2016 च्या जानेवारी पासून ट्रेक करायला सुरुवात केली. तेव्हा पासून आत्ता पर्यंत वीस-एक ट्रेक केलेत. सगळे एक-से-एक होते पण मला खरी ओढ होती ती पंढरीची, अर्थात ट्रेकर्स ची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्र गडाची.
हरिश्चंद्र गडावर जाण्याच्या अनेक वाटा आहेत असं ऐकून होतो पण त्यातही सर्वात कठीण समजली जाणारी वाट म्हणजे नळीची वाट. जेव्हा हरिश्चंद्र गडाबद्दल आणि नळीच्या वाटेबद्दल ऐकलं तेंव्हाच ठरवलं, हरिश्चंद्रगड हजारदा करू पण सुरुवात करायची ती नळीच्या वाटेनेच.
नळीच्या वाटेचे अनेक इव्हेंट झाले पण काही ना काही कारणाने ती वाट हुलकावणी देत होती आणि आता तब्बल दोन वर्षांनी तो योग जुळून आला. Midas adventures या ग्रुप चा 28-29 oct चा हरिश्चंद्र गडाचा प्लॅन पहिला आणि ठरवलं, काहीही झालं तरी यावेळी जायचंच.
माझ्याच ऑफिस मधली माझी खूप चांगली मैत्रीण आरती. हिला एकदा मी गडाबद्दल सांगत असताना तिथली केदारेश्वर गुहा आणि शिवलिंगाचे फोटो दाखवले तेव्हा पासून ध्यास घेऊन बसलेली की हरिश्चंद्र करायचाच म्हणून ते ही नळीच्या वाटेने. आरती ने माझ्या सोबतच 3-4 ट्रेक केलेले, तिचा स्टॅमिना आधी पाहिलेला आणि ती करू शकेल याची खात्री होती. तिला विचारलं आणि अपेक्षेप्रमाणे तिचा होकार आला.
ऑफिस मधून रीतसर शनिवारची सुट्टी काढली आणि गुरुवारी आमच्या seats बुक करून टाकल्या. उरलेले दोन दिवस सरता सरत नव्हते, शुक्रवारची ती एक रात्र तर मला एका वर्षासारखी भासत होती.
शनिवारी सकाळी मोबाईल चा अलार्म वाजायला सुरुवात झाली आणि तितक्यात जाग आली. प्राथमिक विधी उरकून 4:45 ला घर सोडले. टू व्हीलर ने मालाड ला राहणाऱ्या आरती च्या घरी पोचलो आणि 5:10 च्या दरम्यान आमचा प्रवास सुरु केला. साधारण पाऊण तासात म्हणजे 6 वाजता घोडबंदर रोड ने ठाणे गाठले आणि स्टेशन च्या मागे असलेल्या पार्किंग मध्ये bike लावली. ठाणे ब्रिज च्या खाली 2 प्लेट इडली पार्सल घेतली आणि 2 कल्याण रिटर्न तिकीट काढून प्लॅटफॉर्म वर आलो. तिथे पार्सल घेतलेली इडली फस्त केली आणि 6:24 ची टिटवाळा स्लो ट्रेन पकडून 7 वाजता कल्याण उतरलो. सगळं अगदी वेळेत, ठरल्याप्रमाणे!!!
सर्वांची जमवाजमव होई पर्यंत 8 वाजले आणि मग 8:15 ची मुरबाड st पकडून आम्ही मुरबाड कडे रवाना झालो. 9 वाजता मुरबाड ला पोचलो आणि लगेचच जवळच्या हॉटेल मध्ये पोटपूजा करून बेलपाडा या पायथ्याच्या गावाशी जाणाऱ्या गावात जाण्यासाठी जीप मध्ये टेकलो.
हा रस्ता म्हणजे कल्याण-अहमदनगर महामार्ग. थोडा रहदारीचा भाग मागे गेला मग गर्द झाडी रस्त्याला दुतर्फा घेरत गेली आणि त्यांतच सह्याद्रीने आपलं मोहक रुपडं दाखवायला सुरुवात केली. सिद्धगड, आहुपे घाट मग पुढे अचानक समोर आलेला नाणेघाटावरील नानाचा अंगठा आणि वानरलिंगी सुळका यांचं विलोभनीय दर्शन झालं.
साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासाने मुख्य रस्ता सोडून गाडी डाव्या बाजूला वळली आणि पुढच्या 5 मिनिटांत उजवं वळण घेत वालीवरे म्हणजेच बेलपाडा गावाच्या वाटेला लागली. सुरुवातीला चांगला वाटणारा रस्ता नंतर मात्र अंत पाहू लागला कारण गुळगुळीत रस्ता जाऊन तो आता चांगलाच ओबडधोबड झाला होता. या रस्त्याने साधारण 20-25 मिनिटांचा प्रवास करून ११ वाजेच्या सुमारास आम्ही वालीवरे गावात पायउतार झालो.
गावात उतरलो तेव्हा उजवीकडे कोकणकडा आणि नाफ्ता उन्हात भिजून गेलेला दिसत होता, मला आधीच थोडी भीती वाटत होती कारण यावेळी ऑक्टोबर हीट जरा जास्तच लांबला होता त्यामुळे चढाईला त्रास होणार असंच वाटत होतं. Midas च्या महादेव सरांनी आधीच गावात जेवणाचं पार्सल तयार करून ठेवायला सांगितलं होत. ती पार्सल आणि पाण्याच्या बाटल्या काठोकाठ भरून आणि एक छोटासा introduction round उरकून बरोब्बर ११:३० वाजता आम्ही कोकणकड्याकडे रवाना झालो.
साधारण अर्धा-एक तास शेताच्या बांधावरून आणि झाडाझुडुपातून चालल्यानंतर आम्ही मुख्य नळीला भिडलो. वाटेत लागणारे मोठे मोठे दगड समोर दिसणारा भव्य कोकणकडया समोर काहीच वाटत नव्हते. साधारण एका तासात आम्ही पहिल्या धबधब्याजवळ पोहोचलो आणि तिथं थोडं फोटो सेशन करून लगेचंच पुढची वाट धरली. जसं पुढे सरकत होतो तास वाटेत येणाऱ्या दगडांचा आकार वाढत होता आणि लांब लांब ढेंगा टाकत आम्ही ती दगडांची रास चढत होतो.
सकाळी ठाणे स्टेशन ला खाल्लेली इडली आणि मुरबाड चा मेंदूवडा केव्हाच जिरला होता त्यामुळे पोटात कावळ्यांनी अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केली होती. आणखी थोड्या वेळात rock patches वाली नाळ सुरू होणार होती त्या आधी आम्ही गावातून आणलेलं जेवण पोटात ढकललं आणि बराच मोठा म्हणजे साधारण एका तसाचा ब्रेक तिथंच लागला. त्यांनतर थोडं फ्रेश होऊन आम्ही पून्हा नाळ चढायला लागलो. जेवण झाल्यानंतर कोकणकडा थोडा उजवीकडे ठेवत आम्ही डावीकडे चढायला सुरुवात केली, वाटेत लागणाऱ्या दगडांचा आकार वाढतंच होता आणि आम्ही वानरउड्या घेत ते दगड चढून जात होतो. अश्याच वानरउड्या घेत एक निसरडा patch सर करून 4 वाजेच्या दरम्यान आम्ही पहिल्या rock patch खाली पोहोचलो. हा patch बऱ्याचदा फोटो मध्ये वगैरे पहिला होता आणि आज तो patch चढणार या विचारानेच अंगात एक वेगळीच ऊर्जा येत होती. वरून सेफ्टी साठी रोप सोडली होती, ती कमरेला बांधून मी आणि आरती ने अगदी सहज तो patch सर केला. Patch चढून झाल्यावर थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालायला लागलो. काही नवखे ट्रेकर सुद्धा असल्याने थोडा उशीर होत होता.
