कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ५ (अंतिम)

Submitted by हायझेनबर्ग on 16 August, 2018 - 00:02

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४

आमच्या निहालगंजचे ना हेच मोठे वाईट आहे. पाऊस पडला तर असा बेशुमार की तीन दिवस घरातून बाहेरच पडायला नको. नाही तर मग असा गायब की जैसे गधे के सर से सिंग. ऊनही असे जालीम की जणू नार-ए-दोझख आणि ठंड तर तौबा तौबा. डिसेंबरची ठंड पडली की माझ्या मनात बेकरीत जाऊन भट्टीजवळ हाथ सेकत गरमागरम दुधाबरोबर नानखटाई खाण्याची अशी जबरदस्तं तमन्ना ऊफाळून येत असे की बस्स. पण मी नाचीझने बेकरीत पाय ठेवणे म्हणजे अम्मीची शामत ओढवून घेणे. 'या अल्ला' बेकरीत जाण्याचा नुसता हट्टं केल्यानेच अम्मीचे डाफरणे बघून मला अब्बूंना विचारावेसे वाटे 'ही माझी सौतेली अम्मी तर नाही ना?'. पण ह्या बाबतीत अब्बूंचीही काही मदत होईल तर कयामतच येईल जणू. बेकरीचे नाव जरी काढले तरी दोघे जणू शैतानाचे जिन असल्यागत माझ्या मानगुटीवर बसत, म्हणून मी आताश्या त्या भानगडीतच पडतच नसे.

एकदा रात्री तर अशी कडाक्याची ठंड पडली की मला झोपेतच कपकपी भरली. माझी रजाई, त्यावर दादाजानची रजाई मग अम्मीने दिलेले जाडेभरडे कंबल आणि त्यावर माझा ऊन्हाच्या नक्षीचा दुपट्टा असा जामानिमा करून सुद्धा थंड हटण्याचे नावच घेईना. दातांवर दात वाजवणार तरी किती? तेही बिचारे एकमेकांशी लडाई करून दुखायला लागले. अम्मीने खोलीच्या कोपर्‍यात जळत्या निखार्‍यांची शेगडी आणून ठेवली तेव्हा कुठे माझे बत्तीसच्या बत्तीस दात तोंडात बंद झाले. माझा डोळा लागतच होता की.....
तेवढ्यात कुल्फी आणि पापलेट माझ्या नावाने दबक्या आवाजात हाका मारीत आल्या... 'बिस्किट, ए बिस्किट नीचे आ जल्दी.. आपल्याला जायचं आहे'.... त्या दोघी मला न्यायला आल्या होत्या....कुल्फी आम्हाला आईस फॅक्टरी दाखवण्यासाठी तिच्या अब्बूंची ईजाजत घेऊन आली होती....सगळे बर्फाचे ठोकळे ऊद्या दुसर्‍या गावाला घेऊन जाणार म्हणून आजच आपल्याला फॅक्टरी बघितली पाहिजे असे ती म्हणत होती...अम्मी-अब्बू गाढ झोपले होते म्हणून मी त्यांना न ऊठवताच गुपचूप माझे हिरवे स्वेटर घालून दरवाजाचा आजिबात आवाज न करता मांजरीच्या पावलांनी जिना ऊतरून आले आणि त्या दोघींबरोबर चालू पडले.....रात्री कोणीच काम करत नसल्याने फॅक्टरी तशी बंदच होती.....कुल्फीने फॅक्टरीच्या मोठ्या फाटकाला लावलेले साखळीचे कुलूप ऊघडले.....कुलूप ऊघडतांना ती नेहमीसारखेच भुवया ऊडवत हसत होती पण आज मला तिचे हसणे आज मोठे विचित्रं वाटत होते..... पापलेट माझ्याकडे बघून, 'बिस्किट, आपण आतमध्ये खूप मजा करणार आहोत बरं का, तू तयार आहेस ना?' असे काही तरी विचारत होती. मी 'हो तर! मी तय्यारच आहे' म्हणत मान हलवली तसे नेहमीसारखे दोन्ही कानांपर्यंत पोचणारे हसू तिच्या चेहर्‍यावर फुलले....पण आज तेही मला विचित्रं वाटले...कुल्फीने तिला नक्कीच काहितरी पढवून ठेवले होते....मला वाटले, ह्या दोघी काहीतरी नवीन मुहीम ठरवून आल्या आहेत आणि मला कसलाच सुराग लागू देत नाहीत.....कुल्फीने कुलूप ऊघडल्यावर आम्ही आत गेलो तर तिथे आमच्या वर्गाच्या चौपट तरी मोठा कमरा होता आणि पूर्ण कमर्‍यात बाकांएवढेच मोठे बर्फाचे ठोकळे ठेवले होते.....माझ्या तोंडून एकदम 'या अल्ला! ही फॅक्टरी आहे की हिमालयातली बर्फाची शाळा?' असेच निघाले....किती थंडगार, शांत.....आणि चंद्राची सफेद रोशनी तर ईतकी की दिवा लावण्याची गरजही पडू नये....भिंती बर्फाच्या... जमीनही बर्फाची आणि शाळेतली बाकेही बर्फाचीच....कुल्फीने एक बर्फाचा मोठा ठोकळा तिच्या नाजूक हातांनी सरकवून दुसर्‍या ठोकळ्याजवळ नेला.... मला कळेचना तिच्यात एवढी ताकत आली कुठून....माझा गोंधळलेला चेहरा बघून पापलेट म्हणाली, 'अगं हे खूप सोपं आहे, तू नुसतं बोट लावलं तरी बर्फ बघ कसा हळूच सरकतो बघ.' मी एका मोठ्या बर्फाच्या ठोकळ्याला बोट लावले तर तो कापसाचा असल्यासारखा एकदम सरकूनच गेला...एवढी मजा वाटली म्हणून सांगू मला.....मग आम्ही तिघिंनी सगळे बर्फाचे ठोकळे जोडून बर्फाचा एक मोठा चबुतराच तयार केला.....अचानक चबुतर्‍याच्या एका टोकाने कुल्फी वर चढली आणि पापलेटने तिला हळूच बोट लावले तर ती दुसर्‍या टोकापर्यंत 'सुsssईss' आवाज करत घसरतच गेली.....ते पाहून आम्ही तिघीही एवढ्या हसलो ना....मग पापलेट म्हणाली .... 'बिस्किट, अब तेरी बारी'.... मी ही मग कुल्फी सारखे चबुतर्‍यावर चढून बसले...पापलेटने मला बोट लाऊन जरासा धक्का काय तो दिला...मीही कुल्फी सारखा 'सुsssईss सुsssईss' आवाज करीत दुसर्‍या टोकापर्यंत घसरत गेले...ऊंच झुल्यात बसल्यावर येतो तसा माझ्या पोटात क्षणभर खड्डाच पडला.....मग काय? आम्ही तिघींनी एकमेकांना एवढ्या वेळा धक्के देऊन घसरून झाले की घसरतांना हसून आणि हसतांना घसरून कितव्यांदा तरी पोट दुखायला लागले.... मग कुल्फी म्हणाली, 'चल बिस्किट, अजून एक मज्जा दाखवते तुला'.....मला तर ती बर्फाची घसरगुंडी सोडून जाण्याची आजिबात ईच्छा नव्हती पण पापलेट माझा हात खेचतच कुल्फीच्या मागे घेऊन गेली..... ती म्हणत होती...'तुला तिथे पण खूप मज्जा येणार बघ बिस्किट'...मला कळेचना पापलेटला ह्या सगळ्या मज्जा आधीच कश्या ठाऊक आहेत... मी तिला विचारले तर तिच्या चेहर्‍यावर नुसतेच तिचे नेहमीचे मोठे हसू ऊमटले.... बोलली तर ती काहीच नाही...बर्फाच्या त्या खोलीतून आम्ही एका छज्ज्यावर आलो तसे कुल्फी म्हणाली, 'बघ खाली वाकून' मी पुढे होत खाली बघितले तर.... 'या अल्ला! आमच्या शाळेच्या मैदानाएवढा मोठ्ठा कमरा आणि सगळीकडे साखरेसारखा चुर्रेदार बर्फ सांडलेला.... साखरेच्या मोठ्ठाल्या टेकड्यांसारख्या चुर्रेदार बर्फाच्या टेकड्याच सगळीकडे.... माझे तर डोळेच दिपले एवढा मोठा बर्फ बघून...मी खाली बघतच होते आणि अचानक कुल्फीने छज्ज्यावरून खाली ऊडीच मारली....मी ओरडले 'अगं कुल्फी काय करतेस?'... तर ती बर्फाच्या टेकडीवर अलगद पिसासारखी पडली आणि खालून माझ्याकडे बघत खिदळत राहिली.....पापलेट म्हणाली...'बिस्किट, मार तू पण ऊडी कुल्फीसारखी'.....माझ्या तर पोटातच गोळा आला.... मी म्हणाले, 'ना बाबा ना! मला तर खूप भिती वाटते आहे'.... तर पापलेट माझा हात पकडत म्हणाली, 'अगं....कापसासारखा मऊ आहे हा बर्फाचा चुरा...चल तू माझा हात पकड आपण दोघीही बरोबरच ऊडी मारू'... असे म्हणून माझा पकडलेला हात खेचत तिने ऊडी मारली सुद्धा.... पिसासारखं हलकं होऊन त्या भुसभुशीत बर्फात पडतांना काय मजेदार वाटलं म्हणून सांगू....मला तर एकदम, अल्लामियांने लहान मुलांसाठी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या स्वप्नांच्या गावातच आल्यासारखे वाटत होते.... तेवढ्यात माझ्या पाठीत धप्पादिशी एक बर्फाचा गोळा येऊन आदळला.....मी मागे वळून बघितले तर कुल्फी हात झटकत भुवया ऊडवत ऊभी होती...मी ही मग 'थांब दाखवतेच तुला'... म्हणत तसाच एक गोळा बनवायला घेतलाच होता तोवर पापलेटने दुसरा गोळा माझ्या पाठीत मारला...मग पुढचा कितीतरी वेळ आम्ही बर्फाच्या गोळ्यांनी मारामारी करत, गोळे चुकवत खेळत राहिलो....मग पापलेट म्हणाली, 'आता आपण बर्फात लुकाछुपी खेळू......'नया खिलाडी नया खोजी' .....हो की नाही गं कुल्फी'......तर लगेच कुल्फी म्हणाली, 'हो तर... बिस्किट, आता पापलेट आणि मी लपणार आणि तू आम्हाला शोधायचं....ठीक आहे?'....खरं तर मला ही नव्या खेळाची 'नया खिलाडी नया खोजी' तरकीब बिल्कूल पसंत नव्हती... पण मी नाखुषीने का होईना 'हो' म्हंटले.....आणि दस, बीस, तीस मोजत माझे डोळे माझ्या हातांनी झाकून घेतले..... डोळे ऊघडल्यावर बघते तर कुल्फी आणि पापलेट एकदम गायबच... त्यांचे कुठेच नामोनिषाण दिसेना.... मोठ्या हुश्शारच होत्या दोघीही..... पावलांचे, हाताचे कश्याचे म्हणून ठसे बर्फावर दिसत नव्हते...... मला वाटले दोघीही एखाद्या टेकडीवरच्या बर्फाखाली गुडूप होत लपून तर नाही ना बसल्या.... मी अंदाज घेत एका टेकडीवरचा बर्फ थोडा खोदून बघितला...पण काहीच पत्ता दिसेना दोघींचाही....मग कुठेतरी हालचाल होईल ह्या आशेने मी मुद्दाम म्हणाले, 'कुल्फी मला तुझे लांब केस दिसतायेत बरं बर्फाबाहेर'....पण तरीही अजिबातंच हालचाल नाही.... मला कुठूनतरी पापलेटच्या बारीक हसण्याचा आवाज आला पण तो ही वहिमच निघाला.....मला कळेचना अश्या कुठे लपल्या आहेत दोघी की एकही सुराग दिसेना.... त्या बर्फाने भरलेल्या मोठ्या कमर्‍यात माझ्या एकटीचाच आवाज घुमत राहिला.... मला मोठे विचित्र वाटायला लागले....मग मी ओरडून म्हणाले, 'हा खेळ आता पुरे झाला आपण दुसरा खेळ खेळूयात का?'...तरीही त्या दोघींचा काही जवाब नाही की कुठे खुट्टं सुद्धा वाजले नाही.....जणू त्या दोघी बर्फात वितळूनच गेल्या असाव्यात..... मी खूपदा त्यांना आवाज देऊन पाहिले....पण एक नाही की दोन नाही.... शेवटी मला भितीच वाटायला लागली....मी ओरडून म्हणालेही, 'आता तुम्ही दोघी लवकर बाहेर या पाहू मला खूप भिती वाटते आहे.....पण तरीही दोघींचा बाहेर येण्याचा काहीच आसाद दिसेना....मला त्या कमर्‍याच्या भिंतीही दिसेनात.....दूरपर्यंत नुसताच बर्फ पसरलेला....भिंत नाही की दार नाही.....तेवढ्यात माझे लक्ष माझ्या हातांकडे गेले, त्यांचे बर्फाचे पारदर्शक स्फटिक झाले होते...पाय तर बर्फातच बुडालेले....मी ते बर्फातून बाहेर काढून बघितले तर त्यांचेही हातांसारखेच स्फटिक झालेले.... ते बघून तर मला भितीने रडूच फुटले...... मी डोळे बंद करून दोघींच्या नावाने रडवेल्या आवाजात खूप हाका मारल्या....'कुल्फी, पापलेट मला घरी जायचंय, मला ईथून बाहेर काढा..... मला अम्मी अब्बूं कडे जायचंय...माझ्या घरी जायचंय.... कुल्फीssss......पापलेटssss... तरन्नूमssss.... शमाssss.... पण माझाच आवाज माझ्या कानात घुमत राहिला..... तेवढ्यात मला कुठून तरी अम्मीचा आवाज आला...'निलूssss... ए...निलूssss.....' आणि मी अम्मीला मिठीच मारली.
ती माझ्या केसांवरून हात फिरवत 'डर गया मेरा है बच्चा. तुला डरावने स्वप्नं पडले का निलू?....डोळे ऊघड पाहू' म्हणत होती. मोठ्या प्रयत्नांनी मी डोळे ऊघडले तर तिथे बर्फ वगैरे काही नव्हतेच. मी माझ्याच खोलीत ठंडीने कपकपी भरून कुडकुडत होते. अम्मी मला बिलगून बसली होती आणि अब्बू मोठा फिक्रमंद चेहरा करून माझ्या कपाळावरचा घाम रुमालाने पुसत होते.
या अल्ला! ती बर्फाची घसरगुंडी, बर्फाच्या टेकड्या, माझे बर्फाचे हात, बर्फात वितळून गुडूप झालेल्या कुल्फी आणि पापलेट....कुठे गेले? भलतेच डरावने स्वप्नं होते की माझे. मोठी मनहूसच होती ही निहालगंजची ठंड.

