आपल्या मातीचा रंग हा दिसत नसला तरी खोलवर माणसाच्या मनात रुतून बसलेला असतो तो तुम्हाला ठरवलं तरी पुसता येत नाही . अशीच काहीशी माझ्या शहरातली होळी आणि रंगपंचमीचे रंग इतके गडद आहेत की ते दरवर्षी अजून गहिरे होत गेले आहेत . नाशिक हे माझं महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडचं गोदावरी नदीच्या तीरावरचं भारतीय संस्कृती आणि पौराणिक माहात्य्म जपलेलं शहर. आजही इथे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथेप्रमाणे रंगपंचमीलाच फक्त रंग खेळले जातात.इतर शहरांसारखा स्वतःच्या सोयीने आटोपशीर पद्धतीने कुठलीही गोष्ट केली जात नाही.कर्मठ किंवा शास्त्रावादी म्हणून नाही, तर प्रत्येक दिवसाच्या अर्थाला अनुसरून गोष्टी केल्या जातात. रंग पंचमी ह्याचाच अर्थ फाल्गुन महिन्याचा पाचवा दिवस जी रंगानी सजवलेला हा सण होळी मुळे तयार झालेल्या उष्म्याला घालवण्या साठी आणि शरीराला येणाऱ्या वसंत ऋतूसाठी तयार करण्यासाठी साजरा केला जातो. पेशव्यांनी ह्या सणाला खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरूप देण्याचे काम केले आहे. पुणे , कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मोठ्या हौदांमध्ये रंगात माखण्याची प्रथा त्यांनीच सुरु केली. अर्थात, नाशिकचनेचं अभिमानाने ती आजही पंचवटी आणि जुन्यानाशिक भागात सुरु ठेवली आहे. हौद हे पूर्वी गावातले आखाडे होते. आणि तिथे लोक कुस्ती खेळायला भेटत असत .त्यामुळे तिथे ते मस्ती करायला किंवा "राहडा" करायला भेटत असल्याचे बोलीभाषेत बोलले जायचे . ह्या राहडा शब्दाचाच शब्दप्रयोग
म्हणजे "रहाड ". रहाड म्हणजेच हे हौद जे सर्वांसाठी खुले केले गेले होते . मुळात पुरुषी खेळ म्हणून प्रचलित असलेले रहाड आता मात्र स्त्रियांना सुद्धा खळे आहेत. त्यात बंधुभाव जपणे , ऐक्य वाढणे असे उद्देश होते पण गरिबांना रंग परवडत नसत त्यामुळेही हा पर्याय उपलब्ध करून दिला गेला होता . ह्यात पूर्वी फुलांचा रस, केशर रस काढून तो उकळवून विधीवत औषधी आणि नैसर्गिक रंग तयार केले जायचे. आता सोडा आणि साबणाचा मारा वाढलेला आहे.
पण रहाडीतला रंग इतका पक्का असतो की ह्यात उडी मारली की दोन दिवस रंग अंगावरून निघत नाही. प्रत्त्येक ऱ्हाडीला स्वतःचा असा एक रंग सुद्धा असतो उ.दा. शनिचौकातली रहाड हि गुलाबीच रंगाची असते,रोकडीचा तालीम संघ नारंगी आणि केशरी. प्रत्येक रहाडी साधारणपाने २५ बे २५ फुटाचे आणि ८ ते १० फूट खोलच्या आहेत.पूर्वापार अशा १६ रहाडी आहेत पण त्यातल्या फक्त आता ६च उघडल्या जातात त्या शनी चौक, तांबट अळी,दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक, जुनी तांबट अळी,मधली होळी ह्या आहेत. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम सुरु होते.खाली त्यात पायऱ्या बनवल्या असतात. रंगपंचमीच्या आदल्या दिवसापर्यंत त्या स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवले जाते.ह्या रहाडीत उडी मारण्याचा आणि पूजा करण्याचा मान सुद्धा पेशवेकाळी ठरवलेल्याच कुटूंबांनी आजही पाळायचा असतो. शनी चौकातला पूजेचा मान दीक्षित कुटुंबाला आणि उडीचा बेले ह्यांना आहे. जलदेवतेची पूजा केल्यावर
नाशिक ढोल वाजवल्यावरच हि रहाड सगळ्यांसाठी खुली होते. त्यात उडी मारण्याला "धप्पा" असे म्हणतात एक सूर मारला की बाकीच्या २५ जणांवरसुद्धा रंग उडतो. रंगपंचीमीला भाग पिट रंगात मगन होत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रहाड रंगपंचमीनंतर लगेच दुसऱ्यादिवशी बुजवल्या जातात. त्यात लाकडाच्या फळ्या टाकून त्यावर सिमेंट भरले जाते आणि काडी लाली जाते आणि ती बंद केली जाते .जर तुम्ही त्या रस्त्यावरून गेलात तर तुम्हाला रहाडीचा नामोनिशाण दिसणार नाही इतक्या शिताफीने ती गायब होते. दुष्काळात मात्र रहाडी बंद ठेवल्या जातात. लोकही वस्तुस्थिचे भान राखून सहकार्य करतात. एकमेकांबरोबर केली हि मजा एकदा तरी प्रत्येकाने अनुभवण्यासारखी आहे. ह्या ग्लोबल युगात आपल्या माणसांबरोबरच असा शिमगा हवेत विरून जाण्याआधी नक्की लेवून पाहावा!