मानगड आणि कुंभे घाट
पुणे स्थित दिग्गज मित्रमंडळी सोबत ठरवलेल्या हटके ट्रेकला, बराच प्रयत्न करूनही काही कारणास्तव जाता आले नाही. अत्यंत दुःख आणि चिडचिड झाली, शेवट यावर उतारा किमान एक दिवस का होईना सह्याद्रीत घालवायचा. थोड अपेक्षितच होतंच तरी दोघा तिघांना विचारलं, त्यांचा नकार ऐकून आणखी कुणाला विचारायची हिम्मत झाली नाही. मग काय एकला चलो रे ! कुठं जाव, कसं करावं चालू असताना माझे लक्ष बुलेटवर गेले. नुकतीच दोन आठवड्यापूर्वी सर्व्हिसिंग करून आणली होती बहुतेक ती सुद्धा एखाद्या दमदार राईड साठी उत्सुक असावी. दोन तीन पर्याय विचारात घेऊन, मागे एकदा हुकलेला छोटेखानी ‘मानगड’ फायनल केला.
शनिवारी साडेपाचच्या सुमारास घरातून निघून शीळफाटा रोडवर पेट्रोलची टाकी फुल्ल करायला सांगितल्यावर सकाळी सकाळी पंपावरच्या माणसाचे चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे होते. कदाचित पेट्रोल ८५ रू. वर गेल्याचा परिणाम असावा. सकाळचे वातावरण थंड तर नव्हतेच मुळी पण काहीसे ढगाळ आणि मळभ दाटून आलेले. याचा फायदा घेऊन लवकरात लवकर पाली गाठायच्या उद्देशाला हरताळ फासला गेला, त्या खोपोली पाली रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे. साडेआठ वाजता पालीतून नाश्ता करून मी विळे रोड पकडला. नेहमी प्रमाणे डावीकडे मुख्य रांग सोबतीला होतीच तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत. नाडसुर, पाच्छापुर, गोमाशी, नेणवली नागशेत, पाटणूस फाटे सोडत तैलबैला ते हिर्डी पर्यंतचे सारे जुने ट्रेक आठवले. पाली ते विळे पुढे निजामपूर पर्यंत रस्ता बऱ्यापैकी चांगला, तुरळक वाहने सोडली तर रहदारी अशी नाहीच. निजामपूर पासून डावीकडे पाचाड फाट्याला वळालो. दहा पंधरा मिनिटात पाचाड रस्ता उजवीकडे सोडून सरळ बोरवाडी, गावात समोरच शिवाजी महाराजांचा छानसा पुतळा व बाजूला मानगडची माहिती देणारा फलक.
फोटो काढून पुढे पाच मिनिटांच्या अंतरावर मशीदवाडीत पोहचलो तेव्हा अकरा वाजले होते. एक उल्लेख करायचं राहिलं मशीदवाडीच्या थोडं अलीकडे उजव्या बाजूला पुरातन दगडी महादेवाच्या मंदिराचे अवशेष. सध्या स्थितीत उदध्वस्त चौथरा, नंदी आणि पिंड तसेच आजूबाजूला भंगलेल्या अवस्थेत काही शिल्प आणि शिळा.
घराच्या दारात आजी बसलेल्या, परवानगी घेऊन गाडी त्यांच्या अंगणात सावलीत लावली. मला पाहून पहिलाच प्रश्न, "सकाळी लवकर यायचं ना, आता उन्हात जाशील ! श्रावण मध्ये नायतर गणपती नंतर यायचं तेव्हा छान वाटत!" आता यावर मी काय बोलणार? पण आजी सांगत होत्या त्यात ही तथ्य होतेच, कोकणातला किल्ला तेही भर दुपारी उन्हात.. असो. मग गप्पांना सुरुवात झाली शेजारच्या दुकानातले काका आणि बाजूच्या घरातल्या ताई पाणी घेऊन आल्या. बोलता बोलता कुंभे दापसरे गावांचा त्या वाटांचा विषय निघाला.
इथल्या मंडळींचे अजूनही कधी काळी तिथे येणं जाणं होत. त्या ताईंचे माहेर दापसरे.
आमच्या कुर्डुगड ठिपठिप्या घाटाच्या ट्रेकचा विषय त्यात दापसरे म्हटल्यावर ‘धोंडीबा मोरे’ चं नाव माझ्या तोंडून निघाले. धोंडीबा चक्क त्या ताईंचा चुलत भाऊ निघाला. त्यांचे माहेर दापसरे घाटावर. घाट व कोकणातलं सोयरिक आणि नात्यागोत्याचं एक उदाहरण.
