गझल - तू तरी

Submitted by बेफ़िकीर on 23 July, 2018 - 00:20

गझल - तू तरी
========

सोडू नको माझ्याकडे येणे नि जाणे तू तरी
दु:खा नको वागू असा दुनियेप्रमाणे तू तरी

माझी गझल वाचून जर सुचते गझल कायम तुला
जमल्यास चालवशील का माझे घराणे तू तरी

आधी जसा होतो तसा होऊ कसा मी सांग ना
आहेस कोठे राहिली आधीप्रमाणे तू तरी

"आलास या बाजूस तर येऊन जा माझ्या घरी"
काढू नको भेटायचे फुसके बहाणे तू तरी

पडलो तरी वर नाक ही साऱ्या जगाची भूमिका
वाटून का घेतोस मग ओशाळवाणे तू तरी

होता तसा तो चांगला, मी हात ज्याचा सोडला
कोणीच नाही गात.... गा हे खिन्न गाणे तू तरी

भिरकावले होते जगाने 'बेफिकिरला' ठरवुनी
का आणते आहेस हे चलनात नाणे तू तरी

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल छान आहे..!
पण सध्या गझलेतून नेहमीच उदास सूर जाणवतो..!

सूंदर ,

आधी जसा होतो तसा होऊ कसा मी सांग ना
आहेस कोठे राहिली आधीप्रमाणे तू तरी..

वाह

"आलास या बाजूस तर येऊन जा माझ्या घरी"
काढू नको भेटायचे फुसके बहाणे तू तरी

हेही छान , इथे ' भेटायचे' ऐवजी 'टाळायचे' असे चालले असते का ? , कारण पहिल्या ओळीतच भेटणे ओघाने येत आहे ,
असो ....
गझल आवडली

सोडू नको माझ्याकडे येणे नि जाणे तू तरी
दु:खा नको वागू असा दुनियेप्रमाणे तू तरी

आधी जसा होतो तसा होऊ कसा मी सांग ना
आहेस कोठे राहिली आधीप्रमाणे तू तरी

हे दोन्ही खास!