पूर्वीसारखे वेस्टर्नपट आता हॉलिवूडमध्ये निघत नसले तरी चित्रपटाचा हा प्रकार पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. आणि होणारही नाही. दर काही वर्षांनी एखादा वेस्टर्नपट येतच असतो. येणार्या चित्रपटांपैकी सर्वच दर्जेदार असतात असेही नाही. मला स्वतःला उत्तम वेस्टर्नपट पाहिला की कुणीतरी शिवधनुष्य पेलल्याची भावना होते. कारण चित्रपटाच्या या प्रकारात फार सूक्ष्म कंगोरे आहेत. साधारणपणे १८५० ते १९३० पर्यंतच्या काळातले वातावरण उभे करावे लागते. विसाव्या शतकात माणसे असली तर जुन्या गाड्या दिसतात. त्याच्या थोडे आधी गेले की रेल्वे येऊ घातलेली असते आणि घोडेही असतात. त्याच्या आधी बहुतकरून घोडेस्वारीच. आणि त्यावरच्या स्वारांच्या बुटांना असलेले ते अणकुचीदार स्पर्स. या काळानुरुपच वेशभुषा असते. अलिकडला काळ असेल तर कोट आणि हॅट, पलिकडला काळ असेल तर जॅकिट आणि हॅट. त्याबरोबर घरे, टाउन्स, सलून्स यांचे नेपथ्य पुन्हा तो काळ उभा करेल असे असावे लागते अन्यथा तो फिल येत नाही. जुन्या "जँगो" सारख्या चित्रपटात तर रस्ता असा दिसलाच नव्हता सर्वत्र माती किंवा पायवाटा. मोठमोठाली ड्राय गुड्सची दुकाने. घोडे किंवा घोडागाडी सांभाळण्यासाठीच्या जागा. हे त्याकाळचे पार्किंग असणार.
एकंदरीत काहीवेळा रुक्ष भासणारे, खडखडीत, रोखठोक वातावरण. निसर्गही तसाच रोखठोक. बहुतेक वेस्टर्नपटात एकतर उन्हाळा किंवा हिवाळा दाखवला असेल. त्यातही थंडीच. पण बर्फाळ जागा फारच कमी दिसल्या. घोड्यांचा कळपाची राखणदारी असेल तर हिरवाई दिसते. कथावस्तु साधारणपणे घडते ती टेक्सास आणि मॅक्सिकोच्या आसपास. बहुतेकदा कडक उन्हाळ्याचे दिवस, त्यात फारशी झुडपे नसलेल्या मोठमोठाल्या डोंगरावरच्या घोड्यांच्या टापानींच मळलेल्या वाटेवरून भरधाव वेगाने चाललेले ते घोडेस्वार. कमरेला लटकलेले पिस्तुल. मध्येच थांबून कातडी गोल बॅगमधून ते पाणी पितात. त्यावेळी त्यांचे उन्हाने रापलेले चेहरे दिसतात. ही मंडळी टाऊन्समध्ये आली कि आपल्याला नागरी वस्ती दिसते. मग त्या विशिष्ट टोप्या घातलेल्या स्त्रिया. त्या समोर आल्या की आदबीने हॅट काढणारे, निदान हॅटला हात लावून ती अदब दाखवणारे हे घोडेस्वार अत्यंत मानी असतात. ही माणसे प्रथम जाणार ती न्हाव्याकडे. हजामत उरकली की जाणार अंघोळीला. फुल टब बाथ आणि मग "स्टेक" असलेलं व्हिस्किसोबतचं जेवण. तेव्हाच यांना "ऑलमोस्ट फिलिंग लाईक अ ह्युमन" अशी भावना होते.
चित्रपटात ही अक्कडबाज मंडळी सलून्समध्ये गेली की बहुधा पहिली मारामारी होते. कुणीतरी तेथे कुरापत काढणारा भेटतो. मग गनफाईटचे आव्हान दिले जाते. त्यात अर्थातच आपला हिरो जिंकतो. काहीवेळा पिस्तुलाशिवायच मारामारी होते. त्यात बहुतेकदा ठोसेबाजी. तेथे कुणी मारामारी थांबवायला मध्ये पडत नाही. उलट प्रोत्साहनच दिले जाते. जो शेवटपर्यंत उभा राहिल तो जिंकतो. अर्थात आपला इरो जिंकतो आणि बाकिचे त्याच्याकडे आदराने पाहु लागतात. जो विद्युतवेगाने गन काढून अचूक नेम साधतो त्याला या चित्रपटात मान असतो. वेस्टर्नपटाचे बहुतेक नायक हे "फास्टेस्ट गन इन द टेरीटरी" असतात. यांच्या बाहुबलही असतं शिवाय ही मंडळी अतिशय चाणाक्ष आणि सावध असतात. वेस्टर्नपटाची भाषा हा एक आणखी मजेदार प्रकार आहे. ती तशी नसल्यास आपल्याला वेस्टर्नपटाचा फिल येऊ शकणार नाही. येथे माणसे "आय एम नॉट " न म्हणता "आय एंट" असे म्हणतात. "थॅक्यु" हा शब्द फार कमी वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल. त्या ऐवजी "मच ओब्लाईज" असे शब्द ऐकु येतील.