सोबत छोटा पिट्टू घेऊन गडाकडे निघालो. बाहेर पडताच पाण्याच्या टाकीजवळून मळलेली वाट. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई’ यांनी दिशादर्शक पाटी लावली आहे.
वीसेक मिनिटात विंझाई देवीच्या प्रशस्त मंदिराजवळ आलो. फारशी दाट झाडी नसली तरी एकंदरीत रमणीय परिसर आजुबाजुला काही कोरीव दगडी शिल्प पडलेले तसेच थोड्या अंतरावर पीर. देवीचे दर्शन घेऊन मुख्य वाटेने गडमाथ्यावर निघालो. कातळात खोदलेल्या पायऱ्या वरती बुरुज आणि तटबंदी.
वर जाताच किल्ल्याचे गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार. दरवाज्यातून आत गेल्यावर समोर मारुतीराया. वरच्या भागात डावीकडे कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणि मुक्काम करण्यायोग्य मोठी गुहा.
तसेच माथ्याकडे जाताना उजवीकडे आणखी ओळीने काही टाकी त्यात खांब टाके सुद्धा. माथ्यावर पीर, काही जुने सदरेचे अवशेष तर पश्चिमेकडे कातळाच्या टोकावर पाण्याची टाकी. गडाच्या उत्तर बाजूला खाली ‘चाच’ गाव त्यापलीकडे ‘केळगण’ ते कुंभे घाटाची डोंगररांग.
माथ्यावर दक्षिण भागात थोडी मोकळी जागा इथेच दुर्गवीरने लावलेला फलक आणि भगवा ध्वज, तसेच खाली पाहिले तर जिथून सुरुवात केली ती मशीदवाडी.
तसे पाहिले तर गडमाथ्यावर सावली देणारी झाडे नाहीच त्यामुळे उन चांगलेच जाणवत होते, झटपट प्रदक्षिणा घालून उजवीकडच्या छोट्या वाटेने कातळात कोरलेल्या लहान पायऱ्यांनी उतरत पाण्याच्या टाक्यांजवळ आलो. खाली पहिलं तर सरळ रेषेत विंझाई देवीचे मंदिर त्यापलीकडे मांजूर्णेच्या दिशेने गेलेली वाट. खाली उतरत देवीच्या मंदिरात थांबा घेतला. सोबत आणलेला सुका खाऊ आणि फळं खात, नंतर त्या रमणीय शांत परिसरात चांगलीच तंद्री लागली. एकटा होतो त्यामुळे मन मानेल तसे करायचं इतर कुणाचं ही बंधन नाही. खरंतर एकट्या दुकट्याने ट्रेक करावे की नाही याबद्दल बरीच मतांतरे आहेत. ते सर्व ज्याने त्याने आपला अनुभव, शारीरिक व मानसिक क्षमता, तसेच आत्मविश्वास आणि भौगोलिक स्थान त्यानुसार अभ्यास या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. असो... याबद्दल पुन्हा कधीतरी. पण एक मात्र खरं अशा अनगड नैसर्गिक ठिकाणी तिथल्या निरव शांततेत हरवून जात अधे मधे स्वतःशी होणारा मुक्त संवाद जो खूप काही सांगून जातो. वेळ पाहून आल्यापावली गड उतरायला सुरुवात केली.
मानगड या भागातील अगदीच छोटेखानी किल्ला या बद्दल पुस्तकात आणि इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. पण त्याचं भौगोलिकदृष्ट्या स्थान मात्र टेहळणी साठी फारच उपयुक्त. राजधानी रायगडाच्या प्रभावळीतील एक मोक्याचा किल्ला तसेच कुंभे घाटाचा रक्षक.
मला स्वतःला या अश्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर नसलेल्या पण कुठूनतरी मुख्य रांगेशी नाळ जोडून असलेल्या या किल्ल्यांचे फार अप्रूप वाटतं. हे किल्ले त्या परिसरातील वाटांवर तसेच घाटवाटा यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच संरक्षण दृष्टीने आजूबाजूच्या प्रदेशावर अमंल बसविण्यासाठी अत्यंत उपयुक्त. भैरवगड, गोरखगड, सिद्धगड, कोथळीगड, भिवगड, मृगगड, अनघाईगड, सुधागड, कुर्डुगड, मानगड ते मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड अशी काही उदाहरणं. या किल्ल्यांवरून सह्याद्रीचा जो नजारा दिसतो त्याला तोड नाही. त्याचे खरं राकट दणकट रूप येथूनच समजते.
