३: जिंतूर- परतूर (६३ किमी)
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
१२ मे ला पहाटे साडेपाचला जिंतूरवरून निघालो. रात्री चांगली झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत आहे. आज ६२ किलोमीटर सायकल चालवायची आहे. माझ्यामुळे जिंतूरला डॉ. पारवेंना पहाटे लवकर उठावं लागलं व मला निरोप द्यायला ते रस्त्यापर्यंत आले. सकाळच्या प्रसन्न वेळेत सायकल चालवणं खूप मोठं सुख आहे! चांगली झोप झाल्यामुळे कालचा थकवा दूर झाला आहे. काल अगदी थकलेल्या स्थितीत एकदा वाटलं होतं की, हे सगळं जमेल ना? पण तेव्हा मग ठरवलं की, आत्ता पूर्ण प्रवासाचा विचारच करणार नाही. फक्त त्या त्या वेळच्या स्थितीवर लक्ष देईन. म्हणून आत्ता फक्त आजच्या टप्प्याचाच विचार करतोय. विपश्यनेमध्ये 'इस क्षण की सच्चाई' म्हणतात तसं.
जिंतूरवरून पुढे जाताना रस्त्याच्या आजूबाजूला टेकड्या दिसतात. रस्ताही उतार- चढावाचा आहे. ही सिंगल गेअरची सायकल असल्यामुळे चढाव जाणवत आहेत. टायर्स अजून पूर्ण रुळले नाहीत, त्यामुळे उतारावरही जास्त वेग मिळत नाहीय. रस्त्यावर काही गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे बोर्ड दिसले. काल मंठाच्या साधकांसोबत बोललो होतो. आज माझ्या रस्त्यावर मंठा लागेल. मंठातून जाताना भेट असं म्हणाले आहेत.
काल ऊन्हाचा जो त्रास झाला होता, त्यातून बोध घेऊन आज माझ्या दोन्ही बॉटल्समध्ये इलेक्ट्रॉल पूर्ण टाकून घेतलं आहे. जवळ जवळ दर १० किलोमीटर अंतराने चिक्की किंवा बिस्कीट खातोय. काल खूप गॅपनंतर पहिला ब्रेक घेतला होता. त्यामुळे आज पहिला ब्रेक एकोणीस किलोमीटरवर चारठाणा फाट्याला घेतला. चहा- बिस्कीट घेतलं, तिथे संस्थेची पत्रकं दिली, ह्या प्रवासाविषयी सांगितलं व पुढे निघालो. इथे आधीही सायकल चालवली आहे, त्यामुळे रस्ता ओळखीचाच आहे. घराच्या बाहेर आलोय, पण अजून अंगणच सुरू आहे! आज उलट्या दिशेने वाहणा-या वा-यामुळे अर्थात् हेड विंडमुळे माझा वेग थोडा कमी आहे. तरीही मजा येते आहे. इतक्या प्रसन्न वातावरणात सायकल चालवतोय की, आपोआप मनात अनेक गाणी वाजायला सुरू होतात. त्यामुळे आरामात सायकल चालत राहिली व मी मनातल्या मनात गाणे ऐकत पुढे जात राहिलो.
एका ठिकाणी रस्त्यावर दूरवर कुत्रे जोरात पळताना दिसले. अगदी पिवळ्या रंगाचे व चेंडूप्रमाणे टप्पे खात पळणारे! नीट बघितल्यावर कळालं की हरीण आहेत! नंतर एका जागी माकडंही दिसले. त्यामुळे मी एकटा जरी जात असलो तरी एकटा नाहीय. मंठाच्या जवळ आल्यावर तिथल्या योग साधकांना फोन केला. खरं तर ते संस्थेशी प्रत्यक्ष जोडलेले नाहीत, पण ह्या प्रवासाच्या मार्गावर शेवटी मंठ्याला एक हॉल्ट असेल. त्यामुळे मंठाच्या लोकांना संपर्क केला. तेव्हा ह्यांच्याशी संपर्क झाला. आदित्य सेवा संघ नावाची एक संस्था आहे. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात परत जाताना मंठ्याला येईन तेव्हा सविस्तर बोलणं होईल. आत्ता जास्त वेळ नाहीय, कारण ऊन वाढायच्या आत मला परतूरला पोहचायचं आहे. तरीही त्यांना थोडा वेळ भेटलो, त्यांच्यासोबत नाश्ता केला व निघालो. आता दोन- अडीच तास सायकलिंग केल्यामुळे थोडा थकवा वाटत आहे. त्यांच्यापैकी एक जण इथून परतूरला जाणार आहेत, त्यामुळे माझा लॅपटॉप व सामानही त्यांच्यासोबत पाठवता आलं. त्यामुळे जाताना थोडं सोपं जाईल व रस्त्यावरच्या खड्ड्यांची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. नाही तर लॅपटॉपला काही होईल का, ही शंका मनात येते.
