सांजवेळी उदास नसते मी - तरही

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 August, 2018 - 00:15

ओळीसाठी 'बेफिकीर' जी ह्यांचे आभार मानून...

आठवांच्या थव्यात रमते मी
(सांजवेळी उदास नसते मी)

बाळ तू तान्हुले जणू माझे
पुरवते हट्ट, शांत बसते मी

तो अवेळीच रोज मावळतो
पश्चिमेचा गुलाल बनते मी

चेहऱ्यावर तुझ्या नजर खिळते
हुंदके परतवून हसते मी

काय सांगू अशी कशी झाले ?
घेत आले सदैव नमते मी

कोपऱ्यातील एक शेकोटी
रात्रभर एकटी धुमसते मी

एक छाती दिसे तुझी निधडी
उंबऱ्या आत राज्य करते मी

तो स्वतःचा तसा कुठे उरतो
आणि माझी कधीच नसते मी !

मी समजते तसाच नव्हता तो
तो समजतो तशीच नव्हते मी

त्या तिथे तो भरून कोसळतो
ह्या इथे कोरडी तरसते मी

ऐक माझे कधी कधी तू ही
नेहमी हेच हेच म्हणते मी

बोलणे आर्जवी असे त्याचे
ऐकते सर्व आणि फसते मी

गाठण्या गाव धावते त्याचे
रूळ माझे किती बदलते मी

ओळ त्याची खयालही त्याचे
फक्त त्याची जमीन कसते मी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो स्वतःचा तसा कुठे उरतो
आणि माझी कधीच नसते मी !

त्या तिथेही भरून तो येतो
ह्या इथे कोरडी तरसते मी>>> वाह वा! सुरेखच! सगळेच शेर मस्त!

तो स्वतःचा तसा कुठे उरतो
आणि माझी कधीच नसते मी !

त्या तिथेही भरून तो येतो
ह्या इथे कोरडी तरसते मी>>> वाह वा! सुरेखच! सगळेच शेर मस्त>>>>+१