अश्लील वगैरे जोक तसे

Submitted by बेफ़िकीर on 5 May, 2018 - 13:06

गझल - अश्लील वगैरे जोक तसे

प्रत्येकाला येतातच अश्लील वगैरे जोक तसे
तरी तुम्ही असता की प्रत्येकासोबत निर्धोक तसे

ज्यांना बघून काढावी टोपी ते गेले केव्हाचे
ज्यांना बघून फुंकावी सिगरेट.. राहिले लोक तसे

फार उशीरा मला समजले तुमच्यामधला नाही मी
नका दोष देऊ की नाही पाठीला या पोक तसे

उगाच का मी येऊ टाळ्या शिट्ट्या वाजवण्यासाठी
तुला जमवता येतातच की हवे तिथे बिनडोक तसे

माझ्या धर्मामधील सारे घेत भरारी उडणारे
तुझी लायकी जशी महंता, तुला मिळाले भोक तसे

असेच पचनी पडले आहे तुझे न माझे असणेही
असून हृदयामधे दिसेना हृदयावरची खोक तसे

उगीच गांभीर्याने आलो घेत जीवनाला....जीवन
'बेफिकीर'चा हरेक मुद्दा तुला वाटतो जोक तसे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार उशीरा मला समजले तुमच्यामधला नाही मी
नका दोष देऊ की नाही पाठीला या पोक तसे

सही!

माझ्या धर्मामधील सारे घेत भरारी उडणारे
तुझी लायकी जशी महंता, तुला मिळाले भोक तसे

याचा संदर्भ लागला नाही.

<<<याचा संदर्भ लागला नाही.>>>
पुढे मागे बेफिकीरांच्या कविता शाळेच्या पुस्तकात अभ्यासाला लावतील तेंव्हा explain with reference to context असा प्रश्न येईल तेंव्हा मुले इंग्रजीतून त्याचे उत्तर देतील नि त्यांना मराठीत ९५ मार्क मिळतील (१०० पैकी). बक्षीस अर्थातच खुद्द बेफिकीर यांच्या हस्ते!