"माझं ऐक, लडाखला १०० सीसी बाईकवरुन कोणी जात नाही. तिथे कमीतकमी १५० सीसीची बाईकतरी पाहीजेच."
"तुझी २४ वर्षं जुनी यामाहा नेण्यात काय पॉईंट आहे कळत नाही!"
"तू माझी बुलेट का घेउन जात नाहीस?"
"ईतक्या जुन्या बाईकला वाटेत काही झालं तर सगळ्या ट्रीपचा विचका होईल."
"काही नडलंय का पण?"
या आणि यासारख्या अनेक प्रतिक्रीयांने लडाखला बाईकवर जाण्याबद्दल चर्चेला सुरुवात झाली. विशेषत: क्रमांक ५ ची प्रतिक्रीया माझ्या अनेक प्रस्तावांवर कुटुंबाकडून आणि मित्रांकडून मला नेहेमी का बरं मिळते हे एक कुतुहलच आहे!
लडाखला बाईकवरुन जाणार्यांची संख्या गेल्या काही वर्षांत, विशेषत: थ्री इडीयट्स नंतर बरीच वाढली आहे. त्यांची प्रवासवर्णने आणि फोटोज बघून हात केव्हाचे शिवशिवत होते. त्यातच मागच्या वर्षी यामाहा आर एक्स १०० घेउन गेलेल्या एका ग्रुपचा ब्लॉग वाचण्यात आला. मग काय, आपलीच यामाहा, जी मी इयत्ता नववीत असल्यापासून चालवत आलोय, तीच घेउन जाण्याचा विचार पक्का केला. आणि इऽऽऽऽतक्या वर्षांत एकदाही दगा न दिलेल्या आरएक्सने, हाच लौकीक कायम ठेवत मला लडाखला व्यवस्थित नेउन आणले.
खरं तर ही ट्रीप मागच्या वर्षीच करायची होती, पण "काय वाट्टेल ते झालं तरी मी येणारच आहे" असं म्हणणारे एक एक करत गळत गेले आणि मी एकटाच उरल्यावर बेत बारगळला. या वेळी मात्र मी आधीच पैसे भरुनच टाकले. याही वर्षी नक्की येणारे ३-४ जण होते, जे पुन्हा एक एक करत गळालेच. पण या वेळी मी हटलो नाही, आणि 'सदाशिव पेठ, पुणे' येथील Tyremark Holidays बरोबर मनाली-लेह-श्रीनगर टूर पक्की केली.
आमचा मिटींग पॉईंट दिल्ली होता, तिथून वॉल्वोने मनालीला नेणार होते. बाईक टूर मनालीपासून सुरु होणार होती. त्यामुळे बाईक थेट मनालीला ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे पाठवायचे ठरले.
टुरचा श्रीगणेषा चांगला झाला. ठरल्याप्रमाणे बाईकची किरकोळ कामे करुन, १० दिवस आधी बाईक पाठवण्यास तयार झालो. आणि भारतभरातील ट्रकवाले हा शुभ-मुहुर्त धरुन Nationwide Indefinite Strike वर गेले! संप बेमुदत असल्याचे सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण करण्यात कोणतीही कसर बाकी राहीली नव्हती. झालं, आता यामाहा तिथपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान टूर सुरु होण्यापुर्वीच पुढे ठाकले. अनेक पर्यायांचा विचार केला. बाईक रेल्वेने चंदीगडला पाठवून तिथून मनालीपर्यंत चालवत नेणे हा एक पर्याय होता, पण चंदीगड-मनाली ३०० किमी अंतर आहे आणि ९+ तास लागतात. माझी विमानाची तिकीटे आधीच बूक झाली असल्यामुळे हा एक्स्ट्राचा लागणारा वेळही माझ्याकडे नव्हता. तेवढ्यात व्हॉल्वोवाले त्यांच्या डिकीमधून मोटारसायकल नेउ शकतात ही माहीती मिळाली. मग दिल्लीतल्या व्हॉल्वोवाल्याशी फोनवर बोललो, तो दिल्ली ते मनाली बाईक नेण्यास तयार झाला. मग पुण्याहून दिल्लीला बाईक रेल्वेने पाठवून दिली. माझं फ्लाईट दिल्लीला सकाळी ९ ला पोहोचणार होतं, आणि व्हॉल्वो संध्याकाळी ६ ला निघणार होती. त्यामुळे दिल्लीला पोहोचल्यावर एयरपोर्टवरुन निझामुद्दीन रेल्वे स्टेशनला जाउन बाईक कलेक्ट करुन व्हॉल्वो स्टँडला जाण्याचा प्लॅन केला.
बाईक रेल्वेने पाठवण्याच्या अनुभवात एक भला मोठ्ठा स्वतंत्र लेख निर्माण होण्याइतके 'पोटेंशियल' आहे त्यातल्या त्यात पुण्यातील अनुभवाला झुकते माप देऊन निझामुद्दीनला आलेल्या अनुभवावर थोडंसं लिहीतो
दिल्ली मेट्रोबद्दल बरेच ऐकले होते, तेव्हा मेट्रोने जाऊ असा (चुकीचा) निर्णय घेतला. मेट्रो छानच आहे, फक्त मला एयरपोर्टवरुन निझामुद्दीनला जायला ३ मेट्रो आणि एक रिक्षा घ्यायला लागली. मेट्रो बदलताना प्रत्येक वेळी बर्यापैकी चालावे लागले. बरोबर १५ किलोची बॅग, पाठीवर सॅक, आणि जड बाईकींग जॅकेट बॅगेत न मावल्यामुळे अंगावर असा जामानिमा करुन, दिल्लीच्या गरमागरम हवेत फिरताना त्या शंकर पाटलांच्या 'पाहुणचार' कथेमधील शेत बघायला निघालेल्या शाळामास्तरांच्या वरताण अवस्था झाली!
