उत्सव म्हणजे लखलखणाऱ्या लाख दिव्यांची झगमगणारी धरती. या वर्षी गणपती नवरात्र उत्सवाच्या वर्गणीवर उत्सव होईल का....? मंडळ कार्यकर्त्यांना नेहमी प्रमाणे पडलेला घोर प्रश्न. एक म्हणजे गणपती बाप्पा असो वा आई जगदंबा...! भक्ती असेल तेथे शक्ती धाव घेते. कार्यकर्त्यांच्या मनात बळ निर्माण करणारी ती अदृश्य शक्ती कोणी पाहिली नाही. पण गणपती बाप्पा, आई जगदंबा हे आपले त्राता आहेत. ते आहेत म्हणून हे जग आहे. त्यांना भक्तामध्ये विराजमान व्हायचे असेल तर ते त्याची तजबीज करूनच स्थानापन्न होतात. हा अनुभव आम्हांला अनेकदा आला. एक वेळ तर अशी होती, मूर्ती आणायची तर पैसे द्यायला हवेत...! खिश्यात नव्हता पैसा.वर्गणीतून काही जमत नाही. साधा मंडप देखील उभारता येत नाही. सध्या उत्सव म्हणजे ऋण काढून सण साजरे करण्याचा प्रकार. मंडळाची आवक असते काही हजार पण खर्च मात्र लाखात...! सध्या मूर्तीला सोन्याचा भाव आला आहे. मूर्तीकार आपल्या मनाने हवी तशी किमंत सांगत असतो. कार्यकर्त्यांच्या मनाची अवस्था अवघड होणे स्वाभाविकच. त्यात गल्लोगल्लीत मंडळे. समाजातील अनेक प्रवाह एका ठिकाणी नांदू शकत नाही किंबहुना असमाधान, कटुता निर्माण झाली की वेगळी चूल मांडली जाते किंवा केवळ भाव मिळत नाही म्हणून निर्माण झालेली मंडळे. त्यामुळे वर्गणीवर झालेला विपरीत परिणाम. शिवाय आजच्या पिढीला पंचवीस पन्नास रुपये वर्गणी गोळा करणे, गैर वाटते. त्यामुळे मंडळांची आर्थिक समृद्धी खालावलेली दिसून येते. हि वस्तुस्थिती सांगितली,खरं तर हे सगळे सांगणे योग्य नाही. परंतु या वर्षी अनेक मंडळाचे पैश्याचे झाड चांदण्यात उभ्याने न्हालं आणि रातराणी उन्मुक्तपणे सुगंध उधळू लागली. डळमळलेले, गोंधळलेले कार्यकर्ते सुतकी वातावरण असताना जीर्ण त्या भावनांना ऐनवेळी एक सांज चढतो. त्याप्रमाणे उत्सवासाठी एक भक्त धावून आला. ठिकठिकाणी या उत्सवांना आधार द्यायला *यशवंत जाधव* प्रकटले. गणपतीचा भक्त आई जगदंबेचा पुजारी भायखळ्यातील सर्व मंडळांच्या मदतीला धावून आला. आनंदाचे डोही,आनंदाचे तरंग उमटले.परंतु एखादा भक्त मदतीला धावून आला म्हटल्यावर त्याला लुबाडणारे भुरटे समाजात अनेक दिसून आले. उत्सव नसताना देखील उत्सवासाठी मदत मागणारे खलनायकी पात्र सक्रीय होतात. या वेळेस तसेच झाले असणार...! गणेशोत्सव, नवरात्र दिसून येतात. जे आपल्या घरातला दीप प्रकट करण्यासाठी हतबल असतात ते दीपोत्सव नावाखाली संबधिताच्या सोबत अनाहूत सल्ला देणाऱ्याच्या समूहात सामील होत आपला हेतू साध्य करतात.
*यशवंत जाधव* एक परिचित असे नांव. महापालिकेवर माझगांव भागातून अव्वल कामगिरीच्या जोरावर लोकप्रतिनिधित्व करीत असलेले एक करारी नेतृत्व. शिवसेना पक्षाची कर्त्यव्य पताका डौलाने फडकविणारे आणि दूरदृष्टी धोरणाचे पुरस्कर्ते. जनमानसातील त्यांची प्रतिमा आगळीवेगळीच. माझगाव टेकडीवर जगातील *सात अजुबे* निर्माण करण्याचे कार्य हे पर्यटकांना हि रम्य स्थळे बघून पर्यटकांनी वेडं व्हावे, असा प्रयत्न दिसून येतो. कारागीर किंवा शिल्पकाराचे कौशल्य ते अजुबे पाहायला मग्न करतील. या सौंदर्याचा आस्वाद घेताना रंगीबेरंगी फुलांचा परिमळ चौफेर पसरेल. मनातला रेणू न रेणू प्रफुल्लीत होईल. पण एक मनाला खंत बोचत राहील. यामध्ये महाराष्ट्राचा कोणताही एक किल्ला सामाविष्ट असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी *जगदंब जगदंब* करण्याऐवजी *यशवंत यशवंत* ढगाआडून नक्कीच केले असते,शिवाय बाळासाहेब देखील न्याहाळत राहिले असते. जे उत्तम उदात्त उन्नत आहे, त्याचा आग्रह धरीत नाही किंवा हट्ट नाही, पण मनाला वाटते ते लिहायला हवेच.
