जी आदाब! हम निलोफर है!
अब आप पुछेंगे 'कुल्फीके बिस्किटकी पापलेट' येह क्या अजीब माजरा है भई? क्या येह कोई दिमागको गेहरा सदमा लगे हलके-वकुफवाले बावर्चीकी हिमाकतभरी तरकीब है? तो 'पापलेटके बिस्किटकी कुल्फी' क्यों नही? या फिर 'बिस्किटके क्लुल्फीका पापलेट' क्यों नही? तो जी हम आपसे कहेंगे, आप येह बात अपने जहनमें गाठ बांधकर रख ले, 'बिस्किट हमेशा बीचमें आती है, कुल्फी सबसे पहले आयी थी और भई पापलेट के तो क्या केहने'. तो हमारे मायने से 'कुल्फीके बिस्किटकी पापलेट' ही सही नुस्खा हुवा ना.
या खुदा! हम तो भूलही गये! हमे यहां ऊर्दू नही मराठीमेही गुफ्तगुं करनीं है. खता के लिये हमें बेहद अफसोस है.
तो चलिये, हमारी दास्तां हम आपको मराठीमें सुना देते है!
तर मी सांगत होते.. माझे नाव निलोफर... निलोफर काझी आणि ही आहे माझ्या निहालगंजमध्ये व्यतीत झालेल्या बालपणाची गोष्टं.
पूर्वी माझे दादाजान काहीच काम करत नसत तेव्हा त्यांना सगळे काझीसाब म्हणत. तुम्ही ऐकलीच असेल ती म्हण 'मियां-बीबी राझी तो .... ' आता १२-१५ वर्षांच्या मुला-मुलींना मियां-बीबी बनण्यासाठी राझी करणे असे कितीसे मोठे काम असणार? तर माझे दादाजान निहालगंजमधल्या मदरशातल्या मुलामुलींना राझी करून त्यांचे निकाह लाऊन देत. मुलींच्या अम्मी-अब्बूने दादाजानना त्यांच्या घरी बोलावले की ते मुलींशी गोड गोड बोलत, मोठ्या प्रेमाने त्यांची विचारपूस करीत, मदरश्यात शिकवलेल्या कुराणातल्या आयता म्हणायला लावून त्यांची तारीफ करीत, रेशमी दुप्पट्ट्यांची आणि दागिन्यांची शंभर अमिषे दाखवत, त्यांचे होणारे मियां किती तालेवार आहेत आणि मियांच्या घरी त्यांचे किती लाड होतील तेही पटवून देत. असे चार-पाच वेळा झाले की मुली लाजत-मुरडत निकाहसाठी राझी होतच होत. निहालगंजमधल्या माझ्याएवढी मुले-मुली असणार्या सगळ्या अम्मी आणि अब्बूंचे निकाह दादाजाननेच लाऊन दिले पण तेवढेच! निकाह लावणे म्हणजे तसे काही मोठे काम नाही. बाकी दिवसभरात निहालगंजमध्ये फिरून वयात आलेल्या आणि न आलेल्या सुद्धा मुलामुलींची खबरबात डायरीत लिहून ठेवणे, यजमानांनी पुढ्यात ठेवलेल्या सुक्यामेव्याच्या वाट्या आपल्या शेरवानीच्या खिश्यात ऊपड्या करणे आणि त्यातल्या काजूपिस्त्यांची लालूच दाखवून माझ्याकडून त्यांची पांढरी दाढी मेंदीने रंगवून घेणे अशी त्यांची तरतीब असे. माझा डोळा कायम मेव्यातल्या सुक्या अंजीरावर असे पण ते मला क्वचितच मिळे. त्यासाठी दादाजानच्या डोक्यावरच्या केसांनाही मेंदी लाऊन द्यावी लागे आणि आताश्या त्यांचे केस खूप कमी झाल्याने अंजीर मिळणे मोठे मुष्कीलच झाले होते. मेंदी लावून घेतांना दादाजान न चुकता जुम्मनचाचांच्या आठवणी काढीत आणि प्रत्येक आठवणी बरहुकूम त्यांचा आवाज अजुनाजुन कातर होत जाई. मला तर ते सांगत असलेली चाचांची हरेक आठवण त्या आठवणीतला हरेक अल्फाज ईतक्या वेळा ऐकून पाठच झाला होता. ते म्हणत,