निझामुद्दीनला कडक्क उन्हात आणि मरणाच्या ऊकाड्यात पोचलो तेव्हा काही त्राण शिल्लक नव्हते. त्यात ते मोठे स्टेशन होते, आणि तिथे पार्सलची छोटी-मोठी अनेक ऑफीसेस होती. त्यामुळे कुठल्या ऑफीसात जायचे हे विचारीत आधी मनसोक्त फिरुन झाले. शेवटी योग्य ऑफीसात पोचलो. "काय प्रॉब्लेम हे, बघू तुमची साखळी" अशा ग्रहयोग मधल्या 'माणूस' च्याच टोनमधे, फक्त मराठीऐवजी हिंदीत जरा चर्चा झाली. मग "वो जो सामने प्लेटफॉर्म दिख रहा है ना, वहा जाके देखो वहॉ तुम्हारी गाडी है क्या" अशी ऑर्डर मिळाली. माझ्याकडे बाईक पाठवलेल्या गाडीचा नंबर, बोगी नंबर वगैरे सर्व माहीती होती, पण "गाडी किसीभी खाली प्लॅटफॉर्मपर आती है, कोई फिक्स प्लॅटफॉर्म नही होता" हे उत्तर मिळाले. मग त्या प्लॅटफॉर्मला सदिच्छा भेट देउन आलो. बाईक नव्हती. "अब वो उस तरफवाला प्लॅटफॉर्मभी चेक करो" ऐकून तोही प्लॅटफॉर्म पालथा घालून झाला. त्यानंतर या स्टेशनला ७ प्लॅटफॉर्म असून, बाईक कुठल्याही प्लॅटफॉर्मला कुठेही सोडलेली असेल, आणि ती मलाच शोधायची आहे, हे ज्ञान मिळाल्यावर मी सरळ एक कुली घेतला आणि त्याला बॅग घेउन माझ्याबरोबर सात प्लॅटफॉर्मवर सात फेरे घेण्यास सांगितले!
अनेक बाईक्स पहात पहात सातव्या प्लॅटफॉर्मच्या शेवटाला पोहोचलो तरी माझी यामाहा काही दिसली नाही. तेवढ्यात कुलीने "वो कभी कभी गाडी फुल्ल हो जाती है तो पार्सलवाली मोटरसाईकल बिचमेही उतारते है, अब कल-परसो आ जाएगी लगता" हे वाक्य फेकून माझ्या डोळ्यासमोर काजवेच चमकवले. २-४ मिनीटे सुन्न उभा राहीलो, तेवढ्यात तिथल्या शेवटच्या बिल्डींगमागून पॅक केलेल्या एका बाईकचा टायर डोकावताना दिसला. फुल्ल सस्पेन्स मोडमधे बेताने तिथे गेलो, आणी बिंगो! तिथे ५-६ बाईक्स होत्या ज्यात माझी यामाहा एकदाची सापडली.
मग पुढचे सोपस्कार सांगण्यात आले. "अब वो पहले प्लॅटफॉर्मपे जाओ, उधर एंट्री करके यहा आओ. फिर यहासे रिसीट लेके प्लॅटफॉर्म ४ पे ऑफीस है वहाँ जाओ, वहाँ तुम्हे गेट पास मिलेगा. वो लेके यहॉ फिर आओ, और गेट पास दिखाके गाडी ले जाओ!" ऐकता ऐकताच पार घामाघूम झालो. मग कुली म्हणाला की इतना करनेकी जरुरत नही है, आप मुझे १०० रुपये देदो मै अभीच बाईक निकालता इधरसे. मग अडल्या हरीने १०० रुपये देउन बाईक घेतली, गेट पास बनवला आणि स्टेशनच्या बाहेर पडलो एकदाचा. बाईक रेल्वेने पाठवताना त्यात एक थेंबही पेट्रोल ठेवता येत नाही, आणि तिथून पेट्रोल पंप अडीच किमीवर होता. पण त्यांच्याकडे सर्व सिस्टीम तयार होती. स्टेशनबाहेरच एक चांभार बाटलीतून पेट्रोल विकतो असं मला सांगण्यात आले. मग त्या चांभाराकडून ८० रुपयांना अर्धा लिटर पेट्रोल घेतले, माझी बॅग मागे बांधली आणि किक मारुन रंपाट निघालो. गरम वारं लागल्यावर काय मस्त वाटलं! ओरिजीनली दिल्ली फिरायचा विचार होता, पण या सगळ्यात ३-४ तास मोडल्यामुळे थेट व्हॉल्वो स्टँडवर निघालो. गुगल मॅपमधे 'मजनू का टिला' असा व्हॉल्वो स्टँडचा भन्नाट पत्ता टाकला. तिथे पोचल्यावर यामाहा व्हॉल्वोमधे चढवली, नीट बांधली. मग साधारणपणे साडेसहाला निघून रात्रभर प्रवास करुन दुसर्या दिवशी सकाळी साडेसातला मनालीला पोहोचलो. जाताना लागलेल्या बिलासपूरच्या घाटात अप्रतीम निसर्गसौंदर्य होते. घाट भयंकर होता आणि व्हॉल्व्होवाला महाभयंकर चालवत होता. Universal Studios मधल्या ममी राईडची आठवण झाली. खाली डिक्कीत असलेली बाईक मनालीत कुठल्या अवस्थेत मिळते ही धाकधूक सुरु झाली, पण नीट बांधून ठेवल्याचा फायदा झाला आणि मनालीत आमचा ग्रुप आणी यामाहा व्यवस्थितपणे पोहोचलो. तिथून प्रतेक्ष टूरची सुरुवात झाली!
पहीला दिवस - मनाली
रात्रभर बसचा प्रवास झाल्यावर तो दिवस आराम आणी मनालीत फिरण्यासाठी होता. मनालीतली हवा, आजूबाजूचे हिरवेगार डोंगर, भरभरुन वाहणारी नदी हा माहौल बघून प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला, आणि आम्ही आवरुन लगेच मनाली भटकायला बाहेर पडलो.