पहिल्या रॉक patch पर्यंत काहीच वाटत नव्हतं, लोक उगीचच कठीण आहे म्हणतात अशी माझी आत्ता पर्यंत समजूत झाली होती. पण आता मात्र माझा तो समज दूर झाला होता आणि नळीची वाट चढणं म्हणजे येऱ्या-गबाळ्याचं काम न्हाई, हे का म्हणतात ते चांगलंच कळत होतं. पहिल्या patch नंतर वाटेत असणारे दगड सैल झाल्या सारखे वाटत होते कारण ज्या दगडावर पाय ठेवायचो तो दगड जागेवरून हमखास सरकायचा. त्यामुळे इथं थांबणं आणि आराम करण शक्यचं नव्हतं. कधी नाळेच्या मधोमध कधी अगदी डावीकडे चिकटून तर कधी उजवीकडुन सरपटत आम्ही पुढे चालत होतो, थोडं पुढे जाऊन उजव्या बाजूच्या एक दगडावर बऱ्यापैकी मोठी जागा होती तिथे पाठपिशव्या ठेवून थोडं फोटो सेशन केलं थोडा आराम करून पुढच्या वाटेला लागलो. एव्हाना 6 वाजून गेले होते त्यामुळे कोकणकड्यावरून सूर्यास्त पाहण्याची इच्छा असून सुद्धा तो पाहता येणार नव्हता याची खंत वाटायला लागलेली. आता पर्यंत जवळचं पाणी सुद्धा संपत आलं होतं. त्यामुळे असलेलं पाणी सुद्धा जपून वापरावं लागत होतं. का माहीत नाही पण चढायला सुरुवात केल्या पासून ज्या उन्हाची भीती वाटत होती उन्हाची झळ जाणवली नव्हती किंवा कदाचित कोकणकड्याच्या भेटीसमोर ती तितकी काही वाटली नसेल. आता उन्हाची नाही पण अंधाराची भीती वाटायला लागली होती कारण मी ऐकलं होतं की दुसरा rock patch कठीण आहे आणि काळोख पडायच्या आत आम्हाला तो चढणं भाग होत. पण त्या दुसऱ्या रॉक patch च्या जवळ पोहोचणार तोच काळोख पडू लागला आणि पूढे काय ही वेगळीच भीती मनाला स्पर्शून गेली. आपोआप सर्वांच्या टॉर्च बाहेर निघाल्या होत्या आणि हा patch आम्ही अंधारात चढणार यावर एव्हाना शिक्कामोर्तब झालं होतं.
साधारण १० मिनिटांत निसटत्या दगडांवरून स्वतःचा तोल सावरत आम्ही त्या rock patch जवळ पोहोचलो. आता आम्ही जिथं उभे होतो ती अशी जागा होती जिथे धड उभं सुद्धा राहता येत नव्हतं कारण ज्या दगडावर पाय ठेवायचो तो दगड हमखास निखळायचा. ज्यांना बुड टेकवायला जागा मिळाली ते खरंच नशीबवान होते. मला एका ठिकाणी एक पाय राहील अशी जागा मिळाली तिथं आलटून पालटून पाय ठेवत होतो. एक एक करून सर्व जण तो patch सर करत होते आणि त्यात जवळपास अर्धा-पाऊण तास गेला. काही जण अगदी सराईतपणे तो patch चढले काहींची मात्र पूरती गाळण उडत होती, एखाद्याचा हात सुटला की काळजाचा ठोका चुकायचा पण लगेच दोर आहे हे लक्षात यायचं. सगळ्यात शेवटी माझा नंबर लागला. माझ्या आधी वर गेलेल्यांना का वेळ लागत होता ते आता मला कळत होतं कारण तो patch बऱ्यापैकी कठीण होतं. त्या patch वर थोडं वर चढल्यावर उजव्याबाजूला सरकून पुन्हा वर चढायचं होत. दोराची मदत होतीच पण तरीही वर जाईपर्यंत धाकधूक होतीच.
