जबरदस्त गोरखगड ट्रेक

Submitted by सुमित बागडी on 28 October, 2018 - 07:29

ऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश, ज्याच्यासोबत मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. खोपोलीहून योगेश सुद्धा जॉईन होणार होता.

आकाश ने व्हाट्सअप ग्रुप वैगेरे बनवला. ग्रुप वर बरीच चर्चा रंगली. बहुतेक जणांना कळसुबाई पीक ट्रेक करायचा होता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिखर असल्याने प्रत्येक नवीन ट्रेकर ला आधी आठवतो तो कळसुबाई. पण शेवटी आकाश आमचा ग्रुप लीडर असल्याने तो जिथे सांगेल तिथे जाणे भाग होते. योगेश आणि आकाश च्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रश्नच उठत नाही .

gorakhagad trek 5_1.jpg

शेवटी आकाश ने मुरबाड मधील गोरखगड चा प्लॅन निवडला. योगेश आणि आकाश एक दोनदा गोरखगड ला जाऊन आले होते त्यामुळे आम्हाला पूर्ण गायडन्स मिळणार हि खात्री होती. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा शनिवार आणि रविवार जायचे असे सर्वानुमते ठरले. सुरुवातीला १५ जणांचा ग्रुप आता ६-७ जणांचा राहिला. हे तर नेहमीचाच.

गोरखगड हा मुरबाड तालुक्यातील देहरी गावाजवळ आहे. गावात पोहोचताच डोंगराचे दोन सुळके सहज नजरेस पडतात. एक मच्चीन्द्रगड आणि आणि दुसरा म्हणजे गोरखगड. गोरखगड च्या पायथ्याशी श्री गोरक्षनाथांचे सुंदर मंदिर आहॆ. गोरखनाथ किंवा गोरक्षनाथ या गडावर तपस्या करीत होते असे मानले जाते.

देहरी गावात येण्याजाण्यासाठी एस टी बसेस पुरेश्या प्रमाणात आहेत. आमचा प्लॅन रात्री उशिरा देहरी गावात पोहचून गोरखनाथ मंदिरात वास्तव्य करून सकाळी लवकर उठून ट्रेक सुरु करायचा असा होता. पण जो फसत नाही तो प्लॅन कसला. मी आणि आकाश आम्ही दोघांनी शनिवारी रात्री कांजूरमार्ग वरून ट्रेन पकडून १०:३० च्या सुमारास कल्याण गाठले तिथे एस टी स्टॅन्ड वर बाकीची मंडळी भेटली. आम्ही कल्याणहून मुरबाड आणि तेथून रात्री उशिराची एस टी पकडून देहरी गावाला जाणार होतो. आम्ही ठरल्या प्रमाणे मुरबाड ला जाणारी ११ ची एस टी पकडली. एस टी मधेच आम्हाला धक्का बसेल अशी बातमी कळली, एक सहप्रवाशाने सांगितले कि पावसाळी हवाना असल्याने सध्या गोरखगड ट्रेक बंद ठेवण्यात आला आहे. योगेश आणि आकाश ची भंबेरी उडाली पण पॅनिक न होता त्यांनी दुसरा पर्याय शोधण्यास सुरु केला. आकाश ने कुठेतरी फोनाफोनी केली आणि दोन तीन वेगळे पर्याय शोधून ठेवले. आम्ही बाकीचे तरीपण पॉसिटीव्ह होतो. कोना एकाच्या सांगण्यावरून संपूर्ण प्लॅन चांगले करायचा म्हणजे जीवावर येतं. आम्ही मुरबाड ला उतरून पुढे कुठे जायच ते ठरवलं.