आता जालना जिल्हा सुरू झाला आहे. इथे मी पूर्वी जेव्हा सायकल चालवली होती, तेव्हा प्रत्येक वेळी जालना मला जणू विचारत होता- जाल ना? जाशील ना? ह्या वेळी योग साधकांना भेटण्याच्या इच्छेमुळे पुढे जात राहिलो. आज कोण कोण भेटतील, त्यांचं काम कसं असेल, मीटिंग कशी असेल, हाही विचार मनात सुरू आहे. पण हळु हळु ऊन्हाचा त्रास सुरू झाला. एक तर मंठ्यात बराच वेळ थांबल्यामुळे शरीराची लय थोडी बिघडली होती. आता जास्त अंतर राहिलं नाही आहे, पण जास्त ऊर्जासुद्धा राहिली नाही आहे! परतूर १४ किलोमीटरवर असताना ऊन्हाचा तडाखा सुरू झाला. जेव्हा मेडीकल दिसलं, तेव्हा दोन लिक्विड एनर्जाल लगेचच पिऊन टाकले. थोडं बरं वाटलं. पण पुढे रस्ता पूर्ण उखडलेला होता! त्यामुळे अंतर कमी असलं तरी वेळ जास्त लागला व त्रास चालू राहिला. अशावेळी अगदी थकलो असताना एका ट्रॅक्टरवर ओळखीचं गाणं ऐकून खूप बरं वाटलं! आपोआप ते मनातल्या मनात सुरू झालं. ऊन्हाच्या होत असलेल्या त्रासावर असलेलं लक्ष तिथून दूर झालं व मनातल्या मनात ते गाणं ऐकण्यावर गेलं व त्या प्रमाणात चालवणं सोपं झालं.
५ किलोमीटरमध्ये हे app स्टॉप झालं होतं.
जवळजवळ अकरा वाजता परतूरच्या साईबाबा मंदीराजवळ पोहचलो. इथे काही योग साधकांनी मला रिसीव्ह केलं व मुक्कामाच्या जागेपर्यंत घेऊन गेले. डॉ. दिरंगे सरांनी सायकल चालवत रस्ता दाखवला. डॉ. आंबेकर सरांच्या घरी पोहचल्यानंतर पुन: एकदा स्वागत झालं; थोडा वेळ बसलो; थोडं बोलणं झालं. कालच्या इतकं नाही, पण तरीही बरंच थकलोय. क्रिकेटच्या भाषेत काल आठ विकेट पडल्या होत्या, आज सात पडल्या आहेत. पण एकदा घरी पोहचल्यावर हळु हळु निवांत झालो. लवकरच फ्रेश होऊन आराम सुरू केला. आज सुमारे ६३ किलोमीटर सायकल चालवली. विरुद्ध दिशेचा वारा- हेड विंड असल्यामुळे वेग थोडा कमी होता. दुपारी जेवणानंतर आणखी विश्रांती घेतली, थोडी झोपही लागली व नंतर लॅपटॉपवरही अडीच तास काम करू शकलो. अर्जंट सबमिशन्स पूर्ण केले. कालच्या तुलनेत लवकर रिकवरी होते आहे. शरीरालाही थोडी सवय होते आहे. नक्कीच, पुढच्या दिवसांमध्ये हा प्रवास आणखी सोपा होत जाईल.
