माझ्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात १९९९ साली झाली. मी, माझा भाऊ श्री अतुल भिडे आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. माधव साने( त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा डॉ रोहित साने ) अशी तिघांनी मिळून 'वैद्य साने आयुर्वेद लॅब.' नावाची कंपनी सुरु केली. आयुर्वेदिक औषधनिर्मिती हा हेतू असणारी कंपनी नंतर 'माधवबाग' या आज हृदयरोगनिवारणाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमवून असणाऱ्या नाममुद्रेकडे कशी वळली?, काही औषधं ते सव्वाशेहून अधिक क्लिनिक्स आणि दोन हॉस्पिटल्स चा पसारा कसा उभा राहिला ? या सगळ्यावर एक पुस्तक लिहावं असं खूप जणांनी सुचवलं होतं. आणि तो योग प्रत्यक्षात आला २०१६ साली. ग्रंथाली ने सुमेध रिसबूड वडावाला लिखित 'हृदयस्पर्शी माधवबाग' या नावाने ते पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकात मी माझे 'मनोगत' मांडले होते. १६-१७ वर्षांचा प्रवास काही शब्दात मांडणं कठीणच होतं. कितपत जमलं आहे ते तुम्हीच सांगू शकाल.
मनोगत
‘हृदयस्पर्शी माधवबाग’, ही आमच्या गेल्या 16 वर्षाच्या उद्योजकीय वाटचालीची कहाणी, पुस्तकरूपाने तुम्हां वाचकांच्या हातात देत असताना अतीव आनंद होत आहे. एका सी.ए. तरुणाने पाहिलेलं स्वप्न, त्याच्या भावाने आणि मेहुण्याने सत्यात कसं उतरवलं, त्याची ही कथा. यातला तरुण सी.ए. म्हणजे माझा मोठा भाऊ अतुल भिडे. त्याची पत्नी डॉ. सौ. मधुरा भिडे, पूर्वाश्रमीची रजनी साने, सुप्रसिद्ध वैद्य डॉ. माधव साने यांची मोठी मुलगी. तिचा धाकटा भाऊ डॉ. रोहित. या त्रिकुटाबरोबर चौथा भिडू मी, किरण भिडे. आम्ही चौघांनी मिळून माधव सानेंच्या बरोबर एक प्रवास सुरू केला. या प्रवासाची ही कहाणी़! चढउतारांची, वळणावळणांची पण योग्य दिशेने बर्यापैकी पल्ला गाठलेली. ही कहाणी चौघांची असली तरी अतुल व मधुरा वहिनी पुण्यात स्थायिक असल्याने व लेखक सुमेध वडावाला रिसबूड मुंबईकर असल्याने सोयीसाठी ती, मी व डॉ. रोहित अशा दोघांनी सांगायची असे ठरले आणि हे ‘हृदयस्पर्शी’ पुस्तक साकार झाले.
माधवबागचा प्रवास जसा या पुस्तकातून उलगडणार आहे आहे तसेच या पुस्तकाच्या प्रवासाचीही एक वेगळी कहाणी होऊ शकते. हल्ली सिनेमाबरोबर किंवा नंतर ‘मेकिंग ऑफ ...’ अशा फिल्म तयार करतात, तशी एक पुस्तिका व्हावी अशी ही कहाणी असली तरी ती मनोगतातून ओझरती येणंच उचित ठरेल असे आम्हांला वाटले. असे पुस्तक व्हावे अशी माझी कल्पना असल्याने आणि पांढर्यावर काळे करण्याची आवड व अल्पसा अनुभव असल्याने ती जबाबदारी आम्हां चौघांच्या वतीने मीच उचलली आहे.
