५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
योग- सायकल यात्रेचा चौथा दिवस, १४ मेची पहाट. आज अंबडवरून औरंगाबादला जायचं आहे. पहाटे अंबडमधल्या काही योग साधकांना भेटून निघालो. इथे ते व्यक्तिगत वर्ग घेतात. आजचा अर्धा रस्ता 'भारतातून' असेल आणि हायवेपासून 'इंडिया' सुरू होईल! आज पहिल्यांदा स्वत:ला ह्या सायकल मोहीमेवर आल्याबद्दल धन्यवाद दिले! कारण जर गाडीने आलो असतो तर ह्या भागात कधीच आलो नसतो! आजच्या रस्त्यावर रोहीलागड आहे. हे आज एक छोटं गाव आहे, पण पूर्वी इथे बौद्ध लेण्या होत्या. रोहीलागडाजवळच जांबुवंतगड आहे ज्याचा संबंध श्रीकृष्णाच्या वेळच्या जांबुवंताशी आहे, असं मानलं जातं. आज आधी रोहीलागड बघण्याची उत्सुकता आहे. इंटरनेटवर त्याबद्दल शोधलं होतं, पण काही विशेष सापडलं नाही. अंबडवरून निघाल्यानंतरच रस्ता एकदम सुनसान भागातून जातोय. कालच्या सारखीच रमणीय शांतता व निसर्गाची सोबत आणि मध्ये मध्ये लागणारी अगदी छोटी गावं!
जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ जातो, तेव्हा निसर्गातील ऊर्जा आपल्याला ताजतवानं करते. रोहीलागडावर ज्या बौद्ध लेण्या आहेत, त्यासुद्धा ध्यानाचं केंद्र असणार. त्या लेण्या ह्या परिसरात का होत्या, हे आजसुद्धा इथला निसर्ग बघताना कळतं आहे. इतक्या उन्हाळ्याच्या दिवसांतसुद्धा इथे नैसर्गिक सौंदर्य जाणवतं आहे. ज्या वेळी ह्या लेण्या बनवल्या असतील, तेव्हा तर इथला निसर्ग आणखीन सुंदर असणार आणि ध्यानासाठी अधिक मदत करत असणार. त्यामुळेच ध्यानाची व साधनेची अशी क्षेत्रं दुर्गम डोंगरांवरच जास्त असतात. प्राचीन काळी तिथे जाणंही कठीण असायचं. हासुद्धा साधनेचाच एक भाग आहे. अशा जागी पोहचताना जो त्रास होतो; जो विराट निसर्ग दिसतो; त्यामुळेही साधनेला बळ मिळतं. तसंच अशा जागी पोहचताना आपले नेहमीचे विचार व विषय मागे पडतात आणि एक रिक्तता मनात येते. पण आता अशा जागी पोहचणंही सोपं झालंय, त्यामुळे ह्या प्राचीन हेतुला बाधा येत असणार. असो.
दूरवरून दिसणारा रोहीलागड
रोहीलागड आता तर उद्ध्वस्त स्वरूपात आहे. पण एक मोठा दगड रस्त्यावर आलेला आहे व तो लेण्यांचा भाग होता, असं म्हणतात. लेण्याही आता नीट राहिलेल्या नाहीत. काही क्षण थांबून पुढे निघालो. मनात विचार येतोय की, प्राचीन काळी प्रवासी येत असतील तर कसे? साधनं व माहिती तर फार कमी होती. पण मला वाटतं की, प्रत्येक काळाची वेगळी आव्हानं व अनुकूल बाबी असतात. जसं प्राचीन काळी किंवा आत्तापासून अगदी तीस- चाळीस वर्षांपूर्वीसुद्धा अनेक गोष्टी अनुकूल अशा होत्या. जर एखाद्या प्रवाशाला तीर्थयात्रेला जायचं असेल, तर त्याला पैशांची काहीच काळजी करायची गरज नव्हती. पूर्वी साधनं कमी असली तरी लोकांमध्ये अधिक घट्ट संबंध होते. त्यामुळे रस्त्यातली व्यवस्था कशी होणार, ही इतकी काळजी नसायची. त्यामुळे प्रवासी देशभर सहज फिरायचे. कारण प्रत्येक ठिकाणी व्यवस्था करणारे लोक होते. आज साधनं, तंत्रज्ञान आणि माहितीचा प्रचंड विस्तार झालेला असला तरी लोकांमध्ये तितके घट्ट संबंध राहिलेले नाहीत व एका अर्थाने सर्वच गोष्टींचं आर्थिकीकरण झालं आहे. त्यामुळे मला वाटतं की, आजसुद्धा अनुकूल बाबी आहेत आणि आव्हानंही आहेत. तीच गोष्ट शरीराच्या क्षमतेचीही आहे. आज बुद्धी अधिक सुगम झालेली असली तरी शारीरिक क्षमतेचा स्तर खाली आला आहे. असो.
