स्वप्नं बघायला हवीत प्रत्येकाने
पूर्ण होतील न होतील,
तो पुढचा भाग
पण मुळात
स्वप्न पहायला हवीत..
आणि पाहिलेली स्वप्नं
इतरांच्या पापण्यांवर
हलकेच द्यायलाही हवीत
एकत्र बघितली स्वप्नं तर नक्कीच पूर्ण होतात.
नुकताच या गोष्टीचा आम्ही अनुभव घेतला. निमित्त होतं शॉर्टफिल्मचं. ही शॉर्टफिल्म तयार होण्यात "मायबोली.कॉम" चा महत्वाचा वाटा आहे कारण या प्रोजेक्टकरता एकत्र आलेले आम्ही सगळेही इथलेच मूळ रहीवाशी आणि आम्हाला मदत करणारे, प्रेमाने सल्ला देणारे धुंद रवी, सायली, पल्ली हे देखील इथलेच.
इथे या नोडवर जुळलेली आमची मैत्री त्यामुळे सहाजिकच या प्रोजेक्टकरता आम्हाला नावही "कट्टा क्रू" असच सुचल तर नवल नाहीच त्यात.
ही शॉर्टफिल्म तयार होत असताना ती सगळी तयारी, लगबग, धडपड आम्ही मनापासून एन्जॉय केली. कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की आम्ही, की असा एखादा प्रोजेक्ट हाती घेऊ. पण सहज बोलता बोलता ठरलं "करुन तर पाहू" आणि मारली उडी पाण्यात. पण मित्रांनी नेल तारुन आमच्या या वेडेपणाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित पण ही सगळी फिल्म मैत्रीखात्यात तयार झाली. यातले सगळेच्या सगळे कलाकार हे मायबोलीकर आहेत. मायबोली.कॉम या ऋणानुबंधाच्या गाठी बांधण्याचं श्रेय तुला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
इथे जरा चांगलं काही लिहीण्यासारखं जमा व्हाव मग आनंद शेअर करायला धागा काढावा म्हणूनच थांबलो होतो. अमरावती फेस्टीव्हलमधे आपल्या फिल्मचं स्क्रिनिंग झालं, इन्दापूर फेस्टीव्हलमधे आपल्या फिल्मकरता आपली लिड फिमेल अभिनेत्री मायबोलीकर माणिक सोनार हिला बेस्ट अॅक्ट्रेसच बक्षिस मिळालं. या दोन आनंदाच्या बातमीसह म्हणूनच आज ही पोस्ट इथे लिहून आमच्या आनंदात तुम्हालाही सामिल करुन घेत आहे.
बाकी फिल्म तयारीचे किस्से आमच्या या फेसबूक पेजवर वाचायला मिळतीलच. नक्की वाचा आणि कळवा कसा वाटला आमचा प्रवासाचा प्रवास. इथवरचा प्रवास तुम्हा सगळ्या मित्रपरीवाराच्या शुभेच्छांमुळेच शक्य झालाय. तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या पाठी असूदेत. धन्यवाद मायबोली, धन्यवाद मायबोलीकर्स
सध्या फेस्टीव्हलना पाठवत असल्याने युट्युबवर फिल्म उपलब्ध करुन दिलेली नाही आहे. लवकरच करु आणि योग्य धाग्यावर लिंक अपडेट करुच
==================================================================================================
प्रतिसादात कबूल केल्याप्रमाणे हा लेख इथे पोस्ट करत आहे.
==================================================================================================
शॉर्टफिल्म पर्यंतचा प्रवास
कथेची कथा :
ही कथा मला स्वप्नात दिसली. जाग आली तर अर्धवट दिसलेली कथा डोक्यात नुसती घोळत राहीली. तिला रिवाईंड-प्ले करत घोळवत राहून माझ्यापरीने पूर्ण केली. मला बरेचदा स्वप्नं लख्ख आठवत रहातात उठल्यावरही, त्या जोरावर लिहून काढली आणि माझ्या हक्काने छळता येईल अशा मित्र-मैत्रिणींना वाचायला दिली.
