रम्य होते दोन डोळ्यांचे तळे

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 June, 2018 - 20:58

लावले होतेस तू जे सापळे
फारसे नव्हते जगाहुन वेगळे

पोहता येते तरी बुडले खरी !
रम्य होते दोन डोळ्यांचे तळे

पेरली होतीस ना माणूसकी ?
बहरले आहेत द्वेषांचे मळे

केवढे होते निळे आकाश हे
केवढे झाले अचानक सावळे

कारणाविण नेहमी भेटायचो
कारणाविण होत होते सोहळे

रंग गालांचा गुलाबी व्हायचा
आठवांचे मेघ होता जांभळे

तोवरी अप्रूप वाटत राहते
भावनांचे कोंब जोवर कोवळे

भूक रस्त्यावर पुन्हा आणेल ही
ओरडाया लागले की कावळे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरचं सुंदर !!!!

पोहता येते तरी बुडले खरी !
रम्य होते दोन डोळ्यांचे तळे >>> हा विशेष आवड्ला

तळे,मळे,सावळे,कोवळे... क्या बात!
>>>पोहता येते तरी बुडले खरी !
रम्य होते दोन डोळ्यांचे तळे>>>खासंच!

व्वा ! Happy
पोहता येते तरी बुडले खरी !
रम्य होते दोन डोळ्यांचे तळे >>>
+१

वाह!

लावले होतेस तू जे सापळे
फारसे नव्हते जगाहुन वेगळे

पोहता येते तरी बुडले खरी !
रम्य होते दोन डोळ्यांचे तळे

पेरली होतीस ना माणूसकी ?
बहरले आहेत द्वेषांचे मळे

हे खास!!