जे सत्य सुंदर सर्वथा....: ३. इंदापूर ते पंढरपूर
१४ नोव्हेंबरची पहाट. आज बाल दिन आहे आणि मला पहिल्या बाल गृहात जायचं आहे. आज ह्या सायकल प्रवासाचा तिसरा दिवस आहे! त्यामुळे शरीर काहीसं लयीत आलं आहे. पहाटेच्या थंडीत इंदापूर महाविद्यालयातून निघालो. सकाळी मॉर्निंग वॉक घेणा-यांना रस्ता विचारत पुढे निघालो. कालच्या हायवेच्या तुलनेत इंदापूर- अकलूज रस्ता अगदी शांत वाटला! आता खरंच वाटतंय की, मी ग्रामीण भागात आलोय. लवकरच पुणे जिल्हा संपला. अकलूजला म्हणजे आर्चीच्या गावात पहिला ब्रेक घेतला! पहिल्या दोन दिवसांच्या अनुभवानंतर मी नाश्त्यासाठी फक्त केळं, चहा- बिस्कीट, चिक्की व चिप्स हेच घेतोय. पोटासाठी हलकं हवं. डबल चहा- दोन बिस्कीट पुडे असे दोन ब्रेक मला पुरेसे आहेत. तसंच सोबत चिक्की/ बिस्कीटंही आहेत, मध्ये मध्ये खातो. इलेक्ट्रॉलयुक्त पाणी आहेच. सतत तिस-या दिवशी चालवत असल्याने हळु हळु मला सायकलिंग सोपं होत जातंय.
सकाळचं रम्य वातावरण! रस्त्यावर विरळ वाहतूक आहे. हिरवीगार शेतं सगळीकडे आहेत. आणि रस्त्याच्या दुतर्फा उंचं झाडं! अगदी रोमँटीक रस्ता! वाटेत अनेक ठिकाणी वारकरी सोबतीला आहेत. थोड्या वेळानंतर परत हायवे सुरू झाला. पंढरपूर जवळ येतंय. कदाचित मी अपेक्षेपेक्षा लवकर पोहचेन. एका जागी पाण्याचा ब्रेक घेतला, तेव्हा टायर तपासले. मागच्या टायरवर काचेचे बारीक तुकडे लागले होते. ते हळुच काढले. एक तुकडा जवळजवळ टायरमध्ये आत घुसला आहे. त्याला काढण्यासाठी टायरमधली हवा सोडावी लागली. मग टायर दाबून तो काढता आला. परत हवा भरली. एक पंक्चर वाचवता आलं, ह्या आनंदात पुढे निघालो. पण... पंढरपूरला पोहचता पोहचता समोरचं टायर पंक्चर झालं!
पंक्चर कदाचित थोडं आधी झालं असेल. पंढरपुरात गेल्यावरच कळालं. तसं मी दर आठ- दहा किलोमीटरला टायर प्रेशर चेक करतोच. आता पंढरपुरातच आल्यामुळे वाटलं की, जिथे थांबायचं आहे, तिथेच जाऊन काढावं. म्हणून पंक्चर काढण्याऐवजी किंवा ट्युब बदलण्याऐवजी हवा भरलो व पुढे निघालो. मला रिसीव्ह करण्यासाठी पंढरपुरात एचआयव्हीवर काम करणारे डापकूचे लोक आलेले आहेत. कराड रस्त्यावर पुढे जात राहिलो. पण दर दोन- तीन किलोमीटरनंतर हवा भरावी लागतेय. लवकरच त्या लोकांना भेटलो. त्यांच्यासोबतच मग प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी बाल गृहाकडे निघालो. मध्ये परत एकदा हवा भरली. सलग दुस-या दिवशी पंक्चरचा त्रास झाल्याने खूप अस्वस्थ वाटतंय. पण आता जवळ आलो आहे.