मी ठरवून, बैठक मांडून “चला आता कथा लिहूया, किंवा चला आता कविता लिहूया” असं म्हणून लिहू शकेन अशी सिद्धहस्त लेखिका नाही. मला एखादी ओळ अचानक डोक्यात येते कुठूनशी आणि ती ओळ तिचं स्वरुप काय असेल हे ठरवूनच येते बहूतेक कारण जेव्हा अशी एखादी ओळ सुचते किंवा थीम सुचते तेव्हा पुढे ती कविता म्हणून आकार घेणार आहे की कथा म्हणून हे मी न ठरवता आपसूक ठरतं. मी फ़क्त प्रवाहाचा मार्ग वळवायचा प्रयत्न न करता प्रवाहाच्याच दिशेने चालत राहते. तर याच प्रकारे एक वाक्य झोपताना मनात होतं. झोपेत स्वप्न पडलं, त्यात या वाक्याच्या अनुषंगाने सुरवातीची गोष्ट दिसली. जाग आल्यावर त्या स्वनाताल्या कथेचं पुढे काय झालाय हा भुंगा डोक्याला लागला आणि तो भुंगा सोडवायच्या प्रयत्नात कथा पूर्ण झाली. कथा डोळ्यापुढे सरकत जाईल तशी कल्पना केल्याने आणि कागदावर फक्त बोटांच्या माध्यमातून साकारत गेलेला रोमान्स ही कल्पना आवडल्याने त्याच नोटवर कथा पुढे नेली. निव्वळ डोळ्यापुढे सगळी दृश्य चित्रपट बघावा तशी दिसत गेल्याने असं मनात आलं कि यावर लघुपट बनू शकेल का? म्हणजे या कथेने तिची दिशा दृश्य स्वरूपात दाखवून मला प्रवाहाची दिशा दाखवली अस म्हणता येईल.
कट्टर्सना वाचायला दिली, मैत्रिणवरच्या मैत्रिणींना दिली आणि भितभितच विचारलं की याच्यावर शॉर्टफ़िल्म बनू शकते का? त्यांच्याकडून होकार आला इतकच नाही तर कट्टर्सची गॅन्ग, प्रोड्युसर बनून फ़िल्म करु म्हणत पुढे आली आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. टीम जमत गेली तरी एकदा या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला हवाच हे वाटून कथा धुंद रवी आणि सायलीला वाचायला दिली. रवीशी ओळख मायबोलीवरची तर सायलीशी मैत्री ही मैत्रिण.कॉम वरची. प्रत्यक्ष भेट अजूनही झाली नाहीये आमची. कथा वाचायला दिली तेव्हा तर वन टू वन फ़ोनवर बोलणही कधी झालं नव्हतं. पण ती दोघेही मदतीला धावून आली. कथा वाचून त्यांनी ग्रिन सिग्नल तर दिलाच पण छोट्या छोट्या टिप्स, सल्ले देऊन आणि कधीही काहीही अडलं तर फ़ोन करा आम्ही आहोत असा भक्कम पाठींबा देऊन आमचं मनोबल वाढवलं. “बारीकसारीक तपशील कागदावरच लिहून काढ, अगदी सेफ्टी पिन लागणार असेल ते सुद्धा आणि बाकी तपशीलही टिकली पासून चपलेपर्यंतचे सगळेच, म्हणजे प्रत्यक्ष शुटच्यावेळी कमी गडबड उडेल” हा सायालीचा सल्ला तर आम्हाला प्रचंड उपयोगी पडला.
