मागील प्रकरणात आपण मोरोक्को आणि बोस्नियन पेच प्रसंगांची थोडक्यात माहिती घेतली. आता पुढच्या भागात आपण युरोपला पहिल्या महायुद्धाकडे घेऊन जाणाऱ्या कटकटी ज्या बाल्कन देशात/प्रदेशात होत होत्या त्या बाल्कन देशांबद्दल आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याबद्दल थोडी माहिती घेऊयात.तसेच ह्या कटकटी काय होत्या? कोण कसे वागले? आणि युद्ध भडकायचे निमित्त ठरणारी घटना म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक ह्यांच्या खुनाबद्दल ही माहिती घेऊ
पहिले महायुद्ध!
प्रकरण १ भाग ३
तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य आणि बाल्कन राष्ट्र
तुर्कस्तानचे ओट्टोमान राज्यकर्ते मुळचे युरोप बाहेरचे पण त्यांच्या साम्राज्याचा बराचसा भाग पूर्व आणि दक्षिण युरोपात पसरलेला होता, आणि पश्चिमेला आफ्रिकेत मघरेब पर्यंत. (मघरेब म्हणजे उत्तरपश्चिम आफ्रिकेतले देश-लिबिया, मॉरिटॅनिया, ट्युनिशिया, मोरोक्को व पश्चिम सहारा- या भूभागाची भूमध्य समुद्राला लागून असलेली चिंचोळी पट्टी. तुर्की राजा उस्मान पहिला ह्याने १४व्या शतकाच्या आरंभी स्थापन केले म्हणून हे ओट्टोमान साम्राज्य. उस्मानचा अपभ्रंश उथमान आणि मग ओट्टोमान. पण एकेकाळी ताकदवान आणि त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर पोलादी पकड असलेले हे साम्राज्य आता जवळपास ५०० वर्षे झाल्यानंतर कमकुवत आणि खिळखिळे झालेले होते. समकालीन इतिहासात त्याचे वर्णनच मुळी युरोपातला आजारी म्हातारा असं केलेलं आपल्याला आढळून येतं. फ्रांस ऑस्ट्रिया अगदी रशिया इंग्लंड सारखी राष्ट्र त्याच्या नाकाशी सुत धरून बसली होती कि कधी हा म्हातारा गचकतो आणि आपण त्याच्या भूभागाचे लचके तोडतो.युरोपच्या मुख्य भूमीला ओट्टोमान साम्राज्य इस्तंबूल पाशी जमिनीने जोडले गेले आहे. त्यापुढचे युरोपचे समुद्रात घुसलेले भूशीर किंवा द्वीपकल्प म्हणजे बाल्कन प्रदेश.हा आग्नेय युरोपचा भूभाग. बाल्कन हा शब्द मूळ तुर्की त्याचा अर्थ डोंगराळ प्रदेश. बल्गेरिया पासून सर्बियापर्यंत पसरलेल्या पर्वत राजीला बाल्कन असे नाव आहे त्यावरून हा प्रदेश बाल्कन प्रदेश म्हणून ओळखला जातो.
सर्बिया, रोमानिया, मोन्टेनेग्रो, बोस्निया, हर्जेगोविनिया, बल्गेरिया ग्रीस असे अनेक देश ह्यात येतात. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा भुभाग तुर्की ओट्टोमान साम्राज्याच्या अधिपत्याखाली येत होता पण जसजसे तुर्की साम्राज्य कमकुवत होऊ लागले तसतसे त्यांच्या सत्तेचे जोखड झुगारून देऊन ग्रीस, रोमानिया, सर्बिया असे देश स्वतंत्र होऊ लागले. सर्बिया, मोन्टेनेग्रो, बोस्निया, हर्जेगोविनिया, बल्गेरिया आणि दक्षिण ऑस्ट्रिया ह्या प्रदेशात प्रामुख्याने स्लाव वंशीय लोक राहत त्यामुळे ऑस्ट्रियाने सुरुवातीला तुर्की अम्मलापासून मुक्त होण्यात ह्या देशांना भरपूर मदत केली पण १९०८ साली ऑस्ट्रियाने नुकतेच स्वतंत्र झालेले बोस्निया आणि हर्जेगोविनिया हे देश आपल्या साम्राज्याला जोडले.( तसा त्यावर लष्करी ताबा त्यानी आधीच मिळवला होता) त्याला कारणही तसेच होते. ऑस्ट्रियाच्या साम्राज्याच्या ह्याभागात स्लाव वंशीय जनता बहुसंख्येने असल्याने आपला हा घास आपण सहज पचवू असे त्याना वाटले तसेच बोस्निया आणि हर्जेगोविनिया पादाक्रांत करून त्याना जवळपास ३७० मैल लांबीची किनारपट्टी लाभली.ज्याचा व्यापार आणि संरक्षणासाठी त्यांना मोठा उपयोग होणार होता. पण ऑस्ट्रियाच्या ह्या कृतीमुळे सर्बिया कमालीचा नाराज झाला.
सर्बिया हा अगदी नुकताच म्हणजे १८७८ साली तुर्की जोखडातून मुक्त झालेला देश. बाल्कन भागात राहणारे बहुसंख्य लोक स्लाव वंशाचे, त्यातून सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, मोन्टेनेग्रो, बल्गेरिया आणि ऑस्ट्रियन साम्राज्याचा दक्षिण भाग हे विशेष करून स्लाव वंशीयांचे त्यामुळे एड्रीयाटीक सामुद्रापासून काळ्यासमुद्रापर्यंत एक सलग असे स्लाव वंशीयांची सत्ता असलेल्या देशांचे राज्यसंघ निर्माण करून आपण त्यातील प्रमुख राष्ट्र व्हायची त्याला मनीषा होती(प्रशिया जर्मनी प्रमाणे) पण ह्यावर ऑस्ट्रियाने पाणी फिरवले. तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त झालेले भूभाग जर ऑस्ट्रियाच्या प्रभावाखाली न येता ह्या नवीनच जन्माला आलेल्या सर्बियन राष्ट्राचे नेतृत्व स्वीकारू लागले तर ते कुणाला आवडणार होते.उत्तरेला जर्मनी होता म्हणजे दक्षिणेला असे एक प्रबळ राज्य तयार झालेले ऑस्ट्रियाला तर नक्कीच नको होते. अर्थात आतापुरता आणि वरकरणी सर्बिया शांत बसला कारण ऑस्ट्रियाला एकट्याने भिडायची काही त्याची ताकद नव्हती. (अर्थात म्हणून ते हातावर हात चोळत गप्प बसले नव्हते.)
अगदी तीस वर्षापूर्वीच(१८७८) अस्तित्वात आलेल्या सर्बियाची युरोपात पतही तशी काही फार चांगली नव्हती. नाही. सर्बिया हा जहाल स्लाव राष्ट्रवादी होता आणि अशा जहालपणात इतर अल्पसंख्यांकांचे हाल होतातच त्याप्रमाणे सर्बियातल्या एकेकाळच्या राज्यकर्त्या असलेल्या अल्पसंख्य मुसलमान समाजावर अन्याय आणि दडपण होऊ लागल्याच्या बातम्यांनी, तसेच तुर्कस्तानच्या जोखडातून इतर देशाना स्वतंत्र होण्यासाठी मदत करताना हिंसा, जाळपोळ, राजकीय खून असल्या कृत्याना पाठींबा दिल्याने सर्बिया बद्दल एकूणच युरोपात संशयाचे वातावरण होते. त्यात सततच् चालू असलेल्या असल्या हिंसक कारावायांनी हा एकंदर बाल्कन राष्ट्रांचा समुह म्हणजे भांडकुदळ लोकांचा रानटी गट आहे आणि ह्या भागात खून मारामाऱ्या म्हणजे रोजचेच रडगाणे आहे अशीच उर्वरीत युरोपची भावना होती. (त्यामुळेच अशाच एका बाल्कन प्रदेशात ऑस्ट्रियाच्या युवराजची हत्या झाल्याने महायुद्ध पेटेल ह्याची कुणाला स्वप्नातही कल्पना आली नसणार ...असो.)
