परमहंसांची दाल-बाटी

Submitted by हरिहर. on 16 May, 2018 - 04:17

ऐन ऊन्हाळ्याचे दिवस. माझी साईट परळी जवळ सोनपेठ रोडला सुरु होती. निर्जन प्रदेश. सावलीसाठी राखलेले एखादे झाड सोडले तर दुर दुर पर्यंत ऊंच वाढलेले वाळलेले गवत. साईटजवळ एक छोटी वाडी. पण तिही दिवसभर मोकळी. एखाद दोन चुकार कुत्री, काही म्हातारी माणसे. बाकी काही हालचाल नाही. सगळे रानात किंवा औष्णीक केंद्रावर कामाला जायचे. वाडीला वळसा घालून लहाण टेकडीआड दिसेनासा होणारा एक छोटा डांबरी रस्ता. त्यावरचे डांबरही दुपारी वितळायला लागायचे. या टेकडीच्या पायथ्याशीच तात्पुरते ऑफीस आणि डंपर्ससाठी डेपो आणि गॅरेज ऊभारलेले. साईट नऊ किमी पसरलेली. चाळीस डंपर्स आणि दहा-बारा पोकलेन. कामाच्या सुरवातीलाच स्थानिक लोकांनी त्रास दिल्याने मी सर्व ड्रायव्हर्स पुण्याला परत पाठवले आणि स्थानिक ड्रायव्हर्स भरती केले. पोकलेन ऑपरेटर्स युपी साईडचे. एखाद दोन मराठी. काही प्रचंड खडक कामाच्या मध्ये अडचण ठरायचे. ते काढण्यासाठी एक राजस्थानी टोळीही होती. त्यांचे दिवसभर कुठे ना कुठे ड्रिलिंगचे काम सुरु असायचे. कंट्रोल ब्लास्टींगसाठी. पोकलेनचा खडखडाट, ड्रिलर्सची थड थड, डंपर्सची वर्दळ, प्रचंड धुरळा आणि डोक्यावर आग ओकनारा सुर्यनारायण. या सगळ्यातुन साईटच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत सतत धावणारी माझी जीप. कधी कधी ड्रायव्हर असायचा पण बरेचदा मलाच ड्राईव्ह करायला लागायचे. कुणाच्या पोकलेन बकेटचा टुथ तुटलाय, तर कुणाच्या हायड्रॉलीक पाईपचा प्रॉब्लेम तर कुठे डंपरचा रॉड निखळलेला. एकुन युध्दभुमीपेक्षा वातावरण काही कमी नसायचे. दुपारी जेवायला ऑफीसवरच यावे लागे. कारण अजुबाजूला जेवायला बसन्यासाठीसुध्दा झाड नाही. मेस नावाची एक मोठी शेड होती. त्यात ड्रायव्हर्सनीच बनवलेले टेबल. त्या शेडखाली टेबलवर बसुन जेवायचे म्हणजे बंकर मध्येच बसल्यासारखे वाटायचे. कामाची डेड लाईन ठरलेली असल्याने काम सुरु करायची वेळ ठरलेली नसे तसेच संपवायची वेळही ठरलेली नसे. सुर्योदयापुर्वी बरेचसे काम ऊरकण्याकडे सगळ्यांचा कल असे. संध्याकाळपर्यंत शरीर अगदी शिणून जाई. पण त्या कामाची एक नशा असल्यासारखं व्हायचं. युध्दज्वर चढावा तसे सगळेच कामाला भिडत.