'निलूजान, अगदी तुझ्यासारखे नाजूक हात होते बघ माझ्या जुम्मनचे. अस्साच तुझ्यासारखा गोरा रंग आणि हरणासारखे पाणीदार डोळे, बिल्कूल शहजादाच. आणि आवाज तर काय होता म्हणून सांगू! खुद्दं ऊस्ताद विलायत खाँ साहेबांनी शाबाशी दिली होती ते लखनौला आले होते तेव्हा. तो असता तर त्याच्यासाठी अशी हूरपरी बेगम शोधून आणली असती ना मी. नि तुझ्या हातांसारख्या अजून चार नाजूक हातांनी रंगवली असती माझी दाढी. तुला सांगतो, तुझा अब्बू अल्लाचा नेक बंदा आहे पण माझा जुम्मन फरिष्ता होता फरिष्ता. तुझे अम्मी-अब्बू कधी करणार नाहीत एवढे लाड केले असते त्याने तुझे. पण तेव्हा दंग्यात सरायगंज पेटले आणि ईतर अनेक नौजवान मुलांसारखा माझा जुम्मन कुठे हरवला त्या पर्वर्दिगारलाच ठाऊक. आता तर सरायगंज सोडून निहालगंजला येऊनही जमाना लोटला. त्याला घरी यायचे असेल तर त्याने यावे तरी कसे?' एवढे बोलून ते जे शांत होत ते थेट संध्याकाळची नमाज पढून येईपर्यंत शांतच.
मला नेहमी वाटत राही. 'खरंच जुम्मनचाचा असते तर किती धमाल आली असती. कुठे असतील ते आता? आणि त्यांना आमचे हे घर सापडावे तरी कसे?' ईथे मात्र माझ्या विचारांची पतंग कटून जात असे.
माझे अब्बू मात्र दिवसभर आमच्या बेकरीत काम करीत. संध्याकाळी बेकरी बंद करून ते जेव्हा घरी येत तेव्हा त्यांच्या कपड्यांना ईतका मस्त खरपूस वास येत असे की त्या वासाने माझी आधीच दादाजानच्या गोष्टीतल्या हैवान-ए-हुरुफ सारखी दिसेल ते गिळणारी भूक बेकरीतल्या भट्टीसारखी ढणाणा भडकत असे. खरं तर आमची बेकरी घराला लागूनच होती पण मला तिथे पाऊल ठेवण्यास सक्तं मनाई होती. बेकरीत जाऊ द्यावे म्हणून हट्टं धरल्याने मी अनेकदा अम्मीकडून 'नामुराद किंवा बेगैरत' म्हणवून घेत चापटही खाल्ली, पण ती कधी राझी होतच नसे. जास्त हट्ट केला की ती म्हणे 'तू बेकरीत पाय जरी ठेवलास ना की लागलीच तुझा निकाह लखनौच्या अशफाकमियांशी करते की नाही बघ! बसशील मुलं होईपर्यंत परदानशीन होऊन. मग बेकरी नाही नि स्कूलही नाही'. निकाहच्या नावाने मला तर छातीत धडकीच भरत असे मग मी पाय आपटत रडत कुढत का होईना पण अम्मीचा पिच्छा सोडत असे. अब्बू मात्र प्रेमाने समजाऊन सांगत की 'भट्टीच्या वाफेने माझ्या हूरपरीची दुधासारखी नितळ त्वचा कोळशासारखी काळी होईल मग तिच्याशी मोठेपणीही कोणी निकाह करणार नाही अशी अम्मीला भिती वाटते म्हणून अम्मी जाऊ देत नाही'. मी अब्बूंचे एक बघून ठेवले आहे, त्यांच्या गोड गोड बोलण्यातून खरं तर ते अम्मीपेक्षाही जास्ती भिती घालत. मला निकाहच्या नावाने धडकी भरत असे हे खरे पण ईतकीही नाही की मला कधी निकाहच करायचा नव्हता. थोडी मोठी झाल्यावर निकाह तर मला करायचाच होता, मग मीच माझी समजूत घालून घेत असे.