तसं पाहायला गेलं तर एका प्रथितयश डॉक्टरने स्वत:चं एक हॉस्पिटल असावं असं स्वप्न पाहणं आणि त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या डॉक्टर मुलाने ते पूर्ण करणं, हे नैसर्गिकच! त्याचप्रमाणे दोन तरुण भावांनी औषधनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांच्यापैकी एकाच्या डॉक्टर पत्नीला बरोबर घेऊन उतरणं आणि संघर्ष करणं यातही काही अप्रूप नाही. हे तर खूप जणांनी पूर्वीही केलंय, पुढेही करतील. ‘हृदयस्पर्शी माधवबाग’चं वेगळेपण ठरतं, जेव्हा ही दोन स्वप्नं आणि ते पाहणारे एकत्र येतात आणि एका संस्थेची उभारणी करतात. या संस्थेचं स्वरूप अभूतपूर्व असं आहे. या आधी केरळमध्ये व्यावसायिक तत्त्वावर आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स चालू होती. ‘केरला आयुर्वेद’ हा ब्रँड बनला होता. पोटाचे, सांध्यांचे जुनाट आजार असलेले बहुतांश सामान्य रुग्ण आणि आपल्या शरीराचे लाड करायला परवडणारे बरेचसे धनिक यांच्यात या हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स यांनीwellness destinations (therapies) म्हणून चांगली ख्याती मिळवली होती. महाराष्ट्रासह देशभरात ‘केरला आयुर्वेद’ याच ब्रॅण्डखाली बरीच पंचकर्म केंद्रं चालू होती. आयुर्वेद म्हणजे ‘केरला आयुर्वेद’ हे समीकरण दृढ झालं होतं. अशा काळात हृदयरोगासारख्या लोकांच्या हृदयातच धडकी भरवणार्या रोगावर उपचार करणारं केंद्र काढायचं आणि त्यात आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करायचे, असं स्वप्न बघणंच मुळात आकाशाला गवसणी घालणारं ! पण ते डॉ. साने पिता-पुत्रांनी (माधव साने आणि रोहित यांनी) बघितलं आणि ‘माधवबाग’च्या रूपाने प्रत्यक्षात आणलं. हृदयरोगाच्या पारंपरिक उपचाराच्या मानाने एक दशांश खर्च, कोणतीही शस्त्रक्रिया (कापाकापी) नाही, त्यामुळे बरे होण्यासाठी वेळ लागणे अशा भानगडी नाहीत; असं त्या ट्रिटमेंटचं स्वरूप अविश्वसनीय (too good to be true) असंच होतं, आणि लोकांचीही तशीच भावना होती. ‘हे शक्य आहे का?’ हा प्रश्न सामान्यांपासून सर्व पॅथीच्या डॉक्टरांच्या मनात ठाण मांडून होता. एकीकडे शस्त्रक्रियाविरहित आयुर्वेदिक उपचार संकल्पनेची पायाभरणी साने पितापुत्र करत होते त्याच वेळी दुसरीकडे आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन आणि मार्केटिंगमध्ये मी, अतुल व मधुरा वहिनी अनेक अडचणी सोसत होतो. डॉ. माधव सानेंच्या बरोबर वैद्य साने आयुर्वेद लॅब चालू करताना त्यांच्या चाळीस वर्षांच्या प्रॅक्टीसमधून साकारलेली औषधं बनवणं, ती वापरताना त्यांच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड न करणं, असे उदात्त हेतू होते. साहजिकच डॉ. माधव साने यांच्या पश्चात, त्याच तत्त्वांवर औषधनिर्मिती आणि त्यांचं मार्केटिंग करणं, हे आम्ही सर्वांनी तत्त्वत: स्वीकारलं होतं. पण मार्केटिंग क्षेत्रातले दारुण अनुभव लक्षात घेता, या तत्त्वांना उराशी धरून धंदा बुडताना बघणं किंवा तत्त्वांना मुरड घालत आपणही त्याच ‘रॅट रेस’मध्ये घुसणं, हे दोनच पर्याय समोर दिसत होते. अशा वेळी आपलीच औषधं आपल्याच क्लिनिक्समधून जातील, या क्लिनिक्समध्ये हृदयरोगावर आयुर्वेदिक पंचकर्मं होतील आणि ही क्लिनिक्स मूळच्या माधवबाग हॉस्पिटलसाठी पूरक म्हणून काम करतील, हा तिसरा पर्याय शोधून तो अमलात आणणं हे आम्हां चौघांचं वेगळेपण असावं. यातील ‘अमलात आणणं’ हा वाक्प्रचार अधिक महत्त्वाचा. ‘आयडिया मोबाईल’च्या ‘अॅन आयडिया कॅन चेन्ज युवर लाइफ’ या घोषवाक्यात सुधारणा करून ‘इम्प्लिमेन्टेशन ऑफ अॅन आयडिया कॅन चेन्ज युवर लाइफ’ असं म्हणावंसं वाटतं. कारण, केवळ चांगली कल्पना सुचण्यावर यश अवलंबून नसतं. ती कल्पना प्रत्यक्षात आणताना जे अखंड, अविश्रांत व अढळ प्रयत्न करावे लागतात, त्यातून यश साकारतं, हे चिरंतन सत्य आहे. एखादी कल्पना अनेक लोकांना एकाच वेळी सुचू शकते, पण त्याची योग्यरितीने अंमलबजावणी करणाराच यशस्वी होतो. तसेच, यशस्वी अंमलबजावणी म्हणजे नुसतं कल्पना प्रायोगिक स्वरूपात वास्तवात उतरवणं नाही, तर ती व्यवहाराच्या पातळीवरही सिद्ध होणं. माधवबागच्या एकशे पंचवीस क्लिनिक्स आणि दोन हॉस्पिटल्सच्या साखळीने ही कल्पना व्यावहारिक पातळीवर पण यशस्वी सिद्ध झाल्याचा पुरावा दिलाय.
