माटी कहे दुनिया को..!
आपल्याकडे जमिनीला केवळ उपयोगी वस्तू न समजता तिला देवतेचे स्वरुप दिल्या जाते. त्याहीपुढे जाऊन आपण मातीला 'माता' संभोधतो.निसर्गाला देव मानणे, त्याची पूजा करणे याचे महत्व भारतीय संस्कुतीत पहिल्यापासून आहे. मात्र एकदा का एखाद्याला देवत्वाचा दर्जा दिला की, आपली त्याच्याविषयीची इति कर्त्यव्याता संपली हा मानवी स्वभाव राहिला आहे. निसर्गाच्या संदर्भात तर माणसाची कायम कृतघन वृत्ती राहिली आहे. निसर्गाने माणसाला भरभरून दिले, पण त्याचा परतावा करण्याच्या बदल्यात माणसाने निसर्गाला ओरबडण्याचेच काम केल्याचे दिसून येते. आधुनिक युगात मानवाने प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. पण हे करत असताना निरसर्गाचा र्हास होतोय, हे त्याच्या लक्षातच राहिले नाही. अवघ्या जगाचं उदरभरण करणाऱ्या मातीला श्रेष्ठत्वाचा दर्जा माणसाने दिला, मात्र त्या मातीच्या आरोग्याची निगा राखण्याची तसदी त्याने कधी घेतली नाही. त्याचाच परिणाम म्हणजे आज जमिनीची उत्पादनक्षमता कमी होऊ लागली आहे.शिवाय माती दूषित झाल्यामुळे मानवाच्या आणि जनावरांच्या आरोग्याला गंभीर धोका उत्पन्न होत असल्याचा अहवाल अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे. याच संस्थेने यापूर्वीही तसा अहवाल दिला होता.भारतात लागवडीखाली असलेली तब्बल 42 टक्के जमीन प्रदूषित झाली असून तिचे वाळवंट होण्याच्या मार्गावर असल्याचे 2011 मध्येच सांगण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र २२४.०५ लक्ष हेक्टर असून त्यापैकी १.३ लाख हेक्टर क्षारपड झालेली आहे आणि हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. 'इस्रो’नेदेखील यापूर्वी असा इशारा दिला असून, मातीची सुपीकता घटत चालल्याचे नमूद केले आहे. दुर्दैवाने, मातीच्या प्रदूषणाला आजही आपल्याकडे गंभीरतेने घेतले जात नाही.पृथ्वीवर जेवढी जमीन आहे तेवढीच राहणार तिच्यात वाढ होणार नाही, म्हणूनच उपलब्ध असलेल्या अनमोल जमिनीची योग्य ती निगा राखून तिच्यातील जिवंतपणा आणि सुपिकपणा टिकुवून ठेवण्यासाठी माती परिक्षणासारख्या मार्गाचा अवलंब करणे काळची गरज बनली आहे.
आधुनिक शेती आणि जमिनीची उत्पादन क्षमता वाढवने, यावर भाषणं ठोकण्याची हल्ली फॅशन झाली आहे. परंतु त्याचं शास्त्रोक्त विवेचंन करण्याच्या भानगडीत कुणी जातांना दिसत नाही.जमिनीची उत्पादनक्षमता वाढविने ही जशी काळाची गरज आहे. तशीच जमिनीची सुपीकता टिकवणे सुद्धा गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रारंभीची शेती फिरती होती.गरजेपुरत अन्न शेतीतून पिकवल जायचं. नंतर स्थिर शेतीची पद्धत रूढ झाली.मात्र जस-जशी खाणारी तोंडे वाढली तसा शेतीवर ताण येऊ लागला. त्यातच नगदी पिकं घेण्याच्या हव्यासापोटी शेतीवर निरनिराळे प्रयोग केले जाऊ लागले. रासायनिक खतांचा अतोनात वापर, नगदी पिकांसाठी जमीन भिजवून ठेवणे, जमिनीला विश्रांती न देता एकापाठोपाठ एक पिके घेत राहणे, पीक पद्धतीत फेरपालट न करणे, तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर, कीटकनाशकांचा मारा, उद्योगांमध्ये वापरले जाणारे रासायनिक पदार्थ, आदींमुळे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होऊ लागला आणि शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली. अर्थात, बदलत्या काळानुसार शेतीत आधुनिक तंत्रज्ञांनाच वापर झालाच पाहिजे. रासायनिक खाते कीटकनाशक याचा वापर आज अपरिहार्य बनला आहे. पण आपण शेतीत नेमकं पेरतो काय त्यावर फावरतो काय, याचीही जाण ठेवणे आवश्यकच. मध्यंतरी कीटकनाशक फवाराताना काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. रासायनिक घटक मातीत मिसळल्याने आपल्या आणि जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान फक्त स्वतःच्या तत्कालीन फायद्यासाठी नाही तर कधी तरी निसर्गाच्या रक्षणासाठी वापरले गेले पाहिजे. आपल्या शेतात पारंपरिक पिकापेक्षा योग्य पीक कुठले, त्याला किती-कुठले खत द्यायचे आणि मशागत कशी करायची हे शेतकऱ्यांना माती- पाणी परीक्षणातुन कळू शकते.
नत्र,स्फुरद आणि पालांश या व्यतिरिक्त मातीत गांडूळ आणि इतर कीटक,सुक्ष्मजीव हे घटक ही असतात आणि त्यांच्यामुळेच आपली माती कसदार आणि सुपीक बनते. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. हे जरी खरे असले तरीदेखील त्याच्या अवाजवी वापराने या जिवाणूचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे जमिनी कालांतराने नापीक बनत असून त्याचा परिणाम जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर दिसून येत आहे. पण माती परीक्षण करून पिकांची लागवड केल्या गेली तर त्यामुळे जमिनीची सुपीकता ओळखता येते. म्हणजेच जमिनीचा विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रामुख्याने परीक्षण केले जाते. जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमीन पिक वाढण्यासाठी योग्य आहे किंवा नाही. याशिवाय विद्राव्य क्षारांवरून जमिनीची प्रत समजते. मातीतील चुनखडीचेही प्रमाण मिळते. खराब जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी आवश्यकतेप्रमाणे करण्यात येते. तसेच जैविक सृष्टीचे प्रमाणही पहिले जाते. या माहितीवरून पिक वाढीसाठी कशाची कमतरता आहे व ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा अंदाज येतो. माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करणे शक्य होऊन पिक उत्पादनात वाढ होते व खतांची बचत देखील होते. पिकांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो.पिकांचे नियोजन करणे सोपे जाते. शिवाय ही फार काही क्लिष्ट नाही. जिल्ह्या- तालुक्यात माती परीक्षणासाठी सरकारी केंद्र असतात. अर्थात ते याबाबत किती जागरूक असतात, हा भाग वेगळा. पण, आता आपल्याला 'माती'त जायचे नसेल तर 'माती'ची निगा राखण्यासाठी जागरूक व्हावे लागणार आहे.
आज देशभरात शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत, मात्र त्यांची अवस्था अतिशय तुटपुंजी आहे. शासकीय माती परीक्षण केंद्रात केवळ ३० ते ५० रुपयांत माती परीक्षण केले जाते परंतु त्याचा अहवाल देण्यासाठी महिना लावला जातो. कार्यालयात पुरेसा प्रशिक्षितवर्ग नसतो. कृषी विभागातील मंडळींना माती परीक्षण विभागात पाठवले जाते, ते शिक्षा म्हणून असा समज असल्याने सर्व ठिकाणी उदासीनता दिसून येते. ही उदासनीता फक्त सरकारी पातळीवरच नाही तर शेतकर्यांमध्येही असल्याने आज बिकट अवस्था निर्माण झाली आहे. 'पेरलं तर पिकत नाही' अशी ओरड शेतकऱ्यांमधून सातत्याने केली जाते, मात्र का पिकत याचा शोध घेतला जात नाही, हे दुर्दैव म्हटले पहिले. माती परीक्षण ही आज काळाची गरज बनली आहे. विकासाच्या नावाखाली कृषक जामिनाला अकृषक उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असताना जी लागवडीखालील जमीन आहे तीसुद्धा नापीक झाली तर अन्न पिकवणार कोठून? त्यामुळे जमिनीचे मातीचे परीक्षण आणि संवर्धन यासाठी लोकचळवळ उभी करावी लागणार आहे. केंद्र शासनापासून ते गावच्या तलाठय़ापर्यंत व कृषी सहायकापर्यंत या विषयाचे महत्त्व लक्षात घेतले गेले पाहिजे. त्याचा प्रसार आणि प्रचार केला गेला पाहिजे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, देत आहे. माणूस निसर्गाशी कसाही वागला तरी निसर्गाने देण्याचे तत्व सोडले नाही. कधीतरी माणसाला शहाणपण येईल आणि निसर्गाकडे पाहण्याची त्याची पाशवी प्रवृत्ती नष्ट होईल, ही आशा निसर्ग सोडत नाही. त्यासाठी तो वेळोवेळी माणसाला धडे देत असतो. वाढती नापिकी हासुद्धा एक धडाच आहे, त्यातून आपण काय शिकतो, यावर आपले भवितव्य अवलंबून राहील..!!
चांगला लेख.
चांगला लेख.
मातीच्या परिक्षणा विषयी जागरुकता वाढायला हवी, वाढत आहे.
'पाणी फौंडेशन' तर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धे मुळे चालू झालेल्या चळवळी अंतर्गत दिल्या जाणार्या पाणी अडवण्या- जिरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबरोबरच मातीचा कस, मातीची जलधारण क्षमता ई. अनुषंगाने माती परिक्षण विषयक प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जात आहेत. १ मे रोजी झालेल्या श्रमदान शिबिरानंतरच्या रविवारी त्यातल्याच काही स्वयंसेवकांचा गट परिक्षणाकरता आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या गावात जाऊन शेतकर्यांना त्यांच्या मातीचे नमुने तपासून त्याचे परिक्षण करून देण्यात सक्रिय होता. त्यांना भरपूर काम करावे लागेल म्हणजेच शेतकरी जागरूक होतो आहे मी काढलेले अनुमान