सुरग्याचा जुळा..

Submitted by onlynit26 on 29 January, 2018 - 04:08

थंडी वाढली तशी माका कुडकुडी भरली. माचलेवरना खाली उतरान इझालेलो धग केलय. टिलग्यान रकयेतच गुटली केल्यान हूती. माझी जाग लागल्याबरोबर बाजूक झालो. धगात आग झाल्याबरोबर जरा बरा वाटला.
भुईमूगातल्या माचलीवर झोपाचा म्हणजे मोठा दीव्यच. पण नाईलाजान येवचा लागत हूता. बापाशीचा वय झाल्यामुळा घरातच हाथरून टाकी. यंदा एकरभर जास्तच भयमुग केला हूताव. आमच्याकडे शेतात डूकरा काय ठेयीत नसत म्हणान झोपाक जावचा लागा. बापशीन माचली बाकी भारी घालून दिल्यान हूती. भर दुपारच्या कडार पण थंडगार वाटा. नदी जवळ असल्यामुळा शर्नीचे टाळ लय मिळायचे.
जसो डिसेंबर लागलो तशी थंडी भयंकर वाढली हूती. आज पण दांडी मारूचो इचार चललेलो. माझी चुळबूळ बघून बापूशीन माझ्याकडे एकदाच बघल्यान तसा गरम आंगडा आंगात घालून सुरग्याच्या घराकडे चलत ऱ्यवलय. बापाशीचो धाकच तसो हूतो. पुढे बोलाची सोय नाय हूती . सुरगो पण थंडी असल्यामुळा बायकोकडे कारायी हूतो. तेच्यावर पण बापाशीचो जाम धाक हूतो. त्यामुळा बापूस सांगा तसा तेका करूचा लागा हूता. माका बघून तो पण नाईलाजान भायर पडलो. सुरगो पाटल्यादाराच्या पांदीतून जाताना न्हानयेकडे बघूक लागलो, तेची बायल पण थय हात हलवित होती.
बेळा उघडून भयमूगात (भुईमूगाचे शेत) पोचलाव तेवा थंडी लयच बोचाक लागली.
" तेरोजाचा औषध हा काय रे?" मिया सुरग्याक इचारलय.
" नाय रे, तुच तर त्या दिवशी पाघळलस ना? मिया गप बसलय काय बोलतलय पुढे.
सुरग्याची माचली पयली लागायची. नंतर एकदम शेवटाक माझी माचली. थोडोयेळ पत्ते खेळत बसलाव. माका माझ्या माचलेर जायनसारा वाटत नाय हूता. काल पण सुरग्याच्या माचलेर झोपलय हूतय. सुरग्याकडे त्याच्या मोबाईलमधी भारी भारी पिक्चर हूते . ते बघून मी कारेवायचो पण सुरगो चिडायचो. तो हाली हाली चिडाक लागलो हूतो. सारखो माका माझ्या माचलेर जावक सांगायचो. पयलो असा नाय करायचो. सुरगो बदाललो हूतो ह्या नक्की. त्याच्या आणि माझ्या माचलेत जास्त अंतर नाय हूता पण माका भय करायचो. कारण नदीच्या खालच्या आंगाक गरोदरपणात मेलेल्या बायकांका पुरायचे. ऱ्यवान ऱ्यावन ताच मनात यायचा. शेवटी मी नाइलाजान झोपाक गेलय.

