गझल - माणूस समजणाऱ्यांना

Submitted by बेफ़िकीर on 28 August, 2018 - 11:31

गझल - माणूस समजणाऱ्यांना
==========

आहात जवळ माझ्या हे, कळले असणारच त्यांना
मी दूर किती आलो हे, सांगा माझ्या घरच्यांना

वय कधीच झाले तुमचे, मुलगाही पन्नाशीचा
कॉम्प्लेक्स नका देऊ ना, शिकवा माझ्या वडिलांना

जो मला भेटतो त्याचे, मी मन सांभाळत बसतो
जगलो तर माझा पत्ता, कळवा मन मेलेल्यांना

वाहतुक पुण्याची करते, माझ्या हृदयाची कॉपी
येण्याची संधी आहे, पण बंदी जाणाऱ्यांना

उघड्या खांद्यांच्या पोरी, बघतो मी रस्तोरस्ती
दाखवणे जमते ते जग, दाखवते बघणाऱ्यांना

तुकड्या तुकड्यामध्ये का, 'बेफिकीर' जग अभ्यासे
माणूस समजतो केवळ, माणूस समजणाऱ्यांना

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वय कधीच झाले तुमचे, मुलगाही पन्नाशीचा
कॉम्प्लेक्स नका देऊ ना, शिकवा माझ्या वडिलांना

जो मला भेटतो त्याचे, मी मन सांभाळत बसतो
जगलो तर माझा पत्ता, कळवा मन मेलेल्यांना

वाह! एकदम मस्तच!

सुन्दर, अप्रतिम.....
माणूस समजतो केवळ, माणूस समजणाऱ्यांना
शब्द एक साधन आहे गुन्ज मनाची कळण्याचे
कष्ट तुम्हा कळले जीवाचे हे लक्सण सवेदनशील जीवाचे