रात्रीचे स्वप्नं कुल्फी आणि पापलेटला जाऊन सांगावे म्हणून शनिवारच्या सकाळच्या शाळेसाठी ऊठल्यापासून मी स्वप्नातल्या बारीक सारीक गोष्टी आठवत बसले होते. शाळेला निघतांना अम्मीने माझ्या हातात मिठाईच्या डब्यांसारखे नानखटाईचे दोन डब्बे दिले आणि म्हणाली, 'निलू नानखटाईचे हे दोन डबे घेऊन जा आणि तुझ्या दोन्ही मैत्रिणींना दे. दादाजान गेले तेव्हा सगळ्यांनी आपल्या घरी खाना आणून दिला ना...त्याचा शुक्रिया म्हणून अब्बूंनी ही खास नानखटाई बनवली आहे, सगळ्यांच्या घरी देण्यासाठी.' आधीच निघायला ऊशीर झाल्याने आणि वर्ग सुरू व्हायच्या आधी मला कुल्फी, पापलेटला माझ्या स्वप्नाबद्दल सांगायचे असल्याने मी घाईघाईत दोन्ही डबे माझ्या शबनम मध्ये टाकले.

आमच्या अब्बूंची नानखटाई सार्‍या निहालगंजमध्ये मोठी मशहूर होती. मिठाईचे शेकडो डबे नेहमीच आमच्या बेकरीत येत आणि अब्बू त्यात, खरपूस भाजलेली आणि वर मोठ्या नजाकतीने सुकामेवा चिकटवलेली मोठी लज्जतदार नानखटाई भरून ठेवत. सार्‍या निहालगंजची आवाम थेट दिल्ली-हैद्राबाद पर्यंत त्यांच्या मेहमानांना भेटायला जातांना अब्बूंची नानखटाई घेऊन जात. लोक तर म्हणत 'शौकतमियांची नानखटाई जानी दुष्मनाला खिलवली तर त्याच्या मनातली खटासही हवा होऊन जाईल'. ईद-रमझान च्या महिन्यांत तर अब्बूंना नानखटाई भाजण्यापासून ते डबे भरण्यापर्यंतच्या कामात एवढा वेळ जात असे की ते नुसते दोन जिने चढून बाजूच्या बेकरीतून घरी खान्याला येण्यासाठीसुद्धा फुरसत होत नसे. मग तेव्हा रात्री ऊशीरापर्यंत बेकरीतली भट्टी चालू राही. पण तरीही त्यांनी त्यांच्या कामात कधी म्हणजे कधी कोणाची मदत घेतली नाही. ते म्हणत, 'मी सोडून दुसर्‍या कोणी माझ्या भट्टीला हात लावला तर माझी नानखटाई कोणी तोंडात तर सोडा हातातसुद्धा घेणार नाही'. बेकरीबद्दल ते नेहमीच अश्या काही हट्टाने बोलत ना, जसे एखादा लहान मुलगा त्याच्या सगळ्यात आवडत्या खिलोन्याबद्दल बोलत आहे. आपण म्हणालो, 'बघू मला तुझा खिलौना.' तर तौबा तौबा आपली शामतच आली म्हणून समजा. मजाल आहे आपली त्या खिलौन्याला हात लावण्याची किंवा बेकरीत पाऊल ठेवण्याची. मला वाटते हेच कारण असावे अब्बूंनी मला बेकरीत येऊ न देण्याचे. अम्मीलाही त्यांनी ते नीटच समजावले असणार, माझ्यासारखी तीही कधीच बेकरीत पाय ठेवत नसे आणि मलाही ठेऊ देत नसे. दादाजान हयात असतांना, ते मात्रं नेहमीच बेकरीत एखादी तरी चक्कर मारून येत असत.... तेवढेच.