प्रभा हिरा प्रतिष्ठानचं पालवी बाल गृह! पंढरपूर- कराड रोडवर संस्थेचा कँपस आहे. इथे आलेले गायकवाड सर आणि कदम सर तसंच संस्थेतल्या मंगलताईंनी माझं स्वागत केलं. मुलंही सायकल बघून समोर आली. थोड्या वेळ डापकूच्या लोकांसोबत बोललो. डापकू म्हणजे District AIDS prevention and control unit. माझ्या मोहीमेचं उद्दिष्ट, स्वरूप व आत्तापर्यंतचा प्रवास ह्याविषयी त्यांना बोललो. ह्या मोहीमेची माहिती दिली. त्यांनी आपला परिचय करून आपल्या कामाविषयी सांगितलं. ते लोक बाल गृहाशी परिचित आहेतच. त्यांचीही दिदींसोबत चर्चा झाली. नंतर बाल गृहाच्या संस्थापिका मंगलताई शहांसोबत भेट झाली. बाल गृहाच्या कार्यालयात अनेक गोष्टी ठेवलेल्या दिसल्या. मुलांनी बनवलेली गिफ्ट आर्टिकल्स, कागदाची फुले, ग्रीटिंग कार्डस, दिवाळीचा फराळ इ. सर्व इथे आहे. सप्टेंबरमध्ये माझ्या मुलीच्या वाढदिवशी तिने जी बर्थडे कॅप घातली होती, अगदी तशीच कॅप इथे दिसली!
थोड्या वेळ बोलणं झाल्यानंतर दीपक नावाच्या एका मुलाने माझी खोली दाखवली. ह्याच कँपसमध्ये दुसरी इमारत आहे. तिथेही मुलं राहतात व शिकतात. मी इथेच राहेन. थोडा आराम केला. माझ्या पंक्चरविषयी व मी पालवीत पोहचलो ह्याबद्दल माझे सायकल मित्र डॉ. पवन सरांशी बोललो. इथे कोणत्या दुकानात माझ्या सायकलचं टायर रिप्लेस होऊ शकेल का, हे विचारलं. कदम सरांनाही पंढरपूरच्या सायकल दुकानाचे नंबर्स मागितले आहेत. पण इथे माझ्या हायब्रिड सायकलचं टायर मिळेल, ही शक्यता जवळजवळ शून्य आहे. त्या दुकानांमध्ये फोन करून तेच कळालं. आता जे करायचं आहे, ते मलाच करायचं आहे. जेवण झाल्यावर व आराम झाल्यावर पंक्चर काढलं. टायर तपासलं तेव्हा कळालं की, काल जिथे पंक्चर झालं होतं, तिथेच हेही पंक्चर झालं आहे. त्याच जागी एक अतिशय बारीक तारेचा तुकडा मिळाला. काल टायर तपासलं तेव्हा हा दिसला नव्हता. हळुच तो काढून बाहेर सुरक्षित प्रकारे फेकला. काळजीपूर्वक पंक्चर नीट केलं. खरं तर हे काम आहे छोटंच, पण खूपच लक्षपूर्वक करावं लागतं. खूप संयम लागतो त्यासाठी. अगदी सोपं पण तरीही अवघड कौशल्य आहे. जवळजवळ दहा वेळेस चुकल्यानंतर मला हे काही प्रमाणात जमतं. पंक्चर नीट केलं, पण ट्युब बाहेरच ठेवली. न जाणो, हवा उतरली तर परत तपासावं लागेल.
आज ७७ किलोमीटर झाले. तीन दिवसांमध्ये २४६ किलोमीटर.
