सवती संमेलन
घाट उतरून खाली आलं की डाव्या हाताला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा कच्चा रस्ता लागतो. या रस्त्यानं खाच खळग चुकवत चुकवत नेटानं पुढं चालत गेलं की एक छोटंसं गाव लागत. या गावाच नाव हाय यमगर वाडी. गाव छोटं असलं तरी गावात पैकवाल लई जण हैत. गावचा उंबरा असलं शे पाचशे घराचा. गावातल्या मंडळींचं शिकण्यात तसं लक्ष बेताचच. पण मर्दांच्याकडे पैशाला काय बी कमी न्हवत. एकेकाचं धंद म्हणजे एक जंत्रीच म्हणाना. दिवसभर पैसा कमवायचा अन रातच्याला ओल्या पार्टीत घालवायचा हा जणू गावचा नियमच होता.
या गावचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे गावकरी लई इरसाल स्वभावाच. शासनाने गावच्या उन्नतीसाठी ढीगभर योजना जाहीर केल्या. या समद्या योजनांचा फज्जा उडवण्याचं पहिलं बक्षीस याच गावानं मिळवलं.गावात नसबंदीची मोहीम झाली. समद्या गावानं त्याला इरोध केला. बापय गड्यानी निरोधाच फुग पोरांना खेळायला दिल. त्यामुळं जन्माला आलेल्या पोरांनी देखील शाळत जायला सुरवात केली. तवा निरोध, विरोध ,ऊन ,बाया हे शब्द पटापट पाठ केलं. शासनाने द्विभार्या प्रतिबंधक कायदा केला. तर या गावातील इरसाल बापय गड्यानी एका ऐवजी तीन तीन बायाशी लग्न केली. एक का दोन नव्वद टक्के घरात सवती झाल्या. कुठं दोघी, कुठं तिघी तर कुठं चौघी.
काय पन म्हणा पर सवती आणण्याच्या बाबतीत या इरसाल मर्दाचे काय बी चुकत न्हवत. कुणी आय बापाच्या आग्रहाखातर लगीन केल्याल. कुणी बा ला बककळ पैसा मिळावा म्हणून. केवळ बाय हाय म्हणून लगीन केल्याल. त्यामुळं त्यांच्या मर्जीप्रमाण त्यांना पाखरुच मिळालं न्हवत. एखाद दुसरं घर सोडल तर सगळीकडं हीच बोंब.
परिसरात वकील देखील वैतागल हुत. एकही खटला दुसरा नाय. समध खटल सवतीच्या भांडणाच अन आपापसात मिटणार.
तो बुधवारच्या दिवस होता. सकाळची येळ हुती. सातच्या टायमाला एसटीचा धूड गावच्या पाराजवळ थांबला. गावकऱ्यांच्या करमणुकीच तेवढंच साधन असल्यानं या गाडीच्या वक्ताला पाराजवळ गर्दी असायची. गाडीतलं चेहरे न्याहळत गावकरी उगाचच गाडीभोवती वरावरा फिरायचे.तो दिवस मात्र गावकऱ्यांच्या भाग्याचा ठरला. गाडी थांबली अन त्यातून एक नवखी बाई खाली उतरली. इरसाल टगी देखील बेशुध्द पडायची वेळ आली. काय ते देखणं रूप.. केसांचा बॉबकट.. अंगात बिन बाह्याचा झम्पर.. निळ्या रंगाची साडी.. डोळ्याला गॉगल..व्हटाला लिपस्टिक. बाई बघितल्या बघितल्या ताडकन माणसं उठली.बापय गडी कुजबुजल. कोण र ती. आयला अप्सरागत दिसतीया की.
तेवढ्यात पांडूनांना म्हणाल, काय लेकांनो माहित नाय व्हय. आर सरपंचाने आपल्या घरात तिसरी सवत आणली.
बघता बघता गावभर बातमी पसरली.महादेवाच्या देवळाजवळच्या दुसऱ्या पारावर बंड्या, गुंड्या, नाम्या, म्हाध्या, सुभान्या, पांड्या चकाट्या पिटत बसले होते.तिथं ही बातमी जाऊन धडकली. समधीकडे सरपंचाच्या मॉडेलची सवतीचीच चर्चा.
त्यातच भर म्हणून गावात काय तरी करमणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी सरपंचाने रातच्याला बैठक बोलावली हुती. बघता बघता ग्रामपंचायतीचा हॉल गच्च भरला. गेल्याच महिन्यात शेजारच्या गावात साहित्य संमेलन झाले होते. त्या वक्ताला गावातील काही तरणी मंडळी हजेरी लावून आली हुती. बैठकीला सुरवात झाली. सरपंच बोलू लागलं.. मंडळींनो बऱ्याच दिवसात आपण गावात काही करमणुकीचा कार्यक्रम घेतला नाय. माझी अशी विच्छा हाय की येत्या पितरी अमावस्येला आपण गावात एखादा कार्यक्रम घेऊ या. तवा आता यावर चर्चा व्हावी.
