ते खरे की हे खरे?

Submitted by निशिकांत on 10 August, 2018 - 07:09

प्रश्न "आ" वासून दिसले शोधताना उत्तरे
हे खरे की ते खरे अन् ते खरे की हे खरे?

मीच वेडा शोधतो ईमान का नेत्यांमधे?
कारल्यापासून का मिळतात फणसांचे गरे?

वादळाला शांततेचे एवढे का वावडे?
नांदले एकत्र दोघे तर जगासाठी बरे

राव लोकांना न ठावे जायका जगण्यातला
पाहिली नाहीत त्यांनी जीवनी स्थित्त्यंतरे

स्वप्नपूर्तीच्या क्षणाला जाग का आली अशी?
भग्न हृदयाची कहाणी पापण्यातुन पाझरे

मी भणंगाने लिहावे आत्मवृत्ती काय ते?
कोण धजतो वाचण्याला जीवनाची लक्तरे?

नाव इतिहासात ज्यांचे थोडके, बहुतांश पण
पोट भरण्याचेच ओझे वाहणारी खेचरे

वागतो माणूस हल्ली हिंस्त्र प्राण्यांसारखा
जाहली दुर्मिळ अताशा जंगले अन् वनचरे

तू लिही "निशिकांत" थोडी संहिता आता नवी
"क्षण जसे येतील पुढती, ते करावे साजरे"

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! सुरेख रचना! आवडली!

मी भणंगाने लिहावे आत्मवृत्ती काय ते?
कोण धजतो वाचण्याला जीवनाची लक्तरे?

नाव इतिहासात ज्यांचे थोडके, बहुतांश पण
पोट भरण्याचेच ओझे वाहणारी खेचरे

भारी!