या कथानकातील गंमत ही एक (की दोन?) चांगली कल्पना सुचून ती प्रत्यक्षात आणताना करायला लागलेल्या प्रयत्नांत आहे. कित्येक नामांकित व्यावसायिक ‘आताशा चांगले सहकारी मिळतात कुठे?’ अशा सबबींसाठी स्वत:च्या व्यवसायाची वृद्धी रोखतात. (???) आपणच काय ते एक्सपर्ट, बाकीच्यांना हे जमणार का? असा त्यांचा एकंदर रोख असतो. तेवीस वर्षं प्रॅक्टिस झालेल्या आमच्या ओळखीच्या एका डेन्टीस्टना, कामाचा ताण वाटू लागला. त्यांना आम्ही सुचवलं की तुमच्याकडे एवढे विद्यार्थी शिकायला येतात, तुम्हाला मदत करतात, त्यांना प्रशिक्षण द्या, मार्गदर्शन करा. त्यांना ‘फ्रॅन्चायजी’ बनवा. तुमचा बिझनेस आपोआप होईल. त्यावर ते म्हणाले की, ते विद्यार्थी माझ्याइतकं चांगलं काम करू शकतील का? हीच व्यथा सी.ए., वकील, सर्व प्रकारचे डॉक्टर्स यांची असते. पण ‘माझ्याइतकं चांगलं काम करू शकतील का?’ या प्रश्नाचं उत्तर ‘कदाचित नाही आणि कदाचित माझ्याहून अधिक चांगलं काम करू शकतील’ असंही असू शकतं, हे ते विसरतात. या उत्तराचा उत्तरार्ध आहे की माझ्याहून अधिक चांगलं काम करू शकतील, हा अनेक शक्यतांना जन्म देणारा आहे. मीच चांगलं काम करू शकतो, या विचारांनी जी मर्यादा येते ती या विचारांनी निघून जाते. सुदैवाने डॉ. रोहितने स्वतःसारखेच डॉक्टर्स आमच्या सर्व क्लिनिक्समध्ये तयार करायची तयारी दाखवली. डोंबिवलीला आम्ही जेव्हा कंपनीचं पहिलं क्लिनिक चालू केलं, तेव्हा तो तिथे येणार नाही ही आमची पहिली अट होती. एक डॉक्टर दोन-तीन ठिकाणी जाऊ शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. कारण त्याच्याकडेही दिवसाचे चोवीस तासच असतात. अशा वेळी आपल्यासारखे डॉक्टर्स इतर ठिकाणी तयार केले, तर क्लिनिकच्या संख्येचं बंधन राहत नाही. डॉ. रोहित आणि डॉ. मधुरा यांनी हे डॉक्टर्सना तयार करण्याचं, त्यांना सतत ट्रेन करण्याचं शिवधनुष्य पेललं. त्यांच्यासाठी निरनिराळ्या सिस्टम्स उभ्या केल्या. त्यांचं विशेष वेगळेपण हे की ते स्वतः स्वतंत्र प्रॅक्टिसिंग डॉक्टर असूनही, हे करताना तयार होणार्या कॉम्पिटिशनच्या शक्यतेचाही त्यांनी अजिबात विचार केला नाही. पण डॉ. रोहित किंवा डॉ. मधुरा वहिनी यांनी डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी तयार होऊन भागणार नव्हतं. त्यांच्याकडून शिकायला, त्यानुसार त्या क्लिनिक्समध्ये बसून हृदयरोगींना तपासण्याची हिंमत ठेवणार्या तरुण डॉक्टर्सची गरज होती. सुरुवातीला तर त्यांना द्यावे लागणारे पुरेसे पैसेही कंपनीकडे नव्हते. पण डॉ. विद्युत, डॉ. महेश, डॉ. गुरुदत्त, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. दिपाली अमीन, डॉ. सुवर्णा यांसारखे डॉक्टर्स आपलं करीअर पणाला लावून आमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिले आणि आमचं काम हलकं झालं. कॉलेजमधून बाहेर पडणार्या तरुण डॉक्टर आणि इंजिनियरमध्ये सगळ्यात मोठा फरक असतो तो म्हणजे, इंजिनियरसाठी नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. पण डॉक्टरला मात्र स्वत:चं करीअर