मार्ग नाही गावलेला

Submitted by निशिकांत on 12 September, 2018 - 00:39

मार्ग नाही गावलेला

यक्षप्रश्नांनी सदा वैतागलेला
उत्तरांचा मार्ग नाही गावलेला

पापण्या भिजतात तेंव्हा नेमका का?
कोपरा असतो मनी भेगाळलेला

लिप्त संसारी तरी वारीत जाता
जाहलो सर्वांसवे भक्ताळलेला

कोणते घरटे अता आबाद आहे?
लेकुरे उडताच जो तो संपलेला

जो विटेवर कैद आहे, संकटी तो
पाहिला मदतीस नाही धावलेला

हालवाया गदगदा सिंहासनाला
पाहिजे जनक्षोभ धगधग पेटलेला

का दुरुत्तर द्यावयाचे उत्तराला?
मी निरुत्तर मार्ग आहे शोधलेला

गौरवान्वित ईशमाथीच्या फुलांना
शाप "व्हा निर्माल्य"आहे लाभलेला

का असा "निशिकांत"तू भयभीत जगसी?
ताक फुंकी, दूध केंव्हा पोळलेला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

7 Comments

Group content visibility: 
Public - accessible to all site users