सगळे कलाकार मायबोलीकर त्यामुळे ही फिल्म मैत्रीखात्यात करायला आपणहून तयार झाले. नील वेद कृपेने आम्हाला फिल्म दिग्दर्शित करायला दिग्दर्शक मिळाला, त्याच्याच ओळखीने सिनेमॅटोग्राफर, एका दिवसाकरता (२ सीन करता) मेकअप आर्टीस्ट अशी टेक्निकल टीम मिळाली. ही टेक्नीकल टीम देखील मैत्रीखात्यात या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला तयार झाली. त्यांच्यामुळे आमचा हा प्रयोग नेटका होऊ शकला.
बाकीची तयारी आम्ही सगळे मिळून करत होतो. कुठूनस जीप्स्याच्या कानावर गेलं त्याने आपणहून कळवलं “त्यालाही प्रोजेक्टमध्ये यायचं आहे” माझं कॉन्ट्रीब्यूशन घ्या म्हणत तो आपणहून सामील झाला. त्याच्यासोबत त्याचा कॅमेराही त्याने मुक्तहस्ते वापरायला दिला. विनय भिडेने मेमरी कार्ड दिलं, मेधा चाक्रदेवने तिच्या जुन्या रिकाम्या घरी मिटींग, ऑडीशन करता जागा दिली, घारुने त्याचे कपडे दिले एका कॅरेक्टरला, अश्विनीने एक दिवस तिच घर दिलं शूटसाठी, केळकरने लोकेशन मिळवून दिली सगळ्याच सीनकरताची, त्याच्याच घरी सगळं सामान ठेवत होतो दोन महिने (शूट भलेही ४ दिवसांच होत, पण फक्त विकांताला होत असल्याने आणि शेवटच्या शूट करता मध्ये दीड महिन्याचा गॅप पडल्याने दोन महिने ते सामान त्याच्याकडे होतं), मंजिरी सोमण दर विकांताला पुणे मुंबई ये जा करत होती, स्वातीच्या आईने आजीचा रोल करायची तयारी दाखवून मोठ्ठा प्रश्न सोडवला. स्वाती, कीरु एका सिनासाठीही पूर्ण दिवस थांबून राहिले, सगळेच कलाकार चव्हाण, केळकर, मंजी, स्वा, कीरु, नील, माणिक, मेधा, अश्वी, वैभ्या ते अगदी मेधाचा लेक मैत्रेय आणि चव्हाणचा लेक शौनक सगळयांनीच मन लावून काम केल, मॉब मधेही तुम्हाला माबोकर भुंगा दिसेल, तो ही एका फोनकॉलवर एका छोट्या सीनकरता आला होता, मनी (मन्जिरी वेदक) प्रत्यक्ष शूटच्या वेळी बॅगा आणि सगळं इतर सामान सांभाळायच महत्वाच पडद्यामागचं काम करायला पुढे आली, थंडी (शितलतळेकर,), मल्लीनाथ, विवेक देसाई हे सगळे प्रत्यक्ष यायला जमणार नव्हतं तरी आपणहून पैशाचा प्रश्न सोडवायला पुढे आले सगळ्यांसोबत, वैभव त्याचं काम नसेल तेव्हा स्पॉटबॉय व्हायाचा, नील बद्दल काय लिहायचं आम्ही – इतकी नारायाणगिरी केलेय त्याने की बस रे बस. पल्ली द ग्रेट, आमची लोगोमास्टर – तिने कट्टा क्रू आणि “फिंगर्स क्रॉस्ड” दोन्हीचा समर्पक लोगो करून दिला. कट्टा क्रूचा लोगो मला विशेष आवडलाय. कॉक्रीटचा कट्टा एकीकडे भक्कम प्रतिक असलेला जशी आमची टीम. ज्याची मुळं खोल कट्टयामध्ये आहेत रुतलेली आणि ज्याला नवीन पालवी फुटलेय सृजनाची. किती मस्तं विचार मांडलाय तिने लोगो मधून. तर असे हे आमचे सगळे वीर, प्रत्येकाच असं “हा माझा प्रोजेक्ट आहे” या भूमिकेतून काम करणं , हेच हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यामागच रहस्य आहे.