मला चांगले आठवते, त्यावेळी निहालगंजमध्ये कधी नव्हे तो सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडला होता. मी नव्यानेच नूर सुलताना गर्ल्स हायस्कूल मध्ये पाचवीत जाणार होते. मी खरे तर सहावीच्या वर्गात जायला पाहिजे होते पण मागच्या वर्षी मदरसा की शाळा ह्या दादाजान आणि अब्बूंच्या लडाईत माझ्या शाळाप्रवेशाची वेळच निघून गेली. शेवटी अब्बूंच्या प्रयत्नांनी दादाजानचे मन वळवले खरे पण लोक त्यांना 'तुमची नात आता मदरश्यात दिसत नाही?' म्हणत माझ्याबद्दल नाना प्रश्न विचारून हैराण करीत म्हणून त्यांनी निकाह जमवण्याचे त्यांचे छोटेसे काम थांबवले ते कायमचेच.
त्यावर्षी पावसामुळे शाळा पहिले तीन दिवस बंदच होती. चौथ्या दिवशी मात्र लख्खं ऊन पडलं आणि मी दादाजान बरोबर शाळेत निघाले. रस्त्याच्या बाजूला सगळीकडे छोटी छोटी तळी साचली होती. भाताच्या शेतांमध्ये तर एवढे लोक खाली वाकून रांगेत काम करतांना दिसत होते की मला वाटले कोणी त्यांना एकसाथ आमच्या शाळेत करतात तशी पायाचे अंगठे धरण्याची शिक्षाच केली आहे. आम्ही मंदिराच्या ऊजव्या बाजूने वळसा घालून गेलो तर तिथे जास्मीनच्या फुलांचाच पाउस पडला होता.. मला धावत जाऊन पटकन दोन-चार फुले वेचून घ्यावीशी वाटत होती पण शाळेचा नवा फ्रॉक मातीत खराब करण्याची माझी आजिबात ईच्छा नव्हती त्यामुळे ते राहिलं. एका मोठ्या झाडाच्या पारावर मांजरीची दोन छोटी पिल्लं, हिरव्या डोळ्यांचं एक काळं आणि निळ्या डोळ्यांचं एक पांढरं, खेळतांना दिसली. त्यातलं निळ्या डोळ्यांचं पांढरं पिल्लू एवढं गोड होतं की मला शाळेत न जाता दिवसभर त्याच्याबरोबर खेळावसं वाटून गेलं. 'त्याला आपल्या घरी नेता येईल का? पण ते बिचारं पिल्लू रस्ता चुकून बेकरीत गेलं आणि भट्टीचह्या वाफेमुळे ते त्याच्या भावासारखं काळं झालं तर मग ते आपल्याला आवडणार नाही' मग त्याला घरी नेण्याचा विचार मी टाकूनच दिला. मंदिराच्या पुढे डाव्या बाजूला एक बर्फाच्या लाद्या बनवणारी 'ईब्राहिम आईस फॅक्टरी' आणि त्याच्या बाजुला 'ईनायत चुडीवाल्याचं' भलमोठं रंगीबेरंगी दुकान होतं. माझ्या एका दूरच्या चचेर्याबहिणीचा म्हणजे झीनतआपाचा निकाह होता तेव्हा ईनायत चुडीवाला पोतंभर चुडियां घेऊन घरी आला. त्याने चुडी चढवतांना झीनतआपाचे नाजूक हात एवढ्या जोरात दाबले की 'तू जहान्नुममध्ये गेल्यावर खवीसच तुझे हात दाबणार बघ' असे ती त्याला फणकार्याने म्हणाली. त्यावर तो पान खालेल्ल्या लालभडक तोंडातून किनर्या आवाजात हसत 'मोहतरमा बडी दिलचस्प बाते करती है.... हॅ हॅ हॅ' म्हणत राहिला. मग बाजुला बसलेल्यांपैकी आपाची कोणी थोराड मैत्रिण आपाला चिमटे काढून खुसफुसत बोलली.. 'मोठी नाजूक आहेस गं तू.. मियांने हात पकडल्यावर काय करशील?' आणि मग मांजरी ने फिसकारल्या सारख्या आवाजात आपाच्या सगळ्या मैत्रिणी हसत बसत.