स्वत: घडवायचं असतं. समाजाची, कुटुंबाची अपेक्षा असते की त्याने/तिने स्वत:चं क्लिनिक थाटावं आणि स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करावी. आमच्याबरोबर काम करणार्या डॉक्टरकडूनही त्यांच्या कुटुंबांची हीच अपेक्षा होती. ते स्वतःसुद्धा कंपनीचं काम करायला लागल्यावर, ‘1-2 वर्षं अनुभव घेऊन बघू’ याच विचाराचे होते. आम्हांलाही हीच चिंता होती की सर्व डॉक्टर्सनी, असंच एक-दोन वर्षं आमच्याबरोबर काम करायचं ठरवलं, तर आपली शैक्षणिक संस्थाच होईल. मग आपलं मोठी कंपनी उभी करायचं, स्वप्न कोणाच्या आधारे पूर्ण करायचं? एक दिवस मी डॉ. गुरुदत्तबरोबर ंबोलत होतो की आम्हां इंजिनियर्सनी एकत्र येऊन मोठमोठ्या कंपन्या उभारल्याची उदाहरणं खूप आहेत. टाटा, एल अँड टी यांसारख्या कंपन्यांमध्ये किती इंजिनियर्स वर्षानुवर्षं एकत्र काम करीत आहेत. पण डॉक्टर्सनी, तेही बी.ए.एम.एस. पदवीधारक आयुर्वेदिक असलेल्या डॉक्टरांनी, एकत्र मिळून चालवलेल्या, मोठ्या केलेल्या एकाही कंपनीचं उदाहरण नाही. तुम्ही सर्व डॉक्टर्सनी साथ दिली, तर हा इतिहास घडवण्याची आपल्याला संधी आहे. डॉ. गुरुदत्तला ही गोष्ट एकदम भावली. आज ‘माधवबाग’ची सर्व क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समध्ये मिळून 150हून अधिक डॉक्टर्स एकत्रित काम करीत आहेत. हाही एकाअर्थी विक्रमच आहे!
‘माधवबाग’चं वेगळेपण इथेच संपत नाही. नुसतं रोग्याला बरं करून भागणार नाहीये. कारण झपाट्याने वाढणार्या हृदयरोगाची व्याप्ती अशी आहे की त्यात आर्थिक, सामाजिक नुकसानाच्या भरपूर शक्यताही लपलेल्या आहेत. त्यामुळे, ‘रोग्याला बरे करण्याबरोबरच या रोगाविरुद्ध लढा पुकारायला हवा’ या जाणिवेने ‘माधवबाग’ अक्षरश: झपाटल्यासारखे काम करीत आहे. स्वत:च्या मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेऊन हेल्पेज, फेस्कॉनसारख्या एन.जी.ओ.ना बरोबर घेऊन हृदयरोगाच्या समाजशिक्षणाची जोरदार मोहीम सुरू आहे. हजारो लोकांचे मोफत स्ट्रेस टेस्ट, इ.सी.जी., तसेच ‘दिल की बात’सारखे हटके कार्यक्रम, या सगळ्यांनी हृदयरोगाबद्दलची जाणीव वाढवण्याचं काम सुरू आहे. हृदयरोगाच्या कारणांमध्ये मानसिक तणाव आणि स्पर्धात्मक स्वभावाचाही मोठा वाटा असल्यामुळे, माधवबागमध्ये रोग्याला नुसत्या शरीरावर उपचार करून भागणारं नव्हतं, तर त्याचं मनही प्रशिक्षित करावं लागतं. त्यासाठी त्यांची काउन्सिलींग सेशन्स, ‘आरोग्यसंस्कार मासिक’ यांसारख्या उपक्रम व माध्यमांतून त्यांना या रोगाची अधिकाधिक माहिती देणं, हीसुद्धा यंत्रणा ‘माधवबाग’ चालवतं. फक्त आपल्याच डॉक्टर्सना प्रशिक्षित करून आपल्याच क्लिनिक्समध्ये उपचार करून आपणच पैसे कमवावे, हा खुजा विचार ‘माधवबाग’ने कधीच केला नाही. कारण त्याद्वारे पुन्हा प्रशिक्षित मनुष्यबळाच्या मर्यादा येणार, म्हणून ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस’ मध्ये अद्ययावत अभ्यासक्रम तयार करून त्याद्वारे इतरही डॉक्टर्सना प्रशिक्षित करणं म्हणजे तर ‘माधवबाग’च्या खुल्या मनाचा आविष्कार आहे.