सरपंचाने एवढं बोलायचं अवकाश कि बंड्या उठला अन म्हणाला गावात तमाशा तर आपण नेहमीच घेतु. या वक्ताला आपण साहित्य संमेलन घेऊ या. हे ऐकून राम्या जोरजोरात हसायला लागला. तो का हसतोय हे कोणालाच कळेना. सरपंच घाबरले. त्यांना वाटले आयला आपण पितरी अमावस्येचे नाव घेतले. एखाद पितर तर याच्या डोक्यावर बसलं नाही ना. अखेर राम्या उठून उभा राहिला तवा कुठं सरपंचाच्या जीवात जीव आला. राम्या म्हणाला अरे तुम्ही येड का खूळ. तमाशातन काय मिळणार आपणाला. पैसा आपला भाव खाणारी येगळी. काय नाय यावेळी एक्स्ट्रा स्ट्रॉग संमेलन घ्यायचं.
राम्यान विषय मांडला अन चर्चा लई जोरात रंगली. साधू, देवदासी, संत असे लई विषय मांडले गेले. इतका वेळ गप गुमान बसलेलं रामू लोहार ताडकन उठलं. ते म्हणाल, अरे का उगाच डोस्क खाताय. बाया येतील असे एखाद संमेलन घ्या. तेवढीच एक दिसाची मज्जा. मला असं वाटतंय आपण सवती संमेलन घेऊ या.
सवती संमेलन म्हटल्यावर सर्वांनी माना डोलावल्या. उद्या बैठक घ्यायचं ठरलं. सवतीच्या विचार घेऊन सर्व माणस
घरी गेली. दुसरा दिवस उजाडला. सकाळ गेली दुपार गेली सायंकाळचे पाच वाजले. सरपंच आले. बैठकीची तयारी केली. जाजम टाकली. हळूहळू बापय गडी आपापल्या बायांना घेऊन आल. चर्चेला सुरवात झाली. पाहुणा गावातल्या पेक्षा बाहेरचा असावा यावर एकमत झालं. त्याची जबाबदारी सरपंचाच्या सवती पाखराने उचलली. आता मुद्दा आला तो अध्यक्षांचा अन एकच गोंधळ सुरु झाला. अध्यक्ष गावचाच असावा यावर सर्वांचे एकमत झाले पण कोण असावा यावर मात्र चर्चा रंगतच चालली. आपलीच मंडळी अध्यक्ष व्हावी असे सर्वानाच वाटू लागले. जो तो आग्रह धरू लागला. इतका वेळ काही न बोलता चिलिमीचा आनंद घेणारा सरपंच एकदम उठला अन म्हणाला आर कशापायी भांडताय. गावात ज्याला लई बायका त्याची थोरली सवत अध्यक्ष हुईल. सर्वांनी माना डोलावल्या. सरपंचाच्या डाव कोणाच्या ध्यानात आला नाही. शब्द दिला म्हटल्यावर विरोध करण्याचे धाडस कोणी केलं नाही. सरपंचाची थोरली मंडळी सखुबाई अध्यक्ष झाली.
संमेलन म्हटलं की खर्च दाबून येणार हे सर्वांनाच माहित होत. पण गावचं सरपंच लई हुशार होत ते म्हणालं, तुमी काय बी काळजी करू नका. समदी जबाबदारी माझ्यावर सोपवा. लागा कामाला. सरपंचाच बोलणं ऐकलं अन गावकरी कामाला लागण्यासाठी उठलं. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार आयला कधी स्वतःच्या खर्चान न पिता दुसऱ्याची पिणार सरपंच आज इतका खर्च करण्याची भाषा कशी काय करतंय?
तो दिवस उजाडला. बाजाराचा दिवस. परगावाहून बाजारासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून सरपंचान सवती सवती संमेलन कर वसूल केला. पावती पुस्तक घेऊन पंचायतीचे कर्मचारी भल्या पहाटेपासून गावच्या वेशिजवळ थांबलं. बघता बघता तीन साडेतीन हजार रुपये जमले.
समद्या तालुक्यात सवती सवती संमेलनाची बोंबाबोंब झाली. जाहिराती छापल्या गेल्या. कधी नव्हे ते पेपरवाल्यानी यमगर वाडीची बातमी छापली. गावात कोपऱ्या कोपऱ्यावर पेपरचीयमगरवाडीत सवती संमेलन यमगरवाडीत सवती संमेलन
यमगर वाडी ता. 4 – (खास प्रतिनिधी) : सवतीसाठी प्रसिद्ध असलेल्या यमगर वाडीत येत्या 10 तारखेला सवती संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात सवतीची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. सवतींच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काही ठराव केले जाणार आहेत. ज्या सवतींना यात सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी 50 रुपये प्रवेश फिसह आपली नांवे नोंदवावीत.असे गावच्या सरपंचांनी आवाहन केले आहे.