मला घाई करतांना पाहून अम्मी, 'एवढी कसली जल्दबाजी असते ह्या मुलीला कायम...अल्लाजाने. जरा म्हणून नजाकतीने, आहिस्ताने काम करायला नको.' म्हणत माझ्यावर डाफरत राहिली. पण मी तिच्याकडे जास्तं लक्ष न देता शाळेकडे धूम ठोकली.
मी वर्गात पोहोचले तेव्हा कुल्फी रोजच्यासारखी आधीच येऊन बसली होती आणि पापलेट नेहमीप्रमाणेच अजून ऊगवलीच नव्हती. मी माझ्या जागेवर बसत मोठ्या जोष मध्ये कुल्फीकडे बघत, 'कुल्फी, तुला माहितीये मला काल काय स्वप्नं पडलं?' असं म्हणतच होते पण तिच्याकडे बघून मला पुढे काही बोलण्याची ईच्छाच झाली नाही. तिचे रंगढंग आज काहीतरी वेगळेच दिसत होते. चेहर्‍यावर मोठी बेकरारी तर होतीच पण तिला नक्कीच काही तरी खूप परेशान करीत असावे असेही मला वाटले. ती बेकरार असली की नवीन नक्षी न काढता जुन्याच नक्षीवर नव्याने गिरवत राही हे मला आताशा समजले होते. आजही तिचे असेच नक्षी गिरवणे चालू होते आणि तेही नाजूक हातांनी एवढा जोर लाऊन की कागद फाटून जावा. मी तिला विचारले, 'तुझी तबियत मागच्यासारखी आजही नासाज आहे का?' तर तिने माझ्याकडे अश्याकाही अनोळखी आणि दुखभर्‍या नजरेने बघितले की मला वाटले, 'हिला नक्कीच कसला तरी खूप त्रास होतो आहे'. पण जवाबासाठी तिच्या ओठांतून एकही अल्फाज बाहेर पडला नाही. गोड हसणारी आणि घंटीसारख्या किणकिणणार्‍या मंजूळ आवाजात बोलणारी नेहमीची कुल्फी मला माझ्या बाजुला बसलेल्या मुलीत कुठेच दिसेना.
शेवटी, 'कुठल्यातरी नवीन वासाने हिला पछाडले आसणार, त्या वासाचा उगम शोधून काढेपर्यंत ही अशीच बेकरार राहणार. अश्या बेकरारीत ती नेहमीची कुल्फी न राहता एक वेगळीच असामी बनते जिच्याशी बोलणे आजिबात मजेदार नसते' अशी मीच माझ्या मनाची समजूत काढून घेतली. अल्लामियाकडे 'हिची बेकरारी लवकर संपू दे म्हणजे माझी मैत्रिण मला पुन्हा भेटेल आणि रात्रीचे स्वप्नं तिला सांगता येईल' अशी दुआ मागून मी शांतपणे पापलेटची वाट बघत बसले. पापलेट आली तेच तिच्या मागोमाग कुरेशी मॅडमना घेऊन... त्यामुळे तिच्याशीही मला स्वप्नाविषयी आणि कुल्फीच्या पुन्हा डोकं वर काढलेल्या बेकरारीविषयी बोलण्यास मौकाच मिळाला नाही.
खान्याची सुटी झाली तरी कुल्फीची बेकरारी काही संपल्यासारखी दिसेना. ना तिने आमच्याबरोबर खाना खाल्ला ना आमच्या खिदळण्यात शामील झाली. मी पापलेटला म्हणालेही, 'हिची लक्षणे आज मला काही ठीक दिसत नाहीत.' त्यावर पापलेट, 'हो ना! असा झटका येतोच अधून मधून तिला...नक्की कुठलातरी वास तिच्या नाकात सापासारखा वळवळत असणार. आता पुन्हा हिच्या बेकरारीपायी आपण कुठे जाऊन हलाल होणार काय माहित... मी तर बाई शाळेतच येत नाही कशी' म्हणत दात काढत फिदी फिदी हसत राहिली. मग मीही कुल्फीचा आवेष आणत तिचा बारीक किनरा आवाज काढत म्हणाले, 'ऊसूल नंबर दोसो सतरा..... बेकरारीके दौरान किसिभी मोहतरमाको छुट्टी लेना मना है' ते ऐकून पापलेटच्या हसीचा असा काही धमाका झाला म्हणून सांगू आणि तिला हसतांना पाहून माझाही. कुल्फीचा चेहरा ढिम्मंच आणि नजरही खिडकीबाहेर लागलेली. पण मला माहित होते कानाच्या कुठल्या तरी कोपर्‍यातून आणि डोळ्याच्या कुठल्यातरी कोनातून तिने आमचे बोलणे ऐकले असणार आणि खिदळणेही पाहिले असणार.
पण खरं सांगायचं तर मला कुल्फी ह्याआधी कधीही एवढी बेकरार दिसली नव्हती. मॅडम शिकवत असतांनाही तिची सारखी चलबिचल चालूच होती. मध्येच एक क्षण मला वाटले ती मला काही सांगू पहात आहे, पण तेवढेच. दुसर्‍या क्षणी पुन्हा हात चोळत, बेकरार होत ती कधी फळ्याकडे तर कधी खिडकीबाहेर बघत राहिली. मला माझे स्वप्नं आता पोटात सांभाळून ठेवणे मोठे मुष्कील झाले होते. मीही मग आतल्या आत बेकरार होत कसे तरी सगळे तास संपवले. शेवटचा तास संपायच्या आधी मी खुसफुसत दोघींनाही म्हणाले, 'हा तास संपल्यावर वर्गातच थांबा बरं, मला तुम्हाला काही मजेशीर सांगायचंय आणि काहीतरी द्यायचंय सुद्धा.' पापलेटच्या चेहर्‍यावर मला लगेच खुषी ऊमटलेली दिसली पण कुल्फीचा चेहरा?... एक मोठे मायूस सवालिया निशाण. मला नेहमीच वाटे पापलेटचा चेहरा म्हणजे आरसा..... जे आपण बोलू लगेच ते तिच्या चेहर्‍यावर ऊमटून येत असे. आणि कुल्फीचा चेहरा म्हणजे गहिरे पानी...... आपण बोलल्याने आत काही तरंग ऊठले असतील-नसतील पण वरती मात्रं तिच्या परवानगीशिवाय काहीच ऊमटत नसे.
मग एकदाचा शेवटचा तास संपलाच. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने सगळ्यांनाच घरी जाण्याची घाई होती. सगळ्या मुली मागे न रेंगाळता वर्गातून धावत एकदम निघूनच गेल्या. पापलेट मोठ्या ऊत्साहात म्हणाली, 'ए बिस्किट, जे काय मजेचं सांगायचं आहे ते नंतर सांगत बस, आधी आमच्यासाठी काय आणलं आहेस ते दाखव. मला तर तू सांगितल्यापासून चैनच पडत नाहीये' तिचा ऊतावीळपणा पाहून मला हसायलाच आलं. मी शबनममधून एक डबा काढून तिच्या हातात दिला तर ती आनंदाने ओरडलीच, 'ए ह्यात नानखटाई आहे ना? बघू बघू!... मला वाटलंच होतं तू हेच आणलं असणार....तुला सांगते कुल्फी, बिस्किटचे अब्बू अशी लज्जतदार नानखटाई बनवतात ना की बस्स!...मागे मी हिच्या घरी गेले होते तेव्हा खाल्ली होती.... माशाल्ला! जन्नत आहे जन्नत बिस्किटची बेकरी....वा!.. मजा आ गया' असे म्हणे म्हणेस्तोवर तिने डबा ऊघडून दोन्ही हातात दोन तुकडे ऊचलून घेतले सुद्धा. तिचा निरागस ऊतावीळपणा बघून मला अजूनच हसायला येत होतं. मग दुसरा डबा काढून मी कुल्फीकडे देत म्हणाले, 'हा तुझ्यासाठी' तर ती मोठा विचित्र चेहरा करत अजूनच पलिकडे तोंड फिरवून बसली. आता मात्रं मला तिचा राग येत होता. मी मनात म्हणाले, 'किती नाटकी आहे ही मुलगी आणि आम्हीच का दरवेळी तिची नाटकं सहन करायची'. तिने तोंड फिरवल्यावर पापलेटलाही ताज्जूब वाटले. मीही मग हात पुढे करत डबा तिच्या चेहर्‍यासमोर धरत म्हणाले, 'अगं असं काय करतेस? घे ना! अम्मीने खास तुझ्यासाठीच दिले आहेत'. पुढच्याच क्षणाला आमच्या मनी ना ध्यानी, कुल्फीने माझ्या हातातून डबा हिसकावून घेतला आणि लांब भिरकाऊन दिला. डबा ऊघडून सगळी नानखटाई हवेत ऊडाली आणि फरशीवर सांडून तुकडे तुकडे होत सगळीकडे पसरून गेली. मला एक क्षण कळालेच नाही नेमके काय घडले ते, मला फक्तं कुल्फीचा रागाने धुसफुसणारा चेहरा आणि पापलेटचे मोठ्ठे डोळे एवढेच दिसत राहिले. फरशीवर सांडलेले नानखटाईचे तुकडे बघून मला खूप वाईट वाटत होते. मी कसोशीने डोळ्यातून पानी बाहेर वाहू न देता कुल्फीच्या चेहर्‍याकडे बघत तिच्या समोर बुत बनून ऊभी होते.
'हे तू काय केलेस कुल्फी?' पापलेट एवढुसा चेहरा करून म्हणाली.
'जे केले ते बरोबरच केले मी.....आणि तू गं बिस्किट!.... सकाळपासून जहन्नुम बनवून टाकली आहेस ही जागा तू... मी सहन तरी किती वेळ करणार? कितीदा तरी वाटले तुम्हाला सांगावे पण तुम्हा दोघींना खिदळण्यापासून फुरसत मिळेल तर तौबा तौबा!.' कुल्फीला असे रागात धुसफुसत बोलतांना मी कधीही पाहिलं नव्हतं. तिच्या प्रत्येक शब्दाबरोबर माझे डोळे अजूनाजून भरून येत होते.
'अगं पण बिस्किटने केलं तरी काय? तू का अशी चिडते आहेस तिच्यावर', पापलेट काकुळतीला येऊन म्हणाली.
'बिस्किटने काय केलं? शैतानाने पाठवलेला नजराणा घेऊन आली आहे ती आपल्यासाठी.... हा जो तुझ्या हातात डबा आहे ना, शैतानाचा स्पर्श झाला आहे त्याला.', कुल्फी अजूनही रागात धुसफुसत होती.
'तू पागल झाली आहेस का कुल्फी... काय अनाबशनाब बोलते आहेस?' पापलेटचा आवाजही मला ओलसर झाल्यासारखा वाटला.
'तुम्हाला दोघींनाही चांगलंच माहित आहे मी वासांच्या बाबतीत कधीच चुकत नाही, हा ईन्सानी वास पक्का शैतानाचा नाही तर त्याच्या मनहूस जिनचा आहे', कुल्फीचा नेहमीचा मंजूळ आवाज माझ्या कानांना मोठा जालीम वाटत होता.
'तो डबा माझ्या अब्बूंनी भरला होता', एवढ्या वेळ शांत ऊभी मी, पहिल्यांदाच न राहवून बोलले.
'मग समज तुझे अब्बू शैतान आहेत......तू मला दहावेळा विचारलंस, त्यादिवशी बांधणी करायला मी तुझ्या घरी का नाही आले?.... तर ऐक! मी तुझ्या घरी आले होते पण घराच्या पहिल्या पायरीवरंच मला तुमच्या बेकरीतून शैतानाचा तो मनहूस वास आला. मला वाटले, मी जहन्नुमच्याच पायर्‍या चढत आहे. खिडकीतून बेकरीत तुझे अब्बू दिसले ... तरीही मी दुसरी पायरी चढायचा प्रयत्न केला. पण शेवटी प्रत्येक पावलासरशी मनहूस होत जाणारा वास मला असह्यं झाला. त्या वासाने माझ्या रुहवर कब्जा करण्याआधीच मी माघारी वळून घरी गेले आणि दिवसभर माझ्या खोलीत झोपून राहिले. माझ्यासाठी मोठा बदहवास दिवस होता तो.' कुल्फीच्या आवाजात राग अजूनही पुरेपुर भरलेला होता.
'तू माझ्या अब्बूंना शैतान म्हणालीस?' माझ्या दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या.
'हो! जे खरे आहे तेच म्हणाले. मला माहितीच होते तुला माझे म्हणणे आवडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. म्हणूनच, ईतके दिवस त्याबद्दल मी बोलत नव्हते. समजलं? शैतान की बच्ची' एवढे म्हणून कुल्फी तरातरा वर्गातून बाहेर निघून गेली.