संध्याकाळी मुलांसोबत बोलण्यासाठी कार्यालयात गेलो. दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे मुलं तशी रिकामी होती. बाल गृहातल्या शीतल ताईंसोबत थोडं बोललो. संस्थापिका मंगलताई रात्रीच भेटतील. तितक्यात मला क्लाएंटचे फोन कॉल्स आले व लॅपटॉपवर कामासाठी बसावं लागलं. अर्जंट सबमिशन! हा प्रवास पूर्ण होईपर्यंत हीसुद्धा चिंता आहे की सायकल चालवण्याच्या वेळेतच सबमिशन्स तर येणार नाहीत? त्यामुळे दुपारपर्यंतच सायकल थांबवून पुढे मुक्काम करण्याची योजना बनवली आहे. त्यामुळेच मी हा प्रवास करू शकेन, भेटी घेऊ शकेन व माझं कामही करू शकेन. ताईंना सांगून मी लॅपटॉपवर काम करायला परत रूममध्ये आलो. सगळं काम करून बाहेर येईपर्यंत साडेसात वाजले. मुलांचं जेवण झालं आहे. रात्री आठ ते दहा मुलांचा 'जल्लोष' सोहळा असतो! मुलं खेळतात, नाचतात, उड्या मारतात, गाणंही म्हणतात! मीही त्यात सामील झालो. पहिले तर मुलं मला कोणी सर किंवा गेस्ट म्हणूनच बघत होते. पण मी काही मुलांसोबत नाचायला लागलो, तसे ते चकित झाले! मग काही जणांनी माझ्यासोबत गप्पा सुरू केल्या.
इथे शंभरपेक्षा जास्त एचआयव्ही असलेली मुलं राहतात. सगळ्या वयांची आहेत. काही तर एक दिवसांची बाळंही आलेली आहेत. इथे एचआयव्ही असलेली मुलं व महिलांचं देखभाल व पुनर्वसन केंद्र आहे. हे बाल गृह पूर्णत: खाजगी देणग्यांमधून चालतं. सरकारची कोणतीच ग्रँट मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात एचआयव्ही मुलांचं एकही सरकारी बाल गृह नाही आहे. सरकारकडून मुलांना फक्त नि:शुल्क उपचार मिळतात. मुलांसोबत गप्पा मारताना त्यांच्यात मोठ्यांसारखे विचार जाणवले. आपलं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार! आणि समाजाने नाकारल्याचा एक रोषही जाणवला. मुलं शक्यतो अनाथ किंवा एकल पालक असलेलीआहेत. एचआयव्ही हा शब्द, त्यासोबत येणारा भेदभाव व घृणेमुळे ती आपल्या कुटुंबांपासून दुरावली. इथे मुलांना एचआयव्हीची ट्रीटमेंट मिळते, शिकण्याची संधी मिळते. पालवीची स्वत:ची दहावीपर्यंतची शाळा आहे. काही मुलं आणखी पुढे शिकत आहेत. योग्य ट्रीटमेंट व देखभालीमुळे ही मुलं आता 'नॉर्मल' सारखीच जगतात. एचआयव्ही संक्रमण असल्यावर जर योग्य उपचार व योग्य देखभाल असेल तर त्याचं एड्स मध्ये रुपांतर होण्यापासून दीर्घ काळ थांबवता येऊ शकतं.
मुलांसोबत बोलताना व त्यांचा नाच- खेळ बघताना मंगलताईही आल्या. साठपेक्षा जास्त वय असलं तरी त्या स्वत:च व्हॅन चालवत आल्या! खरंच समाजाच्या मानसिकतेच्या विरुद्ध जाऊन इतकं मोठं काम उभं करणं अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. पूर्वी त्या पंढरपूरमधील वस्त्यांमध्ये शिकवायला जायच्या. मग अनाथ मुलांसोबत काम सुरू केलं. नंतर त्यांना एचआयव्ही असलेल्या मुलांच्या समस्या कळाल्या व त्यांनी त्यावर काम सुरू केलं. एका छोट्या शेल्टरपासून सुरू केलेलं काम आज शंभरपेक्षा जास्त मुलांचं भवन झालं आहे. त्यांना आणखीही खूप पुढे काम करायचं आहे. कारण ही समस्या फारच मोठी आहे. मंगलताईंच्या मते महाराष्ट्रात सुमारे सत्तर हजार एचआयव्ही असलेली मुलं आहेत. त्यांची कन्या डिंपलताई ह्याही त्यांच्यासोबत ह्या कामात सहकारी म्हणून आहेत. ह्या दोघी सेवाव्रती ह्या कामाच्या आधारस्तंभ आहेत. मंगलताई आता एका स्वतंत्र मोठ्या कँपसची योजना बनवत आहेत. असं सेंटर जिथे आणखी जास्त मुलांना सगळ्या सोयी मिळूशकतील. त्यासाठी त्यांना पाच हजारांची देणगी देणारे दहा हजार देणगीदार हवे आहेत.