अडचणी आल्या नाहीत तर काय मजा ना? त्या येणार हे गृहीतच धरायला हव माणसाने. त्यात आमच्या फिल्मचं नाव “फिंगर्स क्रॉस्ड” त्यामुळे अगदी प्रत्येकच शूटला आमच्यावर काहीना काही कारणांनी “फिंगर्स क्रॉस्ड” करायची वेळ यायची पण अडचणी जितक्या आल्या त्याच्याही पेक्षा जास्त पटीत मदत मिळत गेली आणि म्हणूनच अडथळ्यांची शर्यत पार करत का होईना आम्ही एंड लाईनला टच करू शकलो
काम सुरु केलं तेव्हा ना आम्हाला अनुभव होता फिल्म प्रॉडक्शनचा, ना खर्चाचा अंदाज होता. थोडक्यात, “क्या क्या पापड बेलने पडते है पता है” याची अजिबातच कल्पना नव्हती. हे म्हणजे पोहता येत नाही तरी पाण्यात उतरायचय, डोळ्यात बोट जाईल इतका अंधार असतानाही हट्टाने मुक्कामी पोहचायचय असा ध्यास घेण्यासारख झालं, जगाच्या दृष्टीने तर हा निव्वळ वेडेपणा. पण जगाच्या दृष्टीने वेडेपणा असलेल्या गोष्टी स्वत:वर विश्वास ठेवून करुन बघायला हव्यात, किमान एकदा तरी. जगात आपल्यासारखे असा वेडेपणा करु पहाणारे असतातच. पहिलं पाऊल टाकायच धाडस केलं की इतर पावलंही वाटेत मिळत जातातच. अशी वेडी पावलं एकत्र येतात तेव्हा पहाटे न पडलेलं स्वप्नही पूर्ण होतं.
डेस्टीनेशनला पोहोचल्यावर आनंद होतोच, पण तिथवरचा प्रवासही खूप मस्त अनुभव देणारा असतो त्याचीही एक वेगळीच मजा असते, झिंग असते. ती आम्हाला अनुभवता आली. बस अजून काय पाहीजे.
अभिनंदन!! यु ट्युब लिंकची
अभिनंदन!! यु ट्युब लिंकची वाट पाह्त आहे. पुढील वाटचालीकरता कट्टा क्रू ला भरपूर शुभेच्छा!
अरे वा, मस्त... माणिकचे
अरे वा, मस्त... माणिकचे अभिनंदन!! माणिक व आनंदमैत्री दोघांनीही अतिशय सुरेख कामे केलीयेत.
तुमच्या प्रवासाबद्दल वाचलंय, ऐकलंय व प्रत्यक्ष पाहिलंय सुद्धा. तरीही इथे परत वाचायला आवडेल.
कट्टा क्रु चे अभिनंदन.
कट्टा क्रु चे अभिनंदन.
स्क्रिनिंग ला मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.
सर्वांनी अतिशय मन लावून घरचं कार्य असल्याप्रमाणे ही फिल्म तयार केली. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे अशा सर्व कलाकारांची मेहनत फळाला आली. सर्वांचं मनापासून अभिनंदन.
माणिक चं पण खूप खूप अभिनंदन!
पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
प्रोजेक्ट बद्दल वाचून खूपच
प्रोजेक्ट बद्दल वाचून खूपच छान वाटलं. तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन.
तुम्ही सर्वजण एकमेकाना आधीपासून ओळखत होता की इकडेच ओळख झाली? हे सर्व कसे शक्य झाले असावे याबद्दल कुतूहल वाटतेय.
फिल्म यूट्यूब वर कधी येईल? पाहायची उत्सुकता आहे खूप.
खुप खुप अभिनंदन आणि
खुप खुप अभिनंदन आणि अभिमानास्पद.
किशोरी, धन्यवाद.
किशोरी, धन्यवाद.