आयुर्वेदाचा अजूनही ‘मॉर्डन मेडिसिन’ने खुल्या दिलाने स्वीकार केलेला नाही. कारण एवढे दिवस आयुर्वेदही ‘मॉर्डन रिसर्च मेथडॉलॉजी’शी कटुतेनेच वागला. पण ‘माधवबाग’ने तिथेही आपला खुलेपणा जपत रुग्णांचे मिळवलेले सर्व रिझल्टस् हे ‘मॉर्डन रिसर्च मेथडॉलॉजी’च्या मुशीतून तावून सुलाखून घेतले. उपरोक्त सर्व गोष्टींतून ‘माधवबाग’ म्हणजे प्रशिक्षित डॉक्टर्स आणि सर्व सोयींयुक्त क्लिनिक्सचं खूप मोठं नेटवर्क, जिथे रोग्याच्या हृदयात तर ताकद निर्माण होतेच, पण मानसिक बळसुद्धा मिळतं; हे समीकरण दृढ झालं. ‘माधवबाग’चं वेगळेपण मला वाटतं या सगळ्यात आहे. साधारणपणे उद्योजकीय कहाण्यांमध्ये उद्योजकाचा प्रवास शून्यातून सुरू होऊन अब्जाधीश होईपर्यंत कसा झाला, त्या प्रवासात त्याला काय अडीअडचणी आल्या याचं वर्णन असतं. ‘माधवबाग’ची कहाणी ही वैद्यकीय उद्योजकतेची असल्यामुळे त्यात उद्योजकीय कथानक तर आहेच. पण ती वैद्यकीय क्षेत्रात घडत असल्यामुळे, फक्त उद्योजक, त्याचं आर्थिक यश एवढ्यावर न थांबता हृदयरोगामुळे ग्रासलेल्या अब्जावधी लोकांना पण स्पर्श करते. हृदयरोगाविषयीचे गैरसमज, भिती घालवते. मला वाटतं हे पुस्तक वाचून झाल्यावर वाचकाला हृदयरोगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली (आणि ‘1+1=3’ हे समीकरण उलगडलं) तर या खटाटोपाचे चीज झाले अशी सार्थकता आम्हांला वाटेल. ज्यांना हृदयरोग झाला आहे अशा वाचकांना त्याविषयी नवी दृष्टी मिळावी आणि ज्यांना झाला नाही आहे अशांना तो टाळता येऊ शकतो असा विश्वास मिळावा ही या कहाणी सांगण्यामागची एक प्रेरणा आहे. हृदयरोगाविरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईमध्ये आम्हांला या पुस्तकाच्या वाचकांच्या रूपाने नवे सहकारी लढवय्ये मिळावेत ही या कहाणी सांगण्यामागची एक अपेक्षा आहे. सुजाण वाचक ती नक्की पूर्ण करतील असा विश्वास वाटतो.
माधवबागच्या आणि या पुस्तकाच्या घडण्याचा गोवर्धन उचलताना अनेकांचा आधार मिळाला आहे. त्यांच्या अखंड ऋणात राहणेच आम्हांला आवडेल पण काही व्यक्तींचा वानगीदाखल उल्लेख करणे आवश्यक आहे. आम्हां चौघांच्या कुटुंबातील सर्व लहानथोरांनी आम्हांला सदैव पाठिंबा दिला. आमचे घराकडे होणारे दुर्लक्ष सहन केले. त्यांचा उल्लेख महत्त्वाचा ! आमच्या सुरुवातीच्या काळात आमच्यावर विश्वास ठेवणारे प्रीती महाजन, मंदार दहितुले, डॉ प्रज्ञा राऊत यांसारखे आमचे सर्व माधवबाग फ्रॅन्चायझी ओनर्स, डॉक्टरांपासून ते पंचकर्म थेरपिस्टपर्यंतचे सर्व कर्मचारी, आयुर्वेदावर भरवसा ठेवणारे आमचे सर्व रुग्ण यांच्या उल्लेखाशिवाय हे मनोगत अपुरे ठरेल.