रोहीलागडच्या पुढे सहा किलोमीटरवर औरंगाबादला जाणारा महामार्ग मिळाला. इथे एकदा नाश्ता केला, लोकांना पत्रकं दिले. इथून पुढे आता मस्त रस्ता असेल. दोन दिवस 'भारतात' सायकल चालवल्यानंतर आता हायवेची मजा मिळणार. इथून औरंगाबाद सुमारे पस्तीस किलोमीटर असेल. आता ऊन वाढतंय आणि आज ढगसुद्धा नाही आहेत. पण आज चौथा दिवस असल्यामुळे शरीराला पूर्ण सवय झाली आहे. जसं आपण झाडाचं एखादं पान तोडलं किंवा फांदी तोडली तर झाड जणू म्हणतं की, हरकत नाही, मी अनेक पानं व अनेक फांद्या निर्माण करेन! तसं आता माझं शरीरही म्हणतंय की, इतक्या ऊन्हात सायकल चालवायची आहे, हरकत नाही! शरीर त्यासाठी तयार राहील आणि ऊर्जा भरून काढेल. त्यामुळे काही त्रास न होता पुढे जातोय. थोड्याच दिवसांपूर्वी औरंगाबादमधली स्थिती तणावपूर्ण झाली होती. पण आता जाऊ शकतो आहे. ह्या पूर्ण प्रवासात एक गोष्ट अगदी वेगळी अनुभवतोय की, मी जिथे जाईन, तिथे मला भेटायला लोक येतील. एकट्याने सायकल चालवणे व एक विषय व एका संस्थेच्या सोबतीने सायकलिंग करणे ह्यातला गुणात्मक फरक स्पष्ट जाणवतोय.
उरलेलं अंतर लवकरच पार झालं. मोठा हायवे असल्यामुळे थोडा वेग मिळाला. पण तरी काही ठिकाणी चढ व हेड विंड असल्यामुळे कमी वेग होता. तरीही अकरा वाजता औरंगाबादमध्ये पोहचलो. इथे फारच भावुक करणारं स्वागत झालं. इथल्या योग साधिकांनी तर माझे चक्क पाय धुतले. मी नाही म्हणालो, तेव्हा मला म्हणाल्या की, शरीरातली उष्णता कमी व्हावी म्हणून असं करत आहेत. औरंगाबादमध्ये पोहचलो तेव्हा चौथ्या दिवशी २४० किलोमीटर पूर्ण झाले आणि योगायोगाने इथला एसटीडी कोडसुद्धा ०२४० आहे! सतत सायकल चालवल्यामुळे आता सायकलिंग जवळजवळ एफर्टलेस झालं आहे. जसं आपण एखादी गोष्ट सारखी करत गेलो तर आपोआप मनात विचार येतो, ह्यामध्ये काय विशेष आहे बरं. तसंच आता शरीरालाही जाणवतंय की, सायकल चालवतोय, काय विशेष त्यात.
चौथा दिवस अंबड ते औरंगाबाद- ६३ किमी
औरंगाबादचे योग साधक
औरंगाबादमध्ये संध्याकाळी योग साधकांना भेटायचं होतं. पण औरंगाबादमध्ये पोहचल्या पोहचल्या क्लाएंटसचे कॉल सुरू झाले आणि पूर्ण दिवस लॅपटॉपवर काम करावं लागलं. पहाटे चारला उठलो होतो आणि ६३ किलोमीटर सायकल चालवली होती, तरी दुपारी एक मिनिटही झोपण्याची संधी मिळाली नाही. आणि डेडलाईनचं प्रेशरही इतकं होतं की, झोपही आली नाही! आणि हे कामही अगदी खडबडीत रस्त्यावरच्या ड्रायव्हिंगसारखं अडचणीचं होतं. त्यामुळे संध्याकाळी योग साधकांना भेटता आलं नाही. पण आजचा दिवस माझ्या योग- यात्रेतला कसोटीचा दिवस नक्कीच होता. चौथा दिवस असल्यामुळे संध्याकाळपर्यंत शरीराचा स्टॅमिना टिकू शकला. पण आता औरंगाबादला पोहचल्यानंतर एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. उद्या देवगिरी किल्ला बघेन आणि योग साधकांना भेटेन.
आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.
निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!
पुढील भाग: देवगिरी किल्ला भ्रमंती व योग साधकांसोबत चर्चा
माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in
थक्क करणारा प्रवास आहे
थक्क करणारा प्रवास आहे,रोहिलागड परिसर ऐतिहासिक संदर्भ, भलीमोठी शिळा न त्यावर आपला हा लेख म्हणजे शिलालेख भासला आम्हाला तुमच्या पासून प्रेरणा घेऊन छोटी मोहीम सायकलवर करण्याची ईच्छा होत आहे,पुढील भागाची प्रतिक्षा ..!!!!
थक्क करणारा प्रवास आहे >>>
थक्क करणारा प्रवास आहे >>> खरच.. +१
सलाम तुम्हाला.. हे करत असताना पुन्हा ऑफिसचे कामही.. बापरे.. काय स्टॅमिना आहे..
उद्या आम्चे औबाद का?? वा वा..
धन्यवाद!
धन्यवाद!