नवरात्र : आदिशक्तीचा जागर
माळ सातवी
“आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी, जागवते रात्र सारी
आज गोंधळला येवी, अंबे गोंधळाला ये ||”
आजचा दिवस हा महालक्ष्मीपूजनाचा. लक्ष्मीमातेचा आपल्या आयुष्यात सदैव वास असावा हीच प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यासाठी ती प्रसन्न कशी राहील या साठी आपण कायमच प्रयत्नशील असतो.
तसेच काहीसे नाते आजच्या आपल्या माळेचे आहे. “सासूबाई” हा आपल्या आयुष्यात अविभाज्य नात्याचा पदर असतो. नवीन घरात रूळेपर्यंत जर हा मायेचा व मदतीचा हात मिळाला तर त्या घराला आपलेसे करणे सोपे होऊन जाते. सासरच्या पद्धती व रीतीरिवाजाची योग्य पकारे ओळख करून देण्याचे काम त्याच करत असतात. सारे अंगवळणी पडेपर्यंत कायम आपल्या बरोबर रहाणार्या् या व्यक्तिला आपल्या आयुष्यात खूप महत्व असते.
महालक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपण जसे झटत असतो तसेच सासूबाई एकदा का आपल्यावर प्रसन्न झाल्या कि मग आयुष्य आलबेल होणारच याची खात्री बाळगून राहायचे बरं का !!
हे नाते जर जुळले तर आजच्या लाल रंगासारखे मनाला उत्तेजना देऊन चित्त शांत रहाण्यास खूप मदत होते. तसे नाते स्वीकारण्यात एक प्रकारचा मोकळेपणा येतो, ज्यामुळे सकारात्मकता वाढून गोष्टी स्वीकारणे सोपे होऊन जाते.
जेंव्हा या नात्यात कौतुकाची वानवा नसेल तर मग एकमेकींच्या बौद्धिक व मानसिक कणखरतेला सलामीच मिळत रहाते हे मात्र खरे.