या पुस्तकाचे लेखक सुमेध वडावाला रिसबूड यांचा या पुस्तकातील वाटा अक्षरशः सिंहाचा आहे. भरपूर गप्पा मारायची आवड असलेला मी आणि काहीसा अबोल असा डॉ. रोहित यांच्याशी तासन्तास फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत बोलून त्यांनी ही कहाणी समजून घेतली. अनेकदा, पुन्हापुन्हा प्रश्न विचारून शंका दूर केल्या. माधवबागची कहाणी स्वतःच्या मनात मुरवली आणि मग आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकार केली. चित्रकार निलेश जाधव यांनी आपल्या व्यग्र कामकाजातून वेळ काढून अतिशय सुंदर व आकर्षक असे मुखपृष्ठ तयार केले. तसेच पुस्तकाच्या मांडणीतही लक्ष घातले. ग्रंथाली प्रकाशन ही मराठी साहित्य विश्वातील नामांकित प्रकाशन संस्था आहे. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेली अनेक पुस्तके, अनेक नवे समर्थ लेखक या वाचक चळवळीने जन्माला घातले. गावांगावातील वाचकांपर्यंत अल्पदरात पुस्तके पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. अशा ‘चळवळ्या’ प्रकाशन संस्थेला माधवबागची ही कहाणी वाचकांपर्यंत न्यावीशी वाटली हे आमच्यासाठी विशेष आनंदाचे ठरले. पुस्तकाची निर्मितीही त्यांनी अत्यंत दर्जेदार अशी केली. ग्रंथालीचे श्री. सुदेश हिंगलासपूरकर आणि त्यांच्या सहकार्यांचेही आम्ही ऋणी आहोत. या पुस्तकाच्या संकल्पनाबीजापासून ते प्रत्यक्षात साकार होण्यापर्यंत विविध प्रकारच्या कामात सहभाग देणार्या डॉ. यश वेलणकर आणि महेश खरे यांचा उल्लेख येथे औचित्यपूर्ण ठरेल.
सर्वांत शेवटी पण विशेष महत्त्वाचे... सुप्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांनी त्यांच्या व्यस्ततेतून वेळ काढून या पुस्तकासाठी आवर्जून प्रस्तावना दिली. या पुस्तकाच्या यशस्वितेचे, वाचकप्रियतेचे जणू श्रीफळच त्यांनी वाढवले. आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. तसेच ख्यातनाम उद्योजक श्री. दीपक घैसास यांच्या ‘चार शब्दां’साठी व लोकप्रिय अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या ‘शुभेच्छां’साठीही आम्ही नेहमीच त्यांच्या ऋणात आनंदाने राहू.
‘हृदयस्पर्शी माधवबाग’ पुस्तकाचा भव्य प्रकाशन समारंभ दादर येथे .... मे 2016 रोजी झाला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचे हात या प्रकाशनासाठी लाभले. ज्येष्ठ वैद्यकसंशोधन डॉ. आर. डी. लेले यांच्यासारखे अक्षरशः ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, भारत सरकारच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी तसेच महाराष्ट्र राज्याच्या आयुष्य विभागाचे संचालक डॉ. कुलदिपराज कोहली यांची उपस्थिती यावेळी आमच्यासाठी आनंददायी होती. सुरुवातीपासूनच वाचकांनी व माधवबागच्या रुग्णांनी या पुस्तकाला दिलेला भरघोस प्रतिसाद ‘हृदयस्पर्शी’ आहे. अवघ्या तीन-चार महिन्यातच या पुस्तकाच्या पाच जनआवृत्या व एक संग्राहक आवृत्ती संपली आहे. या सर्व वाचकांचे आम्ही चारही जण मन:पूर्वक ऋणी राहू.
खुपच छान व प्रेरणादायी .
खुपच छान व प्रेरणादायी .
