डेर्या घाट आणि आवळीची वाट
यंदाची नाताळची सुट्टी वीकेंडला जोडून आल्यामुळे मोठ्या मोहिमेचे मनसुबे रचले पण काही कारणास्तव प्रत्यक्षात मात्र जुळून आले नाही. नंतर पुन्हा दोन दिवसासाठी केवणीत आरामशीर मुक्काम ठोकून, घोणदांड घाट आणि डेर्या घाट तसेच गेल्या वेळी चकवले ती खंडसांबळे लेणी असा प्लान ठरवला. यातही निघायचा अवकाश पुन्हा माशी शिंकली, सुट्टी आहे, घरातून परवानगी आहे, गाडीत सामान आणि सॅक भरून तयार तरी..शेवटी ट्रेक रद्द करून घरी बसावे लागते की काय ? ऐन हिवाळ्यात ट्रेक रद्द होणे या सारखे दुःख नाही हा अनुभव या आधी मी घेतला होता. या विचारानेच घाम फुटला. पुन्हा फोनाफोनी, बरीच चर्चा अंती रात्री निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी परतायचे ठरले. थोडक्यात एक दिवसाचा प्लान. त्याप्रमाणे रात्री साडेदहा वाजता मी, ‘हेमंत’ आणि ‘जितेंद्र’ भेटलो तेव्हा जीवात जीव आला.
आदल्या दिवशी वाहुतुकीचा खोळंबा प्रचंड रहदारी या बद्दल पेपरात वाचलेले, सुदैवाने फारसा त्रास न होता नागशेत अलीकडे नेणंवली गायमाळ पाड्यावर थांबलो तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते. आकाशात चांदण्याचा सडा पडलेला पण प्रवासाची दगदग धावपळ आणि बोचरी थंडी मनात विचार आला इथे एवढी थंडी तर वर घाटावर किती असेल ? ठरल्याप्रमाणे जर आत्ता केवणीत असतो तर ? फार वेळ न रेंगाळता लागलीच समाजमंदिरामागे तंबू टाकून झोपी गेलो. सकाळी जितेंद्र आणि हेमंत यांनी फक्कड चहा बनवला. कडाक्याच्या थंडीत चहा ने चांगलीच ऊर्जा मिळाली. पुढे २ किमी अंतरावर नागशेत मध्ये गाडी लावली तेव्हा ८ वाजत आले होते.
सकाळच्या आल्हादायक वातावरणात कोडंजाई पर्यंतची तीन साडेतीन किमी कच्चा रस्त्यावरील पायपीट मुळीच जड गेली नाही उलट चांगला फायदेशीर वॉर्म अप झाला. ‘कोंडजाई’ आसपासच्या गावातील वाडी वस्तीवरील लोकांचे श्रध्देने पुजलेले दैवत भल्या मोठ्या नदी पात्रात मोठ मोठे डोह आणि रांजण खळगे. दर्शनाच्या निमित्ताने गावकरींची कायम ये-जा असते.
थोडक्यात सांगायचे झाले तर हिर्डी आसनवडी वाटेच्या मध्यावर आल्यावर जो मोठा धबधबा लागतो त्यालाच खाली केवणी आणि घनगड मारठाण्याच्या खिंडीतून येणारा मोठा ओढा याच कोंडजाई अलीकडे एकत्र येतात. मग हे देवाचे स्थान पुढे जाऊन सुधागड पाच्छापुर कडून येणारा आणखी एक मोठा ओढा गायमाळ पिंपळोली जवळ येऊन मिळतो. हीच ती कुंडलिका नदी तीचा पुढे भिरा नदी सोबत संगम होऊन कोलाड रोहा मार्गे कोरलाई रेवदंडा जवळ अरबी समुद्राला मिळते. यालाच कुंडलिकाचे खोरं म्हणता येऊ शकेल.
