(२६ नोव्हेंबर हा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामुळे सर्वांच्या कायम स्मरणात रहाणारा दिवस. हल्ल्याच्या दरम्यान टीव्हीवरील कव्हरेज मी सतत बघत होतो. हेमंत करकरे पण शहीद झाले या हल्ल्यात. त्यांची प्रेतयात्रा बघत असता डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि याचवेळी ही गझल कण्हत्या कलमेमधून झरत होती. गझलेत जरी करकरे यांचाच उल्लेख असला तरी मला या कारवाईत कामी आलेले सर्व पोलिस कर्मचारी अभिप्रेत आहेत.)
दाटून कंठ कांही वदणार आज आहे
कलिजा हिमालयाचा थिजणार आज आहे
होते जिवंत जेंव्हा जखमा दिल्या जयानी
त्यांचेच तोंड काळे दिसणार आज आहे
शहिदास काय देता? श्रध्दांजली फुकाची
भोंदूगिरी तुम्हाला हसणार आज आहे
धरली कधीच नव्हती आशा कुण्या फळाची
त्यांच्या समोर ईश्वर दिपणार आज आहे
अंधार जीवघेणा करतोय राज्य जगती
तो एकला कवडसा पुरणार आज आहे
नवसूर्य पाहिला मी काळ्या कभिन्न रात्री
सूर्यास अर्घ्य देण्या बसणार आज आहे
अधुनीक वाल्मिकीला, पाहून कांड सारे
लिहिण्यास राम नवखा मिळणार आज आहे
बलिदान व्यर्थ नाही, ना व्यर्थ कार्य त्यांचे
हिजडा जिहादवादी, हरणार आज आहे
दु:खी कुटुंब त्यांचे अश्रू कसे कसे पुसावे?
नियतीच हात त्यांचा धरणार आज आहे
"निशिकांत" याद येता, हेमंत करकरेंची
हा बांध आसवांचा फुटणार आज आहे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३