मला काय होत होते तेच कळेना, मी अजूनही तशीच बुत बनून ऊभी होते. डोळे घळघळा वहात होते आणि कुल्फीचे शब्दं आठवून राहून राहून रडू येत होते. मी तो अस्ताव्यस्तं पडलेला बेजान डबा ऊचलून घेतला आणि फरशीवर सांडलेली नानखटाई त्यात भरायला घेतली. पापलेटही एवढुसा चेहरा करून ईकडे तिकडे सांडलेले तुकडे भरण्यास मला मदत करत होती. कुल्फीच्या बेताल वागण्याने तीही मनातून सटपटली असावी पण माझ्याशी काय बोलावे तेही तिला कळत नसावे. डबा भरून झाल्यावर मी तो माझ्या शबनममध्ये ठेऊन दिला आणि खाली मान घालून वर्गाबाहेर चालू पडले. निघतांना पापलेटचे मोठे डोळे मला पाण्याने भरलेले दिसले. रस्ताभर मला कुल्फीचे जालीम शब्दं माझ्या कानात ऐकू येत होते. मला कळत नव्हते की मला जास्तं वाईट कशाचं वाटत आहे, कोणी माझ्या अब्बूंना शैतान म्हणालं त्याचं की माझी अझीझ मैत्रिण माझ्याशी ईतकं वाईट वागली त्याचं.
मी घरी आले तेव्हा दुपारचा खाना खाऊन दादाजानच्या आरामकुर्सीत बसलेल्या अब्बूंचा नुकताच डोळा लागला असावा. मला धावत जाऊन त्यांना मिठी मारावीशी वाटत होती. त्यांच्या प्रेमळ चेहर्‍याकडे बघतांना मला दादाजान गेले त्या रात्रीचा त्यांचा आसवं गाळणारा चेहरा आठवला आणि कानात राहून राहून कुल्फीचे जालीम शब्दं ऊमटत राहिले. शेवटी मी माझ्या खोलीत जाऊन पलंगावर पडून राहिले. शबनममधला डबा काढून मी त्याचा वास घेऊन पाहिला पण मला तर त्यातून खरपूस भाजलेल्या नानखटाईशिवाय दुसरा कसलाच वास येत नव्हता. तेवढ्यात समोर माझ्या बांधणीचा निळा दुपट्टा मला दिसला, त्यातल्या तीन तार्‍यांपैकी एक तारा मला मिटवूनच टाकावासा वाटत होता. रडून रडून मला कधी झोप लागली कळालेच नाही. एकदा अम्मी येऊन माझ्या डोक्यावर हात फिरवत, 'लगता है आज बहोत थक गया है मेरा बच्चा' म्हणून गेली. माझे कशातच मन रमत नव्हते, कोणाशी बोलावेसेही वाटत नव्हते. पूर्ण संध्याकाळभर मी चबूतर्‍यावर बसून होते. मशिदीच्या घुमटामागे ढळणारा सुरज बघून मला ऊगीचच दादाजान गेले ते दुखभरे दिन आठवत राहिले. अंधार दाटून आला होता, आलेली ठंडभरी रात्रंही मग तशीच गुमसूम आणि मायूस गेली.