जागोजागी झाडांना सफरचंदे लागलेली होती:
इतकी वर्षे टिळक रोड, बाजीराव रोड ई रोडवर ट्रॅफीकमधे फिरणार्या यामाहालाही महाराष्ट्राबाहेर इतक्या लांब, इतक्या सुंदर ठिकाणी प्रथमच पळायला मिळाल्यामुळे जोर आला असावा, भन्नाट पळत होती एकदम
दुसरा दिवस - मनाली ते जिस्पा
आज मनालीहून निघून जिस्पाला जायचे होते. बाईकवरुन प्रवासाचा पहीलाच दिवस! अंतर १४२ किमी आणि लागणारा वेळ साडेचार ते पाच तास.
अतीशय सुंदर रस्ता होता. वाटेत ठिकठिकाणी चहा मिळत असे त्यामुळे अस्मादिक एकदम खुश होते. संपूर्ण टूरमधे रोज १० कप चहा तरी व्हायचाच.
निघाल्यानंतर दोन-अडीच तासांनी टूरमधला पहीला पास लागला - रोहतांग पास! उंची १३००० फूट!
इथे आता बोगदा करण्याचे काम सुरु आहे. बोगदा झाल्यावर रोहतांग पास चढण्याची गरज भासणार नाही.
रोहतांग पासला जाण्यासाठी परमिट लागते. ते परमिट घेत असताना, त्या ऑफिसातला माणूस यामाहा आरएक्स १०० बघून बाहेरच आला. "ये अभी यहाँ बिलकूल मिलती नही है, कहासे आये" वगैरे चौकशी करु लागला. मग म्हणाला, "आप प्लीज ये गाडी मुझे बेचदो. चाहो तो अपनी टूर कंप्लीट करना, फिर मै वहॉ आके खरीद लूंगा!" पहील्याच दिवशी प्रवास चालू केल्यावर अवघ्या दोन तासातच मिळालेली पहिली ऑफर! त्यानंतर संपूर्ण टूरमधे अजूनही काहीजणांना ती बाईक विकत घेण्यात सिरीयस इंटरेस्ट होता, अर्थातच मला सर्वांचा हिरमोड करावा लागला!
रोहतांग पास उतरुन पुढे जातानाही आजूबाजूला अप्रतीम सुंदर नजारा होता. मुख्य फरक म्हणजे इथले डोंगर हिरवेगार होते, आणि लडाखमधे सगळीकडे कोरडे, राखाडी रंगाचे! अर्थात त्यातही वेगळंच सौंदर्य होतं. असे हिरवे डोंगर नंतर पुन्हा आम्हाला थेट शेवटच्या दिवशी सोनमर्गजवळ लागले.
त्यानंतर जिस्पाच्या अलीकडे, टंडीला पेट्रोल पंप लागला. इथून पुढे लेहला जाताना पुढचा पेट्रोलपंप थेट ३६५ किमीनंतर आहे. यामाहाची टाकी १० लिटरची, आणि पुण्यात मला ३५-४० किमी/लिटर अॅव्हरेज देणारी आरएक्स इथे २५ ते ३०च देणार होती घाटरस्ते आणी कमी ऑक्सिजनमुळे. त्यामुळे हा पॅच जनरली बाईकर्सकरता चॅलेंजिंग ठरतो. आमच्या ग्रुपबरोबर बॅकअप वेहीकल असणार होती ज्यात कॅनमधे पेट्रोल होतं, त्यामुळे तशी काळजी नव्हती. तरी अगदी काठोकाठ पेट्रोल भरुन घेतलं.
जिस्पाला टेंट्समधे रहाण्याची सोय होती. जागा निव्वळ सुंदर होती, टेंटसाईटच्या मागेच वहाणारी नदी, आजूबाजूला डोंगर आणी गर्दी/कचरा यांचा अभाव!
टेंटसाईट
नदीवर जाउन संध्याकाळी मस्त टाइमपास केला. रात्री शेकोटी केली होती, थंडीत शांत वातावरणात शेकोटीशेजारी बसायला भन्नाट वाटलं एकदम!
तिसरा दिवस - जिस्पा ते लेह
आजचा दिवस हा संपूर्ण टूरमधला सर्वात कठीण प्रवासाचा दिवस! जिस्पा ते लेह! अंतर साडेतीनशे किमी! आणि वाटेत बारलाचा पास - १६०५० फूट, नकीला पास - १५५५० फूट, लाचुलुंग-ला पास - १६६१६ फूट, आणी जगातील दुसर्या क्रमांकाचा उंच टांगलांग-ला पास - १७५८२ फूट! या रस्त्यावर काही अवघड Water Crossings असणार होते, तसेच ५० पेक्षा जास्त किमीचा रस्ता हा अत्यंत खराब होता. त्यात अजून आम्ही आजीबात acclimatize झालेलो नव्हतो, आणि डायरेक्ट १६००० फुटांवर जावे लागणार होते, ते ही सलग नाही तर अनेकदा वर जाउन पुन्हा खाली आणी पुन्हा वर!
काही भागांत रस्ता चांगला होता, पण उंचावर असल्यामुळे ऑक्सीजनचं प्रमाण कमी होतं. त्यातून आरएक्स टू-स्ट्रोक असल्यामुळे मुळात तिला ऑक्सीजन जास्त लागतो. त्यामुळे वेगात जाणं शक्यच नव्हतं.
वाटेत सर्चू नावाचं गाव होतं, त्याच्या अलीकडे जेवून घेतलं. त्या आधीचे चाळीसेक किमी निव्वळ भयंकर होते. रस्ता कमाल खराब, आणि काही ठिकाणीतर रस्ताच नाही! सगळे खड्ड्यांतून, पाण्यातून, जागा मिळेल तिथून गाडी दामटवत राहीले. अंग पार खिळखिळं होउन गेलं!
