आजच्या मटा, मुंबई टाइम्स पुरवणीतील लेख
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/#
-
मे २००८ मधे काश्मिर पाहिलं होतं. यंदाच्या मे महिन्यात थोडा योगायोगानेच लडाख टूरचा योग आला. काश्मिरच्या पार्श्वभूमीवर लडाख सुद्धा हिमालयाच्या पायथ्याशी (खरतर त्याहीपेक्षा उंच) म्हणजे थंड असेल हे गृहितक. अर्थात लडाख काश्मिरपेक्षा फार वेगळं आहे हे माहित नव्हतं, असं नाही. परंतु लडाख मधे लॅण्ड झाल्यापासून काश्मिर आणि लेहलडाख मधे मनातल्या मनात तुलना होत राहिली. कोल्ड डेझर्ट असलेलं लडाख आणि हिरवंगार मखमाली काश्मिर इतका साधा सोपा फरक कळत होता तरीही मन मात्र नक्की फरक कुठला, ते न सापडल्याने सारखं अस्वस्थ होतं.
काश्मिर ! खरोखर स्वर्गिय सौंदर्य ! नंदनवनच ! तिथली हिरवळ, फुलं, पहेलगामला अखंड सोबत करणारी नदी, सोनमर्ग, गुलमर्ग, दाल लेकवरचा शिकारा, मे महिन्यात शरीरावर रोमांच उठवेल इतपतच कुंद गारवा.. सगळं कसं आल्हाददायक.
आणि लडाख... फुलं- झाडं तर दूरच पण गवताचं पातंही जिथे अभावानेच उगवेल अशी खडकाळ जमीन. बर्फ भुरभुरवलेले बोडके माथे, हाडं गोठवणारी थंडी...आणि सभोवती मी म्हणू पाहणारे बलदंड पिळदार देहयष्टीचे अजस्त्र डोंगर.
पण म्हणजे लडाख काश्मिर सारखं सुंदर नाही का... ? आहे ना.. पण मग... दोन्ही सौंदर्यांत वेगळेपणा कुठला..
काश्मिरचं सौंदर्य कसं ? मनाला भुरळ पाडणारं आणि लडाखचं... मनाला अवाक करुन टाकणारं !
*काश्मिरचं गहिरं मादक "मस्तानी सौंदर्य" आणि लडाखंच रांगडं आश्वासक "मर्दानी सौंदर्य" ! *
एखाद्या रुपगर्वितेनं सोळा श्रृंगार करुन यावं तसे काश्मिरी हिरवे डोंगर आणि व्यायाम करुन कमवलेलं पिळदार शरीर कसं असावं, तसे लडाखचे डोंगर.
काश्मिरचा हिरवा हिमालय कसा प्रेयसीसारखा सलगी करु पाहणारा आणि लडाखचा कातळ हिमालय म्हणजे जणु ए्खाद्या रुक्ष तटस्थ पुरुषासारखा.. परंतु त्या विरक्तीतही एक आश्वासकता आहे.. विश्वासार्हता आहे. काश्मिरचा हिमालय म्हणजे संमोहन आणि लडाखचा हिमालय म्हणजे संरक्षण.
क्षणभर असंही वाटून गेलं, काश्मिरहून लडाख म्हणजे आसक्ती ते विरक्ती हा प्रवासच जणु !
लडाखला अथ पासून इतिपर्यंत पसरलेले अक्राळविक्राळ डोंगर, पण त्याहीपेक्षा स्तिमित करतात ते त्यांच्या तीव्र उतारावर असलेले मोठमोठाले दगड. एक एक अजस्त्र दगड जेमतेम त्या उतारावर टेकला न टेकला इतकाच चिकटलेला, तरीही कधीही आपली जागा न सोडता वर्षानुवर्ष तिथेच पाय रोवून उभा.
अगदी असंही वाटत राहतं की डोंगराच्या पार्श्वभागावरचे ते दगड नव्हेतच, तर युगानु युगं तपश्चर्येला बसलेले अनेक बुद्ध आहेत त्या त्या डोंगरावर.. निश्चल आणि अढळ.. !
की, कदाचित त्या दगडांना मुळं फुटून ते घट्ट रोवले आहेत त्या जमिनीत - म्हणून हलत नसावेत ते?
अफाट आहे . अचाट आहे सगळं..
भारताच्या थेट माथ्यावर असलेलं वसलेलं हे लडाख.. ! काय योजना असेल त्या विधात्याची..? एका बाजूला पाकिस्तान (POK) आणि एका बाजूला चीन(ने व्यापलेला भारत). आणि त्या शत्रूपासून काश्मिरसारख्या मस्तानीला वाचवण्यासाठीचं हे मर्दानी रांगडं पहाडी रुप.
थोडक्यात काश्मिर एक अनुभूती आहे तर लडाख एक अनुभव.. अनुभूती ही नेहमी छानच असते.. कधी सौंदर्याची, कधी दिव्यत्वाची, कधी तो साक्षात्कार असतो.. तसं काश्मिर.. तर अनुभव छान बरा वाईट कसाही असू शकतो.. तसं वेगवेगळे अनुभव देणारं लडाख.
काश्मिर आणि लडाखमधला हा असा नेमका फरक सापडल्याने मनं हलकं होतं आणि त्याचबरोबर देवाच्या ह्या अगाध लिलेने हरखूनही जायला होतं.
-अनुराधा म्हापणकर
काश्मीर आणि लडाखची अशी तुलना
काश्मीर आणि लडाखची अशी तुलना आवडली. छान लिहिलंय.
वा, छान लिहिलंय...
वा, छान लिहिलंय...