हेच ते मंदिर इथेच सोबत आणलेल्या ठेपल्याचा अल्पोपहार घेतला.
काही अंतरावरच कोंडजाई धनगरवाडा चार पाच मोजक्या घरांपैकी एका घराच्या अंगणात वयस्कर आजीबाई अगदी बोलायला देखील कष्ट पडत असताना आमचें म्हणनं नीट ऐकून खुणेनेच पुढचा मार्ग समजून सांगितला. ढोबळमानाने अंदाज लावला तर नागशेत - कोंडजाई धनगरपाडा येथुन तीन प्रचलित घाटवाटा निघतात. वायव्येला घोणदांड, ईशान्येला डेर्या घाट तर आग्नेयेस गाढवलोट. या तिन्ही घाटवाटा अनुक्रमे केवणी, आसनवडी आणि हिर्डी या गावांशी जोडलेल्या आहेत. आजीचा निरोप घेऊन कोडंजाईचा मुख्य ओढा पार करून छोट्या चढाई नंतर आणखी एका धनगर वस्तीवर आलो. चार पाच उंबर्यांची ही वस्ती फारच स्वच्छ आणि मोकळी. एकंदरीत खूपच मोक्याची जागा.
समोरच अगदी जवळ केवणी पासून उजवीकडे पसरलेली सह्याद्रीची मुख्य रांग. अगदी त्यांच्या अंगणात बसून हा सह्याद्रीचा पॅनोरमा न्याहळतच राहावं. तिथल्याच एका दादाकडूनच पुढच्या वाटेची खात्री करून घेतली. डेर्या घाटाची वाट कुठून कशी जाते तसेच वाटेतल्या मुख्य खुणा लक्षात घेतल्या. इथली मंडळी तासाभरातच अंदाजे ६००मी चढाई असलेल्या या घाटाने आसनवडीत जातात. पुन्हा थोडे खाली उतरून ओढा पार करून समोरच्या बाजूला वर आलो. मोकळ्या मैदानात याच भागातल्या ग्रामस्थांनी पावसाळी शेती केलेली दिसत होते. वाट अगदी झक्क मळलेली नव्हती तरी पण दिशेने वाटचाल करत निघालो. दोन चार शेताच्या बांधावरून अल्याड पल्याड करत समोरच्या झापाच्या दिशेने गेलो. झापाच्या थोड अंतर पुढे जातो तर वाटच गायब. थोडक्यात मुख्य वाट मागे डावीकडे राहिली कारण दिशेप्रमाणे डावीकडून वर सरकून मोठ्या पठारावरून पुढची चढाई होती. तसेच डावीकडच्या बाजूने टेपाडावर चढलो फारशी झाडी नव्हती म्हणून वाट काढायला सोपे पडले. वर आल्यावर समोर होता तो केवणी घोणदांड पासून घनगड मारठाण्याची खिंड ते पार आसनवडी मागं हिर्डी खजिन्याचा डोंगर पर्यंत पसरलेला सहृयाद्रीचा नजारा.
थोड दम खात तेच पाहत बसलो. दिशेनुसार डेर्या घाटाची अचूक वाट धरली. डाव्या हाताला घोणदांड आणि खंडसांबळे लेणी यालगतचे पठार समपातळीत मध्ये केवणी आणि घनगड मारठाण्याच्या दरीतून येणारा मोठा ओढा. गेल्या वर्षी याच भागात लेणीच्या शोधात चुकामूक मग बरीच दगदग त्यामुळे खंडसांबळे लेणी आणि घोण्यादांडाची चढाई सोडून द्यावी लागली होती. आता सुध्दा या पठारावर बर्याच ढोरं वाटा चुकवू पाहत होत्या. डेर्या घाटाच्या दिशेने एक सोंड गेली आहे, त्याच सोडेंच्या टप्प्यातून चढाई इथे मात्र व्यवस्थित मळलेली वाट. जंगल सुद्धा फारसे दाट नाही तसे पाहिले तर ठाणाळे, सवाष्णी, वाघजाई ते अगदी सुधागड पर्यंत या भागातले जंगल पावसाळा सोडला तर विरळच म्हणूनच या भागांतील भटकंती मार्च नंतर टाळावी अथवा पाणी आणि उन्हापासून बचाव इ. पुरेश्या तयारीनेच जावे.