सकाळीही मी ऊशीराच ऊठले तेव्हा अम्मीची रसोईत खान्याची तयारी चालू होती. अब्बू दिसले नाहीत म्हणजे ते खाली बेकरीत गेलेले असणार. मला पाहून अम्मी म्हणाली, 'कुठल्या शैतानी ताकतीने शिवले गं तुला? एवढी झोपते आहेस ते. काल शाळेतून आल्यापासून बघतेय मी. हसणं नाही, खिदळणं नाही, पळापळ नाही. तबियत बरी नाही का तुझी?'. मला अम्मीचं बोलणं आजिबात आवडलं नाही. मी रसोईतून तडक निघून दिवाणखान्यात येऊन खिडकीतून खाली बघत बसले. रविवारची रस्त्यावरही मोठी सामसूम होती. मला तो रस्ता माझ्या मनासारखाच सुस्तं आणि मायूस भासला. 'बिस्किट' कुठूनसा बारीक आवाज आला म्हणून मी दरवाजाकडे पाहिले तर पापलेट ऊभी होती. तिला बघून मला खरंतर एवढं छान वाटले ना. पडलेल्या चेहर्‍यानेही ती मोठे गोड हसली आणि शांतपणे माझ्या बाजूला येऊन बसली. तेवढ्यात अम्मीचा रसोईतून आवाज आला, 'निलू मी पनीर पसंदा बनवायला घेते आहे...आत येऊन मला पनीर कापून दे पाहू'. पापलेटशी एकही शब्दं न बोलता मी रसोईत गेले, पापलेटही माझ्या मागोमाग आली. तिला तिथे बघून अम्मीला झटकाच बसला. 'या खुदा! शमा? तू आणि कधी आलीस? मला तर कळालेही नाही. सांगायचे नाहीस का निलू, शमा येणार आहे म्हणून. आणि हे काय? तुमच्या दोघींचे चेहरे का असे पडले आहेत? भांडला वगैरे नाहीत ना दोघी?'.अम्मीच्या त्या सवालांच्या सरबत्तीला आम्ही दोघींनीही नुसतीच नकाराची मान हलवली.
'हां मग ठीक आहे... ही थाळी घ्या पाहू.....दोघींनीही ह्या पनीरचे छोटे तुकडे कापून द्या बरं मला. तोवर मी मसाला बनवते... तूही आमच्याबरोबरच खाना खायचा बरंका शमा....तोवर तुला थोडी नानखटाई देते हं मी', म्हणत अम्मीने आमच्या हातात सुरी आणि पनीरच्या मोठ्या तुकड्याची थाळी दिली. पुन्हा नानखटाई ऐकून न ठरवताही आम्ही दोघीही एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघत राहिलो. रसोईच्या एका कोपर्‍यात बसून आम्ही दोघीही एकमेकींशी काहीही न बोलता शांतपणे पनीर कापायला घेतले. पनीर कापतांना मला राहून राहून कुल्फीचे नाक आठवत राहिले. मला तिच्या कालच्या वागण्याचा राग येत होता की रडू येत होते तेच कळत नव्हते.
अजून आमचे सगळे पनीर कापून झालेही नव्हते तोच खालून अब्बूंच्या ओरडण्याचे आवाज ऐकू आले आणि पाठोपाठ कान चिरत जाणारी एक जोरदार किंकाळी. ते ऐकून अम्मी, मी आणि पापलेट खिडकीकडे धावलोच. खालून अब्बूंची 'बेगमsss...निलूsss...' अशी दर्दभरी हाक ऐकू आली. आम्ही तिघिही धावतपळत जिना ऊतरून खाली गेलो. समोर अब्बूंच्या धिप्पाड हातामध्ये नाजूकशी कुल्फी डोळे मिटून पडली होती आणि तिच्या नाकातून रक्ताची धार वहात होती. अम्मी धावतच अब्बूंजवळ गेली. तो नजारा बघून तिलाही मोठा धक्का बसला होता. 'या अल्ला! हे काय झाले?
कोणाची मुलगी आहे ही? आपल्या मुहल्यातली तर दिसत नाही' अम्मीचा चेहरा मोठा परेशान आणि घाबरलेला होता. तिने पटकन तिचा दुपट्टा अब्बूंच्या हातातल्या कुल्फीच्या नाकाला लावला. मला तर काही कळतच नव्हते हे समोर दिसते आहे ते काय चालू आहे. पापलेट आणि मी दोघीही पाय थिजल्यासारख्या ऊभ्या राहून नुसतेच अब्बूंच्या हातातल्या कुल्फीकडे बघत होतो.
'बच्ची रस्ता चुकून बेकरीत आली असावी बेगम, आणि घाबरून बेहोश झाली.' अब्बूंच्या चेहर्‍यावरही मला परेशानी आणि डर दिसत होता.
'निलू बेटा, तुला माहितीये कोणाची मुलगी आहे ही?'....अम्मीने माझ्याकडे बघत विचारले पण माझी नजर अजूनही कुल्फीच्या चेहर्‍यावरून आणि नाकातून वाहणार्‍या रक्ताच्या धारेवरून हटत नव्हती. अम्मीला काय सांगायचे तेही मला सुचत नव्हते. तेवढ्यात पापलेट म्हणाली, 'ही आमची सहेली तरन्नूम आहे. ईब्राहिम आईस फॅक्टरीवाले आहेत ना त्यांची मुलगी'
'या अल्ला! बेटा तू धावत हिच्या घरी जा आणि तिच्या अब्बूंना घेऊन मंदिराजवळच्या डॉक्टर गुप्तांच्या दवाखान्यात घेऊन ये. मी हिला तिथेच घेऊन जातो.' अब्बूंचा आवाज मोठा दर्दभरा होता. पापलेट शहाण्या मुलीसारखी लगेच पळालीच.
'बेगम तुम्ही ईथेच थांबा आणि पहिले बेकरीला बाहेरून कुलूप घाला. तुम्हाला खुदाचा वास्ता, कितीही वाटले तरी बेकरीत जाऊ नका. मी निलूला बरोबर घेऊन डॉक्टर गुप्तांच्या दवाखान्यात जातो. चल निलू!' असे म्हणत ते भराभर चालू पडले. मीही काहीच न बोलता त्यांच्याबरोबर चालू लागले. पण त्यांच्या बरोबरीने चालण्यासाठी मला खरंतर पळावे लागत होते. मी एकवार मागे वळून अम्मीकडे बघितले तर ती मला, 'निलू, अब्बूंच्या बरोबरच रहा. त्यांचा हात सोडू नकोस' असे सांगत होती. दवाखान्याच्या पूर्ण रस्ताभर अब्बू, 'मेरे मौला! बच्ची पे रहम करना, ही कुणा दुसर्‍याची अमानत आहे! रहम करना मेरे मौला' अशी मन्नत अल्लाकडे मागत राहिले.
दवाखान्यात मला बाहेर थांबायला सांगून अब्बू आणि डॉ. गुप्ता कुल्फीला घेऊन आत गेले. पाचच मिनिटात मला आतून, 'शैतान...शैतान का बंदा....मनहूस वास...सोड मला...सोड मला...शैतान' असा कुल्फीच्या ओरडण्याचा आवाज यायला लागला. पण हा तिचा नेहमीचा गोड आवाज नसून मोठा डरावना आणि भेसूर आवाज होता. तो आवाज ऐकून मला भितीने रडायलाच येत होते. तेवढ्यात पापलेटला घेऊन कुल्फीचे अब्बू धावतपळत दवाखान्यात आले 'तरन्नूम! मेरी बच्ची' अश्या हाका मारत ते सरळ आत गेले. बाहेर मी आणि पापलेट कुल्फीचा तो भेसूर आवाज ऐकत रडवेल्या चेहर्‍याने एकमेकांकडे बघत ऊभ्या होतो. पापलेट रडवेल्या आवाजात म्हणाली, 'शैतानाने आपल्या कुल्फीच्या रुहवर कब्जा केला.'. ते ऐकून माझ्या डोळे घळघळा वहायलाच लागले.
मग आणखी काही वेळाने तो भेसूर आवाज शांत झाला आणि आतून फक्तं कुल्फींच्या अब्बूंचे मोठमोठ्याने बोलण्याचेच आवाज येत राहिले. थोड्यावेळाने तेही आवाज शांत झाले आणि तिघेही एकदमच बाहेर आले. कुल्फीच्या अब्बूंचा चेहरा मोठा परेशान आणि नाराज दिसत होता. डॉक्टर गुप्ता म्हणाले, 'शौकत मियां, तुम्ही मुलींना घेऊन घरी जाणेच ठीक राहिल. पुढचे बोलण्याची ही वेळ आणि जागा दोन्हीही नाही. थोड्यावेळात मी शेख साहेबांना घेऊन येतो मग शांतपणे बोलू. काळजी करू नका सगळे ठीक होईल, मी प्रयत्न करतो आहे.'