बेकार रस्त्यात थांबून फोटो काढायला पावरच नव्हती, त्यामुळे फोटो फक्त चांगल्या ठिकाणचेच आहेत
जेवणानंतर एकेक पास चढत आणी उतरत पुढे जात राहीलो. सर्वप्रथम आला तो नकीला पास - १५५४७ फूट:
त्यापाठोपाठ लगेच आला लाचुंगला पास - १६६१६ फूट:
मधे अधे कच्चे रस्ते, धबधबे वगैरे सुरुच होते. काही ठिकाणी क्रॉसिंगसाठी छोटे लोखंडी पूल ठेवलेले होते:
एके ठिकाणी खडकातून कोरुन बोगदा काढला होता. खरंतर फोटोवरुन नीट कल्पनाच येत नाही, प्रत्यक्षात ते ठिकाण अगदीच भन्नाट होतं:
वाटेत एकदा चहाला थांबलो असता पेट्रोलचा अंदाज घेतला, आणि मला अंदाज आला की यामाहा काही पेट्रोल पंपापर्यंत जाणार नाही. बॅकअप गाडीत पेट्रोल होतं, पण आम्ही बरंच पुढे आलो असल्यामुळे त्या गाडीला यायला बराच वेळ लागणार होता. आम्ही थांबलो होतो ती जागा अगदीच विराण होती. पण मी जायच्या आधी माहीती काढली होती त्यानुसार अगदी छोट्या ढाब्यावरसुद्धा पेट्रोल ठेवलेलं असतं विकायला. तिथल्या माणसाला विचारलं तर आहे म्हणाला, १५० रुपये लिटर! मग त्याच्याकडून १ लिटर पेट्रोल घेउन पुढे निघालो. पहीला पेट्रोल पंप लेहच्या अलिकडे साधारण ४० किमीवर आहे, कारु नावाच्या गावात. पण तरीही माझा अंदाज चुकलाच, आणी कारुच्या जेमतेम १२ किमी अलीकडे पेट्रोल संपून गाडी बंद! माझ्या बरोबर एक रायडर होता, पण त्याच्याही बाईकमधे जेमतेम पेट्रोल होतं. कॉलेजकाळात वापरलेल्या टॅक्टीक्ट्स - गाडी आडवी करुन ठेवणे आणी चालू करुन पटकन निघणे - वगैरे वापरुन अजून २-३ किमी गेलो, आणि उपशी नावाच्या गावापाशी पूर्ण खडखडाट झाल्यावर थांबलो. आता बॅकअप वेहीकल येइपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या ढाब्याप्रमाणे उपशी गावात कुणाकडेतरी पेट्रोल असेल या आशेने गावात फिरुन आलो, पण १२ किमीवर पंप असल्यामुळे तिथे कोणी पेट्रोल ठेवत नव्हतं. मग निवांत चहा घेत बसलो. तेवढ्यात लकीली अजून एक रायडर आला, त्याच्या बुलेट मधे पेट्रोल होतं. मग त्याच्या बुलेटमधून अर्धा लिटर पेट्रोल बाटलीत घेउन यामाहामधे टाकलं आणि पंपावर पोचलो. तिथे पुन्हा अगदी काठोकाठ पेट्रोल भरुन घेतलं, आणि पुढे तासाभरात लेहला पोहोचलो.
बाराहून अधीक तास खडतर रस्त्यावरुन प्रवास झाला होता, त्यामुळे पार वाट लागली होती. लेह मधे पुण्यातील आपटे आडनावाच्या सदगृहस्थांचं हॉटेल आहे, तिथे बुकींग होतं. त्यांनी सांगितलं की इतका प्रवास करुन आल्यावर आत्ता लगेच आंघोळ आजीबात करु नका. बॉडी टेंपरेचर हळूहळू सेट होत आलंय त्याची वाट लागेल. फक्त जेवा आणि डायरेक्ट झोपा. त्यांचं म्हणणं ताबडतोब मान्य करण्यात आलं . त्यानंतरचा दिवस आरामासाठी आणि लेह मधे फिरण्यासाठी होता. त्यामुळे जेवण केलं आणि फोनमधला अलार्म बंद करुन कमाल ताणून दिली!
चौथा दिवस - लेह
आज निवांत उठून, नाष्टा वगैरे करुन भटकायला बाहेर पडलो. प्रथम आम्ही Thiksay Monastery मधे गेलो. खुप छान जागा होती. विशेषत: प्रार्थना हॉलमधे सर्वजण अतीशय शांत बसले होते आणि धीरगंभीर आवाजात त्यांची प्रार्थना आणि पारंपारीक वाद्यांचा आवाज इतका मस्त वाटत होता की तिथून उठायची इच्छाच होईना. तिथून बाहेर आल्यावर मराठी बोलणं ऐकून तिथले एक जवान जवळ आले, ते महाराष्ट्रातील होते. त्यांच्याबरोबर मराठीतून मस्त गप्पा झाल्या.
तिथून निघालो आणि 3 Idiots मधील फेमस शाळेत गेलो. त्या शाळेचं खरं नाव आहे Druk White Lotus School. छान आहे शाळा. तिथे शाळेबद्दलची थोडक्यात माहीती दिली. ऑफीसमधे शाळेचे, 3 Idiots च्या शूटींगच्या वेळचे असे काही फोटोज आहेत. शाळा तेव्हा चालू असल्यामुळे मुख्य इमारतीत जायला परवानगी नव्हती, ऑफीस आणि 3 Idiots च्या शूटींगच्या लोकेशनवर जायला एक टूर होती. ते बघून आलो. त्यानंतर आम्ही लेह मार्केटमधे गेलो. उरलेला दिवस मार्केटमधेच गेला.
रोज रात्री जेवण झाल्यावर मिटींग असे, तेव्हा दुसर्या दिवशीचा डिटेल प्लॅन सांगण्यात येई. त्या दिवशी बातमी मिळाली की तुर्तूक ते पँगाँग रस्ता पावसामुळे वाहून गेलेला आहे. त्यामुळे आमचा प्लॅन बदलावा लागणार होता. मूळ प्लॅन लेह-तुर्तूक-डिस्कीट-पँगाँग-लेह असा होता. त्याऐवजी आता तुर्तूक कॅन्सल करुन लेह-डिस्कीट-लेह आणि नंतर लेह-पँगाँग-लेह असा बदल करावा लागला.
