जीवन माझे सजले आहे

Submitted by निशिकांत on 26 October, 2018 - 05:32

नक्षत्राचे लेणे लेउन जीवन माझे सजले आहे
कैक धुमारे, पर्णफुटीने अंगण माझे नटले आहे

रडलो, हसलो, जगलो, मेलो खुशीखुशीने, सांग जीवना !
असेच का अन् तसेच का? हे तुला कधी का पुसले आहे?

फलप्राप्तीची जरी अपेक्षा मनात नाही, तरी मंदिरी
देवासाठी नैवेद्याचे ताट पुढे मी धरले आहे

हिरव्या रोमांचांनी सजली श्रावणमासी तरी परंतू
ग्रिष्मझळांचे दु:ख धरेच्या खोल अंतरी लपले आहे

माझे ओझे मीच पेलतो भार नसे मी कधी कुणाला
मरण्याआधी माझ्यासाठी आज कफन मी शिवले आहे

भांडणातही संवादाला संधी द्यावी खरे परंतू
ज्योत भेटली अंधाराला असे कधी का दिसले आहे?

खळगी भरण्या टिळा लावुनी केला मी उपदेश जगाला
काच मनाला, माझ्या हातुन घडूनये ते घडले आहे

स्वयंप्रकाशी जरी तळपतो सूर्य अभागी, त्याच्यासाठी
चांदण रात्री प्रेम प्रियचे, त्याला मृगजळ ठरले आहे

खळखळणारा निर्झर आहे "निशिकांता"चे जीवन सारे
नको थांबणे, अखंड माझे झुळझुळणे बस उरले आहे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users