अब्बू मोठ्या अजीजीने म्हणाले, 'जी बहोत शुक्रिया डॉक्टर साब... मोठी मेहेरबानी तुमची.....ही नाजूक घडी तुम्ही सांभाळून घेतली. शेख साब माझ्यावर भरोसा ठेवा. अल्ला मोठा रेहमदिल आहे, तो बच्चीला काही होऊ देणार नाही. मी आणि माझी बेगम परवर्दिगारकडे दुवा करू की बच्चीला लवकर बरं वाटू दे. जशी माझी निलू ईथे माझ्यासमोर ऊभी आहे तशीच तुमची तरन्नूमही लवकरच तुमच्यासमोर ऊभी असेल बघा. या तुम्ही डॉक्टर साबना घेऊन घरी, मी वाट बघेन. काय घडले ते कळून घेण्याचा हक्कंच आहे तुम्हाला आणि घडले तसे सांगणे माझा फर्ज.' एवढे बोलून अब्बू माझ्याकडे बघत म्हणाले, 'चलो निलू घर जाते है....तुझी अम्मी मोठी परेशान असेल घरी'. घराकडे निघालेल्या अब्बूंच्या मागोमाग मी आणि पापलेटही खाली मान घालून शांतपणे चालू लागलो. नेहमी ताठ मानेने चालणारे माझे अब्बू आज खांदे पाडून, मोठ्या कष्टाने एकेक पाऊल ऊचलत चालत होते. त्यांच्या चालण्यातही मला मोठी ऊदासी भरलेली दिसली. रस्त्यात मी अब्बूंना विचारले, 'अब्बू, तरन्नूम...' तर माझ्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले, 'डॉक्टरांनी दवा दिली आहे तिला. लवकरच तिला पुन्हा होश आला की ऊठून बसेल ती.' मला अब्बूंना विचारायचे होते, 'आपल्या बेकरीत शैतान आहे का?' पण माझी हिम्मंतच झाली नाही.
आम्ही घरी पोचलो तेव्हा मला बेकरीचे दार कुलूप लाऊन बंद केलेले दिसले. अम्मी मोठ्या बेकरारीने आमची वाट पहात खिडकीत ऊभी होती. अब्बूंनी तिला कुल्फीला लवकरच होश येईल असे सांगितल्यावर तिची बेकरारी कमी झाली. ती आम्हाला म्हणाली, 'निलू, तू आणि शमा तुझ्या खोलीत बसा पाहू. मला आणि तुझ्या अब्बूंना महत्वाचे बोलायचे आहे'. मग पापलेट आणि मी दोघीही माझ्या खोलीत शांतपणे बसून राहिलो. मला अजूनही राहून राहून डोळ्यांसमोर कुल्फीचे पनीरसारखे नाक आणि त्यातून ओघळणारे रक्तं दिसत होते आणि कानात 'शैतान का बंदा...मनहूस वास' ऐकू येत होते. मला खात्री होती पापलेटलाही असेच वाटत असणार म्हणून तीही शांत होती.
थोड्या वेळाने कुल्फीच्या अब्बूंना घेऊन डॉक्टर गुप्ता त्यांच्या पांढर्‍या स्कुटरवरून घरी आले. ते आल्यानंतर अम्मी आमच्याकडे येऊन म्हणाली, 'निलू, तुम्ही दोघीपण या दिवाणखान्यात. अब्बूंची ईच्छा आहे तुम्हालाही कळावं नेमकं काय घडलं ते.. चला माझ्याबरोबर' आम्ही दोघीही अम्मीबरोबर दिवाणखान्यात आलो तेव्हा तिथे मोठा संजीदा मोहौल होता. डॉक्टर गुप्ता अब्बूंशी बोलत होते ते आम्हाला बघून अचानक बोलायचे थांबले. मी आणि पापलेट अम्मीला खेटून एका कोपर्‍यात ऊभ्या राहिलो. थोड्यावेळ असाच शांततेत गेला तेव्हा अब्बू म्हणाले, 'आप बोलिये डॉक्टर साब, बच्चीयां यहीपर रहेगी'. मग डॉक्टर गुप्ता आमच्याकडे बघत म्हणाले, 'शौकत मियांना मी आत्ताच सांगत होतो, काळजीचं आता काही कारण नाही, शेख साहेबांची तरन्नूम आता ठीक आहे. शौकतमिया तिला घेऊन आले तेव्हा थोडी घाबरली होती पण आता सावरली आहे. नाकाला थोडा मुका मार लागला पण ते काही फार मोठं नाही. दोन दिवसात आतली जखम बरी होऊन जाईल.'
'या खुदा! तेरा लाख-लाख शुक्र है', अम्मीने मोठ्या सुकूनभर्‍या आवाजात अल्लाचा शुक्रिया अदा केला. कुल्फी बरी असल्याचे ऐकून पापलेट आणि मलाही मोठी खुषी वाटली. मीही मग मनातला मनात अल्लामियाला शुक्रिया म्हणाले. अब्बू मात्र अजूनही शांत बसून होते. डॉक्टरसाब अब्बूंकडे बघत म्हणाले, 'आता तुम्हाला बोलले पाहिजे शौकतमिया. आणि शेखसाब माझी तुम्हाला विनंती आहे की हे बोलणे तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवावे. तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही तरन्नूमच्या अम्मीला विश्वासात घेऊन सांगू शकता पण ईतर कोणाकडे नको'
'मला शौकतमियांचे बोलणे पटले तर मी तुमची विनंती लक्षात ठेवेन, डॉक्टर साब' कुल्फीचे अब्बू सावकाशीने म्हणाले. दवाखान्यातल्या पेक्षा आत्ता त्यांचा आवाज मला मोठा ऊम्मीदभरा वाटला.
एवढ्यावेळ शांत बसलेले अब्बू कुल्फीच्या अब्बूंकडे बघत म्हणाले, 'शेखसाब, माझ्या वालिदसाबना तीन मुलं होती. मोठे जुम्मन भाईजान, मग माझ्या अफरोझा आपा आणि मी धाकटा. आम्ही पूर्वी सरायगंज मध्ये रहात असू. तिथेही आमची घरची बेकरीच होती. जेव्हा मी आठ वर्षांचा होतो आणि माझ्या अफरोझा आपा निलूच्या वयाच्या, तेव्हा आमचे सरायगंज दंग्यांनी पेटून ऊठले. अब्बूंनी आम्हा तिन्ही मुलांना बाहेर न जाण्याविषयी अनेकदा बजावूनही सगळ्यांची नजर चुकवून आपा मैत्रिणीला भेटायला म्हणून बाहेर पडल्याच. आणि ते कळाल्यावर जुम्मन भाईजान त्यांना शोधायला त्यांच्या मागे. बर्‍याच ऊशीरा आपा कश्यातरी घरी पोहोचल्या पण जुम्मन भाईजान पुन्हा कधीच फिरून घरी आले नाही. दंगे ओसरल्यावर आम्ही त्यांना सगळीकडे खूप शोधले पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. कोणी म्हणे त्यांनी भाईजानना पळतांना पाहिलं आणि त्यांच्या मागे लाठ्या घेऊन लोक पळत होते. कोणी म्हणे त्यांनी भाईजानला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं तर कोणी म्हणे सरकारी गाडी रस्त्यावरची प्रेतं ऊचलून नेतांना त्यांनी जुम्मन भाईजानचं प्रेत पाहिलं. पण अनेक महिने शोधूनही आम्हाला त्यांचा ना सुगावा लागला ना प्रेत मिळाले. दंग्यानंतर मुहल्ल्यातल्या सगळ्याच घरात अश्या दर्दभर्‍या कहान्या घडून गेल्या होत्या. मोठा मायुसीने भरलेला काळ होता तो. त्यानंतर चार-पाच वर्षात आपांचे लग्न झाले, अम्मीचाही ईंतकाल झाला. मग अब्बूंना आणि मला सरायगंजमध्ये करमेनासे झाले, म्हणून आम्ही ईथे निहालगंजमध्ये येऊन राहिलो.
मला आठवते माझी शादी होऊन महिनाच झाला होता. मी आणि अब्बू खाली बेकरीत होतो, भट्टी चालू होती, नानखटाई भाजली जात होती आणि एक अतिशय फाटक्या कपड्यांचा माणूस आत शिरला. केसांच्या जटा झालेल्या, दाढी वाढलेली, कपाळावर जखमेचा मोठा भयानक व्रण, आंघोळ तर त्याने किती महिने केली नसेल अल्लालाच ठाऊक. त्याच्या अंगाला प्रचंड घाण येत होती. एकंदर मोठे डरावणे आणि किळसवाणे रूप होते त्याचे. मी त्याला घालवू लागलो तर तो मोठमोठ्याने, 'मत मारो...मत मारो... अफरोझा भाग...भाग अफरोझा' असे रडत, भेकत राहिला.
ते ऐकून अब्बूंनी त्याला एकदम ओळखलेच, ते माझे जुम्मन भाईजानच होते. पण त्यांच्या डोळ्यात कसलीच ओळख दिसत नव्हती. आम्ही त्यांच्या जवळ गेलो की ते रडत, लांब पळत. ते गेले तेव्हा मी तर खूप लहान होतो पण अब्बूंना, त्यांच्या वडिलांनाही त्यांनी आजिबातच ओळखले नाही. त्यांच्या कपाळावरची ती भयाण जखम त्यांच्या डोक्यातल्या सगळ्या आठवणी, डोळ्यातल्या ओळखीच्या खुणा गिळून बसली होती. जसे एवढ्या वर्षांनंतर ते आम्हाला भेटूनही न भेटल्यासारखेच होते.