टिलग्यान आधीच जावन माझ्या हातूरनात गुटली केल्यान होती. माझी जाग गावली तशी हळूच खाली उतारलो. थोडो येळ धगाक बसान धग टिलग्याच्या स्वाधीन केलय आणि माचलेर येवन झोपलय. श्या झोप येयना भय करूक लागलो. राम राम म्हनान सूदा भय कमी होयना. माझी ही हालत बघून टिलगो गालातल्या गालात हसाक लागलो. तेवा टिलग्याचो माका लय राग इलो हूतो. इतक्यात खाली झाळीत खसखस असो आवाज झालो आणि तेवाच कंदील पण इझला. भर थंडीत घाम फुटाची पाळी. तसाच हाथरून गुटाळलय आणि सुरग्याच्या माचलेकडे चलत ऱ्यवलय. टिलगो मात्र बोंबयेच्या देठापासना भुकत हूतो. म्हणतत कुत्र्यांका भुता दिसतत, माका वाटता टिलग्याक पण भुत दिसत आसतला आणि तेकाच भुकत आसतलो. सुरग्याच्या माचलेकडे इलय तेवा सुरगो डारडूर झोपलेलो. झोपेतना उठवलय तेवा चार गाळी आयकाच्यो लागल्यो.
" झाली तुझी नाटका सुरू? चार राती जरा बऱ्यो गेल्यो हूत्यो." सुरग्यान वैतागाक सुरवात केल्यान.
सुरग्याची माचली ऐसपैस हूती. पण सुरगो माका थय अजिबात थारो करीत नाय हूतो. ती रात कशी बशी गेली. पुढचे चार पाच दिवस अशेच गेले. दिवसेंदिवस सुरगो माझ्यावर खार खावक लागलो . माझो पण नाईलाज हूतो. रोज झाळीत खसखस झाल्याचो आवाज येय , टिलगो तासभर भुकत ऱ्यवा आणि मिया माझ्या माचलेवरना सुरग्याकडे पळत सुटय. माझ्या माचलेपेक्षा सुरग्याच्यो गाळी बऱ्यो वाटत.
सुलग्यान गाळी घायल्यान तरी राती पुरत्यो. परत सकाळी आम्ही मानेत मान घालून ऱ्यवायचे. बरा माझी भियाची गजाल पूऱ्या गावभर झाली. शेवटी सुरगो पचाकलोच हूतो. प्वार टेर खेचूक लागले.

झाला असा, अमावस्येची अगोदरची रात हूती. त्या दिवशी भयमूगात जावक निघताना भरवडीत ठेवलेली बापाशीच्या कोट्यातली नवटाक मारूनच निघालय. सुरगो वास काढीत म्हनान मेंटॉस खालय आणि सुरग्याबरोबर गप चलत ऱ्यवलय.
सुरगो बराच काय माय बडबडा हूता. मी आपलो हूं हा करीत त्याच्यावांगडा चलत हूतय. सुरग्याची माचली इली. पण मी काय थय थांबाक नाय. टिलगो पुढे , मी मागे करीत माझ्या माचलेकडे इलय. सुरग्यान मनात बराच म्हटल्यान आसतला. धगासाठी टोनक्या पेटवून ठेवलय. कंदिलाची वात बारीक करून आडवो झालय. पेटत्या काजीच्या फेनी मुळा लगेच झोप लागली.
बरोच येळ गेलो आसात टिलगो जोरात भुकलो म्हनान माका जाग इली. माका भय करूक लागलो म्हणजे माझी उतारली हूती तर. माचलेर उठान बसलय. पण समोर काय येगळाच हूता. अंधारात दोन डोळे लकाकत हूते. अरे देवा..!बाघाचे डोळे हूते ते. सुरग्याचा कंदील आणि धग पण इझलो हूतो. म्हणजे वाघान सुरग्याक फस्त केल्यान की काय? माका जाग कशी नाय येवक? कशी येयत? काजीची ढोसून डाराडूर झोपललय. तसोच माचलेर उभो ऱ्यवान पाचगळेक लावलेली राकेलची बाटली काढलय.आणि थोडा राकेल टोनक्यावर टाकलय. मोठी आग झाली .आग आसा परयात माका भय नाय हूतो. टिलग्याक वर येवक सांगत हूतय पण तो नदीकडे त्वांड करुन भुकत हूतो. म्हणजे तेना आजून वाघाचे डोळे बघूक नाय हूते तर. तेका तसोच भुकाक दिलय. आसान नसान टोनक्यावर राकेल टाकून आग पेटती ठेवलय. इतक्यात बाजूच्या कुडनात मोबाईलची रिंग व्हाजली आणि मोबाईल वाल्याक कोणीतरी दब्या आवाजात गाळी घातल्याचो आवाज इलो. प्रकार काय तो कळना. अस्सल गाळी आयकान माका धीर इलो. भूत नक्कीच नसतला. भूतांका मालवणी गाळी थोड्योच येतत. माचलेच्या मागच्या बाजून हळूच खाली उतारलय आणि अंदाजान आवाजाच्या दिशेक चलाक लागलय. आमच्या कुडनाक लागान दाजींचा कुडान हूता. तेनी अंदू कलिंगडा केल्यानी हूती. रातीची माकाच राकाक सांगल्यानी हूती. तशी राकाची गरज नाय हूती कारण तेंचा कुडान आवळती (गरोदर बायका मेल्यावर पुरतात ती जागा) पुरतत थय लागानच हूता. त्यामुळे दिवसा पण थय कोण फिरका नाय. पण आज येगळोच सीन हूतो. कुडनात चोर इले हूते यात काय्येक शंका नाय हूती. दाजींच्या मुशीर पोचलय तेवा चार चॉर कलिंगडा काढण्यात एकदम तल्लीन झाले हूते.
" कोण रे ते **झये? " माझो एवढो ताठ आवाज खयसून इलो तो माकाच कळना. त्या बरोबर भुतूरले चार जण सावध झाले. कलिंगडा गोणत्यात भरून नदीकडे पळाक लागले. एवढ्यात मिया दाजींच्या कुडनात पोचलय हूतय. मगाशी जेचो मोबाईल व्हाजलो तो धावताना होलपाटल्यामुळा माझ्या हाताक गावलो. बाकीचे कलिंगडा थयच टाकून पळान गेले. मनात म्हटलय वाघ पुढेच इलो. तर हेका पुढे करूक बरो.
मी धरलेला याड आंगान एकदम चापार (बारीक) हूता. गावातला नाय हूता ह्या नक्की. तेना माझ्या तावडीतना सुटाचो अजिबात प्रयत्न करूक नाय. करतलो तरी कसो? जीव तो केवढो. टिलगो पण वांगडाक हूतो. माचलेकडे इल्या इल्या सुरग्याच्या माचलेकडे लक्ष टाकलय तर ते डोळे अजून थयच लकाकत हूते. च्यामारी आजून थयच.
त्या याडाकडे चांगली ब्याटरी हूती. ती घीतलय आणि त्या दोन डोळ्याच्या दिशेन भियत भियत मारलय. डोळे आजूनच चकाकले. पण हालचाल कायच नाय. वाघ डोळे उघडे ठेवन झोपलो की काय? माका थोडो संशय इलो. मी त्या याडाक वांगडाक घेवन ब्याटरी तशीच मारून धरीत याक याक पाऊल पुढे टाकूक लागलय. थोडो पुढे गेलय आसान आणि तसा याड हसाक लागला.
"अहो, ते नकली डोळे आहेत, चायना मेड !"
मी चक्रवालयच. मामलो हा काय सगळो? सुरग्याच्या माचलेकडे इलय. बघतय तर तेच्या माचलेच्या समोरच्या झाळीत ते चायना मेड डोळे लावन ठेवलेले हूते.
च्या मारी प्रकार हा काय ह्यो? सुरग्याच्या माचलेवर ब्याटरी मारलय तर मस्त बोतान मारून झोपलो होतो.
" सुरग्या ssss , ये सुरग्या ssss, मेल्या उठ " असा बोलान तेच्या आंगावरचा कांबरून ओढलय. बघतय तर सुरग्याचा जुळा लागलेला. तो आणि तेची बायल चिकटान झोपलेली. त्वांड बारीक करीत सुरगो उठलो. तेची बायल लाजेन चूर झाली. तोंडाक पदर लावन बसान ऱ्यवली.
सुरग्याचा घराकडे कारावना, टाटा , बाय बाय, तेचा माझ्यावर वैतागना आणि शेवटाक हे दोन डोळे सगळ्याची लिंक लागली. नवीन लगीन झालेल्या सुरग्याक मिया जास्त काय बोल्लय नाय. माझा लगीन होवचा बाकी हूता. हुकमाचो एको सांभाळून ठेवलेलो बरो. पण नवीन लगीन झालेल्या सुरग्याक तेच्या बापाशीन भर थंडीत असा भायर पाठवूक नको हूतो.

शब्दांकन - नितीन राणे - कणकवली
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<भूत नक्कीच नसतला. भूतांका मालवणी गाळी थोड्योच येतत. >> Proud
भारी जमला हा... पण लेखन दोन वेळा उतारला हा ...