त्यांच्या व्यक्तिविशिष्ट गुणांचा चाहतावर्ग सर्वधर्मात दिसून येतो. कार्य करताना या माणसाने तीन बाबींचा सतत विचार केला. ध्येय, परिस्थिती, आणि योजना. या तिन्ही संगमाच्या जोरावर लोकअडचणी सोडविताना यशवंत जाधव यांना निखळ समाधान आणि आत्मिक आनंदाची श्रीमंती कळत नकळत वास करू लागली. ते मनाने श्रीमंत असलेल्या स्वत: केलेल्या कार्याचे कौतुक स्व:मुखे करीत बसत नाही. उत्तम पण मोजकं बोलणं पण अदबशीर बोलणं,वागणं, खाणं, तरतरीत शरीर आणि उत्तम पेहराव, हे वेदातल्या *श्री* या संकल्पनेला अनुरूप असलेले श्रीमंत व्यक्तिमत्व. माणसाचं सुख एकवेळा दुर्लक्ष करता येते पण समोरच्याचा मनातले दु:ख पाहून हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवीत ‘काय झाले ? मला सांगणार नाही का ? असे विचारल्यानंतर समोरच्याच्या मनाची घालमेल होऊन निर्माण होणारी आपुलकीची श्रीमंती ठायी ठायी बाळगलेली आहे. ऐश्वर्यात्मक सामर्थ्याची ओथंबून ओसंडणारी ही श्रीमंती.
खरं तर *यशवंत जाधव* म्हणजे आवाजाच्या विश्वात वावरणारा प्रतिभावंत गायक. संगीतावरील भक्ती निष्ठा जिद्द या त्रयी गुणांच्या जोरावर गायकीत स्वरीसंगीत आणि सुरेल अविष्कारी वजनदार ताना यांच्यामुळे मैफिलीत मनाच्या तारा झंकारून उठतात. तरुणपणी अभिनय क्षेत्रात देखील त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र आयोजित मुंबई जिल्हा नाट्य स्पर्धेत सतत तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकाविले आहे. राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनात देखील संगीतप्रेम टिकवून ठेवले आहे. एका क्षेत्रातून दुसऱ्या पायवाटेवर जाणे आव्हानात्मक असते. मूळ परंपरेला बगल दिली पण मान राखून वेगळी वाट धरणाऱ्या यशवंत जाधव यांनी राजकारणावर चांगलीच पकड मिळविली. सोबतीला यामिनी सहधर्मचारीनीची छाया बळकटी देत गेली. नुकतीच राज्य नियोजन मंडळाच्या जिल्हा लघुगट प्रारूप आराखडा समितीवर निवड झाल्याचे कळते. शिवसेना उपनेते तर आहेत. या लेखासोबत मी त्यांच्या मातोश्रीचा फोटो का निवडला....! यामागे त्यांच्या आई मुंबई महानगर पालिका डी वार्ड मध्ये झाडू खात्यात सेवेला होत्या. घरची हलाखीची परिस्थिती असताना सात मुलांचे सुयोग्य भविष्य घडविणाऱ्या त्या माय माऊलीच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलगा आज महापालिका स्थायी समितीचा अध्यक्षपदी विराजमान झालेला पाहून तिचे आनंदाश्रू मोत्यासारखे होऊन वाहिले असतील. असे क्षण क्वचित अनुभवायला मिळतील. पण खरोखर त्यामातेने रत्न जन्माला घातली तेव्हा त्यांचा एक नातू लंडन मध्ये उच्चपदस्थ आहे, तर त्यांची भावंड सुखात नांदत आहे. आजही त्याचाळीत आईच्या घरात राहणाऱ्या यशवंताला भविष्यात बरेच काही बाप्पा, आई जगदंबा पदरात सुयश टाकणार आहे. तरीही *घोडपदेव समूह* त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी ईश्वरापुढे नक्कीच प्रार्थना करील.
*अशोक भेके*
https://www.maayboli.com/imce?app=nomatter|imceload@imceInline.load#
धडाडीचं व्यक्तिमत्व आहे यशवंत
धडाडीचं व्यक्तिमत्व आहे यशवंत जाधवांचं. अप्रतिम लिहिलं आहे.
ऊपमा, शब्दसंपदा वाखाणण्यासारखी आहे तुमची.
आवडतोय तुमचा एकूणच घोडपदेव समुह. त्या त्या व्यक्तिमत्वांना नक्की वाचायला द्या तुमचे व्यक्तिचित्रण.
हो... WA मुळे सर्वत्र
हो... WA मुळे सर्वत्र प्रसारित झाला आहे. धन्यवाद