अंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक)

Submitted by बेफ़िकीर on 16 August, 2018 - 01:15

अंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक)
==========

बेचकीत जन्मतो जीव हा कवितासंग्रह हाती आल्यापासून कितीदातरी वाटले की सगळे सोडून आधी ह्यावर लिहायला हवे. ह्या कवितासंग्रहावर लिहिल्याने आपण आपल्या मनावर होत असलेल्या एका मूक परंतु प्रखर मोर्चास्वरुपी वैचारीक हल्ल्यापासून स्वतःला वाचवू शकू. नाही लिहिले तर सुटका होणार नाही. मनाचा एक कोपरा आपल्या अस्तित्वाला चोवीस तास खिजवत राहील आणि म्हणत राहील की बघ, हे सगळे आहे तरीही तू जगण्याचे नाटक करतच आहेस.

अस्तित्वाचे अनेक थर आणि स्तर असतात. अधिकाधिक आतल्या थरातून किंवा स्तरातून व्यक्त होऊ शकणे म्हणजे अधिकाधिक कवित्व असा माझा तरी साधा हिशोब आहे. किशोर पाठकांचा हा थक्क व अवाक करणारा आतला स्तर एकाचवेळी हवासाही वाटतो आणि आपल्या मनावर हल्लाही करतो. तो शब्दांना चित्रांसारखे वापरतो. एक अखंड, वैविध्यपूर्ण चित्रमालिका डोळ्यांसमोर उभी राहते आणि आपले भोंदूत्व आपल्याला सहज पटवून देते. कोणतेही पान उघडावे आणि वाचू लागावे अश्या प्रकारची फार कमी पुस्तके असतात त्यातील हे एक आहे.

====
आम्ही लवलेल्या मानांचे
बधिर कानांचे
कोरड्या थानाचे
लुचत बसतो संस्कृतीचा पान्हा
जो साहेबांच्या ब्रीफकेसमध्ये विकत मिळतो

आम्ही गहाण
त्यांच्या मैथुनग्रस्त नजरेवर
त्यांच्या व्यभिचारी शब्दांवर
त्यांच्या बीभत्स इशार्‍यावर

'ते'उपस्थित असल्याशिवाय कावळा शिवणार नाही
कारण कावळ्यालाही आमच्या षंढ सामर्थ्याची जाण आहे
आणि आमच्या आत्म्यालाही
त्यांचे बूट चाटण्याची तहान आहे
====

फेकून दिले वस्त्र आणि अंगवस्त्रही
मग म्हणाले सगळे, छान स्वामी झालास
आता विठ्ठल रुक्माई किंवा रामकृष्ण
दावणीला बांधून तुला दळण दळता येईल स्वनामाचे
मग सोयीने हो की भगवान स्वामी वा महाराज
====

तिला म्हणालो सूर्य होऊनी उकळव माझी थंडी आता
पेपरातल्या वार्ता वाचून, काश्मीर होऊन गारठलो मी

फेकून दे तू शाल दुधाची सफरचंदही बाँब लपवते
हजार प्रेतांवरती चालत अमरनाथचे पुण्य मिळवते

डोंगर उघडा नदी बोडकी उगम साठवा विधवा झाला
रडण्याचा आदेश काढतो कर डोळ्यांचे डोह मोकळे

तिला म्हणालो श्वासांपुरती नवी बातमी एक तरी दे
तिने मृत्यूच्या कोटामधले स्मशान जाळुन उजेड केला
====

प्रार्थना वितळतात देहामधून
चेहर्‍याची पार्थिवता विरघळून जाते लयविलयातून
विमनस्कता विस्कळीत करते रक्तपेशींचे प्रवाहठोके

प्रार्थना एकट्याच घुसत घुसत देहातून
आरपार फिरून येतात, पूर ओसरल्यावरले
चिखलगाळ अवयव स्वच्छ करून देतात
====

शिडकाव्यावर छप्पर धरले तरी गारठा मनात घुसतो
अक्षर पिवळे पडले तरीही आशय हिरवा ठणकत असतो

वेलांटीची टोपी काढून कर शब्दांचे कान मोकळे
ऐकव त्यांना ओळीमधल्या कोर्‍या जागांची गार्‍हाणी

कवितेच्या बंडलात थोड्या मी अर्थाचा हिशोब केला
वरखर्चाला खिशात आहे ह्या शब्दांची चिल्लर थोडी
====

ह्या शब्दांना कुणी घातले निळे भगवे कपडे
अक्षरांना टोप्या कुणी घातल्या धर्माच्या
मी जन्मलो तेव्हा होतो एक मांसल गोळा माळेत बांधलेला
मग कुणी बांधले मणी माझ्या मनगटात जातीत ओवलेले
कुणी लावली तीट माझ्या गालावर पोटजातीची
कुणी लोटले मला वास येणार्‍या माणसांच्या कळपात
मी रडत होतो ट्याहा ट्याहा
नोंदवत होतो मी निषेध ह्या धर्मांध बोचक्यात बांधताना
====

हे काही भाग त्यांच्या काही कवितांचे! ह्याहूनही अधिक प्रखर असे भाष्य पानापानावर आहे. असे काही एकत्रीत स्वरुपात वाचायला मिळाले किंवा वाचावे लागले तर पानापानागणिक आपण विषण्ण होत जातो. ह्यामुळे नव्हे की कविता नकारात्मक आहेत, कविता नकारात्मक नाहीत. ह्यामुळे विषण्ण होतो की इतके खरे वाचायची सवय उरलेली नसते किंवा झालेलीच नसते. आपण शब्दांना शब्द समजून वापरतो किंवा फार तर हत्यार समजून! शब्दांमध्ये एक निराळे व विलक्षण विश्व असते हे अश्या कविता वाचूनच लक्षात येते.

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करून खाणार्‍या पिढीला चुलीवरचे जेवण मिळावे तशी गत होते. विषयांचा आवाकाही मेंदूत न मावणारा!

मध्यंतरी वाचले होते की समुद्राच्या तळाशी शोध घेतला तेव्हा लक्षात आले की ध्वनी प्रदुषण प्रचंड आहे. पाणबुड्या, जहाजे ह्यांचे आवाज सागराच्या खालपर्यंत पोचतात. तेथे एक असह्य कोलाहल असतो.

बेचकीत जन्मतो जीव हा अंतर्मनातील कोलाहल आहे. तितकाच असह्य आहे. एखाद्या स्फोटकासारखे हे पुस्तक संस्कृती नावाच्या भ्रामक बनून राहिलेल्या संकल्पनेला खजील करते.

आकांक्षा प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक एकशे पन्नास रुपयांना आहे पण मनापासून वाचणार्‍यासाठी ते अमूल्य आहे.

- 'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users