तंजावर : मंदिर,राजवाडा आणि तोफ !

Submitted by dongaryatri on 19 January, 2018 - 04:05

वेल्लोर येथील साजरा आणि गोजरा किल्ले पाहून झाल्यावर , दुसऱ्या दिवशी आम्ही जिंजी चे दर्शन घेतले आणि पुदुच्चेरी ला मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. दक्षिणेत परतीचा पाऊस नोव्हेंबर मध्ये येतो..त्या वर्षी महाराष्ट्रातले पावसाळी ट्रेक कमी झाले होते की काय, पण जिंजी सुद्धा अनपेक्षित रित्या monsoon ट्रेक झाला ! हाती शिल्लक राहिलेल्या तिसऱ्या दिवसात तंजावरचा बेत ठरला.
शालेय अभ्यासक्रमातील तंजावरचा उल्लेख आणि नंतर वाचलेलं 'कावेरी खोऱ्यातील यक्षनागरी 'हे सेतूमाधवरावां चं पुस्तक इतकीच त्रोटक माहिती मला तंजावर बाबत होती. पुदुच्चेरी ते तंजावर हा प्रवास साधारण चार तासांचा आहे. दोन्ही बाजूला भाताची खाचरं आणि नारळाचे वृक्ष ह्यातून आमची गाडी रस्ता कापत होती.तंजन नावाच्या असुराचा वध श्रीकृष्णाने केल्यामुळे यास तंजावर नाव प्राप्त झाले अशी आख्यायिका इथे सांगितली जाते. बृहद्देश्वराचं प्रचंड मंदिर हे तंजावरचं प्रमुख आकर्षण ! चोळ साम्राज्यात ११ व्या शतकात बांधलेलं हे मंदिर तत्कालीन स्थापत्यशास्त्राचं अचंबित करणारं उदाहरण ... मंदिराचा आवाका इतका मोठा आहे की काही तासांत ते संपूर्ण पाहून अभ्यासणे अशक्य आहे.
entrance.jpg
​महा मंडप , नटराज मंडप , तामिळ लिपीमधील शिलालेख, भव्य नंदी ,द्वारपाल ,गोपुरं ह्या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही मंदिराच्या प्रांगणात विसावलो .
ins.jpgdwar.jpg
चोळ ,पांड्य ,यादव ,मुघल ,नायक ,मराठा अशी कित्येक स्थित्यंतर तंजावर ने अनुभवली.ह्या मंदिरात मराठी शिलालेख हि आहेत. मात्र वेळेअभावी ते आम्हाला शोधता आले नाहीत.
मंदिरानंतर आम्ही भेट देणार होतो ते सरस्वती महाल ग्रंथालय आणि राजवाड्याला (Royal palace). शहाजी राजांचे पुत्र व्यंकोजी यांनी १६७४ च्या सुमारास तंजावर काबीज केलं आणि मराठी संस्कृती ची नाळ इथे रुजली. तंजावरच्या मराठी लोकांचं मराठी बोलणं तुम्ही ऐकलंय का ? वेगळयाच धाटणीची मराठी ते बोलतात. सरफोजी राजे (दुसरें ) यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेलं सरस्वती महाल ग्रंथालय आज जगभराच्या पंडितांसाठी खजिनाच आहे. संस्कृत, तामिळ, मराठी , कन्नड, फ्रेंच, स्पॅनिश , जर्मन आदी भाषांमधील ५०००० हून अधिक दुर्मिळ पुस्तके , ताडपत्रांवरील दुर्लभ ग्रंथ पाहून तत्कालीन राजवटीबद्दल कौतुक वाटलं. कधीतरी इथे अभ्यासासाठी मुक्काम करायला हवा असं असा विचार करून आम्ही राजवाड्याच्या दिशेने निघालो.
नायक राजवटीमध्ये हा राजवाडा बांधला गेला आणि नंतर मराठा राजांचं वास्तव्य इथेच होतं. सरदार महाल , दरबार महाल मधील अप्रतिम चित्रे पाहताना वि. का. राजवाड्यांच्या 'राधामाधवविलासचंपू' मधील राजाच्या दिनचर्येची आठवण झाली.
dh1.jpg
हे सगळं चालू असतानाच तंजावर मध्ये पाहण्याची आणखी एक गोष्ट माझ्या टिपणांमध्ये होती , ती म्हणजे तंजावरची तोफ.तोफांमध्ये मला फारसा रस नाही, मात्र ह्या तोफेचा फोटो पाहून का कोण जाणे एक उत्सुकता निर्माण झाली होती.
२-३ लोकांना cannon , big cannon असे म्हणत पत्ता विचारला , मात्र त्यांना काही बोध झाला नाही. त्यानंतर print outs मधील फोटो दाखवल्यावर एका काकांनी जुजबी नकाशा काढून पत्ता समजावून सांगितला .बीरंगी मेदू (Beerangi Medu ) नामक ठिकाणी आम्ही पोहोचलो. (गम्मत म्हणजे )ASI प्रोटेक्टड monument म्हणून ह्या जागेची नोंद केली आहे. 'ह्या जिन्याने वर गेल्यावर तोफ़ दिसेल' असे आम्हाला सांगण्यात आले . अत्यंत वर्दळीच्या ,फारशी स्वच्छता नसलेल्या ठिकाणी आता आणखी काय पाहायला आणलय ह्या इथे .. असे भाव सोबत्यांच्या चेहऱ्यांवर दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतच मी वर गेले आणि अहो आश्चर्यम !
cannon.jpg
साडे सात मीटर लांब आणि वीस टन वजन असलेली ही तोफ़ रघुनाथ नायकांच्या कारकिर्दीत सतराव्या शतकांत तयार केल्याची नोंद आहे. तोफेचा आतला व्यास आहे २५ इंच तर, बाहेरचा व्यास आहे ३७ इंच!
ह्या तोफेला राजगोपाल बीरंगी असं म्हटलं जात असे. बीरंगी चा तामिळ भाषेतला अर्थ आहे तोफ. धातुशास्त्रज्ञांनुसार तोफेची बनावट ही दोन किंवा अधिक तुकडे एकत्र जोडून करण्यात आली आहे . (forge welding ).
tof1.jpgtof3.jpg
तोफेशी निगडित अन्य कुठलीही माहिती इतिहासात आढळत नाही. इतकी प्रचंड तोफ़ बनवताना झटलेले कामगार, त्यावेळी वापरलेलं त्यांचं अभियांत्रिकीचं ज्ञान , आलेल्या अडचणी, तोफ पूर्ण झाल्यावरचा आनंद आदी गोष्टी तुम्हांला तुमच्या प्रतिभेच्या जोरावर ,कल्पनेतच अनुभवता येऊ शकतात . (अर्थात हे आपल्या इतिहासातल्या बऱ्याच गोष्टींना लागू होतं ). तोफेचा अगदी सुक्ष्म भाग अवलोकनासाठी घेऊन त्यावर शोध निबंध लिहिण्यात आला आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा. (संदर्भ : R.Balsubramaniam ::A Marvel of Medieval Indian Metallurgy: Thanjavur’s Forge-Welded Iron Cannon)
ह्या तोफेतल्या लोखंडाच्या झीज/गंज रोखण्याची क्षमता ही आधुनिक steel पेक्षा जास्त आहे असं बालसुब्रमनियम नमूद करतात.
जागतिक दर्जाची ही तोंफ गेली कित्येक वर्षे ऊन, वारा ,पाऊस ,सगळ्या प्रकारची अतिक्रमणे आणि उपेक्षा सहन करत तेच सिद्ध करत नाही का?

Group content visibility: 
Use group defaults

छान फोटो आणि माहिती. बृहद्देश्वर मंदीराचे फोटो नाही टाकले ?! Happy
या तोफेबद्दल माहीतच नव्हते.....