शिंदे

Submitted by क्षास on 15 June, 2018 - 13:48

नुकतंच वपु काळे यांचं आणखी एक पुस्तक वाचून संपलं, वपुंचं पुस्तक वाचून संपल्यावर एक वेगळाच हँगओव्हर येतो....विचारांचा हँगओव्हर !! विचारांची साखळी मनाला कुठल्या कुठे घेऊन जाते...सहज मनात विचार डोकावला..नक्की कुठून सुरवात झाली वपुंचं साहित्य वाचण्याची? नक्की कधी भाळले मी त्यांच्या लेखनशैलीवर? ...विचारांची गाडी रिव्हर्स घेत घेत भूतकाळात जाऊन पोहचली. मी वपुंची फॅन बनले ते माझ्या एका मित्रामुळे..शिंदेमुळे ! डोळ्यासमोर त्याचा चेहरा चमकून गेला ...

आम्ही एकाच वर्गात होतो..बहुतेक पहिलीपासून..पण ओळख झाली सातवीत असताना. तो लहानपणापासूनच हुशार होता. त्याचा नेहमी पहिल्या पाचात नंबर असायचाच! स्कॉलरशिप, होमिभाभा, NTS अशा अनेक परिक्षांमधून तो चमकला होता. दिसायला तो खूप देखणा नव्हता पण त्याच्या चेहऱ्यावर वेगळच तेज असायचं. धष्टपुष्ट, सावळा रंग, बेताची उंची, नाकावर चष्मा,नीट विंचरून बसवलेले केस ...कोणीही पहिल्यांदा बघितल्यावर शिंदे अगदी सामान्य नेभळट मुलगा असावा असा अंदाज बांधून मोकळा होईल.पण त्याला जवळून ओळखणार्यांनाच त्याचे खरे अष्टपैलू गुण माहित होते. तो हुशार असला तरी तो पुस्तकी किडा नव्हता. सगळ्यांमध्ये मिळूनमिसळून राहणारा, थोडी फार टिंगल टवाळी करणारा, मोजकेच मित्र असणारा, आणि मुलींशी बोलायला लाजणारा असा होता शिंदे..

आमची ओळख झाली ती नाटकाच्या निमित्ताने, सातवीत असताना मी पहिल्यांदा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाटकात भाग घेतला. शिंदेने ते नाटक लिहिलं होतं.त्या नाटकामुळे आम्ही चांगले मित्र झालो.नंतर मधल्यासुट्टीत एकत्र डबा खाऊ लागलो. अभ्यासाबद्दल चर्चा करू लागलो. गप्पांसाठी विषयांची कमी नव्हती. त्याचे छंदच ढीगभर होते. एका छंदाविषयी विस्तृतपणे बोलायला लागलो तर शाळेचे पाच तासही कमी पडतील की काय असं वाटायचं. चित्रकला, वक्तृत्व, क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ खेळणं असे अनेक छंद त्याला लहानपणीच जडले होते. नुकताच जडलेला छंद होता स्वयंपाकाचा! पहिल्यांदा कांदा चिरल्याचा अनुभव त्याने अगदी तपशिलांसहीत सांगितलेला. अभ्यासात त्याला भलतीच गती होती. पण नुसतं घोकून ओकणाऱ्यांमधला तो नव्हता. त्याला प्रत्येक विषयाची सखोल माहिती होती. स्पर्धापरिक्षांमुळे त्याचं सामान्यज्ञान प्रचंड वाढलं होतं. त्याला वाचनाचीही आवड होती. त्याच्याकडे पुस्तकांचं भांडार होतं. मराठी वाङ्म़याची त्याला उत्तम जाण होती. शाळेत फावल्या वेळात त्याच्या हातात नेहमी निरनिराळी पुस्तकं दिसायची. शिंदेकडून अनेक पुस्तकं मी वाचण्यासाठी मी घरी न्यायचे. एक एक पुस्तक वाचता वाचता मला कधी वाचनाचं वेड लागलं ते कळलंच नाही..

पुढे शिंदेने माझ्यात अनेक चांगले गुण पेरले.कविता लिहिण्याची स्फूर्तीही त्याच्याकडूनच मिळाली. आठवी-नववीत असताना आम्ही कितीतरी तास सायन्सच्या केमिकल रिऍक्शन्सचा अभ्यास केला होता. सायन्स मध्ये गोडीही त्यानेच निर्माण केली... आणि पुढे दहावीत 100 पैकी 99 पडले सायन्समध्ये! शिंदे पुढे दहावीनंतर कधी भेटलाच नाही. पुन्हा कधी दिसलाही नाही. तो गेला तो कायमचाच गेला. पण जाता जाता मला समृद्ध करून गेला. वर्षभराने पुन्हा आम्ही whatsapp मुळे कॉन्टॅक्ट मध्ये आलो.अधूनमधून तो मेसेज करायचा... शाळेबद्दल, पुस्तकांबद्दल बोलायचा... एकेदिवशी त्याने मला वपु काळेंच्या कथाकथनाचा audio पाठवला. मला ते कथाकथन खूप आवडलं..ती माझी आणि वपुंच्या साहित्याची पहिली भेट होती. नंतर मी नेटवर वपुंचं खूप काही वाचलं. नंतर एका पाठोपाठ त्यांची सात पुस्तकं वाचून काढली..प्रत्येक पुस्तकानंतर माझे वपुप्रेम वाढतच गेलं.वपुंचं प्रत्येक पुस्तक वाचून संपलं की मला शिंदेची हमखास आठवण येते..मनातल्या मनात मी त्याचे शतशः आभार मानते.. माझ्यासारख्या एकलकोंड्या माणसाच्या गाडीला वाचन आणि काव्यलेखन ही दोन चाके जोडली ज्यामुळे माझ्या आयुष्याची गाडी आज सुरळीत चालत आहे.! ... आपल्या आयुष्यात अशी कितीतरी माणसं असतात ज्यांनी नकळतपणे आपल्याला चांगल्या सवयींचं रोप दिलेलं असतं...नकळत त्या रोपाला खतपाणी घातलं जातं आणि भविष्यात त्याचा मोठा डेरेदार वृक्ष होतो!!! .. त्या वृक्षाच्या सावलीत आपण आयुष्यातले काही क्षण विसावतो, रमतो आणि पुढे जातो...

आयुष्यात प्रत्येकाने असं एकतरी झाड लावलं पाहिजे..दुसऱ्यांना सावली देणारं!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users