१९०३ साली ऑस्ट्रिया धार्जिणा असलेला सर्बियाचा राजा अलेक्झांडर ओब्रेनोविक आणि राणी ड्रेगा ह्यांची सर्बियाच्या काही लष्करी अधिकार्यांनी त्यांच्याच राजप्रासादात गोळ्या घालून हत्या केली आणि एवढे करून ते थांबले नाहीत तर त्याच्या शरीराची विटंबना करून आणि अर्धनग्नावस्थेत असलेले राजा राणीचे मृतदेह त्यानी खिडकीतून खाली फेकले. खुनानंतर दाखवले गेलेलं हे क्रौर्य फार काही भूषणावह नव्हते. ह्या कटाचा सूत्रधार आणि म्होरक्या होता “द्रागुतीन देमित्रीवीच” उर्फ ‘एपिस’. ह्या खुनाच्या वेळीच तो राजाच्या शरीररक्षकाशी झालेल्या झटापटीत किरकोळ जखमी झाला होता पण त्यामुळेच त्याला अगदी सर्बियाचे राष्ट्रीय नायकत्व मिळाले होते. द्रागुतीन देमित्रीवीच” उर्फ ‘एपिस’ हा ‘The Black Hand’ ह्या अत्यंत कुप्रसिद्ध्र आणि क्रूर संघटनेचा संस्थापक आणि चालक.
आता ‘The Back Hand’ ह्या नावावरून ही संघटना काही धर्मादाय किंवा सार्वजनिक काम करणारी संस्था नव्हती हे कळूनच चुकते. माफिया आणि दहशतवादी संघटना ही नावे प्रचलित व्हायच्या खूप आधी, तसलीच कामे करणारी ही एक गुप्त संघटना होती. राजकीय हत्या , सरकारविरोधी हिंसक कारवाया, बंडखोर/ क्रांतीकारकाना प्रशिक्षण देणे व रसद पुरवणे असली कामे ते करत आणि त्यांचा मुख्य उद्देश होता ऑस्ट्रियाच्या जोखडातून स्लाव बहुल भाग मुक्त करून एक मोठे स्लाव वंशीयांचे राष्ट्र स्थापन करणे. सर्बियाच्या राजा आणि राणीचे शिरकाण किंवा ऑस्ट्रियाच्या युवराज आणि युवराज्ञीचा खून हे त्यांचेच कारस्थान .
बाल्कन युद्ध १९१२ आणि १९१३
१९०५ ते १९११ दरम्यान उद्भवलेल्या ३ महत्वाच्या पेच प्रसंगात युरोप कसा युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता ते आपण पहिले. १९१२ आणि १९१३ मध्ये बाल्कन प्रदेशात दोन अत्यंत महत्वाची युद्ध झाली. आता युद्ध असल्याने त्यात साहजिक जीवित हानी तह वाटाघाटी सर्व काही झाले पण एकुणात ह्या युद्धाचे पडसाद सर्व युरोपभर तितक्या तीव्रतेने उमटले नाहेत. पण महाविनाशक युद्धाची नांदी ती दोन युद्धे ठरली ह्यात शंका नाही. तर त्यांची त्रोटक माहिती.
पहिल्या बाल्कन युद्धाची ठिणगी पडायचे कारण झाले ते म्हणजे इटली आणि ओट्टोमान साम्राज्यातील युद्ध जे सप्टे १९११ मध्ये सुरु झाले.( हे म्हणजे पहिले बाल्कन युद्ध नव्हे.)खरेतर इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया हंगेरी ह्यांच्या त्रिसदस्यीय करारातला तिसरा मित्र देश. जर्मनी आणि तुर्कस्तानचे काही वाकडे नव्हते (उलट कैसरने म्हटल्याप्रमाणे तो तुर्कस्तान आणि जगभरातल्या मुसल्मनन्चा मित्र आणि हित चिंतक/ संरक्षक ) पण इटली ह्या तिघाताला सगळ्यात अशक्त कमकुवत आणि मुख्य म्हणजे असंतुष्ट देश. मोरोक्कन आणि बोस्नियन तिढ्याच्या वेळी त्याने जर्मनी आणि ऑस्ट्रियाला उघड पाठींबा द्यायचे टाळले होते. इटलीला देखील जर्मनी प्रमाणेच आपल्या वसाहती वाढवण्याची अपार इच्छा होती पण तो फार कमकुवत होता. त्याची ही अवस्था लक्षात घेऊन फरांद आणि इंग्लंडने त्याला चुचकारण्याचे धोरण अवलंबले.१९०९ साली त्यानी आणि रशियाने, इटलीने जर बोस्नियन पेच प्रसंगात रशियाची बाजू उचलून धरली किंवा फक्त गप्प बसणे जरी पसंत केले तर ते इटलीने ओट्टोमान साम्राज्याचा एखादा लचका तोडला तर त्या कृतीकडे कानडोळा करतील असे आश्वासन दिले.
१९०८ साली ऑस्ट्रियाने सहज पचवलेला बोस्निया हर्जेगोवानियाचा घास आणि त्यानंतर फ्रांसने तोडलेला मोरोक्कोचा लचका पाहून इटलीच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो अगदी उतावीळ झाला. १८७८ पासून त्याचा ओट्टोमान साम्राज्याचा भाग असलेल्या लीबियावर डोळा होता पण जर्मनीचा धाक असल्याने तो त्यांचा मित्र असलेल्या तुर्कस्तानवर हाल करायला घाबरत होता नेमके हेच हेरून तशात ब्रिटीश परराष्ट्र सचिव सर एडवर्ड ग्रे ह्यांनी इटलीने जर लीबियावर हल्ला केला तर आपण त्याला पाठींबा देऊ असे आश्वासन दिले त्यामुळे हिम्मत वाढून इटलीने जर्मनी आणि ऑस्ट्रिया ह्या मित्र देशाना अंधारात तेवून साप्ते १९११ मध्ये लिबियात फोजा घुसवल्या.
वरचे दोन नकाशे नीट पहिले तर ब्रिटीश चाल कळून येते. एकदा का इटली त्रिसदस्य करारातुन फोडला कि भूमध्य समुद्राचा अख्खा दक्षिण किनारा जर्मन विरोधी बनतो आणि उत्तरेकडून त्याच्या गळ्याभोवती फास तर सहजच आवळता येतो.
तसा लष्करी दृष्ट्या इटली काही फार मोठा ताकदवान देश नव्हता आणि ही गोष्ट काही गुपितही नव्हती पण ओट्टोमान फौजा त्याच्या पुढे संख्येने कितीही जास्त वाटल्या तरी मागासलेल्या आणि असंघटीत होत्या. पाहता पाहता इटलीने ओट्टोमान फोजांची धुळादाण उडवली. ह्या युद्धाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १ नोवे १९११ राजी जगाच्या इतिहासात प्रथमच कुणीतरी शत्रू सैन्यावर आकाशातून बॉम्ब फेक केली. इटालियन विमानाच्या पायलटाने तुर्की रसद पुरवणाऱ्या काफिल्यावर आपल्या विमानातून चक्क हात बॉम्ब फेकले. .
असो तर इटलीच्या ह्या युद्धाने आणि त्यात सहज मिळालेल्या यशाने आतापर्यंत तुर्कस्तानला दबून असलेल्या बाल्कन देशांची आता हिम्मत वाढली. सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथे तैनात असलेल्या रशियन राजदूत निकोलस हार्त्विग ह्याने परिस्थितीचा फायदा घ्यायचे ठरवले. तो तुर्कस्तानाचा पक्का द्वेष्ट होता असे नव्हे पण उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन ऑस्ट्रिया काही गडबड करेल ह्या भयाने त्याने सगळ्या बाल्कन राष्ट्रांची एकत्र मोट बांधून ओट्टोमान-तुर्क विरोधी आघाडी स्थापन केली तिचे नाव बाल्कन लीग.