पाऊण तासात डेर्या घाटातल्या कातळकड्यापाशी आलो. पुरातन काळापासून वापरात असलेल्या वाटेवरच्या या टप्प्यात कातळात खोदीव पावठ्या त्याजोगे हा टप्पा सहज सोपा झाला आहे. इथून पुढे वाटेतील धबधब्या अलिकडून वाट उजवीकडे वळसा मारून वरच्या टप्प्यात. मग थोडा ट्रॅव्हर्स, थोडा घसारा, कधी दरीच्या कडेने, त्यात छोटे कातळ टप्पे पार करून माथ्यावर दाखल झालो. खरचं या डेर्या घाटाची वाट फारच आवडून गेली. माथ्या जवळच्या मोठ्या झाडाखाली थोडी विश्रांती घेऊन पाऊण वाजेच्या सुमारास आसनवडी गाठली.
उत्तरेला दर्शनी भागात घुटक्याचं पाळणा त्याला जोडून मारठाण्याचा डोंगर थेट घनगड पर्यंत तसेच केवणी पल्याड तैलबैला चांगलेच नजरेत आले. तिथेच घराच्या पडवीत विसावलो, मावशींनी पाण्याचा हंडा समोर ठेवला. झोरे त्यांचे आडनाव, मावशींची मुले इंजिनियर असून पुण्यात कामाला आहेत. पण मावशी मात्र आमच्या डोंगर फिरण्याचा छंदाला हसून नाव ठेऊ लागल्या. एकंदरीत तिथे राहुन कंटाळलेल्या. त्यांच्या मते आहे काय इथे ? शहरी मानाने काही सोय नाही साधी वीज नियमित नाही. लहानसहान गोष्टी साठी पायपीट करावी लागते अजूनही काही सुधारणा नाही. एक हिशोब त्यांचं काय चुकत होत, आजही हीच परिस्थिती सर्वत्र आहे. असो विषय बदलण्यासाठी आम्ही केवणीच्या वाटेची चौकशी केली. आमच्या नियोजन नुसार इथून केवणी गाठून मग घोणदांड घाटाची उतराई आणि अगदीच वेळ मिळाल्यास खंडसांबळे लेणी. पण आता वेळ पहाता लेणी तर अवघड वाटू लागली. मावशीला विचारले कुणी थोडे अंतर वाट दाखवायला येईल का, नाही कुणी नाही सर्व मंडळी कामावर गेली आणि घर सोडून मी नाय येऊ शकत. आजूबाजूला पाहिलं तर चक्क कुणीच नव्हते. एव्हाना एक वाजून गेला होता, वाट शोधण्यात जास्त वेळ गेलेला परवडणारे नव्हते. त्यात बोलता बोलता केवणीतल्या ढेबे मामांचा विषय निघाला. मावशी म्हणाल्या, बहुतेक मामा केवणीत नसतील. कारण काय तर दुसऱ्या दिवशी ग्राम पंचायतची निवडणूक त्यामुळे मामा एकोल्यात असतील. असे झाले तर केवणीत जाऊन घोणदांड घाटाची चौकशी आणि सुरूवात कशी करणार. आमच्यापैकी कुणीही आधी या वाटेने गेले नाही. त्यामुळे वाट शोधण्यात वेळ घालवणे मुळीच परवडणारे नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून मी हिर्डीत जाऊन गाढवलोट घाटाने उतरू असे जाहीर केले. गेल्या काही ट्रेकच्या अनुभवानंतर विविध बाबी आणि शक्यता पडताळून दुसरा पर्याय अभ्यास करून तयार ठेवावा लागतो. जितेंद्र आणि हेमंत यांना माझे मत पटले. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे कुठेही वाट शोधायचे कष्ट नाही त्यामुळे वेळेची बचत कारण आसनवडी ते हिर्डी हा नेहमीचा वापरातला रस्ता.