शेखसाब, तुम्हाला वाटेल एवढ्या मोठ्या दुनियेत हरवून आमचे भाईजान बरोबर पुन्हा आमच्याच घरी कसे आले. तर मी दवाखान्यात तुम्हाला म्हंटले नव्हते, 'अल्ला मोठा रेहमदिल आहे'. भाईजानना निहालगंज पर्यंत आणण्यात अल्लाची मेहरबानी तर होतीच पण त्याहीपेक्षा एक मोठी जादुई गोष्टं त्यांना थेट आमच्या घरी घेऊन आली. वास! शेखसाब वास! खरपूस भाजलेल्या नानखटाईचा वास. सगळ्या ओळखी भाईजानच्या जहेनमधून पुसल्या गेल्या होत्या पण आमच्या सरायगंजच्या बेकरीत जी नानखटाई बनत असे तिचा ओळखीचा वास बहूधा त्यांच्या रुहमध्ये थोडा का होईना अडकून होता. दोरीने ओढल्यागत तो वास त्यांना खेचून बरोबर घरी घेऊन आलाच.
त्यादिवशी आम्ही कसेबसे त्यांना बेकरीच्या तळघरात नेले आणि ते आजतागायत तिथेच आहेत. शेखसाब, माझे भाईजान आजही जिवंत आहेत आणि तेही माझ्या, त्यांच्या स्वतःच्या घरात. माणसांना बघून घाबरून ते दूर पळतात. पण तळघरात त्यांना माणसांचा काही त्रास नाही. बेकरीचा, नानखटाईचा ओळखीचा वास त्यांना सुरक्षित वाटतो, तो त्यांना तिथे बांधून ठेवतो. त्यामुळे आम्हाला ओळखत नसूनही एवढ्या वर्षात त्यांनी कधी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. दुर्दैवाने त्यांच्या डोक्यात राहिलेली शेवटची आठवण दंग्यांची आहे त्यामुळे अजूनही ते दिवसभर 'मुझे मत मारो... अफरोझा भाग' असे पुटपुटत राहतात. कधी मनात आले तर महिन्यातून एकदा-दोनदा आंघोळ करतात. कपडे बदलतात. कधीमधी आमचे दोस्त डॉक्टर गुप्ता त्यांना बघून, दवापानीही करून जातात.
तुम्हाला सांगतो, आमच्या अब्बूंचा भाईजानवर मोठा जीव होता. भाईजानच्या डोळ्यातल्या एका ओळखीच्या नजरेसाठी आमचे अब्बू अनेक वर्षे झुरत राहिले, पण त्यांचा अझीझ मुलगा समोर असूनही त्यांना ओळख दाखवू शकला नाही. भाईजानना रोज समोर बघूनही अब्बूंना भाईजानची ते ठीक असतांनाची आठवण त्यांच्या स्वतःच्या मनातून पुसता आली नाही. त्यांनी शेवटचे बघितलेल्या त्यांच्या हसत्या खेळत्या मुलाचीच आठवण ते शेवटपर्यंत ते काढत राहिले, त्या मुलाची वाट बघत राहिले. तकदीरशी समझौता करणे त्यांना जमलेच नाही. शेखसाब, तुम्हीही एक बाप आहात, कल्पना करा कसे वाटले असेल त्या बापाला वर्षानुवर्षे ओळख न दाखवणारी औलाद अश्या मोडक्या अवस्थेत रोज समोर बघून. शेवटी एके दिवशी मुलाच्या ओळख मिळण्याची आस डोळ्यात घेऊनच त्यांनी त्यांच्या अझीझ मुलासमोरच जीव सोडला.
असो....सगळ्याच घरात अश्या छोट्या मोठ्या कहान्या असतात... तर एकंदरित अनेक वर्षे त्यांच्या तळघरातल्या जागेत आमच्या जुम्मन भाईजानचे ठीकच चालू होते. पण आज मात्रं मोठीच नोबत आली. मी भट्टी लाऊन बिस्किटं भाजण्याची तयारी करत होतो तर अचानक मला तळघरातून भाईजानच्या ओरडण्याचा आवाज आला. ते नेहमीच 'मत मारो... अफरोझा भाग' वगैरे हलकेसे पुटपुटत पण ईतक्या वर्षात ते कधीच ओरडले नव्हते. मी धावत जाऊन खाली बघितले तर तुमची तरन्नूम घाबरून ऊभी होती. ती आवाज न करता आत आली कधी आणि मला न दिसता सरळ तळघराकडे गेली कशी हे माझ्यासाठी एक कोडंच आहे. मला वाटते ती निलूला भेटायला आली असणार आणि रस्ता चुकून घरात जाण्याऐवजी खाली बेकरीत आली असावी. मी खाली गेलो तर मला बघून भाईजाननी तरन्नूमला एकदम ऊचलून घेतले. ते माझ्यावर 'जवळ येऊ नकोस....अफरोझाला हात लावू नकोस' म्हणून ओरडत राहिले. मोठ्या कष्टाने मी तरन्नूमला त्यांच्या मिठीतून सोडवले पण त्या झटापटीत नानखटाईच्या डब्यांना धडकून भाईजान पडल्याने त्या बिचारीच्या नाकाला थोडे लागले. मला वाटतं भाईजानचा अवतार आणि ओरडणं पाहून ती भितीने बेहोश झाली असावी. मी तिला घेऊन तडक डॉक्टर साबकडे गेलो आणि तुम्हाला पैगाम पाठवला.
मला पक्के माहित आहे भाईजानचा तिला ईजा पोहोचवण्याचा काहीच हेतू नव्हता, ते तरन्नूमला त्यांच्या आठवणीतली लहानपणीची अफरोझा समजून बसले. पण मला खात्री होती की बच्ची नक्कीच ठीक होणार. आणि आपले डॉक्टर गुप्ता असल्यावर तर फिक्रची काही बातंच नाही. माझ्या भाईजानच्या वतीने तुम्हाला आणि तरन्नूमला झालेल्या त्रासाबद्दल मी तुमची तहे दिलसे माफी मागतो.
शेखसाब, भाईजानची कहानी ह्या खोलीबाहेर कोणालाच माहित नाही, अगदी माझ्या अफरोझा आपांना सुद्धा नाही. निलूलाही आम्ही आजच सांगत आहोत की तिने कधीही न बघितलले तिचे जुम्मनचाचा एवढी वर्षे तिच्याच घरात रहात होते.'
एवढ्यावेळ एकट्यानेच बोलणारे अब्बू बोलायचे थांबून भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. मला त्यांचा आवाज खूप थकून गेल्यासारखा वाटला. बराच वेळ शांततेत गेला, कोणीच काही बोले ना. मी अम्मीकडे बघितले तर तिच्याही डोळ्यातून आसू वहात होते.
अब्बूंचे सगळेच बोलणे मला कळाले नाही पण एवढे कळाले की, 'दादाजान नेहमी ज्यांची आठवण काढत ते माझे जुम्मनचाचा अब्बूंना आधीच सापडले होते आणि ते ईतके दिवस आमच्या बेकरीतच रहात होते. पण आता त्यांना पहिले काही आठवत नाही. त्यांना बघून कुल्फी घाबरली आणि बेहोश झाली'
मग कुल्फीचे अब्बू म्हणाले, 'शौकतमिया, तुमच्या खानदानाने काय काय सोसले असेल हे मी समजू शकतो. तकदीरने मोठा जालीम खेळच खेळला जणू तुमच्या सगळ्यांबरोबर. तुम्ही म्हणालात ते खरे आहे, दंग्यांच्या दुखभर्‍या कहाण्यांनी हरेक घर होरपळले आहे. आमचेही काही अझीझ यार-दोस्त आम्ही हरवून बसलो. तुम्ही फिक्रं करू नका तुमचे भाईजान आहे तिथेच राहतील. तरन्नूमला बरे वाटले की मी पैगाम पाठवतो. तुम्ही या तिला भेटायला. मी तिच्याशी बोलून ठेवेन मोठी होनहार आणि समझदार आहे आमची तरन्नूम' मला त्यांचा ऊम्मीदभरा आवाज खूपच आवडला.
'बहोत शुक्रिया शेख साब. मला खात्री होतीच तुम्ही समजून घ्याल', अब्बूंचा चेहरा खुषीने फुलला होता.
'चला डॉक्टर साब, तरन्नूम ऊठली असेल एव्हाना' म्हणत कुल्फीचे अब्बू आणि डॉक्टरसाब ऊठून निघाले सुद्धा.
मी धावत जाऊन अब्बूंना मीठी मारत त्यांच्या गळ्यात पडले. ते माझ्या केसांवरून हात फिरवत राहिले आणि त्यांची ओलसर दाढी माझ्या गालांना गुदगुदी करत राहिली. मी त्यांना विचारले, 'आपण कधी जाणार बेकरीत चाचाजानना भेटायला?'
'लवकरच निलू लवकरच' ते अजूनही माझ्या केसांवरून हात फिरवत होते.
'शमाला आणि मला, तरन्नूमलाही भेटायचं आहे' मी म्हणाले.
'तरन्नूमच्या अब्बूंचा पैगाम आला की आपण सगळे जाऊ तिला भेटायला. मी तिच्यासाठी मस्तं खरपूस भाजलेली नानखटाई बनवायला घेतो. गरमागरम नानखटाईचा डबा तिच्यासमोर ऊघडला रे ऊघडला की तिची रूह एकदम खुषच होऊन जाईल बघ'

