चांगले जगता यावे ह्यासाठी सकारात्मकता आणि मनःस्वास्थ्य कसे आवश्यक आहे व ते कसे मिळवावे ह्याची कहाणी म्हणजे १०२ नॉट आऊट!
चित्रपटाचा आरंभ, मध्य आणि अंत ह्यात कथानक वेगवेगळेच वाटू शकते. प्रथम स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी मुलाला वेठीला धरणारा बाप, नंतर मुलाला जगण्याचे स्पिरिट मिळवून देण्यासाठी चमत्कारीक अटी लादणारा बाप आणि शेवटी मुलासकट सगळ्याच प्रेक्षकांना एका अत्युच्च विचारसरणीवर नेऊन सोडणारा बाप असे कथेचे तीन टप्पे जाणवतात.
चित्रपटात मन गुंतून राहावे ह्यासाठी अॅक्शन, रोमान्स, संगीत, दर्दी अभिनय, विनोद, कथानकातील अंगभूत ताकद ह्यातील एक किंवा अनेक गोष्टी एकाचवेळी कार्यरत होत असतात. मात्र १०२ नॉट आऊट सारखी कथानके दुर्मीळ असतात व त्यात ह्यातील बहुतेक घटकांना काहीच स्थान नसते. मग अपरिहार्यपणे अभिनयाची उत्तुंग पातळी आणि हलकाफुलका विनोद ह्यातून प्रेक्षकाला गुंतवून ठेवावे लागते. होय, कथानक तसे पाहिले तर अगदीच दोन ओळींत सांगण्यासारखे व विशेष काही नसलेले आहे. जगावे कसे, मानसिकता कशी ठेवावी ह्यावर कथानक एक आश्वासक व अनुकरणीय भाष्य करते इतकेच! हे कथानक फुलवून फुलवून किती फुलवणार? त्यातल्यात्यात आईबापांना विसरणार्या, पैशामागे असलेल्या, परदेशात कायमचे गेलेल्या एका पिढीचा नालायकपणा व त्या पिढीला घडलेली अद्दल ही फोडणी तेवढी दिलेली आहे. पण एक वेळ अशी येते की फक्त फोडणीचीच चव व्यापून उरते.
अमिताभ बच्चन ही अभिनयाची संस्था आहे. संपूर्ण चित्रपटात त्याच्या तोंडी असलेल्या शेकडो वाक्यांपैकी दोनच वाक्ये अशी आहेत जी बोलताना कॅमेरा त्याच्या डोळ्यांवर स्थिरावतो आणि फार फार पूर्वीचा अमिताभ लक्ककन् झळकून जातो. मनात गलबलते. त्यातील एक वाक्य म्हणजे:
"औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये "
हाडकलेल्या शरीराच्या विझलेल्या डोळ्यांमध्ये पूर्वीचा एक ओळखीचा अंगार दिसतो आणि त्या एका क्षणातच मन तृप्त होते.
आणखी असे दोन तीन क्षण सोडले तर चित्रपटभर अमिताभचा वावर हा 'हा चित्रपट तर काय, पूर्णपणे माझाच आहे 'ह्या शैलीतील आहे. आता कथानकाची गरजच त्या पात्राने तसेच वागावे ही आहे हे मान्य केले तरी अमिताभचे अमिताभपण बेमालूमपण झाकण्याइतपत कथानक थोर नाही. अमिताभचे अमिताभपणच वापरण्यावर भर दिसून येतो. त्याला दिलेल्या वेशभूषा, त्याची वेगळी देहबोली, वेगळी भाषाशैली, वेगळे हसणे ह्या इतक्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या करूनही अमिताभ हा अमिताभ म्हणूनच वावरतो आणि प्रेक्षकांनाही तो तसाच पाहायला लागतो व आवडतही असावा. परिणामतः चित्रपट अमिताभच्या खिशात जातो.
मानवी भावभावनांचा सूक्ष्म अभ्यास असलेला, दिलखुलास व सर्वार्थाने जिवंत राहू पाहणारा हँडसम म्हातारा अमिताभने जिवंत केला आहे खरा, मात्र काही किरकोळ बाबी खटकतात. १०२ वर्षाचा म्हातारा काही झाले तरी इतका फिट नसतो. ते एक असो! त्याने काहीतरी उद्देशाने एक दीर्घ योजना आखणे, ती यशस्वी होण्यासाठी विविध मार्ग अवलंबणे हे सगळे कथानकातील काल्पनिकतेला अधिक ठळक करते.
अमिताभऐवजी इतरांनी हे पात्र कसे वठवले असते असा विचार अमिताभच्या बाबतीत पहिल्यांदाच मनात आला. नसिरउद्दिनने ह्या भूमिकेचे तितकेच सोने केले असते असेही वाटले. बाकी परेश रावल वगैरेंनी भूमिकेची वाट लावली असती.
मूळ कथानकाची मध्यंतरापर्यंत चुणूकही दिसत नसल्याने पहिला बराचसा भाग कंटाळवाणा झाला.
अमिताभ आणि ऋषी कपूर ह्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले व अनेकदा ऋषी कपूर अमिताभचा लहान भाऊ वगैरे असे. अमिताभच्या दैदीप्यमान कारकीर्दीत काही अत्यंत गुणी अभिनेत्यांचा वावर काहीसा दुर्लक्षित राहायचा त्यात ऋषी कपूर हे नांव फार वरचे म्हणता येईल. स्वबळावर चित्रपट सहज चालवू शकणारे असे हे काही अभिनेते होते. ऋषी कपूर, शशी कपूर, विनोद खन्ना वगैरे! त्यातल्यात्यात ऋषी कपूर ह्या अभिनेत्याने जेव्हा आपली ज्येष्ठपदाची म्हणजे दुसरी इनिंग सुरू केली तेव्हा त्याच्यातील एक निराळाच अभिनेता जगाला दिसून आला. खलनायकी भूमिका आणि ऋषी कपूर हेही समीकरण असू शकते हे त्याने एका चित्रपटात दाखवून दिले. अन्यथा दिसायला गोरा, गुलाबी, गोंडस, भावुक भूमिका करणारा आणि गीतांना उत्तम न्याय देणारा अभिनेता म्हणूनच ऋषी कपूर मनात बसलेला होता.
१०२ नॉट आऊट मध्ये त्याने कमाल केली आहे. नव्या नवरीला आठ बाय दहाच्या खोलीत काय करायचा तो संसार करून दाखव सांगितल्यानंतरही तिने त्या अडचणीच्या जागेत महाल उभारावा तसा न्याय ऋषी कपूरने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला दिलेला आहे. केवळ अधिक वाव मिळाल्यामुळे बच्चनसाहेब श्रेष्ठ वाटणे अगदी साहजिक आहे, पण मिळालेल्या संधीला दिलेल्या न्याय ह्या निकषावर ऋषी कपूर आणि अमिताभ ह्यांच्यात काहीही कमीजास्त करता येणार नाही. बाकी अमिताभकडे असलेल्या दोन दैवी देणग्या म्हणजे डोळे आणि आवाज, ह्यावर कोणीच कुरघोडी करू शकत नाही हे सत्य आहेच! तिथे मात्र ऋषी कपूर एक पाऊल मागे पडतो. मात्र कथानकासोबत ऋषी कपूरवर कॅमेरा अधिकाधिक स्थिरावत जातो व शेवटी त्याच्यावरच राहतो. ह्या चढत्या क्रमात ऋषी कपूरने लाजवाब रंग भरले आहेत. त्याचे हसणे हसवते आणि रडणे रडवते.
मी आहे म्हणून भूमिका अशी लिहिली गेली आहे असा अमिताभचा वावर आणि भूमिका अशी लिहिली गेली आहे म्हणून मी असा आहे हा ऋषी कपूरचा वावर एकमेकांना इतके पूरक आहेत की एक समर्थ जख्खड तरुण बाप आणि एक सुरुवातीचा परावलंबी वृद्ध मुलगा हे निव्वळ अभिनयावर खिळवून ठेवतात.. चित्रपटात स्त्री पात्राला अक्षरशः काहीच स्थान नाही. म्हणायला एक दोन स्त्रिया पडद्यावर एक दोन क्षण झळकून जातात इतकेच! धीरू नावाचे एक पात्रही आपले काम सुरेख करून जाते.
म्हातारा झालेला सिंहही सिंहच असतो पण आपल्याला आठवत राहतो तो त्याचा सुवर्णकाळातील वावर!
ह्या चित्रपटाला खचितच प्रतिष्ठेचे बहुतेक पुरस्कार मिळतील. मात्र त्याहून सुखद बाब अशी की अशी कथानके तिकिटे काढून पाहण्याइतका आपल्याकडचा प्रेक्षक सुजाण झालेला आहे.
========
-'बेफिकीर'!
अमिताभ च्या तुलनेत ऋषी कपूर
अमिताभ च्या तुलनेत ऋषी कपूर नेहेमीच उजवा अभिनेता होता.
होता नाही आहे..
होता नाही आहे..
70 आणि 80 मध्ये अमिताभ ला टक्कर नाही कोणी.
Pages