सुरक्षित पणे वर पोहोचलो तर पाहिलं की आधी गेलेले निवांत पडुडले होते कारण दोन लीडर होते ग्रुप सोबत, त्यातला एक वर आणि एक खाली त्यामुळे ते तिथेच थांबले होता. त्यांना आवश्यक तो ब्रेक मिळाला होता आणि बऱ्यापैकी फ्रेश झालेले. त्यामुळे माझ्या ब्रेक चा प्रस्ताव मी स्वतःच धुडकावून लावत पुढे चालू लागलो. या रॉक patch नंतर उजवीकडे वळून मग डाव्या बाजूला जायचे होते. इथेच एक धोकादायक ट्रॅव्हर्स होता, डाव्या बाजूला अखंड कातळ तर उजव्या बाजूला खोल दरी. काळोख असल्यामुळे दरीची भीषणता जाणवत नसली तरी सुद्धा मी फोटो पाहिले होते त्यामुळे सावकाश थोडं जपूनच पावलं पूढे टाकत होतो. तो ट्रॅव्हर्स पार करताना मी पूर्ण dehydrate झालो होतो पण जवळचं पाणी कधीच संपलं होत. मला वाटलं फक्त माझ्याकडे असलेलं पाणीच संपलं असेल म्हणून बाकीच्यांना विचारले तर कळलं की पाणी कोणाकडेच नाहीय. मन आणि बुद्धी अजिबात थकली नव्हती, शरीर बाहेरून तर पूर्ण साथ देत होत पण शरीराच्या आत मात्र पाण्याची नितांत गरज होती त्यामुळे चालायला जमत नव्हतं. तितक्यात दरीत जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि त्यामागून कानावर आली एक किंकाळी. त्या किंकाळी ने सगळ्यांचे धाबे दणाणले. लगेच पुढं जाऊन पाहिलं तर कळलं की एक मुलगी वरून दगड पडताना पाहिला म्हणून किंचाळली होती आणि त्याच दगडाचा दरीत पडण्याचा मोठा आवाज आला होता. हुश्श करून पूढे चालते झालो, तो धोकादायक ट्रॅव्हर्स पार करून झालो तर पुढे आणखी एक छोटासा patch होता, या patch ला बघून कलावंतीण सुळक्याच्या अगदी वरच्या patch ची आठवण झाली. अगदी सहज तो पार करून पुढे गेलो तर जंगलातली वाट लागली आणि त्या वाटेने नळीची वाट संपल्याची जाणीव करून दिली.
त्या जंगलवाटेने पूढे जात होतो, कुठं जातोय कसं जातोय हे काळोखामुळे अजिबातच कळतं नव्हतं. आम्ही फक्त चढत होतो आणि चालत होतो. पुढे आणखी एक रॉक patch आहे हे माहिती होतं, थोड्याच वेळात तिथे पोहोचलो आणि पाहिलं तर 90 अंश (किंवा त्याहून जास्त) च्या कोनातला कातळ आमची वाट पाहत होता.तिथं सर्वानीच एक ब्रेक घ्यायचं ठरवलं करण सगळेच थकले होते. तिथे बसलेलो असताना काहीतरी कारणाने मी माझी बॅग उघडली आणि डोळे सताड उघडे ठेवून आत पाहू लागलो. चमत्कार व्हावा आणि आपल्याला देव दिसावा तसं पाण्याने काटोकाट भरलेली एक पाण्याची बाटली माझ्या बॅग मध्ये होती. त्यावेळी जो आनंद झालं तो अक्षरशः शब्दात सांगू शकत नाही. जास्त नाही पण थोडं पाणी पिऊन ती बाटली बाकीच्यांना दिली कारण त्यांची अवस्था सुद्धा माझ्या पेक्षा वेगळी नाही याची जाणीव मला होती. आणि पुढच्या दोनंच मिनिटात झालेला दुसरा चमत्कार म्हणजे ती बाटली माझ्याकडे परत आली होती पण त्यात पाण्याचा एकही थेंब शिल्लक नव्हता.