रात्री १२ वाजता आम्ही मुरबाड एस टी स्टॅन्ड वर पोहोचलो तेव्हा चांगली बातमी कानावर आली, ती अशी कि गोरखगड ट्रेक अजूनही सुरळीत चालू आहे आणि तेथे जाण्यास कुठीलीही बंदी नाही . सगळ्यांचा जीवात जीव आला. एक चांगली बातमी येते तीच पाठोपाठ दुसरी वाईट बातमी आली. मुरबाड हुन देहरी ला जाणारी शेवटची एस टी सध्या बंद होती. आता काय पूर्ण रात्र एस टी स्टॅन्ड वर झोपून काढायला लागणार. संपूर्ण रात्र स्टॅन्ड वर काढून सकाळी ६:३० ची एस टी पकडून आम्ही नारिवली या देहरी जवळच्या गावात उतरलो. देहरीकडे जाणारी एसटी सुद्धा आम्हाला नाही मिळाली. शेवटी नारिवली ला उतरून देहरी गावातल्या गोरखनाथांच्या मंदिरापर्यंत आम्हाला चालत जावे लागले.

gorakhagad trek 3.jpg

गोरखगड ट्रेक बरोब्बर गोरखनाथ मंदिराच्या मागून सुरु होतो. आम्ही ८ वाजता मंदिराच्या मागून ट्रेक सुरु केला झाडीभरल्या वाटेने वर चढाईस सुरुवात केली . पायवाट तशी समजण्यास सोप्पी आहे. नवीन माणूस सुद्धा त्या वाटेवर चुकणार नाही. तास दीड तासाच्या चाली नंतर आम्ही मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. तेथेच पायथ्याशी आपल्याला काही पुरातन शिळा पाहायला मिळतात. येताना बघू म्हणून आम्ही तिथे ना थांबता मुख्य चढाईस सुरुवात केली.

gorakhagad trek 1.jpg

आता पायवाट सोडून गडाची पायऱ्यांची वाट सुरु झाली. सुरुवातीला सोप्पी वाटणारी पायऱ्यांची वाट हळूहळू जसे वर जाऊ तसे आणखी कठीण व तीव्र होत गेली. पावसाळा असल्याने संपूर्ण परिसरात धुके दाटले होते. धुक्यांमुळे दरी किती खोल आहे हे सांगणे कठीण होते. पण बरीच खोल असावी. पायवाटेने येताना बरेच फोटोस काढले पण आता मात्र फोटो काढायची हिम्मत कोणाची होत नव्हती. अर्धा पाऊण तास पायऱ्या चढून झाल्यावर एक गुंफा लागते. गुंफेत काही मंडळी रात्रीस वास्तव्याला होती आणि दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. १०-१५ जणांचा ग्रुप आरामात राहील एव्हडी मोठी ती गुंफा आहे. गुंफेच्या आसपास पाण्याचे ३ मोठे टाके आहेत. पाणी अतिशय साफ आणि पिण्यास योग्य आहे. सोबतीला माकडे हि आहेत.
आम्ही तिथेच बॅगा टाकल्या कारण बॅग सकट वर जाणे धोक्याचे आहे असे आकाश चे मत होते. वास्तव्याला असलेल्या माणसांना बॅग वर लक्ष ठेवायची विनंती केली आणि आम्ही तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याची चढाई सुरु केली. शेवटची चढाई सगळ्यात खतरनाक. तीव्र चढाई, कातळात खोदलेल्या पायऱ्या, पावसाळी हवामान, आणि मागे दृष्टीभय. साहसी गिर्यारोहींना आणखी काय हवे. पायऱ्यांमध्ये पकडण्यासाठी ताशा खोबणी केल्या आहेत त्यामुळे धोका थोडाफार कमी होतो परंतु याठिकाणी निष्काळजी पणा भारी पडू शकतो. आत्मविश्वास नसल्यास एखादा रोप जरूर घेऊन जावा.

