तीन क्रीडारत्न

Submitted by भागवत on 22 July, 2018 - 01:26

मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.

“हिमा दास” हिने IAAF संघटनेच्या वीस वर्षा खालील ४०० मीटरच्या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन स्वर्ण पदकाची कमाई केली. तिने पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे. तिने टेम्पेरे फिनलंड इथे ही कामगिरी साकारली. हिमा दासने ४०० मीटर पार करण्यासाठी फक्त ५१.४६ सेकंद घेतले. तिची कामगिरी ही ऐतिहासिक तर आहेच पण भारतीयांना अभिमानास्पद वाटणारी आहे. त्यासाठी हिमा दास यांचे मनापासून अभिनंदन.

पदक स्वीकारण्या अगोदर राष्ट्रगीताची धून लावली गेली त्यावेळेस हिमा दासचे हृदय उचंबळून आले आणि तिने स्वत: राष्ट्र गीत म्हणता-म्हणता तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन अश्रु रूपाने प्रकट झाले. ज्या देशासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या भारत देशासाठी आपण काहीतरी करू शकलो ही कृतज्ञता वाटली. साधे पण परिणामकारक वर्तन फक्त एक संवेदनशील मनुष्यच करू शकतो. आपल्याला प्रेक्षा ग्रहात राष्ट्रगीत ऐकायला त्रास होतो. एक खेळाडू म्हणून तिने वेगळीच उंची गाठली आहे पण माणूस म्हणून तिचे वेगळेपण तिने सिद्ध केले आहे. तिच्या वागण्यातून तिने एक सशक्त आणि राष्ट्राभिमानी खेळाडूची वाटचाल होत आहे हे दाखवून दिले. हिमा दासला माझा सलाम.

"किलीअन म्बाप्पे" या तरुण, तडफदार, युवा आणि 19 वर्षीय खेळाडूने फुटबॉल विश्व चषकावर नाव कोरले. त्याची चपळाई वाखाणण्या जोगी आहे. तो चित्त्याच्या चपळाईने विरुद्ध संघावर आक्रमण करतो. आलेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करतो. तो फुटबॉलच्या क्षितिजावर उभरता सितारा आहे. त्याने विश्व चषकात खेळताना पेले सारख्या महान खेळाडूचा कित्ता गिरवत त्यांच्या काही पराक्रमाची बरोबरी केली आहे. नेमार, रोनाल्डो आणि मेस्सी यांच्या समोर दमदार कामगिरी करून आपण येणार्‍या भविष्य काळातील सितारा आहोत हे सिद्ध केले आहे. मला त्याची एक गोष्ट खूप आवडली त्याने तो एक सर्वोत्तम खेळाडू आहे हे तर सिद्ध केलेच पण माणूस म्हणून सुद्धा श्रेष्ठ आहे हे सुद्धा सप्रमाण दाखवले. त्याने विश्व चषका मध्ये मिळालेली सगळी रक्कम आणि कमाई जवळपास २३ करोड रुपये मदत म्हणून केली आहे. Preiers de Cordees association या संस्थेला त्यांनी ही मदत दिली आहे. तो काही जन्मजात श्रीमंत नाही. या गुणी खेळाडूचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने खूप कष्ट सोसून फ्रान्स संघात स्थान मिळवले आहे. त्याला “फिफा युवा खेळाडू पुरस्कार” प्राप्त झाला. आणि सर्वात युवा खेळाडूने विश्व चषकात गोल करून पेले यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.

“नोवाक जोकोविच” या एकतीस वर्षीय सर्बिअन खेळाडूने तेरावे ग्रँड स्लॅम जिंकले. या गुणवान खेळाडूने आत्ता पर्यंत १३ ग्रँड स्लॅम, ५ ATP फॉयनल, ६ ऑस्ट्रेलिया ओपन, २ अमेरिका ओपन, १ फ्रेंच ओपन आणि इतर बऱ्याच काही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविच हा सर्वोत्तम टेनिसपटू मधील एक खेळाडू म्हणून गणला जातो. तेरावे ग्रँड स्लॅम जिंकल्या नंतर त्याने एक भावनिक आणि हृदयस्पर्शी पोस्ट केली. आपल्याला स्वत:चे गुणगान करायला आवडते पण आपण आपल्या चुका जगजाहीर करत नाही. त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या जीवनातील कुटुंब, दुखापत आणि टेनिस बद्दल प्रेरणादायी पोस्ट लिहिली आहे. या खेळाडूच लग्न झाल्या नंतर त्याला कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव झाली. दुखापत झाल्यानंतर स्वत:च्या दोषाची आणि गुणाची उजळणी यांचा लेखाजोखा त्याने मांडला आहे. त्यावर जबरदस्त मात करून त्याने यशस्वी पुनरागमन केले आहे. असे करून या खेळाडूने सगळ्याचं मन जिंकलं आहे.

“हिमा दास” download.jpg
"किलीअन म्बाप्पे" Mbappe.jpg
“नोवाक जोकोविच” novak.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हिमा दासचे खूप कौतुक वाटले. तिच्या हातून चांगली कामगिरी घडणार हा विश्वास तिच्या धावण्यातून मिळतो.

बाकी फिनलंडला ती पहिली रेस धावली तेव्हाच तिथल्या सगळ्यांना कळले, नवी स्टार जन्माला येतेय. फायनलला धावायच्या आधी तिचा उल्लेख we will be watching her म्हणून केला गेला. ती धावायच्या आधीच आज भारताच्या भाग्यात नवा इतिहास लिहिला जाणार हे सगळ्या समालोचकांना माहीत होते. कामगिरीतले सातत्य बघून डोळे दिपले.

तिच्या मातृभूमीत मात्र तिचा कोच वगळता कुणालाही काहीही नाहीत नव्हते, माहीत करून घेण्यात रस नव्हता.

प्रतिसादा साठी धन्यवाद साधना!!! भारतीयांना क्रिकेट शिवाय जाणून घेण्यात काहीच रस नाही. २ दिवसा खाली बातमी आली होती की "हिमा दास"ला पदक मिळाल्या नंतर भारतीय लोक गुगल वर तिची जात शोधात होते. काय मानसिकता आहे. कौतुक सोडून वेगळेच काही तरी शोधले जात आहे.

हिमा दास चे सुवर्णपदक खरोखरच ऐतिहासिक आहे. धावण्याच्या स्पर्धेत ट्रॅक वर सुवर्ण पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला नव्हे पहिली भारतीय व्यक्ती आहे. तिचे मनपूर्वक अभिनंदन आणि तिच्याकडून खूप अपेक्षा ही आहेत.
सगळे म्हणतात त्याप्रमाणे मेडल सिरेमनी ला तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू म्हणजे राष्ट्राभिमान आणि ज्या देशासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या भारत देशासाठी आपण काहीतरी करू शकलो ही कृतज्ञता .
एका खेळाडूच्या मनात हे असतेच. किंबहुना अशा मोठ्या स्पर्धातून उतरायचे तर यासाठी कंडिशनिंग पण होते, व्हावे लागते.
पण हे अश्रू म्हणजे त्याहीपेक्षा जास्त काही असते. भारतात खेळाडूंना मिळणारी उपेक्षा आणि ज्या परिस्थितीतुन हे खेळाडू वर येतात त्यांनीं आणि त्यांच्या घरातल्यानी ही खूप त्याग केले असतात. आर्थिक विवंचनेत खेळ कसा करायचा हा महातप्रश्न असतो. सर्वोच्च पदी पोचून राष्ट्रगीत वाजते तेव्हा या सगळया गोष्टी तिला आठवल्या असणार. आपल्या आई वडलांचे , कोच चे आणि स्वतःचे कष्ट आठवून त्याचे सार्थक झाले असे वाटले असणे जास्त स्वाभाविक आहे.

मनू भाकेर आणि नीरज चोप्रा हे ही या लिस्ट मध्ये हवे होते.

धन्यवाद सावली!!! आपला प्रतिसाद मला नक्कीच उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!
मनू भाकेर आणि नीरज चोप्रा हे ही या लिस्ट मध्ये हवे होते. >> +१ मी नक्कीच प्रयत्न करेन यांच्या बद्दल माहिती मिळवण्याचा आणि त्यांच्या लिहिण्याचा प्रयत्न करेन.
आपल्या आई वडलांचे , कोच चे आणि स्वतःचे कष्ट आठवून त्याचे सार्थक झाले असे वाटले असणे जास्त स्वाभाविक आहे. >> +१

उत्तम लेख, भागवत..
अजून काही खेळाडूंच्या बद्दल माहिती दिली तर अजून छान वाटेल--- +११११

धन्यवाद हिम्सकूल आणि मेघा. !!! आपला प्रतिसाद मला नक्कीच उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!
अजून काही खेळाडूंच्या बद्दल माहिती दिली तर अजून छान वाटेल--- +११११ - मनू भाकेर आणि नीरज चोप्रा ही दोन नाव सुचवली आहेत. मी प्रयत्न करेन त्यांच्या आणि इतरा बद्दल लिहिण्याचा. धन्यवाद!!!