पण या सगळ्या शिणवट्याची भरपाई होई ती संध्याकाळ झाल्यावर. ओसाडपणातही खुप सौंदर्य असते हे तिथे कळाले. संध्याकाळ झाली की आजुबाजूचा सगळा परिसर जणू व्हॅन गॉगचे पेंटींग बनुन जाई. नजर जाईल तिथपर्यत पिवळेधमक गवत. सगळे पिवळे डंपर्स रांगोळी काढल्यासारखे रांगेत लावलेले. दिवसभर ज्या मातीशी धडका घेतल्या त्या मातीवरच नांगी टाकून शरण आल्यासारखे ऊभे असलेले पिवळे पोकलेन. अधून मधून नांगरलेली राखाडी शेतपट्टी. दिवसभर खोदलेल्या माती-मुरुमाच्या विटकरी छोट्या छोट्या टेकड्या. व्हॅन गॉगच्याच पेंटीगसारखी दमलेली, घराकडे परतनारी माणसे, खाली निवलेली पण तरीही किंचीत गरम असलेली जमीन आणि अतिशय अल्हाददायक हवेच्या हलक्या झुळकी. ऑफीस समोर खुप मोठे गवताळ मैदान होते. तेथे सगळे डंपर्स लागत. रोज काम संपल्यावर एका मागोमाग एक चाळीस डंपर मैदानकडे येत तेंव्हा या ड्रायव्हर्समधला कलाकार जागा होई. रोज वेगवेगळ्या आकारात, चक्रव्युह रचावा तसे डंपर्स पार्क केले जात. मध्ये आठ-दहा लोखंडी पाईप्सच्या, कॉटन पट्ट्यांनी विणलेल्या बाजा टाकलेल्या असत. त्यांना केंद्रबिंदू धरुन हा व्युह रचला जाई. चाळीस गाड्यांचा हा व्युह काही गम्मत म्हणून आखला जात नसे. सकाळी कामावर निघताना एका गाडीची दुसऱ्या गाडीला किंचीतही अडचण न होता हा ताफा फक्त दहा मिनिटात रस्त्यावर धुळ ऊडवत धावायला लागे. रविवारी संध्याकाळी आवर्जुन विचारपुर्वक गाड्यांची रचना केली जाई. कारण सोमवारी सुट्टी असे. मग आम्ही विरंगुळा म्हणून बाजुची टेकडी चढून जायचो. टेकडीवरुन या गाड्यांची रचना फार सुंदर दिसे.

संध्याकाळी या मधल्या वर्तुळातल्या बाजांवर बैठक बसे. सगळे ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स असत. माझ्याबरोबर सहा ईंजीनीअर्स आणि पाच ‘ईतर काम पहाणारे’ होते पण ते संध्याकाळी परळीला जात. कंपणीने स्टाफसाठी एक छान बंगला भाड्याने घेतला होता. पण मी साईटवरच रहाणे पसंत करी. तर असो. या बाजांवर झालेल्या बैठका म्हणजे माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक आनंदां पैकी एक होत. यात युपी, राजस्थानी आणि काही मराठी असत. जेवणं वगैरे ऊरकून आमची बैठक एकदा जमली की मग वेळकाळाचे भान नसे. एक युपीचा ड्रायव्हर त्याची एकतारी घेवून येई. एकतारी वाद्य हे ईतकं सुंदर तालवाद्यही आहे हे माहीत नव्हते मला. त्याच्या एकतारीला एका खाली एक अशा दोन तारा होत्या. त्यावर तो एका बोटाने ऱ्हिदम पकडून छान भजने म्हणे. अतिशय सुरेल आवाजात. राजस्थानी गृपमधला एक चिलिम ओढी. गप्पा मारताना अर्धा तास त्याचे चिलिम भरण्याचे कसबी काम चाले. चिलिम भरुन झाली आणि जर वारा नसेल तर तो हाताने खुण करी. सगळे गप्पा थांबवून त्याच्याकडे पहात. हा एक-दोन मोठे दम भरी आणि वर तोंड करुन धुराची ईतकी मोहक रुपे साकारी की विचारता सोय नाही. कुणीतरी एखाद्या डंपरचा हेडलँप ऑन करी. मग ती धुराची एकात एक गुंतलेली वलयं एकदम चमकदार दिसायला लागत. कुणी “माझ्या आजोबाची गोष्ट सांगतो” म्हणत एखादी थरारक घटना सांगे. खरी खोटी त्याची त्याला माहीत. पण सांगण्याच्या हातोटीमुळे आमचा वेळ बाकी मस्त जाई. या कष्टकरी, मुलूखापासून, कुटूंबापासुन दुर असणाऱ्या लोकांचे वेगळेच रुप मला पहायला मिळे.

सोमवारी सुट्टी असे. आणि सोमवारीच आजुबाजूच्या अनेक छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये देवळात भजने असत. असाच एकदा रात्री पोकलेनवर बसलो असताना भजनाचा आवाज आला. माझ्या सोबत राजस्थानी गृपचा लिडर ‘बाजी’ होता. त्याला म्हणालो “चल बाजी, येतो का? बघू कुठे भजन चाललय ते.” बाजी तयारच असायचा अशा गोष्टींसाठी. तो पळत गेला आणि दहा मिनिटात जीप घेऊन आला. त्याच्या सोबत त्याच्याच गृपमधला एक होता आणि युपीचा ‘बडे’ही त्याची एकतारी घेऊन आला होता. आम्ही दहा पंधरा मिनिटातच भजन सुरु असलेले देऊळ शोधून काढले. मंडळीनी भैरवीच घेतली होती. माझा जरा हिरमोड झाला. पण मला पहाताच भजनी मंडळाने मोठ्या प्रेमाने सतरंजी टाकून जागा करुन दिली. कुणाला तरी “गवळण घ्या रे एखादी. साहेब आलेत ऐकायला.” म्हणत हुकूम दिला. (बहुतेक वाड्यांना मी नुकसानभरपाई मिळवून देताना जरा ढिला हात सोडला होता.) आता आठवत नाही कोणती होती पण गवळण मस्त रंगली. बाजीबरोबर आलेल्या मुलाने खिशातुन त्याच्या लाकडी चिपळ्या (करताल) काढल्या आणि बसल्या जागेवरुनच ताल मिळवला. हे कोण आणि काय वाजवतय हे भजनीमंडळींना समजेना. बाजीने त्याला ऊठवला आणि पुढे नेऊन बसवला. ईतर लोक पहिल्यांदाच हे वाद्य पहात होते. पण त्यांचे आश्चर्य काहीवेळातच बाजूला राहीले आणि त्यांच्या टाळात याच्या चिपळ्या मस्त सामावून गेल्या. मग बाजीने बडेला (हा घरात सर्वात थोरला म्हणून युपी पद्धतीने ‘बडे’) पुढे केले. त्याला भजनाचा काहीही अर्थ कळत नव्हता पण सुरतालात चांगला मुरलेला. त्यामुळे भजनाची सुरावट पकडून बडे एखादे त्याचे कडवे भजनात बेमालून मिसळत होता. थोड्या वेळाने पेटी-पखवाद आणि एकतारी-चिपळी अशी जुगलबंदी सुरु झाली. मला खात्री आहे की त्या देवळातला देव त्या दिवशी नक्की प्रसन्न झाला असणार. रात्री दहा वाजता संपणारे भजन पहाटे नाईलाजाने आवरते घेतले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडीतले लोक साईटवर आले. बडेला आणि त्या राजस्थानी मुलाला जेवायचे आमंत्रण द्यायला. अर्थात सोबत मी आणि बाजीही होतो. पुरणपोळी-गुळवणी, कुरडई खाताना त्यांची होणारी तारांबळ पाहून सगळं घर हसत होतं. दोघांनीही हे पदार्थ पहिल्यांदाच चाखले होते. आणि पहिल्यांदाच भरपुर चापलेही होते. अगदी पोटभर जेवले. जेवणानंतर त्यांना टोपी नारळ आणि परत भजनाला यायचे आमंत्रण मिळाले.

कामे सुरु होती. अडचणी येत होत्या, तरीही आम्ही काम पुढे रेटत होतो. अशातच पुण्याला हेडऑफीसला काहीतरी गडबड झाली आणि काम दोन दिवस थांबले. दिवसभर बसुन कंटाळा आला होता. मी बाजीला हाक मारली. काही पैसे काढून दिले. बाजी तसा हुशार होता. त वरुन ताकभात ओळखायचा. तासाभरातच बाजीची जीप परळीकडे जाताना दिसली. संध्याकाळी टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ऊतारावर बाजीने जागा बऱ्यापैकी साफ करवून घेतली, बाजली मांडली. टेकायला दोन रग टाकले. पाच-सहा लाकडे होळीला रचावी तशी रचून पेटवली. बाजूलाच एक बांबू रोवून त्यावर एक बल्ब टांगला. त्याला जीपच्या बॅटरीचे कनेक्शन दिले. मग बाजी आणि त्याची टिम कामाला जुंपली. कुणी तुपामध्ये कणीक मळायला घेतले तर कुणी पातेल्यांच्या बुडांना चिखल लावायला घेतला. दोघांनी डाळी स्वच्छ धुऊन घेतल्या. बाजीने येतानाच वाडीतुन भरपुर गोवऱ्या आणल्या होत्या. त्या एकमेकांना टेकवून त्यांची छोटी रांग केली. त्यावर तुप टाकून पेटवल्या. जो तो कामात गढून गेला. संध्याकाळची अल्हाददायक हवा, सगळीकडे पसरलेला गवताचा पिवळा रंग, समोर सुर्यास्त, मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे, जीपमध्ये मेहदीसाहेबांचे अलवार ‘गुलोमे रंग भरे, बादे नौबहार चले’, बाजीने कुठूनतरी पैदा केलेली व्होडका, बाजूलाच चाललेली दाल-बाटीची जय्यत तयारी. अहा हा! काय सुरेख संध्याकाळ होती ती.

साईट पुर्ण झाली. मी पुण्याला परत आलो. तिकडच्या ड्रायव्हर्सने तिकडेच दुसरे काम शोधले. बाजी आणि त्याची टिम पोटामागे अजून कुठे कुठे भटकत गेली. मीही काही दिवसांनी कंपणी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कंपणीतल्या सहकाऱ्यांचा संपर्क हळू हळू कमी होत पुर्ण थांबला. पण मधेच त्या दिवशी रंगलेले भजन आठवते, (त्यानंतर अनेक दिग्गजांच्या मैफीली ऐकल्या पण त्या दिवसासारखे भान नाही हरपले.) बडेची एकतारीवरची भजने आठवतात, बाजीची चिपळीच्या तालावर गायलेली राजस्थानी लोकगीते आठवतात. त्याच्या हातची ती दाल-बाटी आठवते. अचाणक आलेल्या वळवाच्या पावसात कोसळलेली मेस आणि त्या दिवशी संध्याकाळी जेवणाच्या नावाखाली बडेनी केलेले मिळेल त्या डाळींचे अत्यंत चवदार सुप आठवते. यातल्या कोणत्याच गोष्टी आता परत मिळणार नाही याची जाणिव असुनही काही गोष्टींसाठी अट्टाहास करतो अधुन मधून. कुठे दाल-बाटी चांगली मिळते असे ऐकले की आवर्जुन जाऊन येतो. परिसरातील एकही हॉटेल सोडलं नाही. चोखी धानीही ट्राय करुन झालं. एकदा तर औरंगाबादजवळ कुठल्या तरी धाब्यावर छान मिळते ऐकून तेथवर धडक मारली. (तिकडे बट्टी म्हणतात.) शेवटी एका राजस्थानी आचाऱ्याला गाडीत टाकून गावाला नेले. मित्राच्या शेतात दाल-बाटीचा कार्यक्रम केला. पण बाजीच्या हातची चव काही मिळाली नाही ते नाहीच.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी कुठेसे जात असताना रस्त्यात एक छोटेसे हॉटेल दिसले. नाव जरा वेगळे वाटले. “परमहंस”. मला वाटले बंगाली असेल. मला बंगाली डिश आवडतात. हिलसा वगैरे मिळाला तर बरेच होईल असा विचार केला. जेवायचीही वेळ होती. मी गाडी वळवून परत मागे आलो. गाडी पार्क केली आणि परमहंसला गेलो. प्रथमदर्शनीच मुड जरा गेला. कारण फक्त टेबलांच्या दोनच रांगा. मागे किचन असावे. हात धुवायचे बेसीन हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला. आणि बोर्डवर लिहिलेलं “राजस्थानी थाळी”. टेबलवर बसलो. पत्नीच्या चेहऱ्यावर “मिळू दे बाबा याला एकदाची मनासारखी दाल बाटी” असा भाव. मेन्यूकार्ड पाहीले. १२० रुपयाला दाल-बाटी. म्हटलं १२० रुपयात हे काय देणार? पण आता आलोच आहो तर खावूया. मग ऑर्डर दिली दोन थाळ्यांची. पाचच मिनिटात दोन ताटे समोर आली. ताटात फक्त दाल, लाल चटणी, पापड, लोणचे. ईतक्यात दुसरा आला. त्याने दोघांच्याही ताटात दोन दोन बाट्या अगदी बारीक कुस्करुन दिल्या. दोन दोन बाट्या बाजूच्या डिशमध्ये ठेवल्या. तो गेल्यावर दुसरा एकजण तुपाची किटली घेवून आला. छोट्या मापट्याने त्याने भरपुर तुप ताटातल्या आणि डिशमधल्या बाटीवर घातले. अगदी ‘पुरे’ म्हणेपर्यंत वाढले. माझी तब्बेत खुष झाली. कारण बाजीशिवाय मला कोणी हाताने बाटी चुरुन दिली नव्हती आजवर. पहिला घास खाल्ला. आणि काय सांगू? चक्क ‘बाजी’ची आठवण झाली. अगदी तशीच नसली तरी बरीचशी जवळ जाणारी चव होती. पहिल्या दोन बाट्या खाईपर्यंत मग मी सगळं विसरुन गेलो. नंरत मग दोन बाट्या अत्यंत चवीने खाल्या. शेवटी ईतक्या दिवसांची ईच्छा “परमहंसां’नी पुर्ण केली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख लिहलय..... तुमच्या साईटचे अगदी चित्र उभे राहीले डोळ्यासमोर
साईटचे वर्णन वाचताना 'रारंगढांग' ची आठवण आली

खू...प सुंदर लिहिलंय. मारुती चितमपल्लींची आठवण झाली. तेही अति काव्यमय भाषा न वापरता सुद्धा खूप सुंदर वर्णन करतात...

लई भारी साहेब.
फार आवडलं लेखन.
शेतातल्या खड्यात गोवर्याँवर आरामात भाजलेली बाटी, गरमा-गरम दाळ, आणि भरपूर तूप : मजाच भारी ।
परळी जवळ ही साईट कसली होती ?

Pages