेही व्यसन नाही पण त्याचे एकच व्यसन जबरदस्त आहे ते म्हणजे माणसं जोडणं.
सुंदरच्या सुंदर असण्याला त्याच्या कुटुंबियांच्या साथीची रुपेरी किनार आहे. मी त्याच्या शेजारी राहिलो सहा वर्ष. या सहा वर्षात मला कधीच त्याच्या घरी कौटुंबिक कलहाचे दर्शन झाले नाही. याचे कारण बहुदा सुंदरच्या घरी सगळेच सुंदर आहेत. लक्ष्मी वहिनी होम फ्रंट वर समर्थपणे उभी आहे. सुंदर दक्षिण भारतीय ब्राह्मण पण तो कर्मठ नाही. गणपती येतो त्याच्या घरी. लक्ष्मी वहिनी निष्णात स्वयंपाकी . घरात गोडधोड होते. ते कार्यालया पासून आप्तेष्ट, मित्रां पर्यंत सर्वदूर पोहचते. मी तर आरती झाल्यावर प्रसादातला मोतीचूर लाडू कधी मिळतो याची वाट पहातो.
तो मूळचा चेन्नईचा आणि मी घाटावरचा पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला आलो आणि एकमेकांचे मैत्र जुळले. मी जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी अजूनही सुंदर मला भेटायला येतो . भेट नाही झाली तरी आम्ही एकमेकाशी मनाने जोडलेलो असतो . ममत्वात स्वार्थ, अहंकार असतो. असल्या ममत्वाचा लवलेश नसलेला हा सुंदर सहृदयी माणूस मला सहकारी म्हणून दिल्याबद्दल त्या देवाचे अनंत आभार .
शब्दांकन दत्तात्रय साळुंके
सुंदरच
सुंदरच
छान लिहिलंय!
मधल्या एका परिच्छेदात प्रशिक्षणार्थी या शब्दाची अनेक रूपं निर्माण झाली आहेत तेवढी जरा दुरुस्त करा.
खुप सुन्दर
खुप सुन्दर
@ वावे खूप आभार , चुकांची
@ वावे खूप आभार , चुकांची दुरुस्ती केली आहे.
@ किल्ली तुमचेही खूप आभार ...
छान लिहिलाय लेख, सुंदर सारखी
छान लिहिलाय लेख, सुंदर सारखी माणसे खूप क्वचित सापडतात. त्याला सांगा कि तुम्ही त्याच्यावर लेख लिहिलाय आणि वाचकांना खूप आवडला आहे.
हे व्यक्तिचित्रण सुंदरच्या
@ वेडोबा खूप खूप आभार प्रतिसादासाठी....
हे व्यक्तिचित्रण सुंदरच्या पूर्वपरवानगीने केले आहे. त्याला मी आवश्य कळवेल की हे व्यक्तिचित्रण मा. बो. करांना खूप आवडले. प्रकाशित करण्यापूर्वी एका मायबोलीकर मित्राची प्रतिक्रिया अशी आहे.
सुंदर म्हणजे दुर्मिळ देवमाणूस....
सुंदर
सुंदर
सुंदर म्हणजे दुर्मिळ देवमाणूस
सुंदर म्हणजे दुर्मिळ देवमाणूस....++१११११
विलक्षण माणूस आहे हा सुंदर..
विलक्षण माणूस आहे हा सुंदर.. ________/\________
सुंदर, आतून-बाहेरून सुंदर
सुंदर, आतून-बाहेरून सुंदर आणि ते व्यक्तिमत्व प्रभावीपणे सुंदररित्या आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद!
फार छान वाटले वाचून. सुंदर
फार छान वाटले वाचून. सुंदर सारखी माणसे पाहिल्यावर आपल्याला वाटते तितके जिथे तिथे चिंताग्रस्त होऊन जगायची आवश्यकता नाही असे वाटून जाते. अश्या माणसांचा सहवास म्हणजे एक प्रकारचे मेडीटेशनच!
————————
रखरखाव <<< म्हणजे काय?
@ गजानन आभार...
@ गजानन आभार...
रखरखाव म्हणजे maintenance.
छान.
छान.
पण पण पण सात फूट तीन इंच??? सात? :-O
रखरखाव ऐवजी देखभाल शब्द चालेल असे वाटते.
छान लिहीता तुम्ही.
छान लिहीता तुम्ही.
(रखरखाव हा हिंदी शब्द आहे. मराठीत देखभाल म्हणतात.)
फार सुरेख लिहिले आहे!
फार सुरेख लिहिले आहे!
राजेंद्र देवी, वैशालि कदम,
राजेंद्र देवी, वैशालि कदम, गजानन, अनघा, मंजूताई खूप धन्यवाद सुंदर प्रेरणादायी प्रतिसादासाठी....
अॅमी, किरणुद्दीन खूप आभार. चुक दुरुस्त केलीय.
शाली आपलेही खूप आभार .
कुठलेही लिखाण करताना सतत जबाबदारीची जाणीव होत असतें तुमच्या प्रतिसादाने. जे काही चांगले लिहिले यांचे श्रेय तुम्हा सा-यांचे. ज्या चुका झाल्या त्या माझ्या.
खूप धन्यवाद....
सुंदर आहे. अशी देवमाणसे
सुंदर आहे. अशी देवमाणसे दुर्मिळच
खुप आवडलं
लेख आवडला
लेख आवडला
फार छान व्यक्ती चित्रण ....
फार छान व्यक्ती चित्रण ....
mr.pandit, हर्पेन,शिवाजी
mr.pandit, हर्पेन,शिवाजी उमाजी
खूप आभार ...
सुंदर... आवडले..
सुंदर... आवडले..
सुंदर म्हणजे दुर्मिळ देवमाणूस
सुंदर म्हणजे दुर्मिळ देवमाणूस....
तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशा देवमाणसाचा सहवास तुम्हाला लाभला...