बघता बघता संमेलनाचा दिवस येऊन ठेपला. मारुती मंदिराजवळच्या पारावर भव्य मंडप घालण्याचे ठरले. गावात लग्नासाठी मंडप व स्पीकर पुरवणार एक शाळा मास्तर हुतं. सरपंचाने त्याला बदलीची धमकी दिली व फुकटात काम करून घेतलं. संमेलन नगरास भांडेकर सवती सवती नगर असे नाव दिले.शेजारीच असलेल्या शहरातील महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रखमाबाई पायचोरे याना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले.हेही स्लीव्हलेस मॉडेल असल्यानं सरपंच खुश झालं.
सकाळचं पहिलं सत्र कविसमेलनाच हुत. सौ. पायचोरे यांनी दिपप्रजवलन केले. सखूबाईच्या अध्यक्षतेखाली संमेलन सुरु झाले. एकेकजण तालासुरात गाऊ लागले.
तू सवत मी सवत
नवऱ्याची करू सेवा सोबत
नवऱ्याला घेऊ कवत।
तू काळी मी जाडी
नवरा लागला तिसरीच्या नादी।
सवती सवती एक होऊ
नवऱ्याचा खिमा करू।
एक का दोन पंचवीस कवींच्या कविता झाल्या. दुपारी बारा वाजता कविसंमेलन आवरत घेण्यात आल.
दुपारी तीन वाजता दुसरं सत्र सुरू झालं. एक पती अनेक सवती, सवती सवती अमर रहे, झिंदाबाद झिंदाबाद सवती सवती झिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद नवऱ्याला करू मुर्दाबाद, सवती सवती होऊ एक नवऱ्याशी करू गमती अनेक अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
काही ठराव देखील यावेळी करण्यात आले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सवती सवती मध्ये एकी असावी. पार्टी, शॉपिंग, चित्रपटाला जाताना नवऱ्याने केवळ एकाच सवतीला आपल्या बरोबर न नेता सर्वाना घेऊन जावे. सवती सवतींना एकाच रंगाची एकाच किमतीची साडी आणावी. सर्व सवतींना समान दर्जा असावा. सवती सवतींनी एकमेकीविषयी नवऱ्याजवळ तक्रारी करू नयेत. सवती सवतीत फूट पडणाऱ्या नवऱ्यावर बहिष्कार टाकावा.
ठराव झाल्यानंतर सवती सवती संघटना शाखा यमगर वाडी या संस्थेची स्थापना करण्यात आली.संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या रखमाबाई पायचोरे यांचे मार्गदर्शन झाले.
त्या म्हणाल्या फार पूर्वीपासून सवतीची ही पद्धत चालू आहे. पूर्वीच्या राजांना देखील आवडती व नावडती अशा दोन राण्या होत्या. त्या महालात रहात असत. त्यावेळेपासून सवतीची हे पीक मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. आपला लढा हा सवती सवती विरोधाला नाही.ज्यांनी आपल्याला सवती बनवले त्या नवरेशाही विरुद्ध आपला लढा आहे.ज्याला धड एक बायको नीट सांभाळता येत नाही.तो अनेक बायकांशी संबंध ठेवतो.सवत म्हणून त्यांना घरात आणतो अन मग घरोघरी भांडणे सुरु होतात.
अध्यक्ष पदावरून बोलताना सखुबाई म्हणाल्या, कोणतंही मोठं पद मिळवायचे असेल तर यातना सोसाव्या लागतात. माझंच पहा. मी चार सवतीबरोबर जमवून घेतलं म्हणून मला हा मान मिळाला. तुमी बी सवतीशी जुळवून घ्या. सवती किती बी असल्या तरी नवऱ्यावर छाप कशी पाडायची हे आपल्या हातात असतं.
शेवटी मिनाक्षीबाई हातमोडे यांनी आभार मानले. त्या म्हणाल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सखूबाईंना मिळालं का तर तिच्या नवऱ्यानं जास्त सवती आणल्या म्हणून.आमचा नवरा त्यात कमी पडला म्हणून आम्हाला आभार मानायची वेळ आली. मी माझ्या नवऱ्याला या ठिकाणी जाहीर आव्हान करते की त्यानं लई सवती आणून मला पुढच्या वेळी अध्यक्ष पदाचा मान मिळवून द्यावा. सवतीला माझी काय बी हरकत नाय.
सवती गीताने या संमेलनाची सांगता झाली. संमेलनाचं सूप वाजलं. समेलनानं गावचं रूपच बदलून टाकलं. रोज एकाच्या घरात सवत आल्याची बातमी धडकू लागली. एकनिष्ठ पती पत्नीचं एक घर देखील गावात राहिलं नाही.सवतीच्या गावाचा डिंगोरा पिटला गेल्यानं तरण्या वयात आलेल्या मुला मुलींची लग्ने जमेनात. शेजा शेजाऱ्यातच सोयरीक करण्याची येळ आली.
महिन्याभरान ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. त्यात सवती संमेलनाचा आढावा घेण्यात आला. एकूणच सवती कुटूंब वाढल्याने गावचं नाव बदलण्याचा ठराव करण्यात आला. यमगरवाडी ऐवजी सवतींनगर असे नाव बदलण्यात आले.