आसनवडीतून मुख्य वाटेला लागतो तोच डावीकडे मोठी विहीर. गाडी जाईल असा लाल मातीतला कच्चा रस्ता. म्हतोबाच्या डोंगराला डावीकडे ठेवून झाडी भरल्या वाटेने पुढे निघालो. खरंच हा टप्पा अगदी माथेरान सारखाच त्यात जोडीला गार वारा आणि विविध पक्ष्यांचे आवाज. अर्ध्या वाटेवर मोठा ओढा खाली दरीत कोंडजाईच्या दिशेने झेपावलेला. जसा म्हतोबाचा डोंगर मागे पडू लागला तसे जंगल कमी होऊन वाट मोकळं वनात आली काही अंतरावर डावीकडून अंधारबनकडची वाट येऊन मिळाली. डावीकडे ताम्हिणी घाटाची रांग दिसू लागली. रमत गमत तासाभरात छोट्या आणि दुर्गम अशा हिर्डी गावात पोहोचलो.
आता याला दुर्गम म्हणावे का ? तसे पाहिले तर प्रसिध्दी पावलेल्या अंधारबन ट्रेक मुळे इथे ट्रेकर्स मंडळी कायम ये जा करत असतात. पण तरीसुद्धा इथल्या ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी तासा दोन तासाच्या चालीवर पायी प्रवास करत खाली घाट उतरून विळे, भिरा, नागशेत किंवा आसनवडी याला पर्याय नाही.गावात राम राम शाम शाम झाल्यावर घराच्या अंगणात दुपारचा घरून आणलेले जेवण उरकून घेतले. समोरच्या पडवीत चार पाच जण मागच्या पावसाळ्यातील दुर्घटना तसेच चुकामुकींचे किस्से. शनिवार रविवार येणारे जथ्थे च्या जथ्थे हि १५०-२०० लोकांची गर्दी या विषयी बोलत होते. एकंदरीत प्रसिद्धी पावलेल्या ठिकाणांचा तिथल्या ग्रामस्थाना काय त्रास होत असेल याची कल्पना करवत नाही. जेवण आणि वामकुक्षी घेइस्तोर तीन वाजून गेले. ‘धोंडू नाडे’ मामांना गाढवलोट घाटाने उतरायचे आहे असे सांगितल्यावर आजू बाजूची चर्चा करणारी मंडळी तिथून न जाता आवळीची वाट सुचवू लागले. त्यांच्यामते गाढवलोट वाटेला सद्या घसारा आणि गचपण वाढले आहे त्यामुळे आवळीच्या वाटेने जाणे सोपे आणि सोयीचं. हिर्डी नागशेत व्हाया गाढवलोट हे पक्के ठाऊक होते पण ही नवीन वाट वेगळेच प्रकरण होते. साहजिकच आमची उत्सुकता वाढली. मामा अगदी चार पावलं वाटेची माहिती देत आमच्यासोबत आले, सर्व समजून घेत त्यांचा निरोप घेतला.