ईनायत चुडीवाल्याच्या पायर्यांजवळ पावसाच्या पांढर्याशुभ्र छत्र्या ऊगवल्या होत्या. मला तर आत्ताच्या आत्ता शबनम मधली रंगपेटी काढून त्या छ्त्र्यांना निळे पिवळे, गुलाबी रंगवून टाकावेसे वाटत होते. ईनायतपासून ऊजवीकडची पुढे गेलेली लाल मातीची एकांडी वाट मात्र शाळेकडेच जाते, त्या वाटेवर दुसरे काहीच नाही. वाटेच्या दोन्ही बाजुंना केळीची ऊंच झाडं तेवढी डोलत होती. पाऊस पडून गेला की निहालगंज अगदीच बदलून जाई.. रात्रीतून अल्लामियाने ऊचलून आपल्याला एका दुसर्याच हिरव्यागार गावात नेऊन ठेवले आहे असे वाटावे ईतके. मला तर ही शाळेची सगळी वाट खूपच आवडली.
नवी शाळा माझ्या जुन्या शाळेपेक्षा मोठी तर होतीच, आणि वर्गात बसण्यासाठी सतरंजी नसून लांब बाके होती. मला तर खूपच आवडला हा बाकांचा प्रकार. मला वर्गात सोडून दादाजान निघाले तेव्हा मला ते आताशा पाठीतून जास्तच वाकलेले दिसले. काठी टेकत वर्गासमोरच्या व्हरांड्याच्या पायर्या ऊतरणारी त्यांची पाठमोरी आकृती दूर जाऊ लागली तसे मला वाटले आता मला रडायला येणार. 'तुम्ही मला घ्यायला येणार ना?' मी ओरडून विचारले पण त्यांना ते ऐकूच गेले नाही. आताश्या त्यांना ऐकूही फार कमी येते. माझे डोळे खरच पाण्याने भरून आले होते.
सगळ्या बाकांवर तीन-तीन मुली आपापसात गप्पा करीत बसल्या होत्या पण खिडकीजवळाच्या बाकावर मात्रं एकजण एकटीच होती. मला वाटले तिला कोणी मैत्रिणी नसाव्यात किंवा कोणाला तिच्याजवळ बसायला आवडत नसावे. शेवटी कुठेच जागा न दिसल्याने मी निमुटपणे तिच्या बाजूला बाकाच्या एका कोपर्यावर जाऊन बसले. ती मात्र गाणं गुणगुणत वहीत नक्षी काढण्यात ईतकी गुंगून गेली होती की तिने माझी दखलही घेतली नाही. मी सुद्धा मग तिच्याशी काही न बोलता वर्गातल्या नव्यानेच रंगवलेल्या भिंती आणि ईतर मुलींकडे बघत बसले.
अचानक ती म्हणाली... 'तुझे नाव काय गं बिस्किट?'.... ना तिने नजर वळवून माझ्याकडे बघितले होते ना तिचा नक्षी काढणारा पेन थांबला होता. पण तिचा आवाज एवढा नाजूक आणि मंजूळ होता की तो ऐकून मला एकदम गारेगार वाटून थंडीच वाजली. तो तिचा आवाज होता की खिडकीतून आलेली पावसाळी हवेची लाट.... शहारेच आले माझ्या अंगावर.
'निलोफर काझी... आणि तुझे?
'तरन्नूम शेख' पुन्हा तोच नाजूक आवाज पण ह्यावेळी थंडी न वाजता दूरवरून येणार्या नाजूक घंटीच्या आवाजाने कानात रुंजी घातल्यासारखे वाटले.
'मला बिस्किट का म्हणालीस गंं?' मी डोळे मोठे करून विचारले खरे पण तिच्या आवाजाने अजूनही मला कानात गुदगुल्या होत होत्या.
