आज थोरल्या वाड्यातल्या आज्जीच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस. आज्जीला काहीकाही गोष्टी आजकाल लक्षात राहत नसल्या तरी आज्जी आजची तारीख विसरायची नाही.
नेहमीसारखी भल्या पहाटे ऊठून, सगळं आवरून आज्जी खोलीत आली. आज कोण जाणे का पण मन हवं तितकं आनंदी नव्हतं.
तशी आज्जीला कधी कशाची ददात नव्हती. आजोबांशी लग्न झाल्यावर आज्जी या घरात आली. घर अगदी भरलं गोकुळ होतं, पोरंबाळं धरून २० माणसं. आज्जी माणूसवेल्हाळ( हा आज्जीच्या सासऱ्यांचा शब्द) असल्यामुळे अगदी रमून गेली. आजोबा गावचे पाटील. आणि फक्त नावानं नाही, तर कामानंही. अडल्यानडल्या माणसांना आजोबा कायमच मदत करायचे. जणू त्यांचा बापच. आज्जीही प्रेमानं सगळ्यांचं करायची. आजोबांनी नवी नाती जोडली आणि आज्जीनं त्यांना माया लावली, जपली. पुढे मुलंबाळं झाल्यावर तर तिची उरलीसुरली उसंतही संपली. सगळ्या रामरगाड्यात आज्जीचं स्वत:चं असं वेगळं अस्तित्वच उरलं नाही. आज्जी त्या वाड्याचीच झाली. कधी गावापासून दूर बाहेर जायचा तिच्यावर प्रसंगच आला नाही. जास्तीत जास्त तालुक्याच्या गावी जायची ती आजोबांबरोबर.
“अहो! आज लक्ष कुठाय?”
आजोबांच्या खणखणीत हाकेने आज्जी भानावर आली.
“अगंबाई! झालं का तुमचं आवरून?” आज्जीनं विचारलं.
आजोबांच्या पल्लेदार मिशा हसल्या.
“कधीच! म्हटलं चहाचा कप मिळतोय का ते बघावं, तर तुम्ही विचारात गढलेल्या. कसला एव्हढा विचार चालू आहे ते तरी सांगा.”
“काही नाही. चहा तयारच आहे. पाठवते” म्हणून आज्जी निघाली. आजोबांना चहा आज्जीच्याच हातचा लागायचा. आलं, वेलदोडे आणि भरपूर साखर घातलेला. गड्याच्या हातात आजोबांचा चहाचा कप देऊन, आज्जी तिचा चहा घेणार, इतक्यात कानावर हाक आली,
“आई! आम्ही आलोय गं..”
आज्जीचा मुलगा आणि सून. दोघेही शहरात रहायचे. नोकऱ्या तिकडेच. दोघांचीही चाळीशी उलटलेली. दोघं निम्मं जग फिरलेले. आज्जीला बोलावून दमले की थोडे दिवस चल आमच्याकडे पण आज्जीचं उत्तर ठरलेलं असायचं, “हे नेतील तेंव्हा येईन मी”.
तिला आजोबांचं गावच्या मातीवरचं प्रेम माहित होतं. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांचं बोलणं तिथेच थांबायचं. आज आज्जी आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी ते दोघे सुट्टी काढून आले होते. पण आज्जीचे डोळे तिच्या नातीला शोधत होते.
सावित्री. साऊ. आज्जीची नात. आज्जीची दुधावरची साय. तिचं आणि आज्जीचं मस्त गूळपीठ जमायचं. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघींची धमाल चालायची नुसती.
साऊ म्हणजे आज्जीसाठी बाहेरच्या जगाचं दार होतं. नवनवीन गोष्टी ती सांगत रहायची आणि आज्जी मन लावून ऐकत रहायची. पोरगी एकदम धिटुकली. तिला एकटीने प्रवास करायला आवडायचं. अगदी परदेशवाऱीही पठ्ठी एकटी करून आली होती. आज्जीला तिच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. जणू साऊच्या डोळ्यातून आज्जी ते जग बघायची. तिच्या गावाच्या वेशीबाहेरचं जग. नवीन अनुभवांचं. जे अनुभव आज्जी फक्त साऊच्या बोलण्यातूनच घेऊ शकत होती.
“या रे बाळांनो. पण माझी साऊ कुठाय?”
“अगं आई, ती संध्याकाळी येणार आहे” हे उत्तर ऐकून आज्जी थोडीशी खट्टू झाली.
काय बरं काम राहिलं असेल साऊचं?
पण आज्जी काही बोलली नाही. कामात बुडाली. आज किमान पन्नास माणसं तरी जेवायला असणार याची तिला खात्री होती, त्यामुळे गडीमाणसांना भराभर सूचना देत तिने कामं उरकली.
इतकी माणसे येणार म्हणजे काही ना काही घेऊन येणार, त्यांच्यासाठी परतीच्या भेटी जातीने काढून ठेवल्या आज्जीने. सगळं नीट चालू आहे याची खात्री झाल्यावर आजोबांचे आज घालायचे कपडे गड्याकडे काढून देऊन आज्जी आपलं आवरायला गेली. जमाना बदलला असला तरी आज्जी अजून नऊवारीच नेसायची. साऊ तिच्या मागे लागायची ड्रेस घालून बघ म्हणून, पण आता काय माझं ड्रेस घालायचं वय आहे का म्हणून आज्जीने हसण्यावारी नेलं होतं ते. आज घालायची म्हणून ठेवलेली हिरवी रेशमी साडी हातात घेतल्यावर तिला पुन्हा साऊची आठवण झाली.
कुठे अडकली पोर? एव्हाना यायला हवी होती. स्वतःशीच बोलत आज्जीने आवरून घेतलं. बाहेरच्या सोप्यात कसला तरी मोठ्याने बोलण्याचा आवाज आला म्हणून आज्जी डोक्यावरून पदर घेत बाहेर आली. बाहेर येऊन पहाते तर काय, तिची साऊ तिच्यासमोर उभी होती.
डोळ्यांनी हसत तिची नात, तिची सख्खी मैत्रीण तिच्याकडे पाहत होती.
“काय ग ठमे? यायला इतका उशीर?” आज्जी कुरबुरली.
पण तिला दाद देईल ती साऊ कसली? डोळे मिचकावत साऊ आज्जीला म्हणाली “तुझ्यासाठी सरप्राईझ आहे” आज्जीने काय म्हणून विचारलं पण साऊने पत्ता लागू दिला नाही. जेवण होऊ दे मग सांगते म्हणाली.
दुपारी ही जंगी माणसे जमली. सर्वांचं आगतस्वागत, जेवू घालणं सगळ्यात आज्जी बुडून गेली. जेवल्यावर आजोबा सगळ्या पुरुषमंडळींबरोबर गप्पा मारत बसले आणि आज्जीभोवती बायकांचा घोळका जमला. अखेर सगळे पाहुणे गेल्यावर साऊने दोघांनाही अक्षरशः मागे लागून वर माडीवरच्या तिच्या खोलीत नेलं.
“अगं किती ती गडबड? काय झालं?” आज्जीने विचारलं.
तशी साऊ गालात हसली, इतकंच काय आजोबा आणि साऊचे आईबाबा पण हसले. आज्जीला काहीच कळत नव्हतं.
“कोणी सांगणार आहे का मला” आज्जी.
“अगं हो हो” म्हणत साऊने एक पाकीट तिच्या हातात दिलं. आज्जीने पाकीट उघडलं तर त्यात कसलीशी कागदपत्रे होती.
“आज्जी हे तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट” साऊ हसून म्हणाली.
“काय आहे गं हे?” आज्जीने साऊला विचारलं.
“आज्जी अगं ही एका चांगल्या प्रवासी कंपनीच्या काश्मीर सहलीची तिकिटं आहेत. तू आणि आजोबा जाणार आहात पुढच्या आठवड्यात!”
आज्जीने विस्फारलेल्या डोळ्यांनी साऊकडे पाहिलं. तिला काही समजतच नव्हतं.
आज्जीचे डोळे पाण्याने डबडबले. तिला आजपर्यंत ज्या काही भेटवस्तू मिळाल्या होत्या त्या एकतर साड्या होत्या नाहीतर दागिने. हे असं काही भेट म्हणून आपल्याला मिळेल अशी तिला अपेक्षाच नव्हती.
तिच्या मनातला प्रश्न ओळखून साऊनेच सांगितलं, “आज्जी तुला आठवतंय? मी माझ्या प्रवासाच्या गोष्टी सांगायचे तेंव्हा तू किती मन लावून ऐकायचीस? अगदी रमून जायचीस त्यात. तुला या गावाबाहेरच जग खुणावायचं पण तू म्हणायचीस तुझे आजोबा नेतील तेंव्हा जाईन मी बाहेर. तर हा आजोबांचा आणि माझा प्लॅन. गेल्या महिन्यात आजोबांनी मला फोन केला आणि सांगितलं की त्यांना तुला कुठेतरी फिरायला न्यायचंय. मग काय लागले कामाला. काश्मीर मात्र माझी चॉईस हा! तुला खूप आवडेल बघ निसर्गसंपन्न काश्मीर. आणि हो आज्जी तुम्ही दोघेही विमानाने जाणार आहात!”
“काय?” आजीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिने आजोबांकडे पाहिलं तर त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं.
“आजपर्यंत अनेकदा असा विचार केला की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ पण ते जमलंच नाही, या संसाराच्या रामरगाड्यात अजूनच गुरफटत गेलो आपण. पण म्हणतात ना देर आए, दुरूस्त आए. आता इथून पुढे दरवर्षी असच छान फिरायला जायचं आपण. काय मग? कशी वाटली भेट?”
आजोबांनी विचारलं. यावर आज्जी झक्कपैकी लाजली. साऊने तर टाळ्याच पिटल्या. आजवरच्या आज्जीच्या आयुष्यातली सर्वात अनपेक्षित आणि सर्वात सुखद भेट होती ती....
अप्रतिम..
अप्रतिम..
छान लिहिलीय. आवडली कथा.
छान लिहिलीय. आवडली कथा. पुलेशु.
वा .. मस्त आहे की..
वा .. मस्त आहे की..
छान कथा, आवडली
छान कथा, आवडली
कथा साधीच वाटली पण तुमची
कथा साधीच वाटली पण तुमची लेखनशैली मस्त ओघवती आहे.. पुढील लेखनाला शुभेच्छा ☺️
आवडली.
आवडली.
फार छान
फार छान