उत्तम दगडी बांधीव अशी वाट. सुरुवातीच्या झाडी भरल्या टप्प्यातून खाली उतरून आडवी चाल समोरच खजिन्याचा डोंगर त्यापलीकडे खाली भिरा आणि ताम्हिणी घाटाची रांग. हीच वाट सरळ जात पलीकडे भिरा येथे उतरते आम्ही मात्र मामांनी सांगितल्या प्रमाणे याच वाटेने खजिनाचा डोंगर, डाव्या हाताला ठेवून एक वाट उतरते त्याच वाटेला लागलो. सुरुवातीची वाट खजिन्याचा डोंगरकडून येणाऱ्या ओढ्याला समांतर उतरत पुढे उजवी कडच्या धारेने पद्धतशीर पणे खाली उतरते. फार घनदाट जंगल मुळीच नाही पण या पट्ट्यात डासांचा मात्र भयानक त्रास झाला. थोडे आठवत ध्यानात आले की विकिमपियावर याच वाटेला गाढवलोट असे दाखवले आहे. मनात विचार आला, निदान मामांना घेऊन त्या गाढवलोट ची सुरुवात तरी पाहून आलो असतो पण वेळ आणि उत्साहाच्या भरात ते राहूनच गेले. असो आता पुन्हा यावे लागणारच.
आणखी उतरतो तोच मोठा ओढा आडवा आला अजूनही बारीक धार का असेना पण ओढ्याला पाणी होते हि चांगली बाब. ओढयापाशी जरा विसावलो, मागे उजवीकडे खजिन्याचा डोंगर आणि थोडा समांतर डावीकडे आम्ही आलो ती आवळीची वाट. अंदाजे निम्मी उतराई झाली होती.
अजून थोडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या तसेच पॉट होल्स आता मात्र हे तर निश्चित की ही पुरातन वापरातली वाट. पण हेच मागे एका ठिकाणी फोटोत गाढवलोट घाट म्हणून पहिले होते पुन्हा डोक्यात हाच विचार घोळ घालू लागला. पुढची सौम्य उतरण पार करून मोकळ्या पठारावर आलो. गुरं निवांत चरताना दिसली, काही अंतरावरच रिकामं झाप. त्याला वळसा घालून पुन्हा वाट खालच्या ओढयाला समांतर जाऊ लागली.
पंधरा मिनिटांच्या चालीनंतर तळा धनगर वस्तीवर आलो. दारातच आजी बसलेल्या त्यांना पण विचारले, आजी हि कोणती वाट ? आजींनी मानेने खूण केली, इकडून आला कि तिकडून ? मी खजिन्याचा डोंगराकडे बोट दाखवले. लगेच आजी म्हणाल्या, 'हि तर आवळीची वाट'. मग गाढवलोट कुठे ? तेव्हा आजीने हिर्डीच्या डोंगराकडे बोट दाखवत डावीकडच्या बाजूला (घळीतून) वाट जाते असे सांगितले. मळलेल्या वाटेने पुढे पठारावर एके ठिकाणी शांत बसलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाल केलेला पूर्ण मार्ग डोळ्यासमोर होता.
डेर्या- आसनवडी- हिर्डी- आवळीची वाट खरंच एक दमदार सह्ययात्रा. पुढच्या दहा मिनिटांत कोंडजाई धनगर पाड्यात दाखल झालो. सकाळी एकटीच असलेल्या आजी सोबत आता घरातली सर्व मंडळी होती, घरातल्या दादांसोबत पुन्हा वाटेची चौकशी तेच उत्तर मिळाले आम्ही उतरलो ती आवळीची वाट.
नागशेतच्या दिशेनं परताना डावीकडे खजिनाच्या डोंगरामागे सूर्य अस्ताला जात होता. चांगल्या घडामोडीने भरलेल्या या दिवसाची सांगता झाली. नागशेतहून परतीचा प्रवास सुरु केला पण डोक्यात मात्र गाढवलोट आणि या वेळी पुन्हा हुकलेली घोणदांड घोळत आहे,असो या निमित्ताने पुन्हा लवकरच पावलं इथं फिरकणार यात शंका नाही.
योगेश चंद्रकांत आहिरे.
फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/01/derya-ghat-aavalichi-vaat.html
blog वाचला. फोटोही आवडले.
blog वाचला. फोटोही आवडले.
धन्यवाद !
धन्यवाद !