'अगं मग काय.. तू आलीस आणि मला एकदम बिस्किटं भाजल्याचा वास येऊन भूकच लागली बघ' ह्यावेळी माझ्याकडे बघत ती एवढं गोड हसली की बस्स! मला तर भई तिचा आवाज आणि तिचं गोड हसणं जामच आवडलं. अब्बू घरात आले की बेकरीच्या वासानं कशी भूक लागते आणि पोटात खड्डा पडतो ते मला चांगलंच ठाऊक होतं. पण माझ्या कपड्यांनाही तसाच वास येतो हे मला आजवर ठाऊकच नव्हते. तिचं मला बिस्किट म्हणणं ऐकून मलाही खरंतर राग न येता हसूच येत होतं. मी सांगितले तिला आमच्या घरचीच बेकरी आहे तर तिने सांगितले की शाळेजवळची 'ईब्राहिम आईस फॅक्टरी' तिच्या अब्बूंची आहे आणि फॅक्टरीमध्ये ते कुल्फीही बनवतात. मला माहिती आहे मोठी मशहूर आहे ईब्राहिम आईस फॅक्टरीची कुल्फी सार्या निहालगंजमध्ये.
तरन्नूमचे नाक ईतके नाजूक आणि धारदार होते की जणू कोणी चाकूने पनीरच्या गोळ्यावर कोरीव काम करून तिच्या चेहर्यावर चिकटवले आहे. तिचे केसही अगदीच रेशमी आणि कानात मंद हलत लकाकणारे छोटे डूलही होते.. मला वाटलं ते सोन्याचे असावेत. थोडक्यात ती माझ्यापेक्षा चौपट तरी सुंदर असावी आणि सहापट तालेवार. तेवढ्यात तास सुरू होण्याची घंटा झाली आणि माझ्याच ऊंचीची एक सवळीशी मुलगी धावतपळत वर्गात शिरली. तिच्या मागे आमच्या गणिताच्या कुरेशी मॅडमही लगोलग आल्याच. भांबावलेल्या नजरेने ईकडे तिकडे बघत ती मुलगी थेट माझ्याच बाजुला येऊन ऊभी राहिली. मला दोघींच्या मध्ये बसण्याची आजिबात ईच्छा नसल्याने मी बाजूला होत तिला आत जाण्यास वाट करून दिली. सगळ्यांचा कलमा पढून झाल्यावर कुरेशी मॅडमनी त्यांची ओळख करून दिली आणि लगेचच हजेरी सुरू केली. तेव्हा मला कळले की आमच्या बाकावरच्या तिसर्या मुलीचे नाव शमा बेग आहे. हजेरी घेणं संपलंच होतं तर तरन्नूम अचानक ऊभी राहून म्हणाली,
'मॅडम मला काही तरी सांगायचे आहे' झाडून आम्हा सगळ्या मुलींच्या माना कठपुतलीच्या दोर्या ओढल्यागत तरन्नूम कडे वळल्या.
'बोला मोहतरमा शेख.. काय सांगायचे आहे?' मॅडम त्यांचा चष्मा सारखा करीत म्हणाल्या.
'मॅडम माझ्या बाजूच्या मुलीच्या अंगाला माश्यांचा वास येतो आहे आणि मला तो सहन होत नाहीये' तरन्नूम तिच्या मंजूळ आवाजात ईतक्या शांतपणे म्हणाली की मला कळलेच नाही ती तक्रार करते आहे की कौतुक. ईतक्या गोड आवाजात तक्रारही करता येते? . मला आजिबात असा कुठला वास शेजारच्या मुलीच्या अंगाला येत नव्हता. मी तिच्याकडे बघितले तर ती एकदम खजील होत मान खाली घालून बसली होती.
'हो का? मग आता काय बरं करावं आपण?, मोहतरमा काझी, तुमचे काय म्हणणे आहे ह्यावर? तुम्हाला येतो आहे का वास?' माझं नाव ऐकून क्षणभर मी दचकलेच, मला वाटलं माझ्याच हातून काही चूक घडली की काय?
माझे लटपटते पाय सावरत, ऊठत मी म्हणाले 'नाही मॅडम, मला नाही येत आहे माश्यांचा वास!'