गोरखगड चे आणखी एक आकर्षण म्हणजे येथे एका पायरी वर प्राचीन शिलालेख आढळतो. इतिहासात संशोधनात आवड असणाऱ्यांनी एकदा अवश्य हा शिलालेख पाहायला यावे. कालानुरूप त्याची झीज झाली आहे तसेच त्यातील शब्द ओळखण्यास कठीण झाले आहेत. इतिहास संशोधकांना मात्र ते शब्द वाचायला जास्त कठीण नसावेत.

gorakhgad shilalekh.jpg
pic credit Travelhi5

शेवटचा टप्पा पार करून आम्ही गडाच्या माथ्यावर आलो. माथ्यावर शिवशंकराचे छोटेखानी मंदिर आहे. आजूबाजूचा नजरा अतिशय विलोभनीय. इतक्या वर येण्याचे सार्थक वाटले. दक्षिणेला अहुपे घाट पुढच्यावेळी पुन्हा नक्की येऊन जा असे जणू सांगत होता. समोरच संपूर्ण भीमाशंकर रेंज चित्रकाराने काढलेल्या चित्रप्रमाणे भासत होती. पूर्वेकड नाणेघाट -जीवधन-ढाकोबा सुद्धा खुणावत होते. संपूर्ण परिसर डोळ्यात साठवून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. नेहमीप्रमाणे मी आकाशला पर्यायी मार्ग बद्दल विचारले कारण इतक्या भयानक चढाई नंतर परत त्याच मार्गाने उतरणे म्हणजे जीवावर आले होते. पण उतरायला सुद्धा मजा आली . सावकाश हळूहळू वेळ घेत आम्ही पुन्हा गुंफे पाशी आलो. गुंफेतच दुपारचे जेवण उरकले आणि पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. मगाशी ठरवल्याप्रमाणे प्राचीन अवशेांचे निरीक्षण केले (काही समजले नाही ती वेगळी गोष्ट). पुन्हा झाडी भरल्या वाटेने तासाभराची चाल गोरखनाथांच्या मंदिरात आलो आणि तेव्हा दुपारचे ३ वाजले होते . एकंदर आमचा ट्रेक खूप योग्य वेळेत पूर्ण झाला. मंदिरातच तासभर फ्रेश वैगेरे होऊन पुन्हा गावात एसटी साठी निघालो.

gorakhagad trek 4.jpg

आता पुन्हा एसटी आमची मजा घेत होती. देहरी गावात दोन बाजूने एसटी येते. जिकडे जायला नको होते तिकडेच आम्ही जाऊन उभे राहिले. दुसऱ्या बाजूने ४-५ एसट्या गेल्या आणि आम्ही जिकडे उभे होतो तिकडे एकपण एसटी नाही अली. शेवटी कंटाळून पुन्हा मुख्य नाक्यावर आलो. तिकडे शेवटी अर्धा तासाने एक एसटी मिळाली ती मुरबाड पर्यंत. मुरबाड डेपो ला मात्र आम्हाला लगेच कल्याण एसटी मिळाली आणि रात्री १० पर्यंत पुन्हा घरी.

एकूणच गोरखगड चा हा ट्रेक अविस्मरणीय झाला. इतका कठीण ट्रेक मी आधी कधीच केला नव्हता. आकाश चे याबद्दल खूप आभार. जर बाईक किंवा कार असेल तर या ट्रेक ला वेळेचे काही बंधन नाही पण नसेल तर रात्री उशिराची एसटी वैगेरे पकडून किंवा आदल्या दिवशी संध्याकाळ पर्यंत देहरी ला पोचून रात्री पायथ्याशी मंदिरात वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी ट्रेक पूर्ण करणे हा सुद्धा चांगला पर्याय आहे. गोरखगडावर पावला पावलावर अनेक सर्प्राइसेस मिळतात. कुठे तीव्र चढाई तर कुठे छोटे मोठे कठीण पॅचेस. एकंदर गोरखगड हा प्रत्येक ट्रेकरच्या लिस्ट मध्ये हमखास असावा असा ट्रेक आहे.

gorakhagad trek 5.jpg

छायाचित्रे - आकाश मगदूम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users