निवळले म्हणेतो पुन्हा सज्ज वादळ !

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 May, 2018 - 06:48

अकाली कळ्या ह्या करपतात सोज्वळ
तुला काय सूर्या, उगव आणि मावळ !

कुठे पाळती ह्या नियम कोणताही ?
स्मृतींची अहोरात्र मेंदूत वर्दळ

सरींसोबती कोवळे ऊन यावे
तसे आसवांमागचे हास्य निर्मळ !

उसासे नजरभेट चुंबन अलिंगन
निवळले म्हणेतो पुन्हा सज्ज वादळ !

असे भुलवितो चित्त मृदगंध ओला
जणू तान्हुल्याचे सुगंधीत जावळ

तुला काय कळणार किंमत फुलांची ?
कधी बोचलेली नसावीच बाभळ

घरी परतताना तिन्हीसांज भासे
कुणी प्रेमिका सज्ज रेखून काजळ

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users