तिसरा रॉक patch ला दोर न लावता पट्टी (string) लावण्यात आलीं होती. आणि महादेव सर त्या पट्टीचे एक टोक हातात घेऊन वर बसलेले आणि एकेकेला वर यायला मदत करत होते. तो patch सर करून वर मोकळ्या पठारावर आलो आणि तिथं चालायला लागलो. मधेच छोटासा पाण्याचा झरा आपण कोकणकड्याच्या जवळ पोहोचतोय याची जाणीव करून देत होता. त्या झऱ्यातले पाणी पोटात आणि बाटलीत भरून आम्ही पूढे चालायला सुरुवात केली. काळोख असल्यामुळे काहीच कळत नव्हतं फक्त आपण चालतोय आणि चढतोय इतकंच कळत होतं.
अशीच साधारण अर्ध्या पाऊण तासाची वाटचाल केल्यावर बरोब्बर १०:१५ आम्ही एका खोपटासमोर पोहोचलो, त्या खोपटावर एक बोर्ड लावला होता आणि त्यावर नाव होतं, "Hotel Kokankada.in". याचा फक्त एकच अर्थ होता तो म्हणजे आपण नळीची वाट आणि पूर्ण चढाई संपवून कोकणकड्यावर पोहोचलोय भास्कर दादाच्या खोपटासमोर उभे आहोत. तिथंच पाठीवरची बॅग टाकली आणि पायातून shoes, socks काढले आणि बॅग वरच पाठ टेकवून मस्त ताणून दिली. अखेर माझं एक स्वप्न पूर्ण झालं होतं आणि त्याचा आनंद इतका होता की दिवसभराचा थकवा कुठल्या कुठं निघून गेला होता. सकाळी साडे अकरा वाजता बेलपड्यातून चालू केलेला ट्रेक तब्बल पाऊणे अकरा तासाने संपला होता. थोडा आराम करत तिथेच पहुडलो होतो चांदण्या बघत. बाकीच्यांनी कधी खोपटात जाऊन जेवायला सुरुवात केली हे कळलं सुद्धा नाही.
खोपटात जाऊन मस्त भाकरी भाजी डाळ आणि भात खाऊन घेतला आणि पुनः बाहेर येऊन मी आणि आरती गप्पा मारत बसलो. एव्हाना बारा वाजले होते, दोघांच्याही डोळ्यावर झोप ताबा घेत होती त्यामुळे गप्पा आवरत्या घेऊन बाजूलाच लावलेल्या टेंट मध्ये घुसलो. झोपणार इतक्यात बाहेर आमची काही माणसं गप्पा मारत बसलेली आणि त्यांच्या horror stories चालू होत्या. Horror स्टोरी म्हणजे माझा अगदी आवडता विषय मग झोप बाजूला ठेवून गेलो त्यांच्यात आणि बसलो पुनः गप्पा मारत. तिथे गप्पा मारत असताना माझा आणखी एक मित्र जो गोरखगड ट्रेक ला माझ्यासोबत होता तो विशाल तिथे भेटला. विशाल त्याच्या एका मैत्रिणीला घेऊन नळीच्या वाटेने आला होता, 4:30 ला बेलपाड्यातून निघून हा 12:30 वाजता कोकणकड्यावर पोहोचला होता. त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा भुतांच्या गोष्टीत रमलो. साधारण दीड वाजता सगळ्यांच्याच डोळ्यावर झोप येत होती तेव्हा पुन्हा टेंट मध्ये घुसून लगेचंच निद्रादेवीला शरण गेलो.
स्वप्नपूर्ती (भाग १)
Submitted by निन्या सावंत on 30 August, 2018 - 03:44
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच वर्णन
मस्तच वर्णन
मलाही नळीच्या वाटेने करायचाय ह. गड
मस्त!
मस्त!
सुंदर वर्णन...
सुंदर वर्णन...
हरिश्चंद्र गड हे स्वप्नच बनून राहिले माझ्यासाठी ! खूप वटायचं हा गड पहायचाचम्हणून !कोकणकडा ! पण काहीतरी करणांनी दर वेळेला माझं काहितरी आड यायचं , परिक्षा , स्पर्धा ....
आता जाता येइल असे वटत नाही !
फोटो टाका ... त्यातूनच गडभेटीचा आनंद मिळेल