'अरे वा! मग प्रश्नच सुटला! आता आपण असे करू या, मोहतरमा काझी तुम्ही बसा मोहतरमा शेखच्या बाजूला आणि मोहतरमा बेग तुमच्या बाजुला बसतील. ठीक आहे! चला सगळ्यांनी आपापली किताब काढा पाहू'... आणि मॅडमनी एका क्षणात आमच्या बाकावरची नजर हटवत पूर्ण वर्गावरून फिरवली. जणू त्यांच्या दृष्टीने त्यांनी हा प्रश्न कायमसाठीच निकाली काढला होता. मला फार म्हणावेसे वाटत होते की मला नाही दोघींच्या मधे बसायचे पण माझी हिम्मतच झाली नाही काही बोलायची, मी निमुटपणे जागा बदलून दोघींच्या मध्ये जाऊन बसले. मला एवढा राग आला होता की कुल्फीवालीचे पनीर कोरून चिकटवलेले धारदार नाक कापूनच टाकावे वाटले. मी रागाने चरफडत तिच्याकडे बघितल्यावर ती माझ्याकडे बघून एवढं गोड हसली की अम्मीने बनवलेल्या पनीर पसंदाच्या तोंडात विरघळणार्या तुकड्यासारखा तो राग कुठे विरघळून गेला कळलेच नाही. कुल्फीवालीचे माझ्याशी आणि मी तिच्याशी वागण्याचे तंत्र काही मला ऊमगतच नव्हते आणि त्या तिसर्या मुलीसाठी मात्र मला वाईट वाटत होते. तास संपल्यावर तिच्याशी बोलायचे मी ठरवले.
गणिताचा पहिला तास संपला तरी ती तिसरी मुलगी न हसता मान खाली घालून बसली होती. मी तिला हळूच खालच्या आवाजात म्हणाले 'मला नाही येत हो कुठला माश्यांचा वास' तशी ती एवढे छान हसली की तिचे मेणासारखे गुलाबी ओठ थेट दोन्ही कानांना जाऊन टेकले आणि नाकातली चमकी लक्खकन चमकली. माझ्या ऊजवीकडून पुन्हा तोच मगाचा मंजूळ आवाज आला... 'ए पापलेट! माफी दे दे यार! मी असं करायला नको होतं, पण मला खरच पापलेटचा वास आला. जाऊ दे आता काही मसला नाही, बिस्किटांचा वास आवडतो मला' ती डोळ्यांच्या कोनातून भुवया ऊडवत माझ्याकडे बघत मिष्किल हसत म्हणाली. तिच्या भुवया केवढ्यातरी नक्षीदार कोरल्या होत्या. मला मात्र कुल्फीवालीचा पुन्हा रागच आला. मी तिला रागातच म्हणाले, 'ही पापलेट, मी बिस्किट आणि मग तू कोण कुल्फी?'
तर ती पटकन डोळे मोठे करीत म्हणाली 'माशाल्ला वा! काय अतरंगी नावं आहेत नाही आपली, कुल्फी, बिस्किट आणि पापलेट... सुभानअल्ला!'
आणि पुन्हा आमच्या दोघींकडे बघून कोकराच्या गळ्यात हलणार्या घंटीसारखं किणकिणत हसत राहिली. मग शमाला काय झाले काय माहित तीही तिच्याबरोबर दात काढत फिदीफिदी हसायला लागली.