पहिले बाल्कन युद्ध
८ ऑक्टो १९१२ रोजी पहिले बाल्कन युद्ध सुरु झाले. अजून तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य इटलीबरोबर युद्धात गुंतलेले होते अशात आधी मोंटेनेग्रोने तुर्कस्तान बरोबर युद्ध पुकारले लगेचच बल्गेरिया, सर्बिया आणि ग्रीस ह्या बाल्कन लीगच्या इतर सदस्य देशांनी ही तुर्कस्तान विरोधात युद्ध पुकारले.आधीच इटलीबरोबर युद्धात वर्षभर मार खात असलेल्या ओट्टोमान फोजांची पुरती दैना उडाली आणि ते माघार घेत घेत अगदी राजधानी इस्तम्बुलच्या बंदरापर्यंत येऊन पोहोचले.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मार खाल्लेल्या तुर्कस्तानने आंतररार्ष्ट्रीय परिषद घेऊन तंटा सोडवायची मागणी केली( म्हणजे त्यानी तसे करावे ही गळ इंग्लंडने च घातली)त्याप्रमाणे लंडन इथे परिषद भरली. आता बाल्कन लीगचा सदस्य आहे असे म्हटले तरी सर्बियाचे काही वेगळे इरादे होते. जन्मल्या पासून सर्बिया हा एकमेव असा बाल्कन देश होता ज्याला समुद्र किनारा लाभला नव्हता त्यामुळे त्यांचा डोळा दुरास(किंवा दुरात्सो) ह्या एका महत्वच्या तुर्की अधिपत्या खालील बंदरावर होता.(नकाशा पहा ) ह्या युद्धाच्या निमित्ताने दुरास बंदर आणि आसपासच्या किनारपट्टीचा प्रदेश हस्तगत करण्याचा त्यांचा इरादा होता.त्याप्रमाणे त्यानी तिथे फौजा घुसावाल्याही होत्या पण अर्थात त्यांच्या ह्या अगोचरपणाला परिषदेत ऑस्ट्रियाने खोडा घातला. त्यानी दावा केला कि हाभाग सर्बियाला मिळावा असे काहीच तेथे नाही. ना तेथे सर्ब लोकाची वस्ती आहे न स्लाव लोकांची, तेथे राहतात प्रामुख्याने मुस्लीम धर्मीय आणि ते वंश भाषा चालीरीती ह्या बाबत सर्ब लोकापेक्षा भिन्न आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे जर ते तुर्की अंमलाखाली राहत नसतील तर त्याना वेगळे स्वतंत्र राष्ट्र बनवू द्यावे. आश्चर्य म्हणजे ह्या प्रस्तावाला इटलीने ही दुजोरा दिला. त्याना देखील भांडकुदळ सर्बिया समुद्री शेजारी म्हणून नकोच होता. नेहमीप्रमाणे रशिया सर्बियाच्या पाठीशी उभा राहिला पण ह्या वेळी फ्रांसने मात्र त्याची साथ दिली नाही. अखेर सर्वानुमते तिथे अल्बानिया हे छोटे राष्ट्र बनवले गेले. जे आजतागायत तेथे आहे. शांतपणे आपण बरे आपलेकाम बरे असे धोरण ठेवून राहणारे ते कदाचित एकमेव बाल्कन राष्ट्र असेल...असो तर बराच खल होऊन शेवटी मे १९१३ रोजी समझोता झाला सगळ्यानी सुटकेचा नि:श्वास टाकला पण गोष्टी इतक्यावरच थांबल्या नाहीत. थांबणार नव्हत्याच.
दुसरे बाल्कन युद्ध
आतापर्यंत बल्गेरिया खरेतर ह्या बाल्कन लीग मधला सगळ्यात शक्तीशाली देश. ह्या युद्धात त्याने सैनिक ही सगळ्यात जास्त म्हणजे ६ लाख उतरवलेले होते. त्यांचा मुख्य उद्देश होता थ्रेस आणि मासिडोनिया प्रांत तो त्यानी पदाक्रांतही केला पण समझोत्यात त्यातला काहीभाग ग्रीसला आणि काही भाग सर्बियाला दिला गेला त्यामुळे ते भडकले आणि त्यानी बाल्कन लीग मधील देशावरच चढाई केली. हे दुसरे बाल्कन युद्ध.
ह्या बल्गेरियाच्या कृतीने चवताळून सर्बिया आणि ग्रीस हे तर एकत्र येऊन बल्गेरियाच्या विरोधात उभे ठाकलेच पण आतापर्यंत तटस्थ राहिलेला रोमानिया देखील बल्गेरियाच्या विरोधात युद्धात उतरला. ह्या संधीचा फायदा घेत तुर्कस्तानने देखील बल्गेरियावर हल्ला करून थ्रेस चा काही भाग परत जिंकून घेतला आणि आपली महत्वाचे राजधानी आणि मोक्याच्या जागी असलेले बंदर सुरक्षित करून घेतले अन्यथा बल्गेरियाच्या सीमा अगदी इस्तम्बुलला भिडल्या होत्या.अखेर ऑगस्ट १९१३ साली बुखारेस्ट इथे तह झाला आणि बल्गेरियाला सर्बिया आणि ग्रीस कडून घेतलेला प्रदेश मे१९१३च्या लंडन सामाझोत्याप्रमाणे परत करावा लागलाच शिवाय रुमानियाने उत्तरेकडचा जो भूभाग पादाक्रांत केला होता त्यावरही पाणी सोडावे लागले,. तुर्कस्तानने जिंकलेला प्रदेश त्यांच्या कडेच राहिला .
ह्या दोन बाल्कन युद्धात तशी हानी काही कमी झाली नाही. सगळीकडचे मिळून साधारण ५ लाख सैनिक आणि नागरिक ह्यायुद्धात कामी आले.(त्यात नंतर उफाळलेल्या वांशिक हिंसाचाराचा आणि धार्मिक दंगलींचाही हातभाग होता.) पण तरीही मुख्यत: तंटा बाल्कन आणि तुर्की प्रदेशातच राह्यला. एकंदरीत ह्यात जर्मनी शांतच होता. त्याना कमवायचं काहीच नव्हते आणि एकमेकांच्या विरुद्ध उभे असणाऱ्या इटली आणि ऑस्ट्रियाच्या पैकी एक कुणी निवडायचे टाळायचे होते.अशी कुंपणावरची बैठक घातक असते आणि ते नाराज झालेल्या इटलीने नंतर दाखवूनच दिले. बाल्कन लीग चा घाट घातलेल्या रशियाला ही मोठा डावपेचात्मक फटका असला. बल्गेरियाच्या आततायी कृतीने बाल्कन राष्ट्रांची एकी कायमची फुटली. रशियाने सर्बियाला पाठींबा दिल्यामुळे बल्गेरिया इतका नाराज झाला कि पुढे पहिल्या महायुद्धात तो जर्मनीच्या बाजूने उतरला. ह्या तंट्यात सर्बियाचा फायदा सगळ्यात जास्त झाला पण अजून ही समुद्र किनाऱ्याचा लहानसा तुकडा देखील हाती न आल्याने तो नाराजच राहिला.बोस्नियन पेच प्रसंगावेळी आणि आता ह्या दुरास(किंवा दुरात्सो)चा घास घेताना ऑस्ट्रियाने त्यात विघ्न आणल्याने तो ऑस्ट्रियाचा हाड वैरी बनला. सर्बियात असे अनेक जण होते जे ऑस्ट्रियावर ह्याचा सूड उगवण्याची संधी शोधात होते आणि ती त्यांना लवकरच मिळाली.
इंग्लंड आणि फ्रांस ने ह्या प्रकरणात बाहेरून मध्यस्थी करणाऱ्याची भूमिका बजावली आणि बाल्कन प्रद्शाताला तंटा आपण स्वत: त्यात भाग न घेता फक्त न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन सोडवू शकतो आणि युरोपातले सत्ता संतुलन सांभाळू शकतो असा आत्मविश्वास त्याना वाटू लागला. हा आत्मविश्वास नंतर घातक ठरला.
२०व्या शतकाच्या सुरुवातीपासून ही अशी ५ प्रकरणं उद्भवली कि ज्यांची परिणती एखाद्या मोठ्या युद्धात सहज होऊ शकली असते पण तसे झाले नाही.
रशिया
आकाराने रशिया फक्त युरोपच नाही तर अख्या जगात सर्वात मोठा देश आहे . इतका कि ह्याचे युरोपियन रशिया नी आशियायी रशिया से भाग कल्पिले जातात. रशिया हा देश किंवा राज्य म्हणून ७व्या शाताकाप्सून अस्तित्वात आहे. मध्य आशियातल्या गवताल स्टेप्स पट्ट्यातल्या निरनिरळ्या भटक्या टोळ्यांशी सतत संघास्र्ष करत तो आपले अस्तित्व टिकवून आहे . १५४७ साली इव्हान द टेरिबल हा रशियाचा पहिला झार बनला, झार हे रोमन सीझर ह्या शब्दाचेच रशियन रूप. त्यानेच रशियाला रशिया हे नाव दिले. त्याने पूर्वेकडे साम्राज्य विस्तार करत सायबेरिया आपल्या पंखाखाली आणला. १६१३ मध्ये रोमोनाव्ह घराण्याकडे राशीयाची सत्ता गेली.
त्यांच्यातला पिटर द ग्रेट हा सगळ्यात प्रसिद्ध आणि कर्तबगार झार. त्याने रशियाचे नौदल , लष्कर युरोपच्या धर्तीवर आधुनिक केल. त्यानेच युरोपात म्हणजे पश्चिमेकडे रशियाचा साम्राज्य विस्तार केला आणि रशियाच्या सीमा काळ्या समुद्र पासून ते बाल्टिक सागरापर्यंत नेऊन भिडवल्या.त्याने प्रसिद्ध पिटस्बर्ग हे शहर वसवून त्याला रशियाची राजधानी बनवले . त्याच्या नंतर आलेली राणी कॅथरीनही देखील मोठी कर्तबगार आणि धोरणी/ कुटील वृत्तीची शासक होती. तिच्या काळात रशियाचा भूविस्तार प्रचंड झाला पण त्याबरोबरच रशियन जनतेच्या हाल अपेष्टात, दैन्यात प्रचंड वाढ झाली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आलेल्या नेपोलीयानाच्या वादळी कारकिर्दीत इतर युरोपीय देशांप्रमाणे रशियाही होरपळून निघाला.नेपोलीयनने रशियन सैन्याचा पराभव करत मोस्को जिंकून घेतले आणि जाळून बेचिराख केले पण रशियाने शरणागती पत्करली नव्हती ते फक्त माघार घेत होते. माघार घेताना दग्धभू धोरण अवलंबत होते. इतर युरोपीय देशापेक्षा रशियाची हि जमेची बाजू होती की त्यांच्याकडे जमीन (क्षेत्रफळ) प्रचंड आहे मनुष्यबळ ही प्रचंड आहे त्यामुळे माणसे मेली तर माघार घेत घेत जमीन सोडत आत सरकले तरी त्याना फरक पडत नाही उलट आक्रमण करणाऱ्यांचीच दमछाक होते, रसद लांबली जाते आणि रशियन हिवाळा, तो तर भयानक जीवघेणा. रशिया शरणागती पत्करत नाही फक्त माघार घेतोय हे पाहून शेवटी नेपोलीयननेच माघार घेतली, पण उशीर झाला होता जे युरोपातले कोणतेही सैन्य करू शकले नाही ते रशियन हिवाळ्याने करून दाखवले नेपोलीयनचे जवळपास सगळे सैन्य मारले गेले. हा फटका जीवघेणा होता.आणि मग रशिया फ्रान्सवर उलटला. ऑस्ट्रिया-प्रशिया इंग्लंड बरोबर मिळून त्यानी नेपोलीयानाचा पराभव केला पण रशियाची भूक एवढ्यावर शमली नाही त्यानी पोलंड गिळंकृत केला. चेच्न्या अझरबैजान कोकेशस हे भागही त्यानी गिळंकृत केले.आता पुढचा घास ठरणार होता तुर्कस्तान पण युरोपात रशियाचे वाढत चाललेले प्रभूत्व आता इंग्लंडला स्वस्थ बसू देणे शक्य नव्हते त्यामुळे जेव्हा रशिया आणि तुर्कस्थानच्या ओट्टोमान साम्राज्यात क्रिमियन युद्ध सुरु झाले तेव्हा इंग्लंड आणि फ्रांसने रशिया विरुद्ध युद्धात उडी घेतली. युद्धात रशियाचा निर्णायक पराभव जरी झाला नाही तरी त्यांच्या युरोपातल्या साम्राज्य विस्तारला काहीशी खीळ बसली आणि आपल्या प्रतिस्पर्धी युरोपियन देशापेक्षा आपण उद्योग, दळणवळण, नौदल आधुनिक शस्त्रास्त्र आणि कवायती सैन्य, सैन्य तंत्रज्ञान ह्यात मागे आहोत हे रशियाच्या लक्षात आले . ह्यावेळी रशियाचा राजा होता झार अलेक्झांडर दुसरा. त्याने रशियात उद्योगाला चालना देणे, रेल्वे रस्ते ह्यांचे जाळे उभारणे, शेतीपद्धतीत सुधारणा करणे असे कार्यक्रम हाती घेतले पण रशियाचा आकार पाहता त्याला बराच वेळ लागणार होता. त्यांच्या युरोपातल्या भूविस्ताराला जरी खीळ बसली तरी रशियाचा मध्य आशियातला साम्राज्य विस्तार चालूच होता, त्यानी चीनला नमवून पूर्वेकडे वालाडीवोस्टओक हे बंदर काबीज केले. आता पूर्वदिशेला प्रशांत महासागर ते पश्चिम दिशेला युरोपमधील बाल्टिक समुद्र, काळासमुद्र आणि कॅस्पियन समुद्रा पर्यंतचा सलग भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली होता आणि दक्षिणेला सरकत सरकत ते अफगानिस्तान पर्यंत येऊन पोहोचले होते. हा इंग्लंडच्या आशियातल्या साम्राज्याच्या गळ्यालाच फास होता.त्यातून सुरु झाले १९व्या शतकातले शीत युद्ध ज्याला द ग्रेट गेम म्हणून ओळखले जाते. रशियाने अफगाणिस्तानात इंग्लंडला भरपूर दमवले पण पुरते नामोहरम करू न शकल्याने हा सामना तसा अनिर्णीत राहिला.ह्यामुळे परत एकदा धीर वाढून त्यानी आता दुबल्या झालेल्या ओट्टोमान साम्राज्यापासून मुक्त होउ पाहणाऱ्या बाल्कन राष्ट्राना मदत करायला सुरुवात केली. ही सगळी राष्ट्र बहुसंख्यान्काने स्लाव वंशीय होती अन पश्चिम रशिया किंवा युरोपियन रशियात ही स्लाववंशीय होतेच त्यामुळे आपल्या कच्छपी असलेली स्लाव वंशीय राष्ट्र दक्षिण युरोपात तयार झाली तर ते त्याना ह्वेच होते.आता हे काही सहजासहजी होणार नव्हतेच. त्यातूनच राजकीय डावपेच , शह काटशह, मुत्सद्देगिरी ह्यांचे एक पर्व सुरु झाले. युरोप अस्थिर, स्फोटक दारूचे कोठार बनू लागला...
...असो,तर अशाप्रकारे आपण १९व्या शतकातल्या युरोपचा धावता आढावा घेत जी घटना पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाली त्या घटनेपाशी म्हणजेच ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स)आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक ह्यांच्या हत्येच्या घटनेपाशी आलो आहोत.
ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांझ फर्डिनांडचा जन्म १८६३ साली झाला. तो आणि राज्पारीवारातले इतर ६९ जण आर्च ड्युक होते. आणि तो युवराज म्हणजे सिंहासनाचा उत्तराधिकारी आधी नव्हता. त्याचा एक चुलत भाऊ ड्युक फ्रान्सीस ऑफ मोडेर्ना हा निपुत्रिक वारला आणि त्याच्या सर्व संपत्तीचा उत्तराधिकारी बनल्यामुळे सर्व ७० भावंडात तो सगळ्यात जास्त श्रीमंत बनला होता.पुढे १८८९ साली ऑस्ट्रियाचा युवराज क्राऊन प्रिन्स रुडोल्फ ह्याने आत्महत्याकेली आणि मग फ्रांझ फर्डिनांड सिंहासनाचा उत्तर्धीकारी म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज बनला. खरेतर त्याचे वडील कार्ल ल्युडविग हेच सिंहासनाचे उत्तराधिकारी व्हायचे पण त्यानी गादिवरचा आपला हक्क सोडला आणि त्यांचा थोरला मुलगा म्हणून फ्रांझ ऑस्ट्रियाचा युवराज बनला. अर्थात ८४ वर्षीय सम्राट जोसेप्फ अजून हयात होता. फ्रांझ बद्दल थोडक्यात माहिती द्यायची असेल तर त्याच्या व्याक्तीमात्वावर प्रकाश टाकणाऱ्या तीन गोष्टी सांगावयाच लागतील.
एक म्हणजे त्याचा शिकारीचा अतिरिक्त नाद. आपल्या ५० वर्षाच्या आयुष्यात त्याने जवळपास अडीच लाख प्राण्याच्या शिकारी केल्या.आणि प्रत्येक शिकार नोंद करून ठेवली आणि तिला नंबर ही दिला.त्याच्या कोनोपिस्त येथील मोठ्या गढीत ह्या सगळ्या शिकारी जतन करून ठेवल्या आहेत आज ते मुझीयम आहे. शिकारी साठी तो जगभर फिरला अगदी भारतात ही येऊन गेला.हे कदाचित एक रेकॉर्डच असेल.
दुसरे म्हणजे त्याचे लग्न . तो सोफिया शोतेक ह्या एका बोहेमियन उमराव घराण्यातल्या स्त्रीच्या प्रेमात पडला. ही सोफिया उमराव घराण्यातली असली तरी कुठल्याही राजघराण्याच्या नात्यात नव्हती. त्यामुळे खुद्द सम्राट जोसेप्फ आणि ऑस्ट्रियाच्या राजपरीवाराचा ह्याचा कडाडून विरोध होता. त्याने सोफियाशी लग्न केले तर त्यांच्या मुलांना सिंहासनावर हक्क मिळणार नाही अशी अट जोसेप्फ्फने घातली पण फ्रान्झने ती अट देखिल मान्य केली आणि इतर कशाचीही तमा न बाळगता तिच्याशीच लग्न केले व मरेपर्यंत तिच्याशी एकनिष्ठ राहिला. तो काळ, त्याचे एकंदर सनातनी विचार आणि कर्मठ पणा पाहता ही गोष्ट नक्कीच वेगळी आणि खास होती.
तिसरी गोष्ट म्हणजे त्याचे कर्मठ विचार आणि आणि तरीही आंतरराष्ट्रिय घडामोडींची समज आणि त्यानुसार धोरण ठरवण्याचा समंजसपणा.तो विचारांनी अतिशय सनातनी, राजेशाही समर्थक, राजाचा राज्य करण्याचा हक्क दैवी असल्याचे मानणारा होता. त्याला त्याचा काका सम्राट जोसेप्फ ह्याने हंगेरीचे केलेले लांगुलचालन पसंत नव्हते तो हंगेरियन लोकांचा तिरस्कार करत असे. स्लाववंशीयाना रानटी,अर्धमानव मानत असे, तर त्याने सर्बियन लोकांचा चक्क ‘डुक्कर’ म्हणून अनेकदा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो.रशियन राजघराण्याने तेव्हा ज्याप्रमाणे अनेक सामाजिक चळवळी नृशंसपणाने मोडून काढत सत्ता राखली त्याचा तो चाहता होता अन त्याचबरोबर तो रशियाला शत्रू मानायला तयार नव्हता. सम्राट जोसेप्फ पासून सगळे ऑस्ट्रियन राजघराण्यातले लोक. सेनाधिकारी, राजकारणी रशियाच्या विरोधात आणि संधी मिळताच रशियाला युद्धात चेचला पाहिजे ह्या मताचे होते. तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या / झालेल्या स्लाववंशीय देशाना रशिया जी फूस लावून आपले बगलबच्चे असलेले देश येथे तयार करायचा प्रयत्न करीत होता त्याची पार्श्व भूमी ह्याला होती. ऑस्ट्रियन साम्राज्य हे जर्मन, हंगेरियन, स्लाव, पोलिश,झेक, युक्रेनियन, इटालियन, क्रोएट, रोमानियन अशा इतर नऊ वांशिक गटांचे कडबोळे होता त्यातले जर्मन – ऑस्ट्रियन, हंगेरियन आणि स्लाव वंशीय हे संख्येने जास्त होते तेव्हा जर हा साम्राज्याचा गाडा व्यवस्थित चालू राहायचा असेल तर त्यला ऑस्ट्रिया, हन्गेरी आणि स्लाववंशीयांचे त्रि-राष्ट्रकुल अशा प्रकारचे रूप देऊन प्रत्येक गटाला अंतर्गत बाबीत काही अधिकार,स्वातंत्र्य देऊनच साम्राज्य टिकवले जाऊ शकते ह्या मताचा तो होता.साम्राज्याताल्या एखाद्या गटाला पुरेसे स्वातंत्र्य, अधिकार, हक्क दिले नाहीत तर ते बाहेरील मदत मिळवून ते मिळवायचा प्रयत्न करतात हे तो जाणून होता
ज्या बोस्नियन तरुणाने फ्रांझ फर्डिनांड आणि सोफिया शोटेक ह्या शाही दाम्पत्याचा खून केला तो होता गाव्रीलो प्रिन्सीप. २५ जुलै१८९४ रोजी बोस्नियाच्या ब्रोसंस्को ग्राहोवो नावाच्या खेड्यात जन्मलेला हा माणूस “यंग बोस्नियन्स” नावाच्या एका क्रांतिकारी संघटनेचा सदस्य होता. तुर्की जोखडातून स्वतंत्र होऊ घातलेल्या बोस्निया आणि हर्जेगोविनियाचा जेव्हा ऑस्ट्रियाने १९०८ साली घास घेतला तेव्हाच प्रिन्सीप आणि त्यासारख्या अनेक बोस्नियन-सर्ब तरुणांनी ह्याचा मुकाबला करायचे ठरवले होते. आणि मदतीला होती ‘The Black Hand’ही सर्बियन संघटना आणि तिचा सर्वेसर्वा एपिस (पहा आधीचे तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य आणि बाल्कन राष्ट्र हे प्रकारण)
मार्च १९१४ मध्ये जेव्हा ऑस्ट्रियन सरकारने घोषणा केली कि आपल्या लग्नाचा १४वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि सारायेव्हो शहराबाहेर ऑस्ट्रो हंगेरियन सैन्याच्या कवायती पाहण्यासाठी म्हणून फ्रांझ फर्डिनांड आणी सोफिया शोटेक हे शाही दाम्पत्य जून १९१४ मध्ये तेथे येताहेत तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नरडीला नख लाऊ पाहणाऱ्या साम्राज्याच्या युवराजचा काटा काढायची ही उत्तम संधी आहे हे ओळखून त्यानी त्याला मारण्याची योजना बनवायला सुरवात केली.प्रिन्सीप आणि इतर असेच ६ सहकारी ह्या कटात सामील झाले. The Black Hand’ तर्फे त्याना काही ब्राउनिंग पिस्तुल,काडतुसं,हातबॉम्ब, पकडले गेल्यास पटकन आत्महत्या करून मरता याव म्हणून सायनाईडच्या कुप्या असे साहित्य पुरवले गेले.सर्बियन गुप्तचर विभागातला ( आणि black hand चा सदस्य) मेजर ऑस्कर व्होया टान्केस्चीच्ज हा त्यांचा प्रशिक्षक होता. मे१९१४ मध्ये बेलग्रेडच्या (सर्बियाची राजधानी) कुशिद्नियाक पार्क मध्ये ते नेमबाजीचा सराव करत . (त्याकाळी सर्बियात, राजधानी बेलग्रेडमध्ये दिवसाढवळ्या काही तरुण बागेत जाऊन नेमबाजीचा सराव करत असत म्हणजे बघा !)
२८ जून ही तारिख एका अर्थी मोठी महत्वाची होती. एकीकडे हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस (१४वा – आणि शेवटचा)तर सर्बियन लोकांकरता ह्या तारखेचे ऐतिहासिक महत्व आहे. २८जुन१३८९ रोजी सर्बिया आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याच्या फौजांमध्ये कोसोवो येथे एक महाभयानक युद्ध झाले. ह्यात सर्बियाची जरी हार झालेली असली तरी तुर्कस्तानच्या ओट्टोमान फौजाना ही चांगलाच फटका बसला होता. त्या दिवशी पासून सर्बियाचे स्वातंत्र्य युद्धाच सुरु झाले होते असे सर्बियन लोकांचे मानणे होते आणि त्या दिवसाच्या ५२५व्या वर्धापन दिनी ऑस्ट्रिया मुद्दाम सैन्य संचालन आणि सैन्य कवायती करते आहे हे सर्बियन लोकांना डीवचल्या सारखे होते.
पुढे ह्या टान्केस्चीच्जने दिलेल्या माहिती प्रमाणे प्रिन्सीप हा त्या सात लोकात सगळ्यात खराब नेमबाज होता. इतका की १५-२० दिवसाच्या सरावानंतर ही त्याचा नेम ५-१० फुटावरच्या लक्ष्याला लागत नसे. हे तर झालेच पण पिस्तुलाचा चाप ओढताना अभावित पणे तो डोळे मिटत असे. तो फार काही ह्या कटात करू शकेल अशी अपेक्षाच नव्हती. ज्याचा खून/ हत्या प्रीन्चीप्च्या हातून झाली तो फ्रांझ हा कसलेला नेमबाज शिकारी आणि प्रेन्चीप मात्र एक दीड महिन्यापूर्वी हातात बंदूक प्रथम धरलेला आणि अतिशय खराब नेम असलेला १८-१९ वर्षाचा पोरगा , केवढा दैव दुर्विलास! पण ज्यापद्धतीने ही हत्या घडली ती जर पहिली तर त्यात काळजीपूर्वक केलेले नियोजन आणि शिस्त बद्ध रीतीने केलेली त्याची कार्यवाही असे न वाटता केवळ योगायोग आणि नशीब ह्यांच्या जोरावर नियतीनेच हि घटना घडवून आणली कि काय असे वाटू लागते.कि
जुन१९१४च्य सुमारास ठरलेल्या ह्या भेटीदरम्यान ऑस्ट्रियन युवराजवर प्राणघातक हल्ला होऊ शकतो ह्याची खबरबात बोस्नियन सरकारला तसेच ऑस्ट्रियन अधिकाऱ्याना होती आणि त्यानी हे कारण देत फ्रांझ ने आपली भेट रद्द करावी अशी विनंतीही केली होती पण तसे केल्यास ऑस्ट्रियन सरकार भेकड आहे असा संदेश जाईल म्हणून त्यांची मागणी फेटाळली गेली. सुरक्षेचा विचार करता भेट रद्द नाही केला तरी उघड्या मोटारीतून शहरातून दौरा तरी तहकूब करावा जाहीर भाषणे टाळावी ही विनंती देखील त्याच कारणासाठी नाकारली गेली.
काय योगायोग आहे पहा. ह्या गाडीत फ्रांझ आणि सोफिचा खून झाल्यावरून महायुद्ध पेटले, ती संपणार कधी हे देखील ह्या गाडीवरच लिहिलेले होते . ह्या गाडीचा लायसन्स प्लेट नंबर आहे A III 118 म्हणजेच ARMISTICE 11, 11, 18 आणि खरोखर ११ नोव्हेंबर १९१८ रोजी तह झाला आणि पहिले महायुद्ध संपले.
जून महिन्यात बोस्नियाच्या दौऱ्यावर असलेला युवराज आणि त्याची बायको २८ जूनच्या ऐवजी एक दिवस आधीच म्हणजे २७ जूनलाच सरायेव्होला येऊन पोहोचली. जीवाला धोका असतानाही ते सारायेव्होच्या रस्त्यवर उघड्या मोटारीतून भटकले. (एक दिवस लवकर येणार हे जसे इतराना माहिती नव्हते तसेच त्यांच्या मारेकऱ्यानाही माहिती नव्हते.) ऑस्ट्रिया समर्थक लोक बोस्नियात तसे भरपूर होते. तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त झाल्यावर ह्या भागावर सर्बियाचा डोळा होता आणि सर्बियाच्या राज्यात पूर्वाश्रमीचे सत्ताधारी म्हणून तुर्की मुस्लीम समुदायाला दुय्यम वागणूक मिळत असे. तीच आपलीही गत होईल ह्या भयाने बोस्नियन मुसलमान ही ऑस्ट्रिया समर्थक होते.खरे सांगायचे तर प्रिन्सिप सारखे काही सर्ब तरुण आणि काही संघटना सोडल्या तर बोस्नियन जनता फार काही ऑस्ट्रियाच्या विरोधात नव्हती.
बोस्नियाच्या रस्त्यावर भटकताना फ्रांझ ची गाडी इंजिन खूप गरम झाल्याने बंद पडली आणि शाही दंपती तिची दुरुस्ती होई पर्यंत रस्त्यावरच उभे राहिले होते.त्यावेळी जणू भविष्यात काय घडणार आहे ह्याची चाहूल लागल्याप्रमाणे फ्रांझ म्हणाल देखील कि “आमच्या वर जीवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धोक्याची सूचना मिळते आणि इथे आमची गाडी ऐन रस्त्यात बंद पडते, काय योगायोग आहे.” आणि आज आपल्याला हे सगळे ऐकून आश्चर्य वाटते कि इतके कसे सुरक्षे बाबत हलगर्जी असतील हे लोक पण त्यामागे एक कारण आहे. वर सांगितल्याप्रमाणे सोफिया ही राजघराण्यात जन्म झालेली नसल्याने त्यांच्या लग्नाला मोठ्या नाखुशीने परवानगी देताना त्याना शाही दंपती म्हणून मिरवायला बंदी घातली होती. ऑस्ट्रियाचा युवराज असला तरी तो बायकोला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस (२८ जून) साजरा करायला घेऊन आला होता म्हणजे तिला आणायचे हे कारण त्यानी ऑफिशियली दिले होते आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा शाही इतमाम नव्हता ...असो.
त्यांच्या वर जीवघेणा हल्ला होऊ शकतो अशा बातम्या आल्यावर सुनारिक हा बोस्नियन पार्लमेंट चा एक सदस्य ज्याने पूर्वी त्यांना दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला होता तो जेव्हा २७ जूनला त्याना भेटला तेव्हा सोफिया त्याला म्हणाली, “तुम्ही जसे म्हणाला तसे बोस्नियाचे लोक तर काही आमच्या विरोधात दिसले नाहीत. उलट जेथे जाऊ तेथे त्यानी आमचे प्रेमळपणे स्वागतच केले आहे.”त्यावर हा सुनारिक जे बोलला ते जणू भविष्य दर्शकच होते. तो म्हणाला “बाई साहेब, मी देवाकडे प्रार्थना करतो कि उद्या संध्याकाळी आपण जेव्हा शाही जेवणाकरता परत भेटू तेव्हा ही तूमही ह्याच भावना व्यक्त कराल.”
दुसऱ्या दिवशी म्हणजे २८जुन ला ते जेव्हा सैन्य कवायती आणि सराव पहायला निघाले तेव्हा त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यासाठी सात मारेकरी त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर निरनिराळ्या ठिकाणी उभे होते.त्यात प्रिन्सीप देखील होता
इतर सहा लोकांची नावे खालील प्रकारे
१.महमूद बझिक
२ कुब्रीलोवीच
३. काब्रीनोविक( ह्यानेच पहिल्यांदा बॉम्ब टाकला होता)
४. इलिच
५.पापोवीच
६.ग्राबेझ
ह्या सहाही जणाना पुढे फाशी दिली गेली
शाही दंपतीला घेऊन निघालेला ताफा ( त्यांच्या ताफ्यात सहा मोटार गाड्या होत्या ज्यात तिसऱ्या गाडीत फ्रांझ आणि सोफिया बसलेले होते )मिल्केक नदीच्या काठाने असलेल्या रस्त्यावरून कमरजा नावाच्या पुलावर आला ह्या पुलावर तीन मारेकरी थांबलेले होते त्यातील एक नेजेको काब्रीनोविक ह्याने फ्रांझ आणि सोफिया बसलेल्या गाडीवर बॉम्ब फेकला पण तो गाडीच्या मागील भागावरून टाणकन उडून मागच्या गाडीवर पडला आणि फुटला. गाडीत असलेला एक अधिकारी आणि रस्त्यावरचे एक दोन लोक त्याने जखमी झाले. सुचना मिळाल्या प्रमाणे खरोखर च हल्ला झाल्या हे पाहुल्यावर वर ताफा तिथून त्वरेने निघाला. आणि प्रिन्सीप आणि इतर तिघे जेथे उभे होते तिथून पुढे गेला. थोड्याच वेळा पूर्वी स्फोटाचा आवाज ऐकला असल्याने बहुधा आपला कट यशस्वी झाला असे वाटून ते बेसावध झाले होते, फ्रांझ आणि सोफिया सुरक्षित असलेले अन त्यांची गाडी वेगाने जाताना त्यानी पहिली देखील पण त्वरेने काही करायच्या आत ताफा पुढे निघून गेला. इकडे बॉम्ब फेकल्यावर काब्रीनोविकने त्याला दिलेले सायनाइड विषप्राशन केले आणि नदीमध्ये उडी मारली.पण सायनाइड विष जुने किंवा भेसळ युक्त असल्याने त्याला काहीच झाले नाही. नदीलाही अगदी घोटाभर पाणी होते. त्यामुळे बुडणे सोडा तो पुरता भिजलाही नाही. लोकांनी त्याला लगेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आपला बेत आता अगदी फसला असे वाटून सगळेच कटकरी हताश झाले. इकडे भरधाव वेगाने निघालेला ताफा साराय्व्होच्या सिटी हॉल मध्ये येऊन पोहोचला . सारायेव्होचा महापौर तेथे त्यांचे स्वागत करायला उत्सुक होता. नुकत्याच झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या फ्रांझ आणि सोफियाला थोडा सावरायला वेळ लागला. तरी त्यानी महापौरावर राग काढलाच. आता खरेतर एवढे झाल्यावर स्वत:च्या कमीतकमी पत्नीच्या सुरक्षेचा विचार करता पुढील दौरा रद्द करून परिस्थिती आटोक्यात येई पर्यंत शांतपणे सुरक्षित ठिकाणी राहणे जास्त योग्य होते पण तसे करून जर आपण सैन्य कवायतीला हजार राहिलो नाही तर एका बॉम्बस्फोटाने शक्तिशाली ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज घाबरला असे वाटेल म्हणून युवराजने आपला पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे उरकायचा मनोदय जाहीर केला. त्याला कुणीही विरोध केला नाही . फक्त त्याने त्याआधी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या अधिक्र्याची भेट घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी इस्पितळात जायचे ठरवले. आणि इथेच आतापर्यंत त्याच्या सोबत असलेल्या नशीबाने त्याची साथ सोडली.
ज्या इस्पितळात बॉम्बस्फोटात जखमी झालेले लोक होते तेथे जाण्याकरता त्याना त्यांचा पूर्व नियोजित रस्ता बदलून जाणे भाग होते . मोटारींचा ताफा त्यांच्या बरोबरच विएन्ना वरून आलेला आणि मोटार चालक ही त्यांचा विश्वासू आणि शासकीय सेवेतला म्हणजेच विएन्ना चा होता. त्यामुळे त्याना रस्ता नीट माहिती नव्हता. झाले मोटारींचा ताफा पुन्हा निघाला ह्यावेळी तीनच मोटारी होत्या आणि पुढच्या मोटारीत खुद्द मेयर बसला होता. तोच ड्रायव्हरला रस्ता दाखवत होता. पूर्वी आलेल्या रस्त्यावरूनच कमरजा पुलापर्यंत जाऊन मग पुलासमोर उजवे वळण घ्यायचे होते(नकाशात ४ ह्या ठिकाणी) आणि पुढे फ्रांझ जोसेफ रस्ता ओलांडून पुढच्या चौकातून डावीकडे वळून इस्पितळात जायचे होते पण जेथे नुकताच स्फोट झाला तिथे परत गाडी न्यायला बिचाकल्यामुळे असेल किंवा रस्ता पोलिसांनी बंद केल्यामुळे असेल तो कमरजा पुलाआधीयेणाऱ्या लीटनर पुलासामोराच्या रस्त्यवर वळला.(नकाशावर ७ ह्या आकड्याजवळ) मेयरने त्याला हा रस्ता चुकीचा असून परत मागे वळून कमरजा पुलावर गाडी घ्यायला सांगितले. पहिल्या गाडीचा ड्रायवर थांबला तशा मागच्या दोन्ही गाड्याही थांबल्या. आता सगळ्यात मागची गाडी रिवर्स घेऊन रस्त्याबाहेर काढल्याशिवाय मागे जाता येणे शक्य नव्हते.अगदी तासाभरापूर्वी बॉम्बहला झालेला असताना देखील मोटार गाड्या उघड्याच होत्या अन त्याच्या भोवती जादा सुरक्षा रक्षकही नव्हते.
,,,आणि तिथेच ऍपल-क्वे ह्या नावाच्या इमारतीत शिलर्स स्टोअर नावाच्या दुकानासमोर सॅण्डविच घेता घेता कट फसल्यावर आपण इथून सुरक्षित कसे सटकायाचे ह्याच्या विवंचनेत असलेला प्रिन्सीप उभा होता. त्याच्या अगदी समोर फ्रांझ आणि सोफिया बसलेली उघडी मोटार उभी होती. नियतीचे फासे ह्यावेळी अचूक पडले होते आणि काय होते आहे हे कळायच्या आत त्याने खिशातून ब्राउनिंग पिस्तुल काढले फ्रांझ वर रोखले आणि सटासट दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी सोफियाच्या पोटात लागली आणि दुसरी फ्रांझ च्या मानेतून आरपार गेली. ज्या माणसाचा नेम अगदी खराब होता, त्याने झाडलेल्या दोन्ही गोळ्यानी दोन जीव घेतले. पुढे पोलिसांसमोर एका प्रत्यक्ष दर्शीने सांगितल्याप्रमाणे प्रिन्सीप ने तर गोळ्या झाडताना डोळे मिटून घेत मानही बाजूला वळवली होती पण आज फ्रांझ आणि सोफियाची वेळ भरली होती.
सारायेव्होचा गवर्नर ऑस्कर पोट्युरेक हा फ्रांझ च्या गाडीत ड्रायवर शेजारी बसलेला होता. गोळ्यांचा आवाज ऐकून त्याने मागे वळून पहिले तर फ्रांझ आणि सोफिया गाडीत बसलेलेच होते , त्याला वाटले पुन्हा एका फसलेला हल्ला झालेला आहे. त्याने त्वरेने गाडी तिथून बाहेर काढायला ड्रायवरला सांगितले. गाडी लीटनर पुला जवळ आली तेव्हा फ्रान्झ् च्या गळ्यातून भळा भळा वाहणारे रक्त पाहून सोफिया चित्कारली, “अरे देवा! काय झालय तुम्हाला? (For Heaven's sake! What happened to you?" ) आणि ती बेशुद्ध पडली . पोट्युरेकला वाटले भयाने तिला भोवळ आली असावी पण तिला पोटात गोळी लागलेली होती आणि ती गंभीर जखमी झालेली आहे ह्याची जाणीव झालेला फ्रांझ तिला म्हणाला “ सोफिया सोफिया , मरू नकोस, आपल्या मुलांसाठी तरी तुला जगावेच लागेल.” (Sopherl! Sopherl! ". "Sterbe nicht! Bleibe am Leben für unsere Kinder! " (Sophie dear! Sophie dear! Don't die! Stay alive for our children!)
गाडी इस्पितळाच्या वाटेवर असतानाच दोघांचाही अंत झाला. दोन गोळ्या झाडल्यावर प्रिन्सीपने तेच पिस्तुल स्वत:च्या डोक्यावर रोखले पण आस पासच्या लोकांनी त्याला ताबडतोब पकडला आणि चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केला. झटापटीत त्याने पटकन सायनाइडची कॅप्सूल गिळली पण मघाशी काब्रीनोविकने घेतलेल्या सायनाइडप्रमाणेच हे देखील भेसळ युक्त निघाले आणि दोन चार उलट्या शिवाय प्रीन्चीप्ला काहीही त्रास झाला नाही.
फ्रांझ फर्डिनांड आणि सोफिया च्या खुनाची बातमी लगोलग पसरली . बोस्नियात दंगल झाली. सातही मारेकरी आणि जवळपास ५००० सर्ब लोकांची धरपकड झाली. अनेकाना पुढे युद्ध चालू असताना फाशी दिली गेली. मुख्य आरोपी गाव्रीलो प्रिन्सीपला मात्र फाशी झाली नाही . ऑस्ट्रियन कायद्याप्रमाणे तो वयाने २० वर्षाच्या आत असल्याने(त्याला वयाची २० वर्षे पूर्ण व्हायला फक्त २७ दिवस बाकी होते) त्याला फाशी झाली नाही पण २० वर्षाची शिक्षा झाली . १९१८ साली तुरुंगातच तो क्षयाचा रोग बळावल्याने मेला.साहजिक आहे तुरुंगात त्याची जाणून बुजून खाण्या पिण्याची आणि औषधाची आबाळ केली गेली असणार त्यामुळे त्याचा क्षयाचा रोग बळावला. मरताना त्याचे वजन फक्त ३९ किलो होते.युद्धानंतर त्याच्या पार्थिवाचे अंश त्याच्या गावी आणून एका हुतात्म्यासाराखे समारंभ पूर्वक पुरले गेले.
पण एक गोष्ट मात्र आज नक्की म्हणता येते कि Black Hand, एपिस, यंग बोस्नियन, सर्बियन राष्ट्रवादी क्रांतीकारक, प्रिन्सीप किंवा आणखी इतर कुणी जे ह्या हत्याकांडात सामील होते त्यानी अगदी म्हणजे अगदी खरोखर चुकीचा माणूस मारला होता. फ्रांझ हा विचारांनी कितीही सनातनी, राजेशाही समर्थक, राजाचा राज्य करण्याचा हक्क दैवी असल्याचे मानणारा, वगैरे असेल, स्लाववंशीयाना रानटी,अर्धमानव मानत असेल, सर्बियन लोकांना ‘डुक्कर’ समजत असेल, पण तो सर्बिया आणि पऱ्यायाने रशियाशी युद्ध करायला राजी नव्हता, नव्हे सम्राट जोसेप्फ पासून सगळे ऑस्ट्रियन राजघराण्यातले लोक. सेनाधिकारी, राजकारणी हे सर्बिया आणि रशियाच्या विरोधात होते अन संधी मिळताच सर्बियाला युद्धात चेचला पाहिजे ह्या मताचे होते. ऑस्ट्रियन सेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फ ह्याने एक नाही दोन नाही तर तब्बल २० वेळा ऑस्ट्रियन सरकारकडे सर्बियाविरुद्ध(आणि पऱ्यायाने रशियाविरुद्ध) युद्ध पुकारायाची मागणी केली होती आणि प्रत्येक वेळी केवळ आणि केवळ फ्रांझमुळेच ती फेटाळली गेली होती. अख्ख्या ऑस्ट्रियन साम्राज्यात फ्रांझ फर्डिनांड हा एकच असा माणूस होता ज्याच्याकडे सर्व विनाशक असे युरोपियन युद्ध टाळण्याची खरोखर इच्छा आणि ताकद दोन्ही होते आणि त्याच्यामुळे ते आतापर्यंत भडकण्यापासून थांबलेलेही होते. मात्र त्या एकमेव माणसालाच प्रिन्सीप ने मारून टाकले. आता सर्बिया ऑस्ट्रिया आणि युरोपची महाभयंकर विनाशाकडे अटळ वाटचाल सुरु झाली होती. लगेच हे अंत:प्रवाह समजून आले नाहीत, पण २८ जून १९१४ला सारायेव्होच्या रस्त्यावर सकाळी ११.०० वाजता पडलेल्या ह्या दोन ठिणग्यामुळे बरोबर १ महिन्याने पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला.
असो तर पुढच्या आणि पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या भागात आपण ह्या खुनानात्र घटना कशा कशा घडत गेल्या, आणि त्यांचे पर्यवसान युद्ध भडकण्यात कसे झाले त्याचा इतिहास पाहणार आहोत. हा क्लिष्ट गुंतागुंतीचा आणि तरीही अतिशय रंजक भाग आहे.एक प्रकारे राजकीय मंत्रयुद्धच म्हणाना ...
क्रमश:
--आदित्य
रुमाल टाकला.. आता वाचते
रुमाल टाकला.. आता वाचते
<<रुमाल टाकला.. आता वाचते
<<रुमाल टाकला.. आता वाचते Happy>>
म्हणजे?
म्हणजे आधी प्रतिसाद दिला, लेख
म्हणजे आधी प्रतिसाद दिला, लेख न वाचता.
ओह , नंतर प्रतिक्रिया आवर्जून
ओह , नंतर प्रतिक्रिया आवर्जून द्या पण ...
काय गुंतागुंतीचं आहे हे.
काय गुंतागुंतीचं आहे हे. तरीही रंजक. चांगली मांडणी केलीय. मस्तच सुरूये लेखमाला.
भारीच चालु आहे ही लेखमाला
भारीच चालु आहे ही लेखमाला
सखोल अभ्यास आहे, व्यवस्थित माहिती सुद्धा दिली आहे.
नकाशे दिलेत हे विशेष.
बर्याच गोष्टी नव्याने समजत आहेत
पु ले शु
@अदित्य श्रीपद,
@अदित्य श्रीपद,
तीनही भाग आजच वाचून झाले...पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. शुभेच्छा!
भारीच चालु आहे ही लेखमाला
भारीच चालु आहे ही लेखमाला Happy
सखोल अभ्यास आहे, व्यवस्थित माहिती सुद्धा दिली आहे.
नकाशे दिलेत हे विशेष.
बर्याच गोष्टी नव्याने समजत आहेत
पु ले शु. ....>>>>>>>+१११
खरेच खूप रंजक आहे...लवकर पुढचा भाग टाका
एक चित्रपट आहे ह्या घटनेवर
एक चित्रपट आहे ह्या घटनेवर
नाव आठवत नाही आता