Submitted by सुप्रिया जाधव. on 5 December, 2018 - 14:34
जरी उडतात स्वच्छंदी थवे हे पाखरांचे
प्रवासाची दिशा वाहन ठरवते अनुभवांचे
तुझ्या माझ्यात पडलेली दरी समृद्ध झाली
किती होते सुपिक अवशेष खचल्या डोंगरांचे
उभे केले नव्याने बंगले पडक्या घरांवर
परंतू राहिले धोंडे बदलणे पायथ्यांचे
तुझ्या मजबूत खांद्यावर विसावे मान माझी
अशी पडतात स्वप्ने पण करू मी काय त्यांचे ?
शिखर गाठून गायबले कुठे....माहीत नाही
कधीचे शोधते आहे ठसे त्या पावलांचे
तुझ्या गावात आला ना अकाली पूर यंदा ?
हजारो शेर होते ते निखळल्या आसवांचे
जरा उतरव 'प्रिया' डोळ्यांवरिल साशंक चष्मा
मळे दिसतील फुललेले तुला सदभावनांचे
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा