गुरुवर्य निंबाळकरसरांनी एका ठिकाणी म्हटले आहे की योग हा रेडिमेड नको तर टेलर मेड हवा. अर्थ सरळ आहे. आपली शारीरिक, मानसिक, भावनिक गरज, वय, लिंग आणि क्षमता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपला योगाभ्यास ठरवायला हवा आणि त्यासाठी योगशिक्षकाची मदत घ्यायला हवी. दोन सारख्याच वयाच्या व्यक्तींचा योगाभ्यास पूर्णपणे निराळा असू शकतो. आणि हे कसे केले जाते याचे आदर्श प्रात्यक्षिक मी अनेक वर्षे आमच्या दादर हिंदू कॉलनीच्या योगवर्गात पाहिले होते. तेथे आमचे टेंबे सर जे या जुन्या स्कूलमधून तयार झाले होते ते योग शिकविण्यासाठी येत. येऊन शांतपणे कोपर्यात बसून सगळ्यांचे बारकाईने निरिक्षण करीत असत. त्यांचे सहकारीदेखिल तसेच. कुणी काही चुकीचं करत असल्यास हळूच त्याच्या जवळ जाऊन सुधारणा करीत. नवीन आलेल्या विद्यार्थ्याला योगाची तोंडओळख टेंबेसर करून देत. काही आसने शिकवत. योगाची चित्रं असलेला चार्ट तयार असे. वय, आजार, शरीराची लवचिकता पाहून प्रत्येकाला वेगळी आसनेदेखिल शिकवली जात. विद्यार्थ्याची प्रगती पाहून त्याला प्रगत आसनांची ओळख करून दिली जात असे. त्याला दिवस अथवा महिन्यांचे बंधन नसे. क्वचित आठवड्यातून एकदा टेंबे सर फक्त शवासनाचा एकत्र सराव घेत. एरवी योगाभ्यास करणारी मंडळी वर्गाला येत. आपापले टॉवेल अंथरून बसत आणि स्वतःच्या सरावाला सुरुवात करत. निरनिराळे आजार असलेली माणसे वेगळी आसने करताना दिसत. सराव संपल्यावर शांतपणे शवासन करीत आणि निघून जात. वर्गात योगाला अत्यावश्यक असलेली आणि हवीहवीशी वाटणारी शांतता पसरलेली असे.
त्यानंतर मी आणखी एक वर्ग काही वर्षे पाहिला तेथे चित्र संपूर्णपणे या उलट होते. सर्व माणसे ठराविक वेळेला जमत. ती एक "बॅच" असे. तासभर ग्रूप प्रॅक्टीस घेतली जात असे. तासभर योगशिक्षकाच्या तोंडाचा पट्टा सुरु राही. या जमावात सोळा वर्षाच्या तरुण तरुणीपासून ते सत्तरीच्या वृद्धांपर्यंत सर्वांचाच भरणा असे. जरा कठिण आसन घेतले की ही वयस्क मंडळी स्वस्थ बसून राहात. कुणाला काय आजार आहे त्याला आपण सांगितलेली आसने जमतात की नाही, तो करत असलेल्या आसनांनी आजार वाढणार तर नाही अशासारख्या विचारांना येथे थारा नव्हता. कारण आसने करण्याआधी ती कुठले आजार असलेल्यांनी करु नये हे एकदा सांगितले जात असे. मग जबाबदारी तुमची. येथे पुढचे आसन शिकवायचे म्हणजे सर्वांना एकदमच. मग त्यांचे वय क्षमता काहीही असो. ज्यांना जमत नाही त्यांनी करु नये किंवा आधीचे सुलभ आसन करावे असा मामला होता. माणसे योगवर्गाला आली आणि योगशिक्षकाने जर त्यांचा सराव सुरु केला नसेल तर नुसती बसून राहात. कारण स्वतःचा सराव स्वतःच करण्याची पद्धत त्यांना माहितच नव्हती किंवा त्यांना या पद्धतीने शिकवले गेलेच नव्हते. ही माणसे संपूर्णपणे योगशिक्षकावर अवलंबून होती.
आज अनेक वर्षांनी या पद्धतीतले दोष मला स्पष्टपणे दिसत आहेत आणि ही पद्धत योगाचा अभ्यास करणार्यासाठी घातक आहेच पण एकंदरीत योगविद्येच्या प्रसार प्रचारासात देखिल अत्यंत चुकीचा पायंडा पडणारी आहे असे माझे ठाम मत झाले आहे.
पुढे जाण्याआधी हे सांगितलेले बरे की योगवर्गात जाण्याविरुद्ध मी नाही. योगवर्गाचे स्वतःचे असे इतके फायदे असतात की योगाचा अभ्यास करायचा असेल त्याने शक्य तोवर सुरुवातीला तरी काही वर्षे योगवर्गात अभ्यास करावा. याचे कारण तेथे योगाच्या सरावासाठी पोषक असलेले वातावरण. अशी मोकळी जागा आणि शांतपणा प्रत्येकाला आपल्या घरी मिळेल याची खात्री नसते. आसने करताना कळत नकळत आपल्या हातून चुका होत असतात. आपल्याला ऑबझर्व करणारा योगशिक्षक त्या चुका सुधारत असतो. विद्यार्थ्यालादेखिल काही शंका असू शकतात त्यांचे निरसन तत्काळ घडते. आपल्याला काही दुखणी खुपणी असतील तर त्या संदर्भात आपला योगाभ्यास कसा असावा याचे सातत्याने मार्गदर्शन हे योगवर्गातून मिळू शकते. आजुबाजूला शांतपणे योगाभ्यास करणारी माणसे ही आपल्यालाही योगाभ्यास करण्यास नकळत उद्युक्त करीत असतात. आपला उत्साह त्यामुळे वाढतो. असे योगवर्गाचे असंख्य फायदे आहेत. प्रश्न आहे तो तेथे जाऊन कुठल्या पद्धतीने योगाभ्यास करावा याचाच.
ग्रूप प्रॅक्टीसचे निरिक्षण केल्यावर समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला या प्रश्नाकडे पाहावेसे वाटले आणि सर्वप्रथम मला जाणवले ते यामागील अर्थकारण. योगाचा विचार धंदा म्हणून सुरु झाल्यावर आपल्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील, आलेले विद्यार्थी कसे टिकून राहतील. आणि टिकलेले विद्यार्थी आणखी विद्यार्थी कसे आणतील याचा विचार होणे अपरिहार्य आहे. आणि त्या दृष्टीने माणसाला पांगळे करणारी ग्रूप प्रॅक्टीसची पद्धत अत्यंत सोयीची आहे असे मला वाटते. सोयीची आहे म्हणजे योग्य आहे असे नव्हे. येणार्यांना एका बॅचमध्ये कोंबावे. सर्वांना सुलभ आसने घ्यावीत म्हणजे कुणाचीच तक्रार राहात नाही. कुणालाच स्वतःची आसने स्वतः करण्याचे स्वावलंबन शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. अन्यथा ही माणसे "योगाक्लासवर" अवलंबून राहणार नाहीत. त्यापेक्षा तासाभराच्या सरावात शिक्षकाने पाय उचलायला सांगितला की पाय उचलावा, हात उचलायला सांगितला की हात उचलावा, मान वळवायला सांगितली की मान वळवावी. कोण दमेकरी आहे, कुणाला मधुमेह आहे, कुणाला संधीवात आहे, त्यांना त्या आजाराशी संबंधित अशी वेगळी आसने देता येतील काय याचा विचार करण्याची गरज काय? अशा पद्धतीने माणसे पूर्णपणे योगशिक्षकावर अवलंबून राहु लागतात आणि एक तर्हेने पंगु बनतात.
काहीजण यावर उपाय म्हणून वेळेची विभागणी ग्रूप प्रॅक्टीस आणि स्वतंत्र सराव अशा दोन भागात करतात. याचे परिणाम काय आहेत याची मला कल्पना नाही. मात्र संपूर्ण स्वतंत्र सरावाला ही पद्धत पर्याय असु शकत नाही असे माझे नम्र मत आहे. अनेकदा "लोकांना आजकाल हेच आवडतं" हे कारण दिलं जातं. मला वाटते ही कारण मीमांसा दोषपूर्ण आहे. योग माणसाला स्वावलंबन शिकवतो. जर लोकांना हेच आवडत असेल तर ते शिक्षकाने प्रयत्न करून बदलायला हवे असे मला वाटते. आज माणसाला बरेच काही फारशी शारीरिक मेहनत न करता आयते मिळत असते. यंत्रामुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. अशावेळी आपल्याला काय झेपते, आपल्याला कुठल्या तर्हेचा योगाभ्यास आवश्यक आहे, योगाच्या दृष्टीने आपल्या शारीरिक मानसिक गरजा काय आहेत हे आपले आपण ठरवायला नको का? त्यासाठी योगशिक्षकाची मदत जरूर घ्यावी. पण रोजच्या रोज ग्रूपमध्ये सामिल होऊन स्वतःची स्वतंत्र योगाभ्यास करण्याची ताकद घालवून बसु नये. याचा अर्थ सर्वच योगशिक्षक स्वार्थी आहेत असे समजणे चुकीचे ठरेल. पण कळकळीने योग शिकवणारे शिक्षक असले तरी योगतंत्राचा भाग म्हणून सांघिक पद्धतीचा विचार केला तर काय दिसते? एक तंत्राचा भाग म्हणून सुद्धा मला सांघिक पद्धतीत दोष आहेत असे वाटते. आसने करताना शरीरात कुठे ताण आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे शरीर शिथिल सोडावे. आसन लावल्यावर श्वासाकडे लक्ष असावे. यास प्राणधारणा म्हणतात. योगशिक्षकाचा आवाज वर्गात दुमदुमत असताना आणि त्याच्या सूचनांशिवाय एक पायही हालवण्याची सवय राहिली नसताना कसली प्राणधारणा आणि कसले काय? कारण करणार्याचे लक्ष तर त्याच्या सूचनांकडेच असणार. श्वासाकडे लक्ष जाणार केव्हा? मन आत वळणारच कसे?
बाकी एक सांगावेसे वाटते. ग्रुपमध्ये एकाच वयाचे, एकाच शारीरिक क्षमतेचे, कुठलीही दुखणी नसलेले, किंवा एकाच तर्हेचे दुखणे असलेले, सारखीच लवचिकता असलेले असे लोक जर असतील तर कदाचित ग्रुप प्रॅक्टीस घेता येईल. असा आदर्श ग्रूप मिळण्याची शक्यता अत्यंत अल्प आहे. कदाचित शाळेत किंवा कॉलेजात असा ग्रुप तयार होईलही. पण तरीही मला वाटते की अशा सरावात व्यायामाचे फायदे मिळतील. योगाचे मिळणार नाहीत. कारण त्यात मन आत वळावे लागते. जे ग्रुप प्रॅक्टीसमुळे कठिण आहे अशी माझी समजूत आहे. म्हणूनच आजच्या योगदिनाच्या दिवशी योगाच्या सर्व अभ्यासकांना शुभेच्छा देताना मला अयोग्य वाटणार्या सांघिक पद्धतीकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. घरोघरी योग, जागतिक स्तरावर योग अशासारख्या घोषणा दुमदुमत असताना योगाला अयोग्य असलेल्या या सांघिक सरावाच्या पद्धतीचे उच्चाटन झाले पाहिले असे मला वाटते.
अतुल ठाकुर
पटतंय.
पटतंय.
अगदी बरोबर, योग अभ्यास आणि
अगदी बरोबर, योग अभ्यास आणि सराव टेलरमेडच असायला हवा
लेख पटला.
खरंय!
खरंय!
ऊत्तम लेख. विचार पटले.
ऊत्तम लेख. विचार पटले.
मुद्दा पटला.
मुद्दा पटला.
लेख बराच पटला.
लेख बराच पटला.
बाबा रामदेव ने TV वर पाहून
बाबा रामदेव ने TV वर पाहून योगासने करायची साथ तळागाळात पसरवली (त्या आधी सुद्धा लोक करायचे पण प्रमाण खूप खूप कमी होते). अगदी प्राणायामा सारख्या क्रिया ज्या साधारणत: मार्गदर्शनाखालीच केल्या जातात त्या सुद्धा लोक TV वर पाहून लोक करू लागले.
आधीच सोपा दिसणारा प्रकार , एकदम सर्वसामान्यांच्या कह्यात आल्याने त्याचे रूप बदलणे अपरिहार्य होते
योगासने खूप त्रिवियालैझ करून प्रमोट केल्याने असे होत असेल का?
पॉवर योगा, हॉट योगा वगैरे सारखे fusion योगा प्रकार इंट्रोड्युस केल्याने योग अभ्यासातील गंभीरता निघून जात असेल का?
जर योग एक कमोडीटी म्हणून विकले जात असेल तर त्यात लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे चांगले वाईट बदल होणारच.
तेव्हा कालाय तस्मै नम: इतकेच म्हणणे आपल्या हातात आहे.
छान लेख. मुद्दा पटला.
छान लेख. मुद्दा पटला.
छान लेख, पटतंय सगळं
छान लेख, पटतंय सगळं
लेख पटला!
लेख पटला!
ऊत्तम लेख. पटतंय सगळं !
ऊत्तम लेख. पटतंय सगळं !
योग हा रेडिमेड नको तर टेलर
योग हा रेडिमेड नको तर टेलर मेड हवा. >>+१
लेख छान आहे. पटला.
माझ्या ओळखीत काही जणी अश्याच ग्रुप योगाला जातात. सकाळी लवकर उठून डबा, न्याहारीचे काम आटोपून योगा क्लासला जातात. लेखात सांगितल्याप्रमाणेच बॅच भरते, क्लास संपतो मग या महिला १५-२० मि. गप्पा मारत घरी जातात. आपला सकाळचा एक-दिड तास छान जातो, आपणही 'योगा' करतो म्हणून खूश असतात. त्यांच्यासाठी ती एक फक्त अॅक्टीव्हीटी असते. योगाभ्यासाशी त्याचा काहीही संबंध नसतो.
खूप जनरलायझेशन आणि अनेक
खूप जनरलायझेशन आणि अनेक पूर्वग्रदुषित निरिक्षणे आहेत असे वाटले.
पैसा हे एकमेव मोटिव असेल तर विषयच संपला.
पण ग्रूप क्लासेस घेणारे कळकळ असणारे योग शिक्षक नवीन अनुयायाशी सेशनच्या आधी आणि नंतर आठवडाभर संवाद ठेवतात त्यांच्या कडे पूर्ण सेशनभर लक्ष ठेवतात.. सूचना देतात... स्वतंत्र अभ्यास चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतात त्रास होत असल्यास, जड जात असल्यास दुसरे लाईट सेशन सुचवतात. योग शिक्षकाचे स्वतःचा स्वार्थ आणि मोटिवेशन काय आहे ह्यावर अभ्यासाचे फलित अवलंबून आहे.
चांगला डॉक्टर निवडणे हे जसे पेशंट आणि त्याच्या हितसंबंधीयांचे काम असते तसेच चांगला योग शिक्षक निवडणे अनुयायाचेच काम नाही का?
त्यासाठी ग्रूप सेशन पद्धतीला बोल लावण्याचे खरच काही कारण दिसत नाही.
वन ऑन वन ट्रेनिंग /
वन ऑन वन ट्रेनिंग / customized program चं महत्व मान्य करूनही मला असं वाटतं की ग्रूप सेशन चे / मास प्रॉडक्शन चे काही फायदे सुद्धा आहेत. 'योगा' चा जगभर प्रसार करण्यासाठी ह्या ग्रूप सेशन्स चा खूप उपयोग झाला. जागतिक पातळीवर ओळख लाभणं, मान्यता आणी प्रतिष्ठा मिळणं ह्याचे फायदे (आर्थिक, सामाजिक) खूप आहेत. ह्यातून काही देवाण-घेवाण होणं स्वाभाविक आहे. योगासनं हा प्रकार अशा collaboration मधून अधिकाधिक परिपक्व होऊ शकेल (मुन्नाभाई मधल्या सर्किट च्या भाषेत, 'ग्यान बाटनेसे बढता है' ).
मी तरी भारताचे तीनच आंतरराष्ट्रीय ब्रँड्स पाहिले आहेत - योगा, ताज आणी गांधी.
समुहात होणाऱ्या योगामुळे कमीत
समुहात होणाऱ्या योगामुळे कमीत कमी सराव तरी नियमित होतो. घरी एकट्याने सराव करताना तितकासा नियमित पणा राहात नाही, असा बर्याच जणांचा अनुभव आहे.
मी योग शिक्षक पदविका घेतली आहे आणि बरीच वर्षे योग - अभ्यास करतेय. एकूण अनुभव असे सांगतोय की, समुह शिक्षणामुळे योग शिकायला तरी लोक तयार होतात. योगाकडे वळतात. हळूहळू फायदा लक्षात आला, की मग योगाची आवड निर्माण होते.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सिम्बा तुमचे म्हणणे पटतेय. प्रतिसादाबद्दल आभार.
सोनाली, योगवर्गाचे "योगक्लब" मध्ये होणारे रुपांतर हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. प्रतिसादाबद्दल आभार.
योगासनं हा प्रकार अशा collaboration मधून अधिकाधिक परिपक्व होऊ शकेल
फेरफटका, तुमचं म्हणणं योग्यच आहे फक्त ते योगाशी तडजोड करून होऊ नये असं मात्र वाटतं.
योग दिना निमित्त शुभेच्छा..
योग दिना निमित्त शुभेच्छा..
हळूहळू फायदा लक्षात आला, की मग योगाची आवड निर्माण होते.>> +१
मि देखील योगा क्लास ला जाऊच योगासन शिकलो. आता मात्र घरीच नियमित पणे करतो.
पण ग्रूप क्लासेस घेणारे कळकळ
पण ग्रूप क्लासेस घेणारे कळकळ असणारे योग शिक्षक नवीन अनुयायाशी सेशनच्या आधी आणि नंतर आठवडाभर संवाद ठेवतात त्यांच्या कडे पूर्ण सेशनभर लक्ष ठेवतात.. सूचना देतात
माझ्या लेखातून ग्रूप प्रॅक्टीस घेणारे सर्वच योगशिक्षक स्वार्थी आहेत असा सूर निघत असेल तर ती माझी चुक मान्य करून मी थोडा बदल करतो. पुढील दोन वाक्ये तशी लेखात टाकली आहेत.
"सर्वच योगशिक्षक स्वार्थी आहेत असे समजणे चुकीचे ठरेल. पण कळकळीने योग शिकवणारे शिक्षक असले तरी योगतंत्राचा भाग म्हणून सांघिक पद्धतीचा विचार केला तर काय दिसते?"
पण हायझेन बर्ग माझा विरोध हा तंत्र म्हणूनदेखील आहे. आणि त्याची कारणे साधी आहेत. दिपा जोशी आपणही अनुभवी शिक्षिका म्हणून कृपया यावर काही प्रकाश टाकावा.
१. समजा एखादे आसन करताना एखाद्याला ४ श्वास राहता येते आणि ग्रुपमध्ये रोज सराव करताना जर ३ श्वासातच आसन काढणे होत असेल तर त्याची क्षमता वाढणार कशी?
२. ग्रुपमध्ये सराव घेताना एखाद्याला पाठिचे आणि मानेचे आजार असल्यास पुढे वाकण्याची आसने करताना त्याने स्वस्थ बसावे की वेगळी आसने करावी?
३. नवीन आसने शिकवताना कसे शिकवावे? सर्वांना एकच आसन शिकवायचे तर कुणाची ते आसन करण्याची क्षमता किती आहे हे कसे ठरवायचे?
४. ग्रुप प्रॅक्टीस घेताना विद्यार्थ्यांकडून आसने करताना होणार्या चुका कशा लक्षात येणार? तेवढे बारकाईने लक्ष देता येईल का?
५. ग्रुप प्रॅक्टीस करताना प्राणधारणा करता येते काय? तेवढा वेळ मिळतो काय?
अशासारख्या अनेक शंका आहेत.
मला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात आली आहे. वरील लेखात मी आसने च विचारात घेतली आहेत. प्राणायामाचे ग्रुप प्रॅक्टीसमध्ये काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही.
>>>त्यानंतर मी आणखी एक वर्ग
>>>त्यानंतर मी आणखी एक वर्ग काही वर्षे पाहिला तेथे चित्र संपूर्णपणे या उलट होते. सर्व माणसे ठराविक वेळेला जमत. ती एक "बॅच" असे. तासभर ग्रूप प्रॅक्टीस घेतली जात असे. तासभर योगशिक्षकाच्या तोंडाचा पट्टा सुरु राही. या जमावात सोळा वर्षाच्या तरुण तरुणीपासून ते सत्तरीच्या वृद्धांपर्यंत सर्वांचाच भरणा असे. जरा कठिण आसन घेतले की ही वयस्क मंडळी स्वस्थ बसून राहात. कुणाला काय आजार आहे त्याला आपण सांगितलेली आसने जमतात की नाही, तो करत असलेल्या आसनांनी आजार वाढणार तर नाही अशासारख्या विचारांना येथे थारा नव्हता. कारण आसने करण्याआधी ती कुठले आजार असलेल्यांनी करु नये हे एकदा सांगितले जात असे. मग जबाबदारी तुमची. येथे पुढचे आसन शिकवायचे म्हणजे सर्वांना एकदमच. मग त्यांचे वय क्षमता काहीही असो. ज्यांना जमत नाही त्यांनी करु नये किंवा आधीचे सुलभ आसन करावे असा मामला होता. माणसे योगवर्गाला आली आणि योगशिक्षकाने जर त्यांचा सराव सुरु केला नसेल तर नुसती बसून राहात. कारण स्वतःचा सराव स्वतःच करण्याची पद्धत त्यांना माहितच नव्हती किंवा त्यांना या पद्धतीने शिकवले गेलेच नव्हते. ही माणसे संपूर्णपणे योगशिक्षकावर अवलंबून होती.
आज अनेक वर्षांनी या पद्धतीतले दोष मला स्पष्टपणे दिसत आहेत आणि ही पद्धत योगाचा अभ्यास करणार्यासाठी घातक आहेच पण एकंदरीत योगविद्येच्या प्रसार प्रचारासात देखिल अत्यंत चुकीचा पायंडा पडणारी आहे असे माझे ठाम मत झाले आहे.<<<
+१
हा प्रकार चुकीचस वाटत नसला आणि तंत्र म्हणून अवलंबवला गेला असला तरी पद्ध्ती खूपच चुकीची आहे.
ग्रूप मुळे लोकं ओढली जातात योगाकडे ह्यात मूळ कारणं प्रत्येकाची वेगळी असतात.
-काही जणं फॅशन म्हणोइन
-काही जणं काहीतरी केलं दिवसभरात आपल्यासाठी, ह्यात सखोल आणि उपयोगी नक्की किती हेच माहीती नसतं.
-जिममधे फुकट आहे म्हणून
कितीतरी नक्की काय हवय ह्या साधनेतून हेच न कळल्याने कस्य डोंबलाचा गुरु निवडणार? बरं, गुरुला इतका वेळही नसतो वा द्यायचाही नसतो तुमची शारीरीक प्रकृती कशी आहे ह्या “ गृप“ योगा प्रकारात.
श्वास कसा घ्यावा, कधी घ्यावा व शरीर किती ताणावे, कोन कसा असावा एखाद्या आसनात , किती काळ पोझ धरावी काहीच नसतं. करताहेत माकडासारखे प्रकार.. किती जणं कमरेचे आजार असताना काहीही वाकडं तिकडं माकड प्रकार करतात, ह्यात गुरुचीच चूक आहे.
एक तर थातूर मातूर कोर्स करून गुरु झालेल्यांना उच्चार सुद्धा येत नसतात.
भुजंगासनात फणा काढलेला भुजंग कसा दिसतो तेव्हा हे छातीचे मसल्स ग्रूप काम कसे करतात व पाठीच्या कण्याने दाब न देता फणा काढायचा असतो. इथे लोकं लोवर बॅक वर जोर काय देतात, हाताचा कोन कसाही आणि गुरु म्हणून स्टेजवर बसलेले माकड सांगतेय, जमेल तितकच आणि जमेल तसं करा.. म्हणजे काय आणि किती? माहित नाही.
योगामधे तंत्र शिकण्याआधी स्वतःची शारीरीक स्थिती, मग योगाअभ्यास करून तंत्र शिकवावे.
इथे आपला आली माकडं , करा शिमगा....
(-एक योगाभ्यासी आणि प्रात्यक्षिक शिक्षक)
१. समजा एखादे आसन करताना
१. समजा एखादे आसन करताना एखाद्याला ४ श्वास राहता येते आणि ग्रुपमध्ये रोज सराव करताना जर ३ श्वासातच आसन काढणे होत असेल तर त्याची क्षमता वाढणार कशी? >> मी पाहिलेले.. योग शिक्षक विद्यार्थ्यांची रेंज गृहीत धरूनच सूचना देतात. ते स्पष्टं सांगतील ह्या आसनात तुम्ही जमेल तसे ३/४/५ श्वास राहू शकतात.
२. ग्रुपमध्ये सराव घेताना एखाद्याला पाठिचे आणि मानेचे आजार असल्यास पुढे वाकण्याची आसने करताना त्याने स्वस्थ बसावे की वेगळी आसने करावी? >> हा प्रॉब्लेम पहिल्या दिवशी / सेशन सुरू होण्याआधीच योग शिक्षकाशी बोलून त्यांना सांगता येवू शकतो. प्रॉब्लेम असणार्या लोकांना त्रासदायक आसन आले की योग शिक्षक लागलीच सूचना देतात.. जवळ जाऊन मदत सुद्धा करतात.
३. नवीन आसने शिकवताना कसे शिकवावे? सर्वांना एकच आसन शिकवायचे तर कुणाची ते आसन करण्याची क्षमता किती आहे हे कसे ठरवायचे? >> काही शिक्षक आधी आसन करुन दाखवतात मग दुसर्या रिपिटिशनला फिरून चुका करणार्या विद्यार्थ्यांना हेरून सूचना करतात आणि मग सगळ्यांबरोबर पुन्हा आसन करतात. तर काही शिक्षक मॉडेल विद्यार्थी वापरून त्याला पुढे ऊभा करून स्वतः सुचना देत दुरूस्ती करत फिरतात.
४. ग्रुप प्रॅक्टीस घेताना विद्यार्थ्यांकडून आसने करताना होणार्या चुका कशा लक्षात येणार? तेवढे बारकाईने लक्ष देता येईल का? >> का नाही वरतीच लिहिले आहे.
५. ग्रुप प्रॅक्टीस करताना प्राणधारणा करता येते काय? तेवढा वेळ मिळतो काय? >> हे त्या विद्यार्थ्यावरच अवलंबून आहे ना.. वेळेचे काही असे काटेकोर लिमिटेशन नसते.
मला वाटते देशा देशातल्या योग केंद्रांमध्ये फरक पडत असावा. ईथे मी बघितलेल्या शिक्षकांमध्ये संवाद
साधण्यास, प्रॉब्लेम समजाऊन घेण्यास, पुढे होऊन मदत करण्यास, लोकांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी चढाओढ असते. चार लोकांचे वाईट फीडबॅक शिक्षकाच्या करियर परिणाम करू शकतात. हे शिक्षक स्वतःचा ब्लॉग, फेसबूक वरून सुद्धा माहिती सुचना देतात. आज क्लासमध्ये काय कराणार आहोत त्याची माहिती, ईतिहास वगैरे सुद्धा आधीच ब्लॉग किंवा फेसबूक पेजवर लिहितात.
क्लास चे रिमाईंडर्स , मुलांकडून खेळीमेळीत करून घ्यायचे आसन वगैरे ही सांगतात...
थोडक्यात माझ्या बघण्यातल्या शिक्षकांना खरेच कळकळ होती असे आता वाटते आहे.
छान लेख
छान लेख
आमच्याघरी आहेत असे ग्रूप योगा शिकणारे
आणि शिकवणारे सुद्धा..
त्यांना लिंक देतो.