Submitted by निशिकांत on 12 November, 2018 - 00:57
मी कलंदर आसवांची रात्र करतो साजरी
सांजवेळी सुरकुत्यांशी खेळतो अंताक्षरी
खूप कष्टाने कमवली पोट भरण्या भाकरी
जन्म सारा फक्त केली मी भुकेची चाकरी
घे परिक्षा, देत जा तू यातना नानापरी
मी कधी म्हणणार नाही पाव रे तू श्रीहरी
रंगली रंगात माझ्या मस्त माझी बावरी
लक्तरामध्येच सजली; नेसली ना भरजरी
देत आली गारवा ती वाळवंटी चालता
व्यक्त करण्या ॠण सखीचे रोज लिहितो डायरी
एक दूज्यावीन जगणे कल्पना करवेचना
शक्यतो दोघास देवा एकदम नेरे वरी
मी वसंताचे, फुलांचे गीत रचले ना कधी
लेखणीतुन फक्त झरते वेदनांची शायरी
घेतली ना नोंद कोणी खंत याची का सखे?
सांग जनगणना कधी का होत असते सागरी?
नेत्र का "निशिकांत" थिजले? चेतना गेली कुठे?
फुंक गेली, सूर विरला, फक्त उरली बासरी
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा