अपेक्षाभंगाचं दु:ख एका अर्थी फार विचित्र असतं. अपेक्षा आपणच ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे भंग होण्यासाठीही खरं तर आपणच जबाबदार असायला हवं, पण अपेक्षाभंगासाठी कारणीभूत मात्र आपण नसतोच ! मग नक्की चूक कुणाची ? हे कोडं सुटत नसल्याचं अॅडीशनल नैराश्य मूळच्या दु:खाला अजून वाढवतं. सरतेशेवटी आपण 'जाऊ दे तिज्यायला !' वगैरे मनातल्या मनात म्हणून भंगानंतरच्या तुकड्यांना व्हर्च्युअल लाथ मारून पुढे जात असतो. तसा मी पुढे आलोय आणि हा लेख लिहितोय !
'अय्यारी' पाहून जो अपेक्षाभंग झाला, तसा मी ह्यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स टॉफीच्या फायनलला अनुभवला होता. मोठ्या अपेक्षेने तो भारत-पाक मुकाबला पाहिला होता आणि त्यात भारताने सपशेल नांगी टाकली होती. 'अय्यारी'मध्ये नीरज पांडेंनी सपशेल नांगी टाकली आहे.
'अय्यारी'चा अर्थ होतो, 'चलाखी, manipulation'. सिनेमाचं हे शीर्षक म्हणजे अगदी साजेसं आहे. कारण ट्रेलर्सवरून पांडेजींनी चांगलीच हवा केलेली होती आणि सिनेमाचा एकंदर पवित्रासुद्धा 'आता बघा हं, मी काय जबरदस्त सांगतोय ते' असा एक सॉलिड आव आणल्यासारखा आहे. प्रत्यक्षात मात्र पांडेजी एक पाचकळ ष्टोरी प्रेक्षकाच्या गळी उतरवायला पाहतात आणि हर तऱ्हेची 'चलाखी. manipulation' ही करण्याचाही प्रयत्न करतात. अगदी 'लॉजिक'च्या दोन्ही तंगड्या तोडून प्रेक्षकाच्या हातातही देतात !
तर होतं काय की -
एक बालबुद्धीचा सैनिक असतो. त्याला असं वाटत असतं की आपला देश नुसताच एक महान देश नसून आपली सिस्टीमसुद्धा अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. ह्या सिस्टीममधले अधिकारी त्यांच्या कपड्यांच्या इस्त्रीसारखेच नीटनेटके आणि नेतेमंडळी त्यांच्या पांढऱ्याशुभ्र कुडत्यांप्रमाणेच निर्मळ आहेत. हा बालबुद्धी सैनिक सैन्याच्या एका गुप्त, खास आणि अत्यंत विश्वासू लोकांच्या युनिटचा महत्वाचा सदस्यही असतो. त्या युनिटचा चीफ त्याच्या इस्रायलमधल्या ट्रेनिंगनंतर 'मोसाद'कडून खास ऑफर असतानाही ती नाकारून मातृभूमीच्या सेवेसाठी भारतीय सैन्यातच राहिलेला असा एक चाणाक्ष, कर्तव्यनिष्ठ व कर्तबगार आर्मी कर्नल असतो आणि आपला बालबुद्धी सैनिक त्या चाणाक्ष कर्नलचा अगदी खासमखास, पट्टशिष्य, उजवा हात वगैरेसुद्धा असतो.
पण हरामखोर परिस्थिती बिचाऱ्या बालबुद्धी सैनिकाच्या समजुतीच्या भल्या-मोठ्या चिकन्या फुग्याला निर्दयी निर्विकारपणे सत्याची टाचणी लावते. त्याला अचानक जाणवतं की ही सिस्टीम भ्रष्ट आहे. हे नेते स्वार्थी आहेत. हे अधिकारी लाचार आहेत आणि मी ह्या सगळ्या नालायक लोकांसाठी उगाच स्वत:ची 'जान हथेली पे' घेऊन उंडारतो आहे ! हा साक्षात्कार त्याला आंतर्बाह्य हादरवून टाकतो ! इतक्या वर्षांचं ट्रेनिंग, काम, अनुभव, श्रद्धा, विश्वास सगळ्याला तो झटक्यात तिलांजली देतो आणि चक्क गद्दार बनतो !
Wait. We are not done yet. आत्तापर्यंत पांडेजींनी लॉजिकचं एकच तंगडं आपल्या हातात दिलेलं असतं. पुढील भागात दुसरं तंगडंसुद्धा तितक्याच सफाईदारपणे मिळतं. आणि हा सगळा सोहळा कर्णभेदी, ढणढणाटी पार्श्वसंगीतासह अगदी यथासांग पार पडतो. कार्य सिद्धीस नेण्यासाठी एक आरस्पानी सौंदर्य प्रेमकहाणीच्या निमित्ताने सहभागी होतं. तसेच काही तद्दन बालिश फ्लॅशबॅक्ससुद्धा लांबण लावण्याचं कर्तव्य पूर्ण करतात.
सैनिक जरी बालबुद्धी असला, तरी बाकी व्यक्तिरेखासुद्धा त्याच्याशी बऱ्यापैकी जुळवून घेतात. उदा. - 'मोसाद'ने गौरवलेला कर्नल गोळ्या न भरलेली बंदूक घेऊन हाय-प्रोफाईल टार्गेटला टिपायला पाळत ठेवून बसतो किंवा दस्तुरखुद्द आर्मी चीफची एका अक्षरश: फुटकळ धमकीमुळे तंतरते किंवा कुठल्याही हाय सिक्युरिटी फायलवॉलला भेदू शकणारी एक सॉफ्टवेअर जीनियस कसलीही खातरजमा न करता एका खोट्या कंपनीसाठी काम करायला लागते किंवा एका ऑडीओ रेकॉर्डिंगला ऐकून एक निर्ढावलेला भ्रष्ट माणूस हात-पाय गाळतो.
सिद्धार्थ मल्होत्रा हा काही जबरदस्त क्षमतेचा अभिनेता नसला तरी तो त्याच्या परीने बऱ्यापैकी प्रयत्न करतो. मनोज वाजपेयीने त्याला मिळालेल्या पूर्ण लांबीच्या भूमिकेचं चीज केलंच आहे. पण हे त्याच्याकडून अपेक्षितच असल्याने, त्यात आश्चर्य काहीच नाही. जोडीला कुमुद मिश्रा, विक्रम गोखले, आदिल हुसेन आणि अगदी लहान भूमिकांत अनुपम खेर व नसिरुद्दीन शाह अशी सगळी दमदार कुमक आहेच. त्यामुळे 'अय्यारी' हा पडद्यावरील सगळ्या कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने नटलेला आहे. पण कथानकातच भलीमोठी भगदाडं असल्याने नावेला जलसमाधी मिळणं अटळच होतं !
रकूल प्रीत सिंगची व्यक्तिरेखा सिनेमात का आहे ? नसीरुद्दीन शाहची व्यक्तिरेखा सिनेमात का आहे ? घडणाऱ्या सगळ्या कथानकाचा 'वॉर विडोज'साठीच्या हौसिंग प्रोजेक्टशी संबंध तरी काय आहे ? असे अत्यंत बेसिक प्रश्न पावणे तीन तासांच्या पसाऱ्यानंतर पडतात.
नक्षीकाम केलेल्या सुंदर कपातून प्यायल्याने फिक्क्या चहाला चव येत नाही. चेहऱ्याची ठेवणच बिघडलेली असेल, तर नुसत्याच मेकअप चोपडण्यामुळे फरक पडत नाही. इतकंच काय, कोट, बो घालून आणि 'बो'च्या खाली टाय बांधून एखाद्या अस्सल बावळटाला स्मार्टही बनवता येत नाही.
तसंच, चकाचक निर्मितीमूल्यं, तांत्रिक सफाई आणि दमदार अभिनय वगैरे असला तरी तर्कशून्य, फुसक्या आणि रटाळ कहाणीचा उत्कंठावर्धक थ्रिलर बनूच शकत नाही.
विंडो शॉपिंगच्या नावाखाली कुठल्याही दुकानात बायकोने शिरावं, तसं सिनेमाचं कथानक अचानक १-२ जागांवर उगाच बागडून येतं. तेव्हा प्रश्न पडतो की वेन्सडे, स्पेशल २६ आणि बेबी सारख्या गच्च आवळलेल्या, विचार करायची उसंतही न देणाऱ्या वेगवान पटकथा लिहिणारे पांडेजी हेच का ? उत्तरादाखल 'एम एस धोनी - द अन्टोल्ड स्टोरी' आठवतो आणि आपलाच होमवर्क कमी पडल्यामुळे हा घोर अपेक्षाभंग झाला असल्याचा साक्षात्कार होतो.
'पद्मावत'च्या फुसकेपणासाठीची तयारी 'भन्साळीचा आहे' ह्या जाणीवेतच सुप्तपणे दडलेली असल्याने 'अय्यारी' हा २०१८ मधला एक महत्वाचा फुसका बार ठरणार आहे.
रेटिंग - * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/02/movie-review-aiyaary.html
अगदी अगदी. फसलेलं कडबोळं आहे
अगदी अगदी. फसलेलं कडबोळं आहे.
असा पिक्चर आलाय हे देखील
असा पिक्चर आलाय हे देखील माहीत नव्हते
पद्मावती नाही पाहिला का?
पद्मावती नाही पाहिला का? त्यावर नाही काही लिहिले का?
आता जुना झाला तसा तो...
सिद्धार्थ ने कितीही उड्या
सिद्धार्थ ने कितीही उड्या मारल्या तरी त्याचा वरुण होणे नाही.
नावावरुन काहितरी वेगळे असेल
नावावरुन काहितरी वेगळे असेल असे वाटले होते (अय्यारीचा विषय घेउन)
मला आवडतो सिद्धार्थ, म्हणजे
मला आवडतो सिद्धार्थ, म्हणजे फॅन वगैरे नाहीये त्याची पण तरी त्याचे मूव्ही बघायला आवडतात, म्हणून अय्यारी बघायचा प्लॅन होता, पण बरेच ठिकाणी निगेटिव्ह रिव्ह्यू आलाय सो आता मोबाईलवर येईल तेव्हा बघेन
>> मला आवडतो सिद्धार्थ,
>> मला आवडतो सिद्धार्थ, म्हणजे फॅन वगैरे नाहीये त्याची पण तरी त्याचे मूव्ही बघायला आवडतात <<
मलाही. त्याचे आत्तापर्यंतचे सगळे सिनेमे पाहिले आहेत. ग्रेट अजिबातच नाहीय, पण प्रामाणिक प्रयत्न करतो.
पद्मावती नाही पाहिला का?
पद्मावती नाही पाहिला का? त्यावर नाही काही लिहिले का?
आता जुना झाला तसा तो...
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 February, 2018 - 03:01
>>
पाहिला. लिहायला वेळ मिळाला नाही.
भिकार मूव्ही, थर्ड क्लास अॅक्टिंग.. जाम पकलो.
मनोज बाजपेइचा रोल चांगला आहे
मनोज बाजपेइचा रोल चांगला आहे. त्याने कामही चांगले केले आहे. पण वाया निव्वळ.
भिकार मूव्ही, थर्ड क्लास अ
भिकार मूव्ही, थर्ड क्लास अॅक्टिंग.. जाम पकलो. शद्
>>>
हो तुमचे हेच मत असणार कल्पना होती. त्यामुळे परीक्षणाऐवजी तुम्ही कसे त्याला घेतात हे वाचायची उत्सुकता होती
सिद्धार्थ ने कितीही उड्या
सिद्धार्थ ने कितीही उड्या मारल्या तरी त्याचा वरुण होणे नाही.
>>>
हे वरूण होने नाही हे शाहरूख वा सलमान होणे नाही या थाटात का लिहिलेय. वरुण स्वताही तिसरया फळीतील कलाकार आहे.
आणला रे ओढून "त्याला"
आणला रे ओढून "त्याला" धाग्यावर.
मी काल पाहिला अय्यारी. खास
मी काल पाहिला अय्यारी. खास नाही वाटला . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कथानकच अस्ताव्यस्त असल्याने सिनेमा पकड घेत नाही ..
२.५*
अरे वा रसप बर्याच दिवसानी
अरे वा रसप बर्याच दिवसानी आलात माबोवर. असो ह्या परिक्षणामुळे माझे पैसे वाचले.
अरे वा रसप बर्याच दिवसानी
अरे वा रसप बर्याच दिवसानी आलात माबोवर. असो ह्या परिक्षणामुळे माझे पैसे वाचले. >>> अगदी अगदी
वेळेवर टाकला हा review तुम्ही , कारण जाऊ कि नको कळत नव्हते, जे इथे वाचल्याने नाही असे ठरविले
त्यामुळे पैसे अन मुख्य म्हणजे वेळ वाचला
कारण वेळेच्या कमतरतेमुळे खूप दिवस शॉपिंग ला गेले नव्हते जी काल केली. शेवटी असा अख्खा दिवस भटकत शॉपिंग ची जी मजा असते ती ऑनलाईन शॉपिंग ने येत नाही
असा काही पिच्चर येतोय हेच
असा काही पिच्चर येतोय हेच माहित नव्हतं अजुन.
सिद्धार्थ ने कितीही उड्या मारल्या तरी त्याचा वरुण होणे नाही.>>>>>> च्रम्प्स हे उगीच हा. दोघेही छान आहेत. आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत.
प्लस वरुण्कडे फिल्मिइ फेमिली बॅकग्राउंड आहे.
वरूणने एक बदलापुर सोडला तर
वरूणने एक बदलापुर सोडला तर बाकी सगळ्या चित्रपटात माकडचेष्टाच केली आहे.
बघितला काल . सिद्धार्थ आणि
बघितला काल . सिद्धार्थ आणि राकुल खूप छान दिसतात . विशेशतः , जेन्व्हा दोघे पहिल्यान्दा भेटतात तेन्व्हा . he looks dapper! . तो हसतो भारी . शेवटच्या शॉट्मध्येही .
मनोज वाजपेयी , फौजी ची बॉडी वगैरे नसतानाही ईतका प्रामाणिक वाटतो . चंदीगड वाली आयडिया आवडली , बायकोला फोन करतो ती.
hats off to कुमुद मिश्रा . काय वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो तो .
न.शा , अ.खे आणि वि.गो फुकट घालवलेत .
सिनेमा संपल्यावर शेवटी , " हो .. हे सगळं कळलं , पण मग पुढे काय ? तुला नक्की काय म्हणायचय? " असं म्हणावसं वाटतं.
चपखल परिक्षण !
चपखल परिक्षण !
पण एक मात्र निश्चित , चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
"अय्यार" चा अर्थ चित्रपटात " रंग बदलणारा / रूप बदलणारा " असा सांगितला आहे !
आणि हो ;
सिद्धार्थ चं व्यक्तिमत्व नि:संशय आकर्षक आणि छाप पाडणारं आहे ! मला नेहमी वाटत आलय कि हा "लंबे रेस का घोडा" आहे बॉलीवूडचा ...
प्रामाणिक प्रयत्न काय कतरीना
प्रामाणिक प्रयत्न काय कतरीना कैफही करतेच ...
उगाच दिग्दर्शकाचा मुलगा , दिग्दर्शकाचा हा म्हणून चित्रपट मिळतातच त्यामुळे प्रयत्न हे करावेच लागणार.
असे किती प्रयत्न पहायचे.
अरे अरे!! मला वाटलं बरा असेल.
अरे अरे!! मला वाटलं बरा असेल.
सिद्धार्थ मल्होत्रा आवडतो मला. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे असे माझे मत आहे. आणि बाकीची कास्टसुद्धा तगडी आहे त्यामुळे बघायचा होता. असो.
आणखी एका मस्त परीक्षणाबद्दल
आणखी एका मस्त परीक्षणाबद्दल धन्स रसप. फेवरेट स्टार्ससाठी बघेन, पण टिव्हीवर आल्यावर. बाकी सिद्धार्थबद्दल, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स छान आहे व अॅक्टींगही बरी वाटते.
<<आणला रे ओढून "त्याला" धाग्यावर.
नवीन Submitted by पाथफाईंडर >> +१
वरूणने एक बदलापुर सोडला तर
वरूणने एक बदलापुर सोडला तर बाकी सगळ्या चित्रपटात माकडचेष्टाच केली आहे.
>>> अरे बद्रीनाथ की dulhaniya विसरलात का? किती मस्त काम केलंय
वरूणचा बद्री की दुल्हनीया
वरूणचा बद्री की दुल्हनीया मधली अॅक्टींगपण भारी होती की!
अय्यारी बघावासा वाटला नाही. आता, तुमचा रिव्ह्यु वाचून कधीच बघणार नाही.
ते ' ले डूबा' गाणं छान आहे ,
ते ' ले डूबा' गाणं छान आहे , पण राहून राहून नाम शबाना मधल्या 'रोजाना' ची आठवण येते ते ऐकताना
सिद्धार्थ मल्होत्रा फॅन क्लब ने ते गाणं चुकवू नये . प्रत्येक फ्रेम मध्ये तो ईतका भारी दिसलाय .
बाकीची गाणी पण चांगली आहेत , पण ईतकी ऐकली नाहीत .
चित्रपट बघितलेल्यानी , ती शेवटची कविता कोणाची आहे माहितेय का ?
कुठे मिळेल का?
वरूणने एक बदलापुर सोडला तर
वरूणने एक बदलापुर सोडला तर बाकी सगळ्या चित्रपटात माकडचेष्टाच केली आहे. >> अगदिच.
त्याच्याकडे लेगसी असल्याने पदार्पण दमदार झाले पण सिद्धार्थ स्ट्रगल करत पोहोचला आहे इथवर.
माय नेम इज खान साठी त्याने करण जोहर बरोबर असिस्टंट चे काम केल्याचे ऐकले आहे. वरूण धवन करेल काय?
बाकी परिक्षण छान मी असले सिनेमे पहातच नाही अगदी टिव्हिवर आले तरिही.
माय नेम इज खान साठी त्याने
माय नेम इज खान साठी त्याने करण जोहर बरोबर असिस्टंट चे काम केल्याचे ऐकले आहे. वरूण धवन करेल काय?
>>>वरून पण असिस्टंट होता त्या पिक्चर साठी. सिद्धार्थ आणि वरुण दोघे होते.
सिद्धार्थ आणि वरुण मधे तुलना
सिद्धार्थ आणि वरुण मधे तुलना असेल तर वरुण इज वे बेटर इन अॅक्टिन्ग्, डान्स आणी स्क्रिन प्रेझेन्स सुद्धा, सिद्धार्थ ठोकळा आहे अॅक्टीन्ग मधे ...
अय्यारी मधे माहित नाही पण आतापर्यत जे १-२ बघितले त्यात तर अगदी अॅव्हेरेज वाटला . बाकी दिसायला वैगरे चान्गला आहे पण तो तर काय आफताब शिवदासानी ही होताच की.
बाकी दिसायला वैगरे चान्गला
बाकी दिसायला वैगरे चान्गला आहे पण तो तर काय आफताब शिवदासानी ही होताच की.
नवीन Submitted by प्राजक्ता on 21 February, 2018 - 12:02
>>
अर्रर्र ! भयंकर तुलना !
आफताब शिवदासानी तोंडात अख्ख्या घराचं फर्निचर घेऊन फिरायचा !
अॅक्च्युअली, वरुण आणि
अॅक्च्युअली, वरुण आणि सिद्धार्थमधली तुलना म्हणजे दोन गरिबांमधली भाग्यवान तुलना वाटते. दोघेही सारखेच वाटतात. एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा.
सिद्धार्थचा फिल्म्स निवडण्याचा सेन्स मात्र खूपच वेगळा वाटतो मला. सलमान असलेला सिनेमा तो रिजेक्ट करतो (रेस-३), हे नक्कीच त्याच्यासारख्या एका आउटसायडरसाठी करेजिअस आहे. मला असं वाटतं की त्याला स्वत:च्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे तो खूप आव्हानात्मक भूमिका करतच नाहीय. ज्या करतो, त्यात तो मला तरी कधीच मिसफिटही वाटला नाही आणि कमी पडल्यासारखाही वाटला नाही.
Pages