मी विचारलं मग शमाला, आवडेल कोणी असं तुला पापलेट म्हंटलेलं? ही कुल्फी सगळ्या मुलींना असेच विचित्र काहीतरी म्हणाली असणार म्हणूनच तिच्या बाजुला कोणी बसत नाही वाटते'
तर शमा खांदे ऊडवत म्हणाली, 'हे हे...पापलेट ठीकच आहे... आमच्या घरी पापलेटं आणि दुसरे मासे चिक्कार असतात विकायला. माझे अब्बू किनार्याच्या गावाला जाऊन घेऊन येतात टोपल्या भरून मासे. मग ते मासे मी आणि माझ्या बहिणी मीठ लाऊन बर्फात घालून लाकडी पिपांमध्ये भरून ठेवतो आमच्या तळघरात. पापलेट मात्र मीच भरते कुणा म्हणजे कुणाला हात लाऊ देत नाही माझ्या पापलेटना... ही ही'
तशी कुल्फी पुन्हा म्हणाली, 'बघ बिस्किट, माझं नाक कधीच मला दगा देत नाही... मी म्हंटलं नव्हतं तिच्या कपड्यांना पापलेटचा वास येतो म्हणून'
आणि फ्रॉकची कॉलर ताठ करत आपली नाजूक मान तिने अशी काही ऊडवली की मलाही फिस्सकन हसायला आलं. मलाही मग आवडलीच आमची नवीन नावं 'कुल्फी, बिस्किट आणि पापलेट'
मग कुल्फी, 'ती पुढून चौथ्या बाकावर डावीकडे बसलेली मुलगी आहे ना तिच्या अंगाला पिकलेल्या केळ्यांचा वास येतो तिच्या अब्बूची केळीची बाग असणार.....ती पिवळ्या रिबिनवाली, तिच्या अंगाला लहान मुलीच्या लाळेचा वास येतो, तिच्या घरी एकतरी लहान बाळ असणार.... ती लांब वेण्यांवाली, तिच्या अंगाला बकरीच्या दुधाचा वास येतो आणि तुम्हाला सांगते ती शेवटच्या बाकावरची ऊंच मुलगी आहे ना तिच्या अंगाला तर शराबचा हलकासा दर्प येतो... तिचे अब्बू नक्की तळघरात शराब घोटत असणार बघाच तुम्ही'. असे काहीबाही बोलत राहिली, शेवटचे वाक्य ती तोंडावर हात ठेवत ईतक्या दबक्या आवाजात म्हणाली की मला एकदम ती दरोगाने आमच्या शाळेत नेमलेली जासूस आहे की काय असेच वाटले.
नव्या शाळेत, ह्या वर्गात, कुल्फी आणि पापलेटच्या मध्ये मी मात्र जामच खुष होते. दूरवरून येणार्या थंड हवेच्या लाटांवर हलकेच स्वार होऊन मंदिराच्या घंटीसारखा कानात कायम किणकिणारा कुल्फीचा आवाज, शमाच्या सावळ्या चेहर्यावरती दोन्ही कानांपर्यंत पसरलेलं तिचं हसू आणि हसतांना फुग्यांसारखे वर येणारे तिचे मेणापरीस मुलायम गाल, कुरेशी मॅडमचा चष्मा, पिवळ्या रिबिनी मला सगळंच प्रचंड आवडलं होतं. मला ईथे पाठवल्याबद्दल मी मनातल्या मनात अल्लामियाला कितीदा तरी शुक्रिया अदा केला.
----क्रमशः
छान झालीय सुरुवात. पुभाप्र.
छान झालीय सुरुवात. पुभाप्र.
छान झालीय सुरुवात. पुभाप्र.
डबल पोस्ट
मस्त! खूपच वेगळी आणी गंमतशीर
मस्त! खूपच वेगळी आणी गंमतशीर वाटली. छान सुरुवात आहे.
हाय अल्ला ... अरे कसलं जादुई
हाय अल्ला ... अरे कसलं जादुई लिहिलंयस! त्या दुनियेत घेऊन गेलास लगा. ती भाषा, लहान मुलीच्या नजरेतले निरागस खट्याळ भाव. मझा आ गया. लिही लिही पुढे ...
ए किती मस्तय हे....खूप आवडलं.
ए किती मस्तय हे....खूप आवडलं.....
वाह खुप छान लिहलं आहेस...
वाह खुप छान लिहलं आहेस... मनापासुन आवडलं लिखाण.
वाह! मस्तच! आफ़रीन!
वाह! मस्तच! आफ़रीन!
सुरवातीला वेगळाच सुर लागला होता. पण काय सुंदर लिहिलय. शाळेचा रस्ता तर मस्तच!
पुढील भाग लवकर.
मस्त! पुभाप्र.
मस्त!
पुभाप्र.
मस्त लिहिलंय. वेगळ्याच जगात
मस्त लिहिलंय. वेगळ्याच जगात गेल्यासारखं.
आहा! किती गोड सुरुवात
आहा! किती गोड सुरुवात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माशाल्ला! बहोत खूब, मस्त
माशाल्ला! बहोत खूब, मस्त लिहिलंय. बारीक सारीक निरिक्षणं, व्यक्तिरेखा एकदम चित्रदर्शी. मला तर मजमुआचा किंवा ऊदाचा वासही आला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लंपनची मुस्लिम बहीण जणू कुंडलकरांच्या 'गंध' मधे मलाही घ्या म्हणत्येय असे काहीतरी मॅड सारखे वाटतंय.
हाब, लोभसवाणे लिहिले आहात,
हाब, लोभसवाणे लिहिले आहात,
आवडले
कृपया यात पुढे दंगे, ताटातूट , जबरदस्ती निकाह, वगैरे प्रकार असतील तर आत्ताच सांगा, मी वाचणे थांबवतो
सुरुवात अगदी गोड झालीये.
सुरुवात अगदी गोड झालीये.
आवडेल वाचायला.
मस्त डिटेलिंग, खुप आवडली कथा.
मस्त डिटेलिंग, खुप आवडली कथा. फक्त क्रमशः नका लिहु हो, पुढचा भाग येईपर्यंत रहावत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख!
सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिर्षक "मटरु की बिजली का
शिर्षक "मटरु की बिजली का मन्डोला" किंवा "सोनु के टिटु की स्विटी" यापासुन इन्स्पायर झाल्यासारखं वाटलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरचं हि लंपनची बहिण वाटली..
खरचं हि लंपनची बहिण वाटली... खुप खुप आवडली लेखनशैली... _/\_
मस्त लिहिलेय पुभाप्र
मस्त लिहिलेय
पुभाप्र
मस्तच, आवडला हा भाग...
मस्तच, आवडला हा भाग...
पु.भा.प्र.
बहुत दिनोंके बाद चमन-ए-कहानी
बहुत दिनोंके बाद चमन-ए-कहानी खिल गया है| मजा आ गया|
पण मला या गोष्टीला कल्चरल शॉकचा वास येतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती गोड आहे गोष्ट !
कित्ती गोड आहे गोष्ट !
Chanach aahe kulfi biscuit
Chanach aahe kulfi biscuit paplet......
खूप छान लिहिलंय
खूप छान लिहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! खूपच वेगळी आणी गंमतशीर
मस्त! खूपच वेगळी आणी गंमतशीर वाटली. छान सुरुवात आहे.>>>+१
खूप छान सुरुवात हाब!! पुढिल
खूप छान सुरुवात हाब!! पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
किती गोड! किती निरागस!
किती गोड! किती निरागस!
या गोष्टीला किंचितसंही वाईट वळण लागू नये! तिच्यातली निरागसता शेवटपर्यंत अशीच रहावी!
पूनम अगदी.
पूनम अगदी.
मलाही हे गोगोड वाचल्यापासुन उगीच जीवाला लगलंय की पुढे काही वाईट वळण येइल ह्या कथेत.
तसं होउ नये.
पुढील भाग लवकर येऊ द्या. ती
पुढील भाग लवकर येऊ द्या. ती हल्ली एक सिरीयल लागते स्टार प्लस वर मॅरियम खान रिपोर्टींग अगदी त्या सिरीयल चा एपिसोड पाहते आहे असे वाटले वाचून.
ए..! मस्स्त सुरुवात एकदम !
ए..! मस्स्त सुरुवात एकदम ! खूपच वेगळी आणि निरागस दुनिया !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेणासारखे गुलाबी ओठ > हे विशेषण आवडलं
त्या कुल्फी ला एवढे सगळे वास लगेच ओळखू येतात हे बघून मला मीच तिच्या जागी आहे कि काय असं वाटायला लागलं खरं तर !
माझं हिंदी /उर्दू फार पाणी भरत नसल्याने मला १-२ प्रश्न आहेत कुणाला माहित असेल तर सांगा
सगळ्यांचा कलमा पढून झाल्यावर .. >> कलमा म्हणजे काय ?प्रार्थना का ?
मला एकदम ती दरोगाने आमच्या शाळेत नेमलेली जासूस आहे .. > यातलं दरोगा म्हणजे कोण?
आता पुढच्या भागाची आतुरता आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान लिहिलंय! पुभाप्र!
खूप छान लिहिलंय!
पुभाप्र! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages