चाळीतील गमती-जमती (४)

Submitted by राजेश्री on 7 May, 2018 - 06:45

चाळीतल्या गमती-जमती(४)

आमच्या चाळीत हर तर्हेची माणसं आम्ही पाहिली. आमचे बहुसंख्य शेजारी निम्न मध्यमवर्गीय होते.आहे रे वर्गापासून दूर आणि नाही रे वर्गाच्या जरा जवळ अशी त्यांची आर्थिक परिस्थिती. मग व्हायचं काय कधी एखाद्या महिन्यात दवाखाना माग लागला,काही अनाहूत खर्च उपटले की या वर्गाचं पारड नाही रे वर्गाकडे झुकायच.कधी काही नोकरीच टेन्शन असायचं,कधी मुलीच्या लग्नाची चिंता,पोरगा असा का वागतो म्हणून काळजी.मग या लोकांचे पाय कामावरून येताना दारूच्या गुत्त्याकडे वळायचे.आमच्या शेजारचे प्रमोद चे वडील आम्ही त्यांना ताईचे बाबा म्हणायचो.ते त्यातलेच एक.स्वभाव साधा भोळा पण दारू पिऊन आले की घरातल्यांसाठी त्यांची डोकेदुखी ठरलेली असायची.शिवाय तमाशा हा प्रकार सुरू व्हायचाच तो वेगळा.म्हणजे कधी आपलं उगीच रडायचं.कधी कोण शेजारी ऐकून घेणार बसलं असेल तर काही बरगळत आपलीच कथा सांगणं असे प्रकार चालायचे.ताईचे बाबा दारू पिऊन आले की आमची मम्मी मागचा दरवाजा बंद करायची आणि आम्ही मुकाट्याने बाहेर कुठं न जाता अभ्यास करायचा हा अधिलिखित नियम असायचा.आमचे कान मात्र त्या बाहेरच्या आवाजाकडे.मला पायजेल हिथ..हा त्यांचा रोज टाकून आल्यानंतरचा (म्हणजे दारू पिऊन आल्यानंतरचा)परवलीचा शब्द असायचा.उठा जेवण तयार आहे असं ताईच्या आई सांगायला लागल्या की म्हणायचे,मला पायजेल हिथ..अंघोळ करून घ्या म्हंटल तरी आपलं तेच,मला पायजेल हिथ..आम्हाला हे आमच्या घरात बसूनही ऐकायला यायच.ताईचे बाबा अस म्हंटल की आम्ही लय हसायचो.मम्मी आम्हाला डोळे वटारून शांत बसा म्हणून डाफ्रायची .
एकदा तायडी मला मी शेजाऱ्यांच्या घरात बसले असताना जेवायला बोलवायला आली.म्हणाली राजू जेवायला चल, मला अचानक ताईच्या बाबांची आठवण झाली मी लगेच दारू पिऊन बरगळतात तस तिला म्हणाले,मला पायजेल हिथ...तायडी तशीच माघारी जाऊन मम्मीला घेऊन आली.मम्मीच्या हातात काठी.तुला कुठं पायजेल सांग म्हणत मला फटके बसलेच. तेंव्हापासून मी मला पायजेल हिथ अस कधीच म्हणाले नाही.
ताईच्या बाबांचं नाव गोविंदा ..मग काय मी आणि माझी मैत्रीण ते लांबून येताना दिसले की हे गोविंदा आला रे आला...अस मोठ्याने म्हणत जायचो.आमची तक्रार आप आपल्या मम्यानकडे झाल्यावर शुभांगीची मम्मी आमच्या मम्मीला म्हणाली तुमच्या पोरीच्या नादाने आमची पोरगी बिघडली आणि आमची मम्मी त्यांना म्हणाली तुमच्याच पोरीच्या नादाने आमची पोरगी बिघडली. मग काय त्यादिवशी चाळकऱ्यांना मला पायजेल हिथ..चा एपिसोड बघायला न मिळता भांडणाचा एपिसोड मात्र पहायला मिळालाच.आणि पुढे फतकल घालून ताईचे बाबा देखील भांडण बघत होते..जणू काय ते म्हंटले असावेत की,मला भांडण पायजेल हिथ......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिताय. मी हे वातावरण आणि अशा विवध स्वभावाची माणसे लहानपणी जवळून पहिले असल्याने चित्र उभे राहते. लिहित रहा.

फक्त एकच सुचवावेसे वाटते कि हे सगळे किस्से एकाच धाग्यात लिहिले तर वाचकांच्या दृष्टीने जास्त बरे होईल. एकगठ्ठा वाचायला मिळेल आणि तुम्हाला सुद्धा सर्व प्रतिसाद एकत्र पहावयास मिळतील. (एकाच धाग्यात एकत्र तुम्हाला अनुभव आठवतील तसे प्रतिसादांतून लिहू शकता किंवा धाग्याच्या विषयातच एडीट करून भर घालू शकता).