याचाच अर्थ डिस्कीटच्या रस्त्यावर असलेला सर्वात उंच खारदुंगला पास जाताना आणि येताना असा दोनदा चढून उतरायचा.
तसेच पँगाँगच्या रस्त्यावर असलेला तिसर्या क्रमांकाचा उंच आणी सर्वात लांबलचक असलेला चांग-ला पासही जाताना आणि येताना असा दोनदा चढून उतरायचा. बाबो.... चांग-लाच खतरनाक ट्वीस्ट आला हा तर!
पाचवा दिवस - लेह ते डिस्कीट
लेहमधून सकाळी लवकरच निघालो. लेहमधून बाहेर पडल्यावर खारदुंगला पास लगेचच चालू होतो. मुळात लेह साधारणपणे १२००० फूटांवर आहे. साधारणपणे ८०००-९००० फूटांनंतर गाड्या मिसफायर करायला लागतात. त्यामुळे लेहमधेसुद्धा गाड्या आजीबात नीट चालत नव्हत्या. खारदुंगला चढायला सुरुवात केल्यावर तर गाड्या कमालीच्या मंदावल्या. टॉप जवळ येउ लागला तसंतर सेकंड गिअर आणि फुल्ल अॅक्सीलरेटर देउनसुद्धा यामाहा २० चा स्पीड सुद्धा घेईना. अर्थात बाकी गाड्यांची अवस्थाही फार काही बरी नव्हती. फायदा एवढाच कि गेले २-३ दिवस high altitude वर घालवल्यामुळे आम्ही आता acclimatized झालो होतो, त्यामुळे आम्हाला काही त्रास होत नव्हता.
बराच वेळ अॅक्सीलरेटर पिळून पिळून मनगट दुखायला लागलं, आणि शेवटी एकदाचा खारदुंगला टॉप आला. जगातल्या The Highest Motorable All Weather Road वर आपली MH-12 नंबरची यामाहा घेउन जाण्याचं स्वप्न साकार झालं
टॉपला थोडावेळ थांबून (आणी अर्थात एक चहा मारुन ) खारदुंगला दुसर्या बाजूने उतरायला सुरुवात केली, आणि Nubra Valley कडे निघालो. या रस्त्यावर उन्हाचा चांगलाच तडाखा बसला. वाटेत एके जागी घोडे पाणी पिताना मस्त दृष्य पहायला मिळालं:
Nubra Valley सुद्धा अप्रतीम सुंदर आहे. हॉटेलवर पोहोचल्यावर फ्रेश होउन लगेच आम्ही फिरायला बाहेर पडलो. तिथल्या Sand Dunes मधे संध्याकाळच्या वेळी फिरायला फार भारी वाटलं. तिथे ऊंटावरुन सफारी करता येते. तेथील ऊंटांचे वैशिष्ठ म्हणजे त्यांना दोन मदारी असतात. रात्री पार अंधार पडेपर्यंत आम्ही तिकडेच फिरत राहीलो.
सहावा दिवस - डिस्कीट ते लेह
आज सकाळी उठून हॉटेलच्या जवळच असणार्या Diskit Monasteryला गेलो. तिथे बुद्धाची मोठी मुर्ती आहे, आणि चहूबाजूंनी डोंगर आहेत त्यामुळे भारी व्ह्यू मिळतो.
तिथून पुन्हा आपले लागलो खारदुंगला चढायला. यावेळी टॉपला थोडा ब्रेक घेतला. तिथल्या खारदुंगला कॅफेमधे, जो जगातल्या सर्वात उंचावरचा कॅफे आहे, मॅगी आणि चहा घेतला. तिकडून उतरताना दुरवर बर्फाच्छादित शिखरं खुप मस्त दिसत होती:
दुपारपर्यंत लेहमधे परतलो. थोडा आराम करुन संध्याकाळी Hall of Fame ला गेलो. हवा अचानक पावसाळी झाली आणी आम्हाला इंद्रधनुष्य पहावयास मिळाले:
Hall of Fame आणि कारगिलला दिलेली भेट अक्षरश: अविस्मरणीय होती. तिथे सैनीकांनी कारगील व इतर युद्धांमधे काय काय पराक्रम केलेत याची माहीती, त्यावर एक फिल्म दाखवली जाते. ते सगळं बघून डोळ्यात अक्षरश: पाणी येतं. १७००० फूटांवर केवळ काही मिनीटे जाउन आमची इतकी वाट लागली होती, आणि आपले सैनीक सियाचीन मधे २५००० फूटांवरदेखील प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत रहातात, लढतात. आपल्याला इतक्या लांब सुरक्षित वातावरणात राहून त्यांच्या त्यागाची कल्पना येणेच अशक्य आहे. Hall of Fame मधे केवळ २२व्या वर्षी शहीद झालेल्या जवानाचे घरी पाठवलेले शेवटचे पत्र, आणि शहीद झाल्यानंतर त्या पत्राला त्यांच्या वडीलांने लिहीलेले उत्तर लावले आहे. विशेषत: वडीलांचे उत्तर तर मी शेवटपर्यंत वाचूच शकलो नाही. त्याबरोबरच युद्धात वापरलेली शस्त्रे, सियाचीन सारख्या ठिकाणी रहाण्यासाठी वापरली जाणारी आयुधे, युद्धात केळ्यासारखी सोलली गेलेली अवजड लोखंडी शस्त्रे पाहून हादरुन जायला होतं. युद्धाच्या वेळचे, सियाचिन मधले, निरनिराळ्या आपत्तीकालातले अनेक फोटोजही तिथे पहावयास मिळतात.