अनेक बाल गृहांना सहाय्य करणा-या HARC संस्थेचं माहिती पत्रक
आज मुलं दिदींच्या देखभालीत आनंदात आहेत. पण अजूनही समस्या खूप मोठ्या आहेत. आताही इथे दगडफेक होत असते. इथे काम करायला कोणी लवकर तयार होत नाही किंवा टिकत नाहीत. समाजात भेदभाव सुरूच आहे. अगदी काही काळापूर्वीच एकदा मुलांचे डोळे आले होते (कंजक्टीवायटीस). तेव्हा एक डॉक्टर कसाबसा संस्थेच्या गेटपर्यंत आला व त्याने फक्त एकाच मुलाला तपासून बाकीच्यांना औषधं सांगितली. जिथे डॉक्टरच इतके घाबरतात किंवा भेदभाव करतात, तिथे बाकी समाजाविषयी काय सांगावं! मी ताईंना विचारलंही की, हे सेंटर गावाच्या इतकं बाहेर असण्याचं कारण तेच तर नाही? त्यावर त्यांनी म्हंटलं की, त्या कारणामुळे तसं नाहीय. एचआयव्ही असलेल्या मुलांना टीबी होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना मोकळी हवा चांगली असते. त्यामुळे हा कँपस गावाबाहेर आहे. इथे आता काही मुलं- मुली मोठी झाली आहेत. बाल गृह त्यांना रोजगारासाठी व लग्नासाठीही मदत करतं. ज्या मुलांची कुटुंब आहेत व जे तिथे जाऊ शकतात, असे कधी कधी तिथे जात असतात. संस्था त्यांना बाहेरही नेत असते. अशा चर्चेमध्ये रात्र वाढत असल्याची जाणीवही झाली नाही आणि थकवाही जाणवला नाही. हे काम बघून मीसुद्धा त्यात छोटी देणगी दिली. ताईंचं म्हणणं हे आहे की, समाजाची मानसिकता बदलायला हवी. समाजात चांगलेही लोक आहेतच. काही मुलांना आपलं घर सोडून यावं लागलं, पण शेजा-यांनी त्यांना मदत केली होती. अनेक संवेदनशील लोकांच्या मदतीनेच ह्या बाल गृहाचं काम सुरू आहे. आपल्यालाही इच्छा असेल तर त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. पंढरपूरला येणं होईल तेव्हा इथे येऊन मुलांना भेटू शकता आणि यथा इच्छा ह्या कामात सहभागसुद्धा घेऊ शकता.
संपर्क: Palawi Project Address: Prabha -Hira Pratishthan. Plot no.33, gat no. 461/2/c, Takali. Pandharpur. Dist -Solapur, Maharashtra, India. PIN - 413304 दूरध्वनी- मंगल शहा- ९८८१५३३४०३, डिंपल घाडगे- ९८६००६९९४९, पालवी परिवार- ९६७३६६४४५५ पालवी बाल गृहाचं फेसबूक पेज: https://www.facebook.com/PalawiProject
पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ४. पंढरपूर ते बार्शी
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
वाचतोय!
वाचतोय!