गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल (१९५७) - पश्चिमरंग

Submitted by अतुल ठाकुर on 28 December, 2017 - 22:01

123.jpg

वायट अर्प आणि डॉक हॉलिडे या सर्वस्वी भिन्न प्रवृत्तीच्या दोन माणसांची मैत्री हा हॉलिवूडच्या वेस्टर्नपटांचा एक आवडता विषय. शंभर एक वर्षांपूर्वी प्रत्यक्ष घडलेल्या या गनफाईटवर अनेक चित्रपट निघाले. ३-४ मी स्वतः पाहिले आहेत. इतिहासाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा दावा करणारे हे वेस्टर्नपट पाहणं हा रंजकतेचा भाग आहेच पण वायट अर्प आणि डॉक हॉलिडे या प्रमुख व्यक्तीरेखा ही मंडळी चित्रपटात कशी सादर करतात हा देखील मुद्दाम पाहण्याजोगा भाग आहे. पैकी टाऊन मार्शल वायट अर्प हा हेन्री फोंडा, बर्ट लंकास्टर, जेम्स गार्नरपासून ते थेट केविन कॉस्टनर पर्यंत अनेकांनी रंगवला. आणि दारुच्या आहारी गेलेला "फास्टेस्ट गन" आणि किलर अशी ख्याती मिळवलेला जुगारी डॉक हॉलिडेही अनेकांनी रंगवला. त्यातील जेसन रोबार्ड आणि कर्क डग्लसचा डॉक मला जास्त आवडला. "गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल" मध्ये बर्ट लंकास्टर आणि कर्क डग्लस ही जोडी जमली आहे.

गावातील श्रीमंत खलनायकाने जमीन आणि कुरणासाठी जबरदस्ती करणे आणि प्रामाणिक मार्शलने त्याचा विरोध करणे हे कथेचे मुख्य सूत्र. खलनायक मार्शलच्या भावालाच ठार करतो आणि दुसर्‍या भावाला जायबंदी करतो. निकराचा लढा म्हणून वायट अर्प आपला मित्र डॉक हॉलिडे सहीत खलनायकाचा खात्मा करायला निघतो. ही गनफाईट प्रत्यक्ष झाली होती असे म्हणतात. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या त्याचा तपशील निरनिराळा देण्यात येतो. ही चकमक झाल्यावर वायट अर्पवर खटलाही चालला. काही चित्रपटांमध्ये हा खटलाही दाखवला आहे. "गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल" मध्ये बर्ट लंकास्टरने साकारलेला अर्प हा मिशा नसलेला आहे. प्रत्यक्षात अर्प हा घसघशीत मिशा असलेला माणूस होता. बहुधा लंकास्टरच्या चित्रपटात कला स्वातंत्र्य जास्त घेतलं असण्याची शक्यता वाटते. कारण यात जॉनी रिंगो या आणखी एका फास्ट गनचा खात्मा करताना डॉक हॉलिडेला दाखवलं आहे. जॉनी रिंगो ही व्यक्तीरेखाही ऐतिहासिक असल्याचे म्हटले जाते.

या मालिकेतील आणखी एक अलिकडला चित्रपट म्हणजे कर्ट रसेलचा "टुंबस्टोन". यात डॉक हॉलिडे साकारला आहे तो व्हाल किल्मर याने. यात रिंगोबरोबरची गनफाईट तपशीलाने रंगवली आहे. रसेलचे अर्पच्या चेहर्‍याशी बर्‍यापैकी साम्य आहे. बाकी एक गोष्ट मात्र बहुतेच चित्रपटांमध्ये सारखीच आहे. ती म्हणजे डॉक हॉलिडेचे अतिरेकी मद्यपान. तरीही हा माणुस विद्युतवेगाने गन काढून अचूक नेम धरु शकतो. कर्क डग्लसचा डॉक हा सुरेबाजीतही निष्णात आहे. ज्यांना या गनफाईटच्या आधी वा नंतर जे खटले झाले ते पाहण्यात रस असेल त्यांनी जेम्स गार्नर व जेसन रोबार्डस यांचा "अवर ऑफ गन" हा चित्रपट पाहावा. ज्यांना वेगवान घटना पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी "गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल" हीच योग्य निवड आहे.

गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल मध्ये सुरुवातीलाच दर्शन घडते ते सर्जियो लियोनिच्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेल्या तरण्याबांड ली व्हान क्लिफचे. त्याची आणि कर्कडग्लसची सलूनमध्ये झालेली चकमक. वेस्टर्नपटातील हे नेहेमीचे दृश्य. मात्र कर्क डग्लससारखा अभिनेता असेल तर त्यात गहिरे रंग भरले जातात. डग्लसने रंगवलेला डॉक हॉलिडे हा नुसताच किलर किंवा जूगारी नाही. त्याची प्रेयसी आहे. कधीकधी तिच्यावर सुरी उगारण्याइअतके त्याचे तिच्याशी खटके उडतात. ती देखील मांजरीप्रमाणे त्याच्यावर धावून जाते. डग्लसच्या व्यसनात कुठेतरी नैराश्य आहे, हताशपणा आहे. या माणसाला कसलेतरी दु:ख कुरतडते आहे असे आपल्याला वाटत राहते. मात्र हातात गन असली की त्याचे विचार अगदी स्वच्छ आहेत. कसलाही गोंधळ त्याच्या मनात नाही. मित्रासाठी जीव देणे इतकेच त्याला ठावूक आहे. नेमके हेच मार्शल अर्पला आवडते. त्यामुळे आपल्या भावांचा विरोध पत्करूनदेखील तो डॉकशी मैत्री करतो.

मार्शल अर्पचा बेडर स्वभाव सर्व चित्रपटांमध्ये दाखवला आहे. हा चित्रपटदेखील त्याला अपवाद नाही. कितीही माणसे समोर असु देत अर्प निधड्या छातीने सामोरा जातो. तत्त्वांसमोर त्याला प्रेयसीची पर्वा नाही. दु:ख होते पण तडजोड नाही. लंकस्टरचा अर्प हा लोभस आहे. कारण लंकास्टरचे व्यक्तीमत्व तसे आहे. हा सरळसोट स्वभावाचा मार्शल आपल्या प्रेयसीलासुद्धा जूगार खेळण्याच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकायला कचरत नाही. "गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल" मध्ये आठवणीत राहणारी अशी अनेक दृश्ये आहेत. १९५७ च्या या चित्रपटाने मला त्याकाळच्या आपल्या वैभवशाली प्रभातची आठवण होते. विषयानुरूप आणि कुठेही कृत्रिम वाटणार नाही असे सेट्स असायचे. दरबार म्हणजे दरबारच वाटणार. अगदी तसेच विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या खेड्याचे वातावरण दाखवले आहे.

यात दोन्ही नायकांना आपापल्या नायिका आहेत. लंकास्टर आणि डग्लस हे दोघेही कसलेले अभिनेते त्यांना मिळालेल्या सीनचे सोने करतात. स्टार ट्रेक मालिहेतील डॉक्टर मकॉय हा देखील या चित्रपटात अर्पचा भाऊ म्हणून येतो. र्होन्डा फ्लेमिंग ही अतिशय देखणी नायिका लंकास्टरसमोर आहे. आपण ज्याच्या प्रेमात पडलो तो माणुस मार्शल असून उठता बसता मृत्युच्या छायेत वावरतो हे सहन न होणारी आणि म्हणून निघून जाणारी तिची प्रेयसी कुठेतरी पटते. त्याचवेळी अर्पचे तत्त्वाला चिकटून राहणे देखील भावते.

अशा तर्‍हेची अनेक आंदोलने या विषयावर निघालेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये आढळतात. इतिहासकारांमध्ये, लोकांमध्ये या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. मात्र त्यावर निघालेले चित्रपट अतिशय रंजक आहेत हे नक्की.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाईट अ‍ॅफ दि ओ के करॅल बरोबर कॉस्नर (वाय्ट अर्प) आणि कर्ट रसल (टुंबस्टोन) या दोघांनी साकारलेले वाय्ट अर्प आवडलेले. चित्रपट निर्मितीत नविन टेक्नॉलॉजीचा खुबीने होणारा वापर वेस्टर्न क्लासिक्सना वेगळ्याच लेवलला नेउन ठेवतो. एकाच कथानकावर आधारलेले वाय्ट अर्प आणि टुंबस्टोन हे याचं बोलकं उदाहरण आहे.

साधारण वाय्ट अर्पच्याच काळात अजुन एक इन्फेमस आउटलॉ होता - बिली द किड. त्याच्यावर आधारलेले यंग गन्स १/२ हे चित्रपट हि मस्त आहेत...