याचबरोबर अत्यंत खेदाने असे लिहावे लागते की आपल्या बर्याच लोकांवर याचा काहीही परिणाम होत नाही. तिथेही हास्यविनोद करणारे, समोर कारगिल युद्धाची फिल्म चालू असताना, जवान छातीवर गोळ्या झेलत असताना मोबाईलची मोठ्याने रिंग वाजणे, अनेकदा रिंग वाजून मग मोबाईल उचलून मोठ्या आवाजात बोलायला सुरु करणे, आजूबाजूचे लोक त्रासून/रागाने मागे वळून बघत असतानादेखील काही फरक न पडणे - ही वागणूक तिथेही पहायला मिळाली. फिल्म संपल्यावर शहीदांची नावे सुरु झाल्यावर, जणू काय आता पिक्चर संपला आणि आता end credits काय पहायचे अशा थाटात काही लोक उठून गेले, फिल्म साठी हॉल मधे अंधार करुन एक जवान बंद दरवाजाजवळ उभे असता त्यांना दरवाजा उघडायला लावून बाहेर पडले. इतका पराकोटीचा कोडगेपणा पाहून मन विषण्ण झाले.
सातवा दिवस - लेह ते पँगाँग
आज पँगाँगला जायला निघालो, आजचा पास होता चांगला. हा चांगलाच लांबलचक पास होता, संपता संपेना. गाड्यांचा जणू जीव घाबरा झाला. उंचीला खारदुंगला पेक्षा थोडासाच कमी आहे पण खारदुंगलापेक्षाही अवघड वाटतो. त्यामुळे पँगाँगला पोहोचायला वेळही बराच लागला.
पँगॉंगचे सौदर्य आपण 3 Idiots मधे पाहीलेच आहे. इथे मात्र आम्हाला वेदरची फारशी साथ लाभली नाही. प्रचंड थंडी, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या बारीक सरी येत होत्या.
तरी आम्ही बराच वेळ थांबलो. शेवटी लांबवर एका डोंगरावर थोडी उन्हाची तिरीप यायला लागली, पण नंतर लगेच अंधार पडायचीच वेळ झाली होती:
त्या रात्री टेंट्समधे रहायची व्यवस्था होती. कडाक्याची थंडी होती पण जाडजूड रजया असल्यामुळे झोप छान लागली.
आठवा दिवस - पँगाँग ते लेह
सकाळी उठल्यावर थंडीच्या जोडीने भुरभुर पाऊस सुरु झाला. त्यामुळे रेनकोट चढवूनच निघालो. पँगाँगमधून बाहेर पडतानाच वाटेत काही Marmots फुल्ल खेळायच्या मूडमधे आले होते:
पुन्हा एकदा चांगला पास चढून उतरला. लेहमधे परत आल्यावर थोडी विश्रांती घेउन संध्याकाळी शांती स्तूप बघायला गेलो:
इथेही तीन बाजूंनी डोंगर आणि चौथ्या बाजूला लेह शहर खुप मस्त दिसते.
नववा दिवस - लेह ते कारगील
आज लेह-लडाख प्रांताचा निरोप घेउन कारगीलला निघालो. लेहच्या बाहेर Magnetic Hill लागला. तिथे जरा थांबून पुढे निघालो. लेह-कारगील नॅशनल हायवे असल्यामुळे रस्ता एकदम करकरीत होता. थोडं पुढे गेल्यावर एका टेकडीवरुन खाली सिंधू आणि झंस्कार नद्यांचा संगम पाहीला:
अजूनही आजूबाजूला डोंगर दिसतच होते. लेहमधून बरंच लांब जाईपर्यंत उंची कायम असल्यामुळे यामाहा नॉर्मल चालत नव्हतीच.
त्यानंतर श्रीनगर पर्यंत ३ पास लागले, फोटूला, नामीक-ला आणि झोझीला. त्यातला झोझीला पास डेंजर होता, फक्त लेहकडून जाताना तो उतरायचा होता ही त्यातल्या त्यात जमेची बाब!
कारगीलला पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली. संध्याकाळी तिथल्या बाजारात जरा फिरुन आम्ही हॉटेलवर परतलो.
दहावा दिवस - कारगील ते श्रीनगर
आजचा बाईक प्रवासाचा शेवटचा दिवस. सकाळी आवरुन Kargil War Memorial ला भेट दिली. हे मेमोरियल द्रास शहरात आहे, जे भारतातील सर्वात थंड ठिकाण आहे. तसेच तिथे लावलेल्या J&K Tourism च्या पाटीनुसार ते The second coldest inhabited place in the world आहे.
कारगील वॉर मेमोरीयलमधेही लेहसारखीच अवस्था झाली. तिथेही कारगील युद्धावर एक फिल्म दाखवण्यात आली. तिथेही एक वॉर म्युझियम आहे. फिल्ममधील कॅप्टन बात्रांच्या तोंडचे "येह दिल मांगे मोर" शब्द ऐकून अंगावर काटा येतो.
वॉर मेमोरियल अत्यंत सुंदर बनवलेलं आहे:
वरील फोटोत मागे दिसणारा पहाड हाच तोलोलिंग!
वीरभूमी!
मेमोरियल
तिथून भारावलेल्या अवस्थेतच बाहेत आलो आणि श्रीनगरची दिशा पकडली. सोनमर्ग जवळ येउ लागल्यावर वर म्हटल्याप्रमाणे पुन्हा हिरव्यागार टेकड्या दिसू लागल्या:
श्रीनगरला हाउसबोटवर रहायची सोय होती. बाकी सगळे आराम करु लागले, पण मला यामाहा पुण्याला कुरीयरने पाठवायची असल्यामुळे माझी संध्याकाळ त्यातच गेली.
हा, एक गंमत: मी यामाहावर बसून कुरीयर ऑफीसला जायला निघणार, इतक्यात आमच्या ग्रुपचा मेकॅनिक येउन म्हणाला की गाडी स्टँडपे लगाके जरा बाजू होना. मी तसे केल्यावर त्याने यामाहाला नमस्कारच घातला ही शंभर सीसीची गाडी नीट चालेल का नाही ही त्याला सुरुवातीला थोडी शंका होती, पण शेवटी तो म्हणाला की इस गाडीका परफॉर्मन्स देखके मै तो दंग रह गया
यामाहा पाठवून देउन मी दुसर्या दिवशी विमानाने परतलो. यामाहा अजून पुण्याला पोहोचायचीय. ही ट्रीप सर्वार्थाने आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय अनुभव बनून राहील यात शंकाच नाही!