सलून्समध्ये चाललेल्या जुगाराचे दृश्य नसेल तर वेस्टर्नपट पूर्ण होणारच नाहीत. खेळ एकच आणि तो म्हणजे "पोकर". "लेट्स प्ले सम पोकर" हे वाक्य अनेक ठिकाणी तुम्हाला ऐकु येईल. या दृश्यांमध्ये बरेचदा ज्याला टाईट क्लोजप्स म्हणतात तसे घेतलेले असतात. काहीवेळा खेळणार्यांचे फक्त डोळे दिसतात. फक्त चेहरे दिसतात. अतिशय उत्सुकता ताणून धरणारी ही दृश्ये असतात. त्यात हार जीत होते. त्यात लबाडी करणारे असतात. त्यामुळे पुन्हा गनफाईटची आव्हाने दिली जातात. त्यात माणसे मरतात देखिल. कार्ड चिटर हा गुन्हेगार मानला जातो. एखाद्याचा घोडा चोरणे हा देखिल गंभीर गुन्हा मानला जातो. या चित्रपटात न्यायालये असतात. मात्र वेळ दवडणे नसते. फटाफट निकाल लागतो. आणि गुन्हेगाराला फासावर चढवले जाते. हे फासावर चढवणे आम जनतेसमोर असते. सर्व माणसे हा सोहळा पाहण्यासाठी जमतात. वेस्टर्नपटात काही ठरलेल्या व्यक्तीरेखा असतात. त्या नसल्यास वेस्टर्नपट हे वेस्टर्नपट वाटणारच नाहीत. शेरीफ ही सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा.
शेरीफचा तोरा काही वेगळाच असतो. काहीवेळा आपला नायकच शेरीफ असतो. अतिशय प्रामाणिक, धाडसी आणि अर्थातच फास्टेस्ट गन. त्याच्या छातीवर डावीकडे लावलेला स्टार हा त्याचा मानबिंदू. त्याच्या कर्तव्याची सतत जाणीव देणारा. त्याच्या बरोबर त्याचे डेप्युटी. शेरीफ अथवा डेप्युटी म्हणून होणार्या नेमणूकाही फटाफट. आपण उजवा हात वर करायचा. "मी आपले कर्तव्य बजावेन" अशा अर्थाची शपथ कुणीतरी दिली कि तुम्ही शेरीफ किंवा डेप्युटी झालात. छातीवर स्टार, हातात बंदूक, कमरेला पिस्तुल, मांडीखाली घोडा लगेच येतो. पगार मात्र फारसा नसतो. आठवड्याचे काही डॉलर्सच. मग काही भ्रष्ट शेरीफ असतात, काही धनदांडग्यांना विकले गेलेले असतात. त्यांच्याशी आपला नायक टक्कर देतो. काही गुन्हे या शेरीफच्या अखत्यारीबाहेर गेले की मग यु एस मार्शलना बोलावले जाते. हा आणखी वरचा हुद्दा असावा. मात्र बहुतेक प्रकरणं ही शेरीफच हाताळतो.
शेरीफ गनफाईटचे आव्हान देऊ शकत नाही. जर द्यायचे असेल तर मात्र त्याला आपला बॅच उतरवून ठेवावा लागतो. सलूनमधला बारटेंडर ही वेस्टर्नपटात आणखी एक नेहेमी दिसणारी व्यक्तीरेखा. काहीवेळा महत्त्वाची भूमिका बजावणारी. मात्र भूमिका महत्त्वाची नसली तरी तो असायलाच हवा. अनेकदा त्याला ड्रिंक देणे आणि ग्लास पुसत राहणे इतकीच कामे असतात. तरीही तो असला म्हणजे विशिष्ट "फिल" येतो. वेस्टर्नपटात होणारी गनफाईट हा त्या चित्रपटातील सर्वोच्च क्षण. काहीवेळा संपूर्ण चित्रपट त्याभोवती फिरत राहतो आणि हा क्षण अगदी शेवटी येतो. या गनफाईटसाठी काही धनदांडगे खलनायक कुशल गनफायटर्सना बाहेरून बोलावतात. अर्थात आपला नायक त्याला पुरून उरतो. ही फाईट पाहणे चित्तथरारक असते. विस्तीर्ण भूमी, त्यावरील डोंगरांच्या रांगा, काहीवेळा सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य, काहीवेळा दौडत जाणारा घोड्यांचा कळप, आजुबाजुचे डोळे निववणारे हिरवेगार कुरण, चॉकलेटी रंगाच्या निरनिराळ्या शेडसचे वेश परिधान केलेले ते गनफायटर्स, कळपाची राखण करणारे, कठोर, अत्यंत मानी. या सार्यांचा संगम असणार्या काही महत्त्वाच्या वेस्टर्नपटाची सफर या लेखमालेद्वारे आपल्याला करायची आहे. वाचकांना ती निश्चितच आवडेल अशी अपेक्षा आहे.
अतुल ठाकुर
खरंय. खूप एंगेजिंग होत्या
खरंय. खूप एंगेजिंग होत्या दोन्ही प्रिक्वेल
Pages