आम्ही सगळे इथेच मायबोलीवर भेटलो.
जास्त जाणुन घ्यायचं असेल तर फेसबूक पेज बघा तिथे सगळी माहिती मिळेलच
धन्यवाद विठ्ठल, साधना, जागु,
धन्यवाद विठ्ठल, साधना, जागु, किशोरी, दक्षिणा
जास्त जाणुन घ्यायचं असेल तर फेसबूक पेज बघा तिथे सगळी माहिती मिळेलच>> प्लस १ . सगळीकडे ते लेख फिरवणं हे अनॉइंग वाटू शकेल म्हणून रिपीटेशन टाळण्याकरता फेसबुक पेजची लिंक वर दिली आहे.
आम्ही सगळे इथेच भेटलो, इथेच ओळख झाली. गप्पा मारता मारता, गटग, ववि या निमित्तांनी भेटी होताहोता एक मस्त गृप तयार झाला आमचा, जो मग ऑफलाईनही टिकून राहीला.
मस्त मस्त मस्त कविन अॅड कंपनी
मस्त मस्त मस्त कविन अॅड कंपनी!
तुम्हाला असंच खूप खूप यश मिळत राहो ही मनापासून शुभेच्छा!
अभिनंदन माणिक मोती/सोनार आणि
अभिनंदन माणिक मोती/सोनार आणि फिंगर्स क्रॉसड मायबोलीकर टीम !
जेव्हा तुमचा ट्रेलर पाहिला आणि त्यात तुम्हाला पाहिले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. तरी वाटलेलं केलं असेल काहीतरी हौसेने किडूकमिडूक.. त्यामुळे पुढे घेतली गेलेली दखल आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार दुसरा धक्का होता
आता फिल्म बघण्यास उत्सुक ..
फेसबूक पेजला भेट देतोच.. पण काही किस्से ईथेही येऊ द्या.. अजून काही माबोकर त्याने प्रेरीत होतील
फेसबुक पेज वाचलं. धमाल आणि
फेसबुक पेज वाचलं. धमाल आणि भारी आहे हे सगळं!
तुमच्या पुढच्या सर्व प्रवासाला खूप शुभेच्छा.
धन्यवाद चिन्नु, ॠन्मेष
धन्यवाद चिन्नु, ॠन्मेष
ऋन्मेष, तू फक्तं खर्या नावाने पिंग कर मग तुझ्यासाठी पेशल स्क्रिनिंगच ठेवतोय बघ
आज बर्याच दिवसांनी ट्रेलर
आज बर्याच दिवसांनी ट्रेलर पाहिलं पेज वर जाऊन. मस्त बनलंय सगळं.
ही कथा पहिल्यांदा वाचलेल्या काही जणींपैकी मीही एक हे जाणवून अभिमान वाटतो.
मणिकमोती ने कामही छान केलंय.
ही कथा पहिल्यांदा वाचलेल्या
ही कथा पहिल्यांदा वाचलेल्या काही जणींपैकी मीही एक हे जाणवून अभिमान वाटतो.>> थॅन्क्यु अनु
हो मी मैत्रिण.कॉमवर खरडून हे खरच शॉर्टफिल्म स्क्रिप्ट होईल का हे विचारलं होतं तेव्हा तुम्ही मैत्रिणींनीच ग्रीन सिग्नल देत उत्साह वाढवला होतात.
तरी डेअरींग होत नव्हतं, वाटत होतं मैत्रिणी आहात, प्रेमापोटी चांगलं म्हणताय कौतुक करताय. कान पकडेल असा तज्ञ शोधत होते. धुंद रवी आणि सायलीला कथा वाचायला दिली. दोघेही भरभरुन बोलले. करा तुम्ही बिंधास्त असा त्यांच्याही कडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि आम्ही मग आर या पार म्हणत कामाला लागलो
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
वा! मस्तच. कट्टा क्रू आणि
वा! मस्तच. कट्टा क्रू आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन !! फिल्म बघायची उत्सुकता वाटते आहे.