साडेबाराच्या सुमारास गावात परतलो. विश्रांती घेऊन निघेपर्यंत सव्वा वाजून गेले, खरंतर दुपारच्या टळटळीत उन्हात निघायची मुळीच इच्छा नव्हती पण थांबून तरी किती वेळ थांबणार! आता माझ्यासमोर दोन पर्याय होते, किल्ले रायगड अथवा कुंभे. शिवतीर्थ खुणावत होते, गेल्या काही वर्षांत तिथे जाणं झालेच नाही. राजांच्या समाधीचे दर्शन घेऊन, टकमक टोकावरून सह्याद्री न्याहाळून किती दिवस झाले. मी त्याच विचारात तितक्याच ओढीने बुलेटला किक मारून निघालो पाचाड फाट्याला डावीकडे वळणार तोच दोन लहान गाड्या आणि मिनी बस त्यापैकी एकाने थांबून मला, ‘रायगड किधर है असे विचारले’. ती गर्दी पाहून लक्षात आलं अरे आता तर सुट्या आहेत आणि त्यात आज शनिवार म्हणजे विकेंडची अजुन गर्दी असणार. खरं तर एवढ्या गर्दीत आणि धावपळीत जाण्यात काही अर्थ नाही, लवकरच निवांत वेळ काढून यायचं अशी मनाची समजूत काढत गाडी मागे फिरवली. कुंभे घाटाची जुनी आठवण होतीच.
दहा मिनिटांत ‘चाच’ गावात आलो तेव्हा समोर घाटाची रांग बर्यापैकी उंच वाटत होती आणि आता काही वर्षांपूर्वी मांजूर्णे ते पुढे कुंभे धरण प्रकल्पामुळे गावात पर्यंत झालेला गाडी रस्ता. चाच गाव सोडून घाटाच्या रस्त्याला लागलो मानगड आता माझ्या उजव्या हाताला त्याला तसाच वळसा घालून गाडी घाट चढू लागली. दोन मोठी नागमोडी वळणे पार करून मांजूर्णे गावाच्या थांब्याजवळ आलो. अर्थातच भर दुपारी उन्हात तिथं कुणी चिटपाखरू नव्हते. तसाच पुढे जात केळगण फाट्यावर थांबलो. तसं पाहिलं तर केळगण पुढे बोरमाची ही कुंभे घाटातली पदरातली छोटी गावं. केळगणला तर माणगाव निजामपूरहून परिवहन महामंडळाची एसटी येते.
थोडा वेळ तिथेच थांबलो असताना समोरून एकजण बाईक वर येताना दिसला. पुढच्या रस्त्याची आणि काही इतर चौकशी केल्यावर शेवटी एक वाक्य बाकी मजेशीर बोलून गेला. "सावकाश जा घाबरु नका, या भागात एवढी भूतं नाही आहेत". केळगणचा रस्ता डावीकडे सोडून मी सरळ कुंभेकडे निघालो. मोठा चढ आणि वळसा घालून एकदाचा बोगद्या समोर आलो.
हाच तो कुंभेचा बहुचर्चित बोगदा. अलीकडे थांबून काही फोटो घेतले. गॉगल काढून हेडलाईट ऑन करून बोगद्यात शिरलो. थोड आत जात विलक्षण गारवा जाणवला, बुलेटचा आवाज बाकी भारीच घुमत होता. लांबी जवळपास सहाशे सातशे मीटर असावी.
बोगदा पार केल्यावर पलीकडच्या बाजूला एक मोठा ओढा (कोरडा) दरीत झेपावत होता. पावसाळ्यात इथलं दृश्य पारणे फेडणारे असेल यात वादच नाही. तसेच थोडे अंतर गेल्यावर उजवीकडे रस्त्याच्या कडेला काळकाई देवीचे जुने दगडी मंदिर. मंदिराच्या एका बाजूला थोडफार झाडोरा आणि पलीकडे ओढा. ओढ्यात अजूनही पाण्याची बारीक धार वाहती होती थोड पुढे तिथेच कुंड बांधलेले. स्वच्छ पाण्याने तोंड हाथ पाय धुवून घेतले. बूट काढून कितीतरी वेळ पाय पाण्यात सोडून बसलो. भर उन्हात तापलेल्या रोडवर गाडी चालवून पायातले बूट ही प्रचंड तापलेले. गार पाण्याने चांगलाच दिलासा मिळाला. एकदम शांत वातावरण त्यात घाटावर आल्यावर हवेत लगेच बदल जाणवला. जवळच पाणी आणि थोडी का असेना पण थंड हवा. अधून मधून पक्ष्यांची किलबिल. एकंदरीत प्रसन्न वातावरण, बराच वेळ तिथेच रेंगाळलो. मंदिराच्या समोरच रस्त्या पलीकडे छोटासा खिंडी सारखा भाग तिथेच दरी काठावर संरक्षक कठडा बांधलेला, बरोब्बर तिथूनच जुनी वाट वर येते. कठड्यावर जाऊन उभा राहिलो, खाली दूरवर चाच गाव, घाटरस्ता, उजव्या बाजूला केळगण तर डावीकडे मांजूर्णेचा काही भाग.