माधवबाग'च्या जाहिराती पेपरात
माधवबाग'च्या जाहिराती पेपरात दिसतात पण यामागे तुमचीच टीम आहे हे माहित नव्हतं. पुस्तक वाचलेलं नाही पण या लेखातून माहिती कळली. आयुर्वेदिक सेवा देण्याची केंद्रे काढण्याची कल्पना आवडली.
इतर रोगातून जसा रुग्ण मुक्त होतो तसा आयुर्वेद उपचारांनी ह्रुदयरोगांतून ( सर्व प्रकार) रुग्ण मुक्त करता येतो का?
फ्रँजाईजींमधे त्याच दर्जाचा
फ्रँजाईजींमधे त्याच दर्जाचा अनुभव मिळेल का ? न आल्यास तक्रार करता येते का ?
तिन्ही प्रश्नाचे उत्तर १००%
तिन्ही प्रश्नाचे उत्तर १००% असे आहे.
१. आयुर्वेदातून हृदयरोग मुक्त होता येतं. माधवबाग ने यासंदर्भात बरंच साहित्य उपलब्ध केले आहे. youtube channel, आरोग्यसंस्कार मासिक, निरनिराळे वर्कशॉप्स यातून माहिती मिळू शकेल. google करा.
२. पहिली franchisee मी २००७ साली दिली होती. त्यानंतरच्या २-४ वर्षात या शंकेला वाव होता. पण आता सर्व क्लिनिक्स ( कंपनीची आणि franchisee ) ही एकाच दर्जाची सेवा देतात. खूप मोठं backoffice या सगळ्यावर काम करीत असतं.
३. पेशंट मग तो कंपनी क्लिनिक मध्ये उपचार घेणारा असो की franchisee क्लिनिक मध्ये , आपण कधीच भेदभाव केला नाही. तो माधवबागचे उपचार घेत आहे. त्यात त्या पेशंटला काहीही तक्रार करावीशी वाटली तर तो ती करू शकतो. त्यासाठी helplines असतात. call centres मधून सर्व पेशंट्स चा सतत follow up घेतला जातो.
शंका असणं आणि त्यादेखील भरपूर, हे एकदम स्वाभाविक आहे. पण नेटवर आणि प्रत्यक्ष क्लिनिक मध्ये खूप माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. आमच्या मते सर्व शंका, भीती याचे मुख्य कारण माहितीचा अभाव हे आहे. ती देऊया म्हणजे योग्य/अयोग्य ठरवणे सोपे जाईल.
अरे वाह, छान माहिती !!!
अरे वाह, छान माहिती !!!
>>सर्व क्लिनिक्स ( कंपनीची आणि franchisee ) ही एकाच दर्जाची सेवा देतात. खूप मोठं backoffice या सगळ्यावर काम करीत असतं.
होय हे अगदी खरे आहे. एकदा चौकशीसाठी एका शाखेत गेलो होतो, तेव्हाच माधवबागचे वेगळेपण जाणवले होते.
पंधरा दिवसांपुर्वी मराठी
पंधरा दिवसांपुर्वी मराठी चानेलवरचा फोनइन आरोग्य प्रश्नोत्तर कार्यक्रम पाहिला. ( वंध्यत्व आणि आयुर्वेद .) हा विषय वेगळा आहे परंतू मुद्दा असा आहे -
" अमुक रोगावर आयुर्वेद उपचार आहेत का आणि गुण येण्यास किती वेळ लागतो?"
" रुग्ण थेट आयुर्वेद उपचार घेण्याकरता प्रथम जाणे हे प्रमाण फारच कमी आहे. त्याने अगोदर काही महिने अलोपथिक उपचार घेतलेले असतात. मग तो तिकडे जातो. अर्थातच वेळ फार लागतो."
ही प्रवृत्ती बदलली पाहिजे.
डॉ. ऱोहित हे स्वतः होमिओपाथ
डॉ. ऱोहित हे स्वतः होमिओपाथ आहेत. मग आयुर्वेदीक उपचार पद्धती त्यांनी का स्विकारली ?
डॉ रोहित हे स्वतः MBBS आहेत.