या ट्रीपसाठी कुटुंबिय आणि मित्रांकडून सहकार्य आणी प्रोत्साहन खुप मिळालं. त्यांचे तसेच इतके दिवस एकट्याने जाउ दिल्याबद्दल सौभाग्यवतींचे विशेष आभार
ट्रीपबद्दल ऐकल्यावर त्यावर लिहीण्यासाठीही खुप जणांनी आग्रह केला, त्यामुळे जास्त दिवस न घालवता काही गोष्टी विसरायच्या आत आज संपूर्ण लेख लिहून काढला. इतका मोठा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद, आणि लिहू दिल्याबद्दल मायबोलीचे आभार!
ब्राव्हो! या अफलातून
ब्राव्हो! या अफलातून प्रवासाबद्दल. एक महत्वाची अचिव्हमेंट आहे ही.
माझें हे adventure करण्याचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही, बस मनालीहुन यामाहाने रोहतांग पास आणि अजून इकडे तिकडे फिरलो एवढेच.
फोटो सुंदर आहेत, वर्णन पण खूप छान केलंय.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
मस्त रे! लेख आणि फोटोज दोन्ही
मस्त रे! लेख आणि फोटोज दोन्ही छान आहेत. अजून माझ्या नशीबात इतकी वर्षं हा टायरमार्क योग आला नाहीये. बघू कधी येतोय!
सही रे! निवांत सविस्तर वाचतो.
सही रे! निवांत सविस्तर वाचतो.
मंदार, तुझे ह्या ट्रीप चे
मंदार, तुझे ह्या ट्रीप चे फोटोज बघून, वर्णन ऐकायची उत्सुकता ताणली गेली होती. सुंदर अनुभव आणी तो तु मस्त शब्दबद्ध केलायस. महत्वाचं म्हणजे, क्रमशः न टाकता, संपूर्ण लेख टाकलास, हे फार बरं केलस. ट्रीप, हे वर्णन आणी फोटोज - एक नंबर!!
बेकार रस्त्यात थांबून फोटो
बेकार रस्त्यात थांबून फोटो काढायला पावरच नव्हती >>
मंदार, मस्त लिहिलं आहेस. फोटो ही सुंदर आहेत.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
किती छान लिहीलं आहेस मंदार.
किती छान लिहीलं आहेस मंदार. थोडीफार सफर करून आल्याचा फील आला वाचताना आणि नव्याने लेह लडाख ला जाण्याचा उत्साह.
फोटो तर फारच सुरेख!
तुझ्या लाडक्या यामाहा चं विशेष कौतूक!
मस्तच लिहिलंय! लिहिण्याची
मस्तच लिहिलंय! लिहिण्याची शैली खूपच आवडली. फोटोही छान!
छान वाटलं वाचून! सफर केल्यासारखं वाटलं
गेल्यावर्षी याच दिवशी हीच सहल
गेल्यावर्षी याच दिवशी हीच सहल पूर्ण करून आम्ही पुण्यात आलो होतो. फरक एवढाच की आम्ही ही बुलेट वरुन केली होती. पिलियन रायडर होते मी. थोड़ी फार चालवली पण NH01 वर. आम्ही डायरेक्ट लेह मधे उतरून खारदुंगला , पँगाँग, कारगिल- द्रास ला गेलो होते. मागच्यावर्षी पण तुर्तूक ते पँगाँग रस्ता पावसामुळे वाहून गेला होता म्हणुन मग आम्हाला आमचा प्लान बदलावा लागला. डिस्कीट न जाता आम्ही फ़क्त खरदुंला पर्यंत जाऊन आलो अणि लेह-पँगाँग-लेह असा प्रवास केला. खारदुंगला ला जायला २ वेळा मिळाले. ज्या दिवशी आम्ही लेह मधे पोहचलो त्याच्या तिसऱ्या दिवसा पासून आम्ही ट्रिप सुरु होणार होती. लेह मधे काही शॉप्स आहेत जे तुम्हाला साईकल रेंट वर देतात अणि ती साईकल जीप वर टाकून तुम्हाला खारदुंगला पर्यंत घेऊन जातात. येताना तुम्हाला साईकल घेऊन याव लागत. सगळा उतार असल्याने साईकल चालविण्याचा जास्त त्रास होत नाही. high altitude चा त्रास मात्र होऊ शकतो. ट्रिप च शेवट मनाली मधे केला होता.
मी_परी, भारीच की!
मी_परी, भारीच की!
विलक्षण !
विलक्षण !
फोटो आणि लिखाण दोन्ही आवडले. आत्ताच्या आत्ता उठून तिकडे जावं असं वाटतंय
पण आता
"लेह लडाख मधे बायकिंग म्हणजे तसे काही फार भारी नाही, आमच्या एमेच १२ ची १०० सी सी वाली यामाह पण खूप छान चालते तिकडे" असे सांगायला खूप जण मोकळे झाले बरं
मंदार, खुप मस्त लिहिलं आहेस.
मंदार, खुप मस्त लिहिलं आहेस. फोटो तर आधि पाहिलेच होते. - भावना आत्या
मस्त वर्णन आणि कमी cc च्या
मस्त वर्णन आणि कमी cc च्या यामाहा वरून ही ट्रिप यशस्वी करणं हे खरंच कौतुकास्पद !
