मार्ग हा 'दे माय धरणीठाय' नाही राहिला

Submitted by बेफ़िकीर on 24 October, 2018 - 06:19

गझल - मार्ग हा दे माय धरणीठाय नाही राहिला
==========

मार्ग हा 'दे माय धरणीठाय' नाही राहिला
भाग्य हे की पाय डावा, पाय नाही राहिला

सिद्ध केल्या आजवर मी हरप्रकारे भावना
ह्यापुढे गझलेविना पर्याय नाही राहिला

गुंतवत होतो मने पर्वा न व्याजाची करत
आज तो माझा तुझा व्यवसाय नाही राहिला

ग्रंथ विरहाचे निघाले प्रेमग्रंथांऐवजी
आपला त्यांच्यातही अध्याय नाही राहिला

आजही घेऊन चटके सांत्वने करतो तुझी
एवढाही हक्क माझा काय नाही राहिला?

'बाय' बोलत राहतो साऱ्या जगाला 'बेफिकिर'
एक साला जीवघेणा 'हाय' नाही राहिला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users