वाह! बर्याच दिवसांनी माबोवर
वाह! बर्याच दिवसांनी माबोवर आलो आणि हाच धागा सगळ्यात वर दिसला.
मनापासून अभिनंदन सर्वांचेच.
कट्टा क्रूचं अभिनंदन. कधी
कट्टा क्रूचं अभिनंदन. कधी बघायला मिळेल?
सगळ्यांचे अभिनंदन! लवकरात
सगळ्यांचे अभिनंदन! लवकरात लवकर येऊ द्या.
धन्यवाद स्वाती, मैत्रेयी,सायो
धन्यवाद स्वाती, मैत्रेयी,सायो, वत्सला आणि नची
अपलोड केली फिल्म की अपडेट देईनच इथे
अर्रे वा वा! अभिनंदन!
अर्रे वा वा! अभिनंदन!
मस्त! सर्वांचे अभिनंदन, आणि
मस्त! सर्वांचे अभिनंदन, आणि आगामी फेस्टिव्हल्स करता शुभेच्छा! गेल्या काही दिवसांत फेबुवर फ्रेण्डलिस्ट मधल्या काहींच्या फीड्स वरून असे काहीतरी आहे याची कल्पना आली होती पण नक्की काय आहे माहीत नव्हते. फेबु पेज पाहतो आता. बघायची संधी मिळेल तेव्हा बघण्यात इंण्टरेस्ट आहेच.
ट्रेलर पाहिला. उत्सुकता ज्याम
ट्रेलर पाहिला. उत्सुकता ज्याम चाळवलीय ( किंचित डबलसीट सिनेमा आठवला)
रिलिजची वाट पाहत आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन!
अभिनंदन!
मस्तच की! अभिनंदन.
मस्तच की! अभिनंदन.

फेबु वर जाईन तेव्हा बघतोच, पण इथे पण लिहा. ज्यांनी नाही वाचलंय त्यांचं रिपिटीशन नाही होणार
इथे वाचायला जास्त मजा येते.
संपूर्ण कट्टा क्रु टीमचे
संपूर्ण कट्टा क्रु टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
सर्व टीमचं अभिनंदन आणि
सर्व टीमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
कविन, लघुकथेतून जन्मलेली
कविन, लघुकथेतून जन्मलेली शॉर्टफिल्म हा आमच्या डोळ्यासमोर प्रवास खरंच अद्भुत होता! ट्रेलर पाहिल्यावर तू लिहीलेली कथा साकार केली आहे अभिनेत्यांनी हे जाणवून खूप मस्त वाटले! (तुला तर किती मस्त वाटत असेल!!
)
बेस्ट अॅक्ट्रेसचे व सर्व टीमचे अभिनंदन!
धन्यवाद स्वाती, फारेंड, चौथा
धन्यवाद स्वाती, फारेंड, चौथा कोनाडा, चर्चा, अमितव, अंजु आणि बस्कु
अगदी खरय बस्कु
अमितव, माबोकर सहनशील आहेत हे माहिती आहे म्हणूनच सहनशीलतेचा अंत बघावासा वाटत नाही
पण मी नक्कीच एक वेगळा आणि सर्वसमावेशक लेख लिहून इथे पोस्ट करेन आणि प्रयत्न करेन की तो लेख फेसबुक किश्श्यांपेक्षा वेगळा असेल पण उणा नक्कीच नसेल 
नक्की !
नक्की !
वा! वा! `फिंगर्स क्रॉस्ड
वा! वा! `फिंगर्स क्रॉस्ड'बद्दल मायबोलीवर सांगितलं जायला हवं असं मला मनापासून वाटत होतंच.
समस्त टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन.
आनंद-मैत्री आणि माणिकमोती - दोघांनी खरंच सुंदर कामं केली आहेत.
Pages