मला फोटो का बरं दिसत नसतील ?नुसते मॅप दिसत आहेत .. मी chrome वापरतेय
जबरी रे! हा सगळा प्रवास दोन
जबरी रे! हा सगळा प्रवास दोन वर्षांपूर्वी केला आहे, अर्थात जीपमध्ये बसून, पण त्यामुळे एकदम नॉस्टॅल्जिक केलंस! अरे काय तो 'चांग ला' पास! संपतच नाही! खारदुंग-लाचा रस्ताही वाईट आहे. बाईकवाल्यांचे सिरियस हाल! कस पाहणारं टेरेन आहे. पण काय निसर्ग आहे ना! सगळे कष्ट वर्थ इट वाटतात
ब्राव्हो. यामाहाला काय बक्षिस देणार?
मस्त! मी ही लदाख ला श्रीनगर
मस्त! मी ही लदाख ला श्रीनगर ते लेह असा प्रवास करून आले . बाइक नाही पण ड्राइव्ह करत जायचा प्लॅन आहे! खरतर त्याची पूर्वतयारी म्हणून ही ट्रिप केली.
चांगला पास सं प त च नाही! त्यात तो ट्रिप च्या शेवटी आला असेल तर , अगदिच.
नितांत सुंदर अन अंतर्मूख करायला लावणाअरा प्रदेश आहे . परत परत जावस वाटणाअरा. मी परतीच्या प्रवासात , पुढच्या प्रवास इटिनरीज ठरवूनही टाकल्या.
धन्यवाद लोकहो, जायचा विचार
धन्यवाद लोकहो, जायचा विचार असेल तर नक्की जाउन या. खुपच सुंदर आहे लडाख प्रदेश.
मला फोटो का बरं दिसत नसतील ?नुसते मॅप दिसत आहेत .. मी chrome वापरतेय >>>
मलाही अधून मधून क्रोम मधे फोटोज दिसत नाहीत, पण पेज रिफ्रेश केल्यावर दिसतात. तसं करुन बघा.
सुन्दरच
सुन्दरच
आर एक्स १०० ला
__________________/\________________
मस्त रे मंदार.....सहिच...
मस्त रे मंदार.....सहिच....Pulsar 220 cc व डबलसीत घेउन जाने शक्य आहे काय ?
भारी आहे हे . फोटो आणि लिखाण
भारी आहे हे . फोटो आणि लिखाण दोन्ही सुंदर
धन्यवाद!
धन्यवाद!
Pulsar 220 cc व डबलसीत घेउन जाने शक्य आहे काय ? >> मी काही अॅव्हेंजर्स 220 cc डबलसीट जाताना पाहीले, मग Pulsar जायला हरकत नाही.
यामाहाला काय बक्षिस देणार? >> आल्यावर डीप वॉश आणी फुल्ल सर्व्हीसिंग
तीला कध्धीच विकणार नाही हे फार पूर्वीच ठरवले आहे.
"लेह लडाख मधे बायकिंग म्हणजे तसे काही फार भारी नाही, आमच्या एमेच १२ ची १०० सी सी वाली यामाह पण खूप छान चालते तिकडे" असे सांगायला खूप जण मोकळे झाले बरं >>
जबरी प्रवास.. गाडीतून
जबरी प्रवास.. गाडीतून फिरल्यामुळे सगळा टेरेन माहिती आहे, पण बाईक वरुन फिरायला जास्त मजा येते, एक दिवस लेह मधेच बाईक वरुन फिरलो होतो..
यामाहा रॉक्स.. मी एकदा नाशिक मधे मित्राच्या यामाहा आर एक्स १०० वरुन त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो होतो, काय पण गाडी आहे.. (मी आता कॅलिबर पण नेता येऊ शकेल असा विचार करायला सुरुवात केली आहे)
जबरदस्त ट्रीप! फोटो ही
जबरदस्त ट्रीप! फोटो ही सुन्दर!
मला फोटो दिसत नाहीएत. लिहिलय
मला फोटो दिसत नाहीएत. लिहिलय मस्तच. मी एक दोनदा जायचा प्लॅन केला आणि तुमच्याप्रमाणेच एक एक मित्र गळाला आणि बारगळले. एकट्याने प्रवास करण्यात काय मजा? म्हणून ते राहीले ते राहीलेच.
अप्रतिम लिहिलंय..
अप्रतिम लिहिलंय..
सही!!! फार छान लिहिलं आहेस
सही!!! फार छान लिहिलं आहेस मंदार, फोटो पण सुंदर आहेत
कडक...
कडक...
जबरदस्त वर्णन !!!! आणि फोटो
जबरदस्त वर्णन !!!! आणि फोटो पण मस्त !!!
प्रतिक्रीयांबद्दल सर्वांना
प्रतिक्रीयांबद्दल सर्वांना धन्यवाद!
शाली - बहुतेक सर्वांना फोटो दिसत आहेत, होपफुली दुसरा ब्राउझर किंवा पेज रिफ्रेश केल्यावर दिसतील फोटोज.
मी आता कॅलिबर पण नेता येऊ शकेल असा विचार करायला सुरुवात केली आहे >>> कॅलीबरसुद्धा जाईलच. पण आपलीच विशिष्ठ बाईक न्यायचा अट्टहास असेल तरच न्यावी. अन्यथा इथून नेण्या-आणण्याच्या खर्च धरल्यास त्यापेक्षा कमी खर्चात तिथे रेंटल बाईक मिळते.
मस्त वर्णन आणि फोटोज !
मस्त वर्णन आणि फोटोज !
मी पण २०१४ मधे "Tyremark, सदाशिव पेठ, पुणे" सोबत लेह - लडाख बाइकींग टूर केलीय. आमचा रूट उलटा होता.
जम्मू - श्रीनगर - लेह -द्ड डिस्किट - लेह - पा पँगाँग - लेह - सर्चू - जिस्पा - स्पिती वॅली - मनाली - चंदिगढ.
मी पिलियन होते त्यामुळे भरपूर फोटो काढले मागे बसून . फार कमाल त टूर.
तुम्ही लेह मधे खार्दुंगला व्ह्यु हॉटेल मधे राहिलेलात का ? ते Tyremark चं हो हॉटेल आहे (आपटे + जोशी मालक).
Pages