आता संध्याकाळच्या मीटिंगची वाट बघतोय. सकाळी पोहचल्यावरच बघितलं होतं की, परतूरमध्ये योग साधिकांची 'नारी शक्ती टीम' खूप सक्रिय आहे. संध्याकाळच्या मीटिंगमध्ये त्याची प्रचिती आली. सुमारे पंचवीस- तीस योग शिक्षक- साधिका मीटिंगला आले. पहिली गोष्ट ही आवडली की, माझा परिचय अनौपचारिक प्रकारे करून देण्यात आला. मीटिंगसुद्धा मीटिंग नसून एक अनौपचारिक चर्चा अशीच झाली. सर्वांनी आपापला परिचय दिला व योगाशी असलेला संबंध सांगितला. इथे जालनाच्या चैतन्य योग केंद्राचे सुमारे आठ सक्रिय योग साधक आहेत. त्यांनी एक तर योग शिक्षण पदविका पूर्ण केली आहे किंवा करत आहेत. आणि जे योग- विद्यार्थी नाहीत, तेही योगाबद्दल अनेक गोष्टी जाणत आहेत. जेव्हा चर्चा करणा-या लोकांमध्ये इतकी जागरूकता असेल, तेव्हा चर्चापण चांगलीच होणार. इथे महिलांची टिम खूप सक्रिय आहे. योग आणि योग साधना, योग शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. इथल्या टीमची क्षमता बघून खात्री वाटतेय की, लवकरच परतूरला ह्या कोर्सचं वेगळं सेंटर सुरू होईल, त्यांना ह्या कोर्ससाठी जालन्याला जाण्याची गरज राहणार नाही. सर्वांनी योगाशी संबंधित अनुभव सांगितले. योग करण्यामध्ये असलेल्या अडचणीही सांगितल्या. अशा अडचणी अनेक प्रकारच्या असू शकतात. जसे महिलांना सकाळी घरातलं काम सोडून योग वर्गावर येणं सोपं नसतं. पण समस्या असेल तिथे त्यावर उपायही असतो. आणि कोणत्याही दिशेने पुढे जायचं असेल तर सोबत हवी आणि ही टीम निश्चितच त्यासाठी सज्ज आहे. ह्या टीमला भेटून नवीन ऊर्जा मिळाली. कोणतंही सामाजिक काम पुढे न्यायचं असेल, तर त्यासाठी कार्यकर्त्यांची टीम हवी. संघटन हवं. इथे ते स्पष्ट दिसतं आहे. चर्चेमध्ये ग्रूपच्या पुढच्या नियोजनाविषयी बोलणं झालं. योग- कार्य पुढे नेण्यासंदर्भात बोलणं झालं. ह्या टीमची मुख्य साधिका व कार्यकर्ती अदिती योग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे.
चर्चेच्या शेवटी माझे योग- ध्यान व सायकलिंगशी संबंधित अनुभव सांगितले. चर्चेत सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे माझ्यासाठी बोलणं सोपं झालं. चर्चा संपताना पाऊस सुरू झाला व त्यामुळे वातावरण आणखी प्रफुल्लित झालं. ह्या सर्व योग साधकांना भेटून आनंद होतो आहे. आणि त्यांनाही मला भेटून आनंद झाला आहे! थोडा वेळ व्यक्तिगत भेटी झाल्या व लवकरच चार घास खाऊन रात्रीच्या झोपेसाठी तयार झालो. शक्य तितक्या लवकर झोपलो व हेच रोज करेन, त्यामुळे पहाटे उठणं सोयीचं जाईल. आज दुसरा दिवस पूर्ण झाला. अनेक साधक भेटले आणि दोन दिवसांमध्ये सुमारे ११७ किलोमीटर सायकलिंगही पूर्ण झालं.
आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.
निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!
पुढील भाग: परतूर- अंबड (६३ किमी)
माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in
कठीण पण प्रेरणादायी प्रवास
कठीण पण प्रेरणादायी प्रवास चाललाय.. वाचायला आवडतेय. परभणी-परतूर-जिंतूर- मंठा कित्ती दिवसांनी कानावर पडले..
धन्यवाद!
धन्यवाद!
आता हळूहळू तुम्हाला उन देखील
आता हळूहळू तुम्हाला उन देखील म्हणल कि चल बाबा लवकर ढगाची सावली देईल तुला
सुरवातीचे २/३ दिवस हेच खूप टफ असणारच शुभेच्या
पता नहीं क्यों
तुम्हारी तरफ
Interest बढ़ता जा रहा है!!