खाली बोरगाव मांजूर्णेकडून येणारी जुनी कुंभे घाटाची वाट त्यात काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या. गेल्या काही वर्षांत जुन्या घाटवाटेला धरून गाडी रस्ते बांधले गेले, अणुस्कुरा घाट... रघुवीर घाट आणि हा कुंभे घाट ही काही उदाहरणे. अर्थात हा घाट अजुन पूर्णपणे वापरात नाहीये, भविष्यात कुंभे आणि घोळ रस्ता झाल्यावर पुणे पानशेत घोळ कुंभे निजामपूर पुढे माणगाव. मंदिराजवळच्या ओढ्याला समांतर रस्त्याने वर जात त्याच ओढ्यावर बांधलेल्या पुलावर आलो. या भागात ओढा चांगलाच रुंद. पुलाच्या अलीकडची वाट सरळ जुन्या कुंभे गावात जाते. मग गावातून पूर्वीचे मार्ग खाली मांजूर्णे, केळगण, बोरमाची ते अगदी कुंभळमाची पर्यंत, तर या वरच्या भागात घोळ दापसरे ते गारजाईवाडी जाणारे जुने मार्ग. हल्ली क्वचित प्रसंगी गावकरी आणि मोजके ट्रेकर सोडले तर या भागातून कुणी फिरकत नाही. कुंभे जरी घाटमाथ्यावर असले तरी हे रायगड जिल्ह्यात मोडते.
पूल पार करून नव्याने वसलेल्या कुंभे गावात आलो. धरण प्रकल्पामुळे गाव याबाजूला विस्तापित झाले आहे. एका घराच्या अंगणात थांबलो, पाण्याचा तांब्या घेऊन मामा बाहेर आले. राम राम शाम शाम झाले, या गावात बहुतेकांची आडनांव ‘तेलंगे’. मामांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्या वेळेच्या वाटा येणं जाणं, पाणी पावसाचं प्रमाण, शाळा, आरोग्य सुविधा, जंगल तोड, धरण बांधकाम विद्युत प्रकल्प पुढे स्थगिती मग आत्ताची परिस्थिती इतर अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच या भागातील बरीच माहिती दिली. वेळचे गणित आणि परतीचा पल्ला लक्षात घेत मामांचा निरोप घेतला. वाटेत नव्याने बांधलेल्या मारुती मंदिर आणि जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ थांबून पलीकडच्या बाजूचे काही फोटो घेतले. घाट उतरून अर्ध्या तासात निजामपूर गाठले.
येताना थोडे आत जात विळे, पाटणूस, भिरा धरण, वर अंधारबन हिरडीचा भाग कलत्या उन्हात सारं पुन्हा पुन्हा नजरेत भरून पालीला आलो दोन ग्लास कोकम सरबत पिऊन खोपोली पर्यंत सह्याद्रीची सोबत होतीच. पुढे सायंकाळची पनवेल शीळफाटा ट्रॅफिक टाळत चौक कर्जत मार्गे बदलापूर पाईप लाईन रोड पकडला. वाटेत दूर इर्शाळगड त्या पलीकडे सूर्य अस्ताला जात होता, पुढे संधिप्रकाशात माथेरानला टाटा बाय बाय करत, दिवस सह्यसानिध्यात घालवून घरी परतलो.
अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/06/mangad-kumbhe.html
मायबोलीवर वाचलेला पहिला लेख
मायबोलीवर वाचलेला पहिला लेख.फार सुंदर वर्णन.
व्वा! मस्त! फोटो आवडले. कौतुक
व्वा! मस्त! फोटो आवडले. कौतुक वाटते तुमच्या ट्रेक प्रेमाचे.
नेहमी प्रमाणे मस्त लिहीलंय.
नेहमी प्रमाणे मस्त लिहीलंय. तो बोगदा खूपच भारी वाटतोय, तुंबाडला जाणारा बोगदा शोभतोय.
धन्यवाद ...सुमित, रश्मी आणि
धन्यवाद ...सुमित, रश्मी आणि मानव