******

तर भई अशी आहे आमची, कुल्फी, बिस्किट आणि पापलेटची कहानी. एवढे सगळे घडून गेल्यानंतर त्या वयातही अनेक प्रश्नांची ऊत्तरे मला मिळाली नव्हती, ना ती शोधण्याचा प्रयत्न करण्याएवढा वकुब आणि हौसला माझ्याकडे होता. खासकरून एक प्रश्न मला नेहमी सतावत राही 'त्यादिवशी शाळेत आमचे एवढे मोठे भांडण झाल्यानंतर, दुसर्‍या दिवशी कुल्फी माझ्या घरी आलीच का? घराच्या पहिल्या पायरीवरच जहन्नूमची आठवण करून देणारा चाचाजानच्या अंगाच्या वासाने माघारी फिरलेली कुल्फी पुन्हा त्याच मनहूस वासाचा माग काढत थेट तळघरात का गेली? ह्या प्रश्नाचे ऊत्तर थेट कुल्फीलाच विचारावेसे मला नेहमी वाटे पण मी तो विचारला नाही हे खरे.
अब्बूंनी शेवटी एकदा अफरोझा आपांना जुम्मन चाचांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. तार करतांना फातिमाला न घेऊन येण्याचेही सांगायला विसरली नाही आमची हुशार अम्मी. मग अफरोझा आपा जुम्मन चाचांना भेटायला घरी आल्या आणि चांगल्या चार दिवस राहिल्या. तेव्हा मी त्यांना विचारले 'पण आपा तुम्ही दंगे चालू असतांना मैत्रिणीकडे गेलातंच का?' तेव्हा त्या जुन्या आठवणीत रमून जात म्हणाल्या, 'लहानपणी ना निलू, मी मोठी तडकू चिंगारी होते, कायम चिडलेली. आणि माझी गोबर्‍या गालांची एकुलती एक अझीझ मैत्रिण होती मुमताझ, ती बिचारी एकदम मोम.
अल्ला तिला लंबी ऊमर दे पण न जाने कुठे लपून बसली आहे आता करमजली.
तर एकदा माझ्या गुडियाची वेणी कशी घालायची त्यावरून मी तिच्याशी खूप भांडले, तिला नको नको ते बोलले. पण त्या बिचारीने एकही शब्दं न बोलता आसवं ढाळत गप गुमान सगळं ऐकून घेतलं. नंतर मला मोठं वाईट वाटत राहिलं, त्या बिचारीकडे तर खेळण्यासाठी गुडियाही नव्हती. मला मुमताझशिवाय करमेनासे झाले, राहून राहून गोबर्‍या गालांवरून ओघळणारे तिचे आसू दिसत होते. तुला सांगते निलू, कधी नव्हे ते मला तिच्या आठवणीने रडायलाही आले. मग मी एकदम ठरवलेच. गुडिया घेऊन निघालेच तिच्या घरी जायला आणि माझी गुडिया तिला देऊनच माघारी आले. अल्लाकसम निलू, हे कौमी दंगे वगैरे म्हणजे काय ते कळण्याचं वय नव्हतं गं आमचं'
आपांच्या त्या कहानीत मला कुल्फीच्या माझ्या घरी येण्याने पडलेल्या प्रश्नाचं एका शब्दातलं ऊत्तर एकदमच मिळालं.... 'दोस्ती'
कुल्फी, बिस्किट आणि पापलेट मधली दोस्ती.. बरोबर हसतांना, खिदळतांना आपोआप तयार झालेलं एक अतुट प्रेमाचं नातं. मला माहितीये आमच्याशी भांडल्यानंतर कुल्फीला आजिबात करमलं नसणार आणि आमच्या दोस्तीच्या मध्ये येणारा तो मनहूस शैतानी वासाचा ऊगम शोधून काढायला ती त्याच्या मागावर निघाली असणार.

आता माझ्यासारखेच तुमच्याही मनात सवाल असतील ना? मग कुल्फी कुठे आहे? पापलेट कुठे आहे? मी कुठे आहे? आणि महत्वाचे म्हणजे माझे जुम्मन चाचा कसे आहेत?
सांगते सांगते जरा सब्र तो किजिये जनाब.

कुल्फी ने तिच्या मियांबरोबर हैद्राबादेत ईत्र चे हे भले मोठे दुकान खोलून ठेवले आहे. दुकानाचे नाव काय आहे माहिती, तेच पापलेटचे गाणे, 'आईयेsss मेहरबांsss' देशोदेशीचे लाखो ईत्रं जमवून ठेवले आहेत तिने. अगदी बिस्किट आणि पापलेटच्या वासाचे सुद्धा. तुम्हाला हव्या त्या वासाचे ईत्रं कुठे मिळाले नाही तर कुल्फीच्या दुकानात नक्की चक्कर मारा... सांगा बिस्किटने पाठवले आहे... मग जनाब, बघाच तुमची काय खातिरदारी केली जाते तिथे.

पापलेट? भई पापलेट तर मोठी खानसामाच बनून गेली आहे. दिल्लीला तिच्या मियांचे मोठे मशहूर रेस्तरां आहे. करोल बागेच्या कुठल्याही कोपर्‍यात ऊभे राहून कुणालाही विचारा हीरा-पन्ना बिर्याणी हाऊस? बंद्याचे जेवण झालेले असले तरी तुम्हाला पत्ता सांगण्याच्या बहाण्याने बंदा रेस्तरापर्यंत तुमची सोबत करणार आणि बेगमसाठी बिर्याणी बांधून घेऊनच जाणार. मग तिथेही तुम्ही सांगालच बिस्किटने पाठवले आहे म्हणून. पण तिथल्या मुर्ग मुस्ल्लम जरा हळूच आडवा हात मारा बरं... खातिरदारीच्या नावाखाली लेणे के देणे पड गये तो फिर मेरा नाम ना लेना.

आणि मी? भई हम आज यहां तो कल वहां. अभी तो शिमला की ठंडी वादियों का मजा ले रहे है. कल न जाने अशफाक मियां (हां हां वही लखनौवाले) यहांसे ऊठाके कहां रख दे. भई आप हमारे अशफाक मियां को कही बंजारा तो नही समझ बैठे? नही जी, फौज में बडे अफसर है हमारे मियां, हवाई जहाज ऊडाते है. और तो और हमारे पास भी अब एक छोटी बिस्किट है.... आफरीन.. बस आठ साल की है पर दिनभर बहोत चपर चपर करती रहती है. बिल्कूल वैसी ही है जैसे हम किया करते थे... लो जी...आपको तो पताही है हम कैसे थे.

राहिले आमचे जुम्मनचाचा. तर भई जुम्मनचाचांचेही एकंदरित ठीकच चालले आहे. बिचारे अजूनही तिथेच अडकले आहेत बेकरीच्या तळघरात. आता त्यांचे वय झाले आहे, पुटपुटणेही थोडे कमी झाले आहे पण अजूनही डोळ्यात ओळख दिसत नाही. अम्मी, अब्बू त्याच प्रेमाने त्यांची काळजी घेत राहतात. अशफाकमियां त्यांच्या पोस्टींगच्या ठिकाणी गेले की मी आफरीनला घेऊन निहालगंजला अम्मी अब्बूंकडे जाते. मग आफरीनला मी मुद्दाम बेकरीत घेऊन गेले की चाचा तिला बघून अजूनही 'अफरोझा...अफरोझा' म्हणत राहतात आणि आफरीन बिचारी तिच्या ईवलुश्या पनीर कोरून बसवल्यासारख्या नाकावरून चारचारदा बोट फिरवत राहते.

अरे हो बरे आठवले... ते बर्फाच्या फॅक्टरीचे स्वप्नं मी कुल्फी आणि पापलेटला अजून सांगितलेच नाही.... चला त्यांना जरा टेलिफोन करते.

चलते है... खुदाने चाहा तो फिर मिलेंगे.

--समाप्त

एका मायबोलीकर मैत्रिणीने हे अप्रतिम चित्रं बनवून पाठवले कुल्फी (ऊ.), बिस्किट आणि पापलेटचे (डा.)

Kulfi_Biscuit_Paplet.jpg.

कुल्फी, बिस्किट आणि पापलेटवर एवढं प्रेम करण्याबद्दल बंदा त्यांचा तहे दिलसे शुक्रगुजार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त होती कथा खुप आवडली.

छान शेवट. आवडली गोड कथा.
पण शेवटी मुली मोठ्या झाल्यात ते काही फार बरं वाटलं नाही मला. Happy
चित्र मैत्रेयीने काढलंय का? छान आहे.

वाह वा! किती गोड कथा. खूप खूप आवडली.
हायझेनबर्ग, अगदी गोष्टीवेल्हाळपणे रंगवून रंगवून सांगितली आहेत कथा, यातला प्रत्येक एलिमेन्ट झकास जमून आला आहे. सुपर्ब कॅरॅक्टरायजेशन. हॅट्स ऑफ!

छानच!
पूर्ण विचार करून, पाच भागांची योजना करून, त्यात खास लोकाग्रहास्तव म्हणत अजिबात पाणी न घालता लिहिल्यामुळे मजा आली वाचायला.
याचं छोटंसं पुस्तक काढा... ज्योत्स्ना प्रकाशनाची मुलांसाठी लहान-लहान पुस्तकं असतात, तसं.

छानच!
पूर्ण विचार करून, पाच भागांची योजना करून, त्यात खास लोकाग्रहास्तव म्हणत अजिबात पाणी न घालता लिहिल्यामुळे मजा आली वाचायला.
याचं छोटंसं पुस्तक काढा... ज्योत्स्ना प्रकाशनाची मुलांसाठी लहान-लहान पुस्तकं असतात, तसं. >>>>>>>>>> हो पुस्तक काढाच

खुपच सुरेख!
सगळेच भाग एकापेक्षा एक जमून आलेत!
मस्तच!

मस्त जमला आहे हा भाग.
बाकी सगळ्यांनी विचारलं तेच. चित्र मै ने काढलं आहे का?

Pages