डॉ रोहित हे स्वतः MBBS आहेत. त्यांचे वडील डॉ माधव साने प्रख्यात वैद्य होते. त्यांच्या नावावरूनच माधवबाग ही नाममुद्रा तयार झाली आहे. डॉ रोहित हे स्वतःला कुठल्याही उपचारपद्धतीशी बांधून घेण्यापेक्षा रुग्णाला ज्याने सगळ्यात जास्त आराम पडेल ती आपली हे मानणाऱ्यांपैकी आहेत. माधवबाग चे youtube channel पहा...
हा धागा उडवलेला परत का काढला
हा धागा उडवलेला परत का काढला आहे?
मार्केटिंग करायचे असेल तर मायबोलीवरील छोट्या जाहिराती सुविधा वापरून पहा.
गेल्या वर्षी मराठी बिझिनेस
गेल्या वर्षी मराठी बिझिनेस एक्स्चेन्ज या कार्यक्रमात डॉ. ऱोहित स्वतः म्हणाले की ते होमिओपाथ आहेत
https://www
https://www.maharashtramedicalcouncil.in/frmRmpList.aspx
<<
या पानावर अॅलोपथीच्या, महाराष्ट्रात रजिस्टर्ड अधिकृत डॉक्टरांची लिस्ट मिळते. सर्च क्रायटेरियात "Rohit Sane" टाईप केल्यास काहीही रिझल्ट येत नाहीत. (पहिल्या ड्रॉप डाऊन बॉक्समधे डॉक्टरांचे नांव सिलेक्ट करा)
("नॉट फाउंड" असे लिहून येत नाही हा वेबसाईट डिझायनरचा बावळटपणा आहे. जिज्ञासूंनी आपल्या ओळख/माहितीतल्या कुणाही किमान एमबीबीएस डॉक्टरचे नांव टाईप करून पहावे, रिझल्ट सापडेल.)
एम. बी. बी. एस. सोडाच, एम.डी
एम. बी. बी. एस. सोडाच, एम.डी मेडिसिन पदवीधारकही हृदयरोग चिकित्सा व उपचार करण्यास नालायक आहेत, त्यासाठी डी.एम. कार्डिऑलॉजी अशी डिग्री आवश्यक असते, असे मा. हायकोर्ट, मुंबई व मा. सुप्रीम कोर्ट, भारत; या दोहोंचे मत आहे. (रिलेव्हंट केसेस चे जजमेंट्स सापडले की देतो.)
माधवबाग आयुष नावाच्या भंपकपणाखाली सुरू आहे व पनपते आहे, असे नोंदवितो.
गेल्या वर्षी मला वाटतं एप्रिल
गेल्या वर्षी मला वाटतं एप्रिल, मे च्या आसपास माझ्या मावशीला हार्ट प्रॉब्लेम असल्याचं डिटेक्ट झालं. तिच्या मुलांनी तिला माधवबागेत उपचार सुरु करायचं ठरवलं. आयुर्वेदात हार्टचे वगैरे प्रॉब्लेम्स सोडवण्यात उपचार आहेत ह्याची कल्पनाच नव्हती पण अगदी खरं सांगायचं तर तिच्या मुलांनी हा निर्णय घ्यावा हे अजिबात पटलं नव्हतं. मावशीला अतिशय कडक डाएट होतं. (हा प्रॉब्लेम सोडता तिला बाकी काही आजार नव्हता. वय ७८.) जे तिला सोसत नव्हतं. ऑक्टोबरमध्ये मध्यरात्री तिला अतिशय मोठा अटॅक आला आणि गेलीच ती. तेव्हापासून ह्या जागेबद्दल माझ्या मनात एक अढी आहे.
आयुर्वेद पुरेसे अद्ययावत नाही
आयुर्वेद पुरेसे अद्ययावत नाही आणि होमिओप्याथी ही तद्दन धूळफेक आहे, त्यापेक्षा रस्त्याच्या कडेचा जडीबुटीवाला परवडला. हे स्वतः पाळतो आणि जवळचे लोक यांना सांगत असतो. भारतात लोकं ऐकत नाहीत त्यांना वैद्याकडे जा, पण गोळ्या सोडू नको सांगतो. कँसर, हृदयरोग यावर हुकमी इलाज ... रादर तो बरा करू अशी जाहिरात वाचली, ऐकली तरी डोक्यात जाते. इतके दिवस धागा खाली जात होता तर कशाला वर काढा म्हणून लिहीत न्हवतो.
फारसा चा.न्गला अनुभव नाहि आला
फारसा चा.न